अर्जदार तर्फे वकील - श्री.शिवराज पाटील
गैरअर्जदार तर्फे वकील - श्री.एन.एन.कागणे
निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री. आर.एच.बिलोलीकर, सदस्य)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार सुभाष गंगाधर स्वामी हा प्राध्यापक असून गांधीनगर,देगलूर येथे त्यांनी घर बांधलेले आहे. सन2011-12 मध्ये अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून प्लायवुड,सनमायका,फर्निचर खरेदी केले. सदर प्लायवुड,सनमायका,फर्निचर खरेदी करीत असतांना गैरअर्जदार यांनी ते उत्तम व टिकाऊ असल्याचे सांगितले. गैरअर्जदार यांचे शब्दावर विश्वास ठेऊन अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून प्लायवुड,सनमायका इत्यादी खरेदी केले. सदर प्लायवुड खरेदी केल्यानंतर त्याचा वापर फर्निचर बनविणेसाठी व इतर कामासाठी केला. परंतु सदरील प्लायवुड,सनमायका हे 5-6 महिन्याच्या आतच खराब झाले. त्यातच काही फर्निचरला किड लागून त्यातून सतत पावडर पडत होती. सनमायका फुगले होते तर फर्निचर चिरले व तुटले. त्यामुळे अर्जदारास मानसिक त्रास झाला. अर्जदार यांनी दिनांक 07.07.2013 रोजी पोलीस स्टेशन देगलूर येथे फिर्याद दिली तेव्हा पोलीसांनी योग्य त्या न्यायालयात दाद मागणेसाठी कळविले. म्हणून अर्जदार यांनी मंचात तक्रार दाखल केलेली आहे व मंचास विनंती केलेली आहे की, अर्जदारास झालेल्या नुकसानीबद्दल व मानसिक व शारिरिक त्रासाबद्दल तसेच दावाखर्च इत्यादी मिळून अर्जदारास रक्कम रु.3,00,000/- गैरअर्जदार यांचेकडून देण्याचा आदेश करावा.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर वकीलामार्फत ते तक्रारीत हजर झाले व गैरअर्जदार यांनी आपला लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेला आहे.
गैरअर्जदार यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. अर्जदार यांनी प्रस्तुतचे प्रकरण हे काल्पनिक मुद्यावर आधारीत तयार केलेली बनावट तक्रार आहे व त्यात गैरअर्जदार यांचा कोणताही दोष नसल्या कारणाने त्यांचेविरुध्द हे प्रकरण खारीज करण्यात यावे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे तक्रारीतील परिच्छेद क्रमांक 2 मधील मजकूर खोटा व चुकीचा असल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदार हा युसूफ †òन्ड कंपनी या नावाने प्लायवुडची विक्री करतो. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे हे म्हणणे अमान्य केलेले आहे की, अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून सन 2011-12 मध्ये मध्ये प्लायवुड,सनमायका,फर्निचर खरेदी केले. तसेच सदर प्लायवुड,सनमायका,फर्निचर खरेदी करीत असतांना गैरअर्जदार यांनी ते उत्तम व टिकाऊ दर्जाचे आहे असे सांगितले. उलट अर्जदार हा खरेदी करीत असलेल्या प्लायवुडची कोणतीही गॅरंटी अथवा वारंटी नाही, ते लोकल दर्जाचे आहे असे स्पष्टपणे सांगितले होते. परंतु अर्जदाराने त्यांना फक्त तात्पुरत्या स्वरुपात ते पाहिजे असे सांगून खरेदी केले. अर्जदाराचे हे म्हणणे चुकीचे आहे कही, त्यांनी गैरअर्जदाराकडून रक्कम रु.2,75,000/- प्लायवुड,सनमायका,फर्निचर खरेदी केले. अर्जदार यांनी परिच्छेद क्रमांक 3 मध्ये नमूद केलेल्या पावत्या हया खोटया व चुकीच्या आहेत व बोगस पावत्या प्रकरणात दाखल केलेल्या आहेत. तसेच गैरअर्जदार यांचेविरुध्द पुरावा निर्माण करता यावा म्हणून पोलीस स्टेशनला खोटी फिर्याद दिलेली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास कोणतीही सेवेत त्रुटी दिलेली नाही व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. उलट अर्जदार हा गैरअर्जदारास कारवाईमध्ये गुंतवून दबाव आणून त्यांचेकडून मोठया रक्कमेची मागणी करीत आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे तक्रारीतील बहूतांश कथन अमान्य केलेले आहे व मंचास विनती केलेली आहे की, गैरअर्जदार विरुध्द अर्जदार यांनी खोटी तक्रार करुन त्यांना बचाव करणेस भाग पाडल्यामुळे रक्कम रु.10,000/- चे खर्चासह सदरील तक्रार फेटाळण्यात यावी.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक होता हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या पावत्यांवरुन स्पष्ट आहे. अर्जदाराची मुख्य तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेले प्लायवुड व सनमायका हे निकृष्ठ दर्जाचे निघाल्यामुळे अर्जदाराचे नुकसान झाले. गैरअर्जदार यांनी त्यांचे जबाबात त्यांनी अर्जदारास विकलेल्या प्लायवुडची क्वालीटी बद्दल असे म्हटले आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास सदर प्लायवुडची कोणतीही गॅरंटी अथवा वारंटी दिलेली नाही. तसेच ते लोकल क्वालीटीचे आहे. म्हणजेच गैरअर्जदार यांनी अर्जदारास विकलेल्या प्लायवुडची क्वालीटी निकृष्ठ दर्जाची होती हे मान्य केलेले आहे. अर्जदार यांनी दाखल केलेल्या फोटोवरुन त्याला पुष्टी मिळत आहे. गैरअर्जदाराने आपल्या जबाबात असेही म्हटले आहे की, तो युसूफ †òन्ड कंपनी या नावाने प्लायवुडची विक्री करतो. त्याचवेळी गैरअर्जदार हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या युसूफ †òन्ड कंपनीच्या पावत्या हया अमान्य करतो व ते बोगस असल्याचे म्हणतो. त्याचे कारण असे दिसते की, गैरअर्जदाराने अर्जदारास बिलाच्या ऐवजी estimate असे शिर्षक असलेल्या पावत्या दिल्या. परंतु सदर estimate शिर्षकांच्या पावत्यांचे बारकाईने अवलोकन केले असता असे दिसते की, गैरअर्जदाराने त्यात bal म्हणजेच येणे असलेल्या रक्कमेचा व जमा असलेल्या रक्कमेचा उल्लेख केलेला आहे. यावरुन गैरअर्जदाराने अर्जदारास त्याने केलेल्या व्यवहाराबद्दल estimate हया शिर्षक असल्याच्या पावत्या दिलेल्या आहेत. असे करुन गैरअर्जदाराने अर्जदारास योग्य बिले दिलेली नाहीत हे स्पष्ट होत आहे. गैरअर्जदाराने सदरचे कृत्य हे कर वाचविणेसाठी केलेले दिसते. तसेच गैरअर्जदाराने असे करुन ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(r) प्रमाणे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. अर्जदार यांनी तक्रारीच्या पृष्ट्यर्थ पुरावा म्हणुन बाबुराव विठ्ठलराव पांचाळ, प्लायवुड कारागीर यांचे शपथपत्र व संदीप किसनराव कांबळे,फोटोग्राफर यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे. प्लायवुड कारागीर यांनी दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये बाबुराव पांचाळ यांनी अर्जदाराच्या घरातील फर्निचरचे काम केलेले आहे. सदरील घरातील फर्निचर हे कीड लागलेले आढळून आले. सदरील फर्निचरचे काम करतांना वापरण्यात आलेले प्लायवुड हे निकृष्ठ दर्जाचे असल्याने खराब झालेले आहे असे नमूद केलेले आहे. तसेच फोटोग्राफर यांनीही अर्जदाराचे घरातील फर्निचरचे फोटे काढले असल्याचे शपथपत्र दिलेले आहे. वरील दोन्ही बाबींचे अवलोकन केले असता अर्जदाराचे घरातील फर्निचर हे खराब झालेले असल्याचे निदर्शनास येते.
अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून रक्कम रु.2,75,000/- चा माल विकत घेतल्याचे म्हटले आहे. परंतु अर्जदाराने युसूफ †òन्ड कंपनीच्या रक्कम रु.1,54,660/- च्या पावत्या मंचात दाखल केलेल्या आहेत. गैरअर्जदाराने अर्जदारास निकृष्ठ दर्जाचे प्लायवुड विकून अर्जदारास मानसिक त्रास दिलेला आहे. म्हणून अर्जदार हा त्याला झालेल्या नुकसानीची भरपाई व झालेल्या मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई गैरअर्जदार यांचेकडून मिळणेस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास रक्कम रु.1,54,660/- दिनांक 04.10.2013 पासून रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 7 टक्के व्याजासह आदेश कळाल्यापासून तीस दिवसाच्या आत द्यावेत.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदार यास सेवेत त्रुटी दिल्याबद्दल मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.3000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.