::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, उमेश वि. जावळीकर मा. अध्यक्ष
१. सामनेवाले यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. अर्जदार संस्थेने त्यांचे मालकीचे मौजा खुटाळा गावातील सर्व्हे नं. ९७ आराजी २.०८ हे.आर. शेतजमिनीची अति तातडीने मोजणी करण्याकरीता गैरअर्जदाराकडे अर्ज केला होता. त्याप्रमाणे मोजणीची रक्कम रु. ९०,०००/- दिनांक २८.०८.२०१४ रोजी गैरअर्जदार क्र. २ कउे जमा केली होती. गैरअर्जदार क्र. २ यांनी सदर रक्कम स्विकारली. परंतु खुटाळा येथिल खसरा नं. ९७ हे ग्रामपंचायत कोसारा अंतर्गत येत असुन गैरअर्जदार क्र. २ यांनी सदर जागा महानगरपालीका हद्दीत येते असे समजुन सदर रक्कम अर्जदाराकडुन वसुल केली. अर्जदाराने महानगरपालीकेकडुन दिनांक ०५.११.२०१४ रोजी माहिती प्राप्त केली असता दिनांक २७.११.२०१४ चे पत्रान्वये महानगरपालीकेने सदर जागा महानगरपालीकेच्या हद्दीत येत नाही असे कळविले. त्यामुळे अर्जदारांनी दिनांक ०१.१२.२०१४ रोजी रक्कम परत मिळण्याबाबत गैरअर्जदार क्र. २ कडे विनंती केली. परंतु गैरअर्जदार क्र. २ यांनी दिनांक १४.०३.२०१४ रोजीचे पत्राप्रमाणे स्विकारलेली रक्कम ही शासनाच्या अंतिम अधिसुचना प्रसिध्दीवर अवलंबुन आहे. जर अंतिम अधिसुचना मध्ये वगळण्यात आल्यास रक्कम परत देण्याबाबत विचार करता येईल असे कळविले. त्यानंतर दिनांक ०८.०५.२०१५ रोजी अर्जदारने गैरअर्जदार क्र. १ व जिल्हाधिकारी, चंद्रपुर नोटीस पाठवुन जादा रक्कम परत मागीतली परंतु गैरअर्जदार क्र. १ यांनी दिनांक ०६.०७.२०१५ रोजी पुर्वी दिल्याप्रमाणे उत्तर देवुन रक्कम परत दिली नाही त्यामुळे अर्जदाराने दिनांक ३१.०५.२०१६ रोजी माहिती अधिकारा अंतर्गत गैरअर्जदार क्र. २ कडे माहिती मागीतली असता गैरअर्जदार क्र. २ यांनी अर्जदारास सर्व्हे क्र. ९७ महानगरपालीका क्षेत्रात येत नसुन साधारण मोजणी फी १५,०००/- व तातळीची मोजणी फी ४५,०००/- भरण्यास सांगीतले. त्याप्रमाणे अर्जदाराने मौजा खुटाळा गांव महानगरपालीकेत समाविष्ठ नसल्याने गैरअर्जदार क्र. २ यांनी तातळीची मोजणी फी रक्कमरु. ४५,०००/- घेणे आवश्यक होते. परंतु गैरअर्जदार क्र. १ यांनी अर्जदाराकडुन रक्कम रु. ९०,०००/- स्विकारुन अर्जदारास सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केला असुन अतिरीक्त घेतलेली रक्कम रु. ४५,०००/- दिनांक २८.०५.२०१४ पासुन १२ टक्के व्याजासह परत करावी व तक्रार, शारीरीक, मानसिक त्रासापोटी रुक्क्म रु. २०,०००/- व तक्रार खर्चासाठी ५,०००/- यासह मान्य करावी, अशी विनंती तक्रारीत अर्जदारानी केली आहे.
३. सामनेवाले क्र. १ व २ यांनी अर्जदाराने केलेल्या तक्रारीतील कथनाचे खंडन केलेले असुन अर्जदार गुरुकुल गृहनिर्माण भाडेकरु मालकी हक्क,सहकारी संस्था मर्या. चंद्रपुर र.नं. १२६ तर्फे अध्यक्ष ज्ञानेश्वर लक्ष्मणराव महाजन यांनी दिनांक २८.०८.२०१४ रोजी मोजणीसाठी अर्ज सादर केला होता. चंद्रपुर शहर महानगरपालीका अधिसुचने मधील परिरीष्ठ अ अनुसूची १ व परिरीष्ठ ब अनुसूची २ मध्ये दर्शविल्याप्रमाणे मौजा खुटाळा सर्व्हे नं. १ ते १३६ पावेतो चंद्रपुर शहर महानगरपालीका क्षेत्रात समाविष्ठ आहे. सदर प्रकरणी शासनाकडुन याबाबत अंतिम अधिसुचना प्रसिध्दीवर प्रलंबित आहे व सर्व सामन्यपणे अशी अधिसुचनाही भुतलक्षी प्रभावाने मान्य होत असते किंवा दुस-या शब्दात प्राथमीक अधिसुचना हीच अंतिम अधिसुचना असते. अर्जदार यांनी मा. जिल्हाधिकारी, चंद्रपुर यांचेकडे दिनांक ०८.०५.२०१५ रोजी नोटीस पाठविली असुन सदर नोटीसीचे जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख यांचेकडुन दिनांक ०६.०७.२०१५ रोजी लेखी उत्तर देण्यात आलेले आहे. सदर अधिसुचनेनुसार मौजा खुटाळा येथिल सर्व्हे क्र. १ ते १३६ मध्ये सर्व्हे क्र. ९७ त्यामधिल असल्याने अर्जदाराकडुन आकारलली फी बरोबर आहे. सामनेवाले क्र. १ चे म्हणने असे कि, सदर अर्जदाराने महानगरपालीकेकडील दिनांक २७.११.२०१४ चे पत्र मोजणी करण्याअगोदर सादर केले असते तर सदर अर्जाचा विचार केला जाउ शकत होता, परंतु अर्जदाराच्या मौजा खुटाळा येथिल सर्व्हे क्र. ९७ ची मोजणी पुर्ण झालेली असुन अर्जदाराला मोजणीची ‘क ‘ प्रत सुध्दा दिलेली आहे. अर्जदार व सामनेवाले यांच्यात ग्राहक व विक्रेता या तत्वानुसार संबंध प्रस्तावित होउ शकत नाही. सामनेवाले क्र. १ व २ हे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनीयम १९६६ चे कलमा अंतर्गत कार्य करणारे असुन सामनवाले क्र. १ हे नियंत्रण अधिकारी व सामनेवाले क्र. २ हे शासकीय सेवा पुरविणारे क्षेत्रिय स्तरावरील कार्यालय आहे. महानगरपालीका क्षेत्राचे दरानुसार केलेली मोजणी फी आकारणी अचुक आहे. सबब तक्रार खर्चासह अमान्य करावी.
६. तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद व सामनेवाले क्र. १ व २ यांचे लेखी म्हणने, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दे निष्कर्ष
१. सामनेवाले क्र. १ व २ यांनी मोजणी सेवासुविधा
पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार सिद्ध
करतात काय ? होय
२. सामनेवाले क्र. १ ते ३ वैयक्तीक व संयुक्तीकपणे
तक्रारदारास नुकसान भरपाई अदा करण्यास पात्र
आहेत काय ? होय
४. आदेश ? अंशतः मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ व २ :
५. अर्जदार संस्थेने दिनांक २८.०८.२०१४ ला मोजणी अर्ज सामनेवाले क्र. १ कडे सादर केलेला आहे. अर्जदाराने सामनेवाले क्र. १ यांचेकडे अतितातडीची फी रक्कम रु. ९०,०००/- सामनेवाले क्र. १ कडे जमा केली व ती सामनेवाले क्र. १ यांनी स्विकारली. अर्जदार यांनी मौजा खुटाळा हे गांव ग्रामपंचायत कोसारा यांच्या हद्दीत असुन ती महानगरपालीका क्षेत्रात येत नाही हे अर्जदाराने महानगरपालीकेचे पत्र दिनांक २१.११.२०१४ अन्वये सदर क्षेत्र हे महानगरलीका क्षेत्रात नसुन ग्रामपंचायत क्षेत्रात येत असल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. मुंबई प्रांतिक महानगीपालीका अधिनीयम १९४९ मधिल कलम ३ चे अवलोकन केले असता उपकलम ३ मध्ये महानगरपालीकेची हद्दीबाबतचे अधिसुचना प्रकाशित करण्याचा अधिकार शासनाचा आहे. त्याप्रमाणे प्रस्तुत तक्रारीमध्ये शासनानी मौजा खुटाळा या गावांच्या समायोजनासाठी अधिसुचना काढली असली तरी सदर अधिसुचनेस अंतिम मंजुरी मिळाली नसल्याने तो पर्यंत अर्जदाराकडुन महानगरपालीका हद्दीतील दराप्रमाणे जमीन मोजणीची फी आकारणी करणे न्यायोचिࠀत नसुन मौजा खुटाळा सर्व्हे क्र. ९७ ही जागा ग्रामपंचायत, कोसारा मध्ये समाविष्ठ आहे. तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केल्याची बाब सिध्द होते. सबब सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी तक्रारदारास सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब सिध्द झाल्याने व परिणामी तक्रारदारास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला आहे ही बाब सिध्द झाल्याने मुद्दा क्रं. १ व २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र. ४ :
७. मुद्दा क्रं. १ व २ वरील विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. ८९/२०१६ अंशतः मान्य करण्यात येते.
२. सामनेवाले क्र. १ व २ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे तक्रारदार
यांना जमीन मोजणी नियमावली कराराप्रमाणे, ग्राहक संरक्षण अधिनियम
अन्वये तरतुदीनुसार,सेवासुविधा पुरविण्यात कसुर केल्याची बाब जाहीर
करण्यात येते.
३. सामनेवाले क्र. १ व २ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे तक्रारदार
यांना जमीन मोजणी नियमावली कराराप्रमाणे रक्कम रुपये ४५,०००/-
दिनांक ३०.०८.२०१४ पासून अदा करेपर्यंत द.सा.द.से. ६% व्याजासह
तक्रारदार यांना अदा करावी.
४. सामनेवाले क्र. १ व २ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे तक्रारदार
यांना जमीन मोजणी नियमावली कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात
कसूर करुन तक्रारदार यांना मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासापोटी व
तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु.२०,०००/- या आदेशप्राप्ती
दिनांकापासून ३० दिवसात तक्रारदार यांना अदा करावे.
५. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमत श्रीमती.कल्पना जांगडे श्रीमती. किर्ती गाडगीळ श्री.उमेश वि. जावळीकर
(सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष)