::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 08 /07 /2020)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्त्याने वि.प. क्र 1 यांचेकडून त्यांची नात नामे अंकिता प्रकाश फटिंग हिच्या नावाने दिनांक 10/7/1998 रोजी राजलक्ष्मि युनिट प्लान(2) आरयुपी (2) चे एकुण 500 युनिट प्रति युनिट 10 रुपयेप्रमाणे एकुण रू.5,000/- चे युनिट खरेदी केले होते. सदर युनिटची परिपक्वता तिथी 10/7/2017 व परिपक्वता तिथीला एकुण गुंतवणूक रक्कम रु. 5,000/- च्या 14 पट म्हणजे रु. 70,000/- देण्याचे वि.प.ने मान्य केले होते. तक्रारकर्त्याने परिपक्वता तिथी दिनांक 10/7/2017 व नंतर दिनांक 28/11/2017 रोजी उपरोक्त 500 युनिटच्या परिपक्वता रक्कमेची मागणी केली असता वि.प. यांनी तक्रारकर्त्याला दिनांक 28/12/17 च्या पत्रानुसार फक्त रु. 10,580/- अधिक रु. 3,545.67/- एवढयाच रक्कमेचे भुगतान केले व सदर पत्रान्वये तक्रारकर्त्यास उपरोक्त योजना दिनांक 31/3/2004 रोजी बंद केल्याचे व तसे तक्रारकर्त्यास त्याच्या पत्यावर कळविले होते व जाहिर सुचनासुद्धा दिली होती. परंतु तक्रारकर्त्याचा पुर्वीचाच पत्ता कायम असताना सुध्दा तक्रारकर्त्यास कोणतीही सुचना तसेच जाहिरसुचनेची माहिती सुध्दा मिळाली नाही. वि.प. यांनी तक्रारकर्त्यास रु.70,000/- व त्यावरील व्याज देणे बंधनकारक असतांनासुध्दा फक्त रु. 14,045/- एवढीच रक्कम दिल्याने व उर्वरीत रक्कम देण्यास नकार देऊन आवश्यक सेवा न दिल्याने तक्रारकर्त्याचे नुकसान झाले. सबब तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांविरुध्द मंचासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्यांस रक्कम रु. 80,955/- व त्यावर तक्रार दाखल तारखेपासून 12 % व्याज तसेच तक्रार खर्च तक्रारकर्त्याला दयावा अशी विनंती केली.
3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पक्षांविरुध्द नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष क्र.1 हजर होवून त्यांनी दिनांक 20/7/2018 रोजी नि.क्र.15 वर आपले लेखी म्हणणे दाखल केले असून त्यामध्ये तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन नाकबूल करून पुढे नमूद केले तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष यांचेकडून कुमारी अंकिता प्रकाश फटिंग हिच्या नावाने राजलक्ष्मी युनिट प्लांन अंतर्गत 500 युनिट रुपये 5000 गुंतवून घेतले होते. व त्याची परिपक्वता दिनांक 10/7/2017 होती. परंतु सन 2004 मध्ये विरुद्ध पक्ष यांनी बाजारातील शेअर मार्केटची परिस्थिती, योजनेचा उद्देश आणि गुंतवणूकदारांचे हित विचारात घेऊन सदर राजलक्ष्मी यूनिट प्लान 94 (II) या योजनेमधील नियम व तरतुदीनुसार सदर RUP-94(II) योजना बंद केली व तक्रारकर्त्यासह सदर योजनेतील सर्व गुंतवणूकदारांना त्या योजनेतून बाहेर निघून, तोपावेतो मिळणारे लाभ स्वीकारावे किंवा त्यातील रक्कम दुसरी योजना A. R. S. Bond ज्यामध्ये 6.6 टक्के दराने व्याज मिळण्याची तरतूद आहे, त्यात परावर्तित करून सदर रक्कम गुंतवावी यापैकी जो पर्याय तक्रारकर्त्याला निवडावयाचा असेल तो पर्याय नमूद करून ऑप्शन्स फॉर्म भरून दिनांक 16 /2 /2004 पर्यंत गैरअर्जदार यांना सादर करावेत असे तक्रारकर्त्याला कळविले. परंतु तक्रारकर्त्याला ऑप्शन फॉर्म पाठवूनही त्याने तो भरून विहित मुदतीत सादर केला नाही. त्यामुळे SUUTI यांनी तक्रारकर्त्याने
RUP-94(II) मध्ये गुंतविलेली रक्कम 10,580 . 67/- ही नमूद निर्णयाप्रमाणे ARS bond मध्ये परावर्तित करून ARS बॉंड सर्टिफिकेट क्रमांक 31684889( ID No. 164049426) विरुद्ध पक्ष यांचेकडे नोंदणीकृत असलेल्या तक्रार कर्त्याच्या नानाजी नगर, नागपुर रोड, चंद्रपुर पत्त्यावर पंजीकृत डाकेने पाठविले. व त्यासोबतच राजलक्ष्मी युनिट योजना 94 (II) संपुष्टात आली तो दिनांक 31/3/2004 पर्यंतचे वार्षिक विवरण देखील, तक्रारकर्त्याला पाठविले. मात्र सदर योजनेत तक्रारकर्त्याला देय असलेले व्याज रक्कम रुपये 3,545. 67/- तक्रारकर्त्या कडून मूळ प्रमाणपत्र मिळालेले नसल्यामुळे पाठविता आले नाही विरुद्ध पक्ष हे तक्रारकर्त्या कडून पत्रोत्तराची वाट बघत होते. मात्र विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्तायांचा त्यांचेचेकडे असलेल्या नोंदणीकृत पत्त्यावर दिनांक 7 /4/ 2004 रोजी पाठविलेले पत्र तक्रारकर्त्याला प्राप्त न होता परत आले. त्यामुळे विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्त्याला पुन्हा दिनांक 18 /12 /2008 दिनांक 22/ 2/ 2012 व दिनांक 6/ 5/ 2016 रोजी याप्रमाणे 3 वेळा तक्रारकर्त्याच्या नोंदणीकृत पत्त्यावर पत्र पाठवून पत्ता बदलला असल्यास नाव पत्ता व बँकेचे खात्याची माहिती पुरवण्यास सांगितले.
4. तक्रारकर्त्याकडून दिनांक 22/9/ 2017 रोजी विरुद्ध पक्ष यांना नवीन नावाने व bond holder चा नवीन पत्ता नमूद केलेले, परिपक्वता रकमेची मागणी करणारे पत्र प्राप्त झाले. त्यात bond holder चे नाव अंकिता प्रकाश फटिंग ऐवजी विशाखा प्रकाश फटिंग व नवीन पत्ता “मानसी अपार्टमेंट क्र.1, फ्लॅट क्रमांक बि 2 साई मंदिर रोड सिव्हिल लाइन्स, चंद्रपुर”असा नमूद होता. त्यामुळे विरुद्ध पक्ष यांनी दिनांक 5 /10/ 2017 रोजी तक्रारकर्त्याला पत्र लिहून नावातील तसेच पत्त्यातील बदल याबाबत बॉंड होल्डर चे शपथपत्र दाखल करावे असे सुचविले. तक्रारकर्त्याने दिनांक 31 /10 /2017 रोजी सदर बाबींची पूर्तता केल्यानंतर विरुद्ध पक्ष यांनी परिपक्वता रक्कम रुपये 10, 500/- व व्याजाची रक्कम रुपये 3,545. 67/- तक्रारकर्त्याच्या बचत खाते क्रमांक 3326333047 मध्ये जमा केली व ती प्राप्त झाल्याबद्दल बॉन्ड धारकाने पोच सुद्धा दिली. तक्रार कर्त्याने बदललेले नाव तसेच बदललेला पत्ता याबाबत विरुद्ध पक्ष यांना वेळीच सूचना न दिल्यामुळे तक्रारकर्त्याला सदर रक्कम प्राप्त होऊ शकली नाही त्यामुळे विरुद्ध पक्षांनी कोणतीही न्यूनता पूर्ण सेवा दिलेली नाही सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी अशी त्यांनी मंचास विनंती केली आहे.
5. विरूध्द पक्ष क्र.2 यांना मंचाचा नोटीस प्राप्त होवूनदेखील ते मंचासमक्ष प्रकरणात उपस्थीत न झाल्यामुळे मंचाने दिनांक18/12/2018 रोजी त्यांचेविरूध्द नि.क्र.1 वर प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारीत केला.
6. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज,तक्रारअर्ज व दस्तावेजांनाच तक्रारकर्त्याचा पुरावा समजण्यांत यावा अशी नि.क्र.26 वर पुरसीस दाखल, तसेच विरूध्द पक्ष क्र.1चे लेखी म्हणणे, दस्तावेज ,तसेच लेखी उ्त्तर व दस्तावेजांनाच रिजॉईंडर समजण्यात यावे आणी लेखी उत्तर, दस्तावेज आणी रिजॉईंडर यालाच वि.प.क्र.1 यांचा लेखी युक्तीवाद समजण्यात यावा अशी अनुक्रमे नि.क्र.27 व 28 वर पुरसीस दाखल, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व वि.प.क्र.1 यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरूध्द पक्षांचा ग्राहक आहे काय ? : होय
2) विरूध्द पक्षांनी तक्रारकर्त्याप्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे नाही
काय ? :
3) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे
काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबतः-
7. तक्रारकर्त्याने निशाणी क्रमांक 2 वर दाखल केलेल्या गुतवणुक प्रमाणपत्रांच्या प्रती वरून तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्षांचेकडून कुमारी अंकिता प्रकाश फटिंग हिच्या नावाने राजलक्ष्मी युनिट प्लांन 94 (II)अंतर्गत 500 युनिट रुपये 5000/- गुंतवून घेतले होते. व त्याची परिपक्वता दिनांक 10/7/2017 होती हे सिद्ध होते. शिवाय विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांनी देखील ही बाब मान्य केली असल्यामुळे तक्रारकर्ता हा विरुद्ध पक्षांचा ग्राहक आहे ही बाब सिद्ध होते. सबब मुद्दा क्रमांक 1चे उत्तर होकारार्थी नोंदवण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2 बाबत
8. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष यांचेकडून कुमारी अंकिता प्रकाश फटिंग हिच्या नावाने राजलक्ष्मी युनिट प्लांन अंतर्गत 500 युनिट रुपये 5,000/- गुंतवून घेतले होते. व त्याची परिपक्वता दिनांक 10/7/2017 होती. परंतु सन 2004 मध्ये विरुद्ध पक्ष यांनी बाजारातील शेअर मार्केटची परिस्थिती, योजनेचा उद्देश आणि गुंतवणूकदारांचे हित विचारात घेऊन सदर राजलक्ष्मी यूनिट प्लान 94 (II) या योजनेमधील नियम व तरतुदीनुसार सदर RUP-94(II) योजना बंद केली व तक्रारकर्त्यासह सदर योजनेतील सर्व गुंतवणूकदारांना त्या योजनेतून बाहेर निघून तो पावेतो मिळणारे लाभ स्वीकारावे किंवा त्यातील रक्कम दुसरी योजना A. R. S. Bond ज्यामध्ये 6.6 टक्के दराने व्याज मिळण्याची तरतूद आहे, त्यात परावर्तित करून सदर रक्कम गुंतवावी यापैकी जो पर्याय तक्रारकर्त्याला निवडावयाचा असेल तो पर्याय नमूद करून ऑप्शन्स फॉर्म भरून दिनांक 16/ 2 /2004 पर्यंतविरुद्ध पक्षांना सादर करावेत व विहित मुदतीत पर्याय सादर न केल्यास जमा रक्कम A. R. S. Bond मध्ये गुंतवितवण्यात येईल असे तक्रारकर्त्याला कळविले.याशिवाय टाइम्स ऑफ इंडिया व इंडियन एक्स्प्रेस या दोन्ही वर्तमानपत्रांमध्ये सदर योजना बंद करतआहे याबाबत जाहीर नोटीस प्रसिद्ध केली . परंतु तक्रारकर्त्याला नोंदणीकृत पत्त्यावर ऑप्शन फॉर्म पाठवूनही त्याने तो भरून विहित मुदतीत सादर केला नाही. त्यामुळे SUUTI(Specified Undertaking of Unit Trust of India) यांनी तक्रारकर्त्याने RUP-94(II) मध्ये गुंतविलेली रक्कम 10,580.67/- ही नमूद निर्णयाप्रमाणे ARS bond मध्ये परावर्तित करून ARS बॉंड सर्टिफिकेट क्रमांक 31684889( ID No. 164049426) विरुद्ध पक्ष यांचेकडे नोंदणीकृत असलेल्या तक्रारकर्त्याच्या नानाजी नगर, नागपुर रोड, चंद्रपुर पत्त्यावर पंजीकृत डाकेने पाठविले व त्यासोबत राजलक्ष्मी युनिट योजना 94 (II) संपुष्टात आली तो दिनांक 31/3/2004 पर्यंतचे वार्षिक विवरण देखील, तक्रारकर्त्याला पाठविले. सदर पत्ता हा वि.प यांनी तक्रारकर्त्यास दिलेल्या राजलक्ष्मी युनिट योजनाप्रमाणपत्रावर सुद्धा नमूद आहे मात्र सदर योजनेत तक्रारकर्त्याला देय असलेले व्याज रक्कम रुपये 3,545. 67/- तक्रारकर्त्याकडून मूळ प्रमाणपत्र मिळालेले नसल्यामुळे पाठविता आले नाही विरुद्ध पक्ष हे तक्रारकर्त्याकडून पत्रोत्तराची वाट बघत होते. मात्र विरुद्धपक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या त्यांचेकडील नोंदणीकृत पत्त्यावर दिनांक 07/04/ 2004 रोजी पाठविलेले पत्र तक्रारकर्त्याला प्राप्त न होता परत आले. त्यामुळे विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्त्याला पुन्हा दिनांक 18 /12 /2008 दिनांक 22 /2/ 2012 व दिनांक 6/ 5/ 2016 रोजी याप्रमाणे 3 वेळा तक्रारकर्त्याच्या नोंदणीकृत पत्त्यावर पत्र पाठवून पत्ता बदलला असल्यास नाव पत्ता व बँकेचे खात्याची माहिती पुरवण्यास सांगितले. याबाबतचा पत्रव्यवहार, पोस्टाने परत आलेले लिफाफ्यांसह याशिवाय टाइम्स ऑफ इंडिया व इंडियन एक्स्प्रेस या दोन्ही वर्तमानपत्रामध्ये सदर योजना बंद करण्याबाबत जाहीर प्रसिद्ध केल्याचे कात्रण विरुद्ध पक्षयांनी प्रकरणात दाखल केलेले आहेत.
9. तक्रारकर्त्याकडून दिनांक 22/9/ 2017 रोजी विरुद्ध पक्ष यांना नवीन नावाने व bond holder चा नवीन पत्ता नमूद केलेले, परिपक्वता रकमेची मागणी करणारे पत्र प्राप्त झाले. त्यात bond holder चे नाव अंकिता प्रकाश फटिंग ऐवजी विशाखा प्रकाश फटिंग व नवीन पत्ता मानसी अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक बि2 साई मंदिर रोड सिव्हिल लाइन्स चंद्रपुर असा नमूद होता. त्यामुळे विरुद्ध पक्ष यांनी दिनांक 5/ 10 /2017 रोजी तक्रारकर्त्याला पत्र लिहून नावातील तसेच पत्त्यातील बदल याबाबत बॉंड होल्डर चे शपथपत्र दाखल करावे असे सुचविले. तक्रारकर्त्याने दिनांक 31/ 10 /2017 रोजी सदर बाबींची पूर्तता केल्यानंतर विरुद्ध पक्ष यांनी परिपक्वता रक्कम रुपये 10,500/- व व्याजाची रक्कम रुपये 3,545. 67 तक्रारकर्त्याच्या बचत खाते क्रमांक 3326333047 मध्ये जमा केली व ती प्राप्त झाल्याबद्दल बॉन्ड धारकाने पोच सुद्धा दिलीव तक्रारीमध्येसुद्धा मान्य केले. तक्रारकर्त्याने बदललेले नाव तसेच बदललेला पत्ता याबाबत विरुद्ध पक्षांना वेळीच सूचना न दिल्यामुळे तक्रारकर्त्याला सदर रक्कम प्राप्त होऊ शकली नाही त्यामुळे विरुद्धपक्षांनी तक्रारकर्त्याप्रति कोणतीही न्यूनता पूर्ण सेवा दिलेली नसून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यायोग्य आहे या निष्कर्षाप्रत हे मंच आलेले आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 3 बाबत
10. वरील मुद्दा क्रमांक 1व 2 मधील निष्कर्षांच्या आधारे मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार क्रमांक 24/2018 खारीज करण्यात येते.
2. उभय पक्षांनी आपआपला खर्च सोसावा.
3. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे) (श्रीमती. कीर्ती वैदय (गाडगीळ) (श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.