::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :-08/05/2019)
१. अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. गैरअर्जदाराने पाणीपुरवठा न करून सेवेत न्युनता केल्यामुळे सदर तक्रार अर्जदाराने दाखल केलेली आहे. अर्जदाराच्या राहत्या घरात अर्धा इंची पाइपलाइन असलेला घरगुती नळाला पाणी येणे बंद झाल्यामुळे पुणे गैरअर्जदार क्र. 1 यांना दिनांक 22/1/2018 रोजी पत्र दिले. त्यानुसार गैरअर्जदार क्र. 1 श्री. अतुल रामटेके यांनी पाहणी केली, परंतु नळाला पाणी येईल अशी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही व त्याबद्दल गैरअर्जदार क्र. 1 यांनी काहीही कळविलेदेखील नाही. सबब अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांना दिनांक 29/1/2018 रोजी पत्र दिले. त्यानुसार दिनांक 30/1/2018 रोजी श्री भोयर, झोन प्रमुख यांनी मोका पाहणी केली परंतु त्यानंतरही नळाला पाणी येईल अशी व्यवस्था केली नाही. शेवटी अर्जदाराने दिनांक 8/3/2018 रोजी गैरअर्जदार क्र. 2, मनपा आयुक्त यांना पत्र दिले व त्यानंतर दिनांक 10/03/2018 ला झोन प्रमुख मोका तपासणीसाठी आले. त्यात त्यांनी कनेक्शन कापण्यात आलेले असल्यामुळे कनेक्शन चार्जेस भरून दुरुस्तीचे काम करण्यात यावे असे त्यांनी पत्राद्वारे अर्जदाराला कळविले. अर्जदाराने सदर दुरुस्तीसाठी किती चार्जेस लागतील असे झोन प्रमुख यांना विचारले असता रू. 1800/- पर्यंत लागेल असे अर्जदाराला सांगितले परंतु खर्चाबाबत सविस्तर माहिती दिली नाही. अर्जदाराने पुढे नमूद केले की 1 ईचीच्या सर्विस पाइपलाइन वरून त्याचे अर्धा इंची पाईपलाईनचे घरगुती नळ कनेक्शन जोडलेले आहे. सदर सर्व्हीस लाईन खराब झाल्यामुळे ती बंद करण्यांत आली असून अर्जदाराची घरगुती पाईपलाईन मुळीच बंद करण्यात आलेली नाही त्यामुळे अर्जदाराने खर्च कां सोसावा अशी अर्जदाराने विचारणा केली असता, तुमच्या नळाला पाणी पुरवठा सुरळीत पाहिजे असेल तर तुम्हाला पैसे भरावे लागतील असे गैरअर्जदारांनी उत्तर दिले. त्यामुळे नाईलाजाने अर्जदाराने कार्यालयात जाऊन रू.1800/- चा भरणा केला. परंतु सदर रक्कम भरून सुद्धा कारवाई करण्यात आली नाही. तेव्हा दिनांक 16/3/2018 रोजी गैरअर्जदार क्र. 2 यांना अर्जदाराने पत्र दिले. त्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 यांनी सदर सर्विस पाइपलाइनच्या जोडणीचे काम श्री भोयर प्लंबर यांच्याद्वारे दिनांक 21/3/2018 रोजी करून दिले. परंतु तरी सुद्धा अर्जदाराच्या नळाला पाणी पुरवठा सुरू करण्यात आला नाही. सबब गैरअर्जदार क्र. 1 विरुद्ध 1 व 2 विरुद्ध सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
अर्जदाराची मागणी अशी आहे की अर्जदारास पूर्ववत पाणीपुरवठा होईल अशी व्यवस्था करून देण्याबाबत गैरअर्जदार यांना निर्देश देण्यात यावा तसेच अर्जदारास पाणीपुरवठयापासून वंचीत ठेवल्याबद्दल दावा दाखल केल्यापासून स्वतंत्र नळकनेक्शन घेण्यासाठी येणा-या खर्चाची रक्कम रू.60,000/- व ती अदा करेपर्यंत दसादशे 18 टक्के दराने व्याज देण्याचे आदेश व्हावे तसेच झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रू. 20,000/- व तक्रारीचा खर्चापोटी रू.10,000/- तसेच पाईपलाईन जोडण्यासाठी त्याच्याकडून विनाकारण वसूल करण्यात आले रू.1800/- व्याजासह परत करण्याचे आदेश देण्यांत यावेत.
२. अर्जदाराची तक्रार स्वीकृत करून गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आले.
गैरअर्जदार क्र. 1 यांनी मंचासमक्ष उपस्थित होवून त्यांचे उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराचे तक्रारीतील कथन अमान्य करत असे नमूद केले की अर्जदाराचे नळकनेक्शन त्याने पैसे न भरल्यामुळे कापले असल्यामुळे पैसे भरल्याशिवाय चालू करता येत नाही, असे झोन प्रमुख श्री भोयर यांनी अर्जदारांस सांगितले परंतु तरीही अर्जदाराने पैसे न भरल्यामुळे कनेक्शन पूर्ववत चालू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दाखल केलेली तक्रार व अर्जदाराची कोणतीही मागणी मंजूर करण्याजोगी नाही. अर्जदाराचा अर्ज केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने केलेला असल्यामुळे खारीज होण्यास पात्र आहे.
३. गैरअर्जदार क्र. 2 यांनी मंचात उपस्थीत राहून त्यांचे उत्तर दाखल करीत नमूद केले की गैरअर्जदार क्र. 2 यांनी पाणीपुरवठा तसेच नळाचे पाईपलाईन दुरूस्ती व इतर कामे ही खाजगी कंत्राटदाराला दिलेली दिलेली आहेत व त्यामुळे पाणीपुरवठा करणे पाईपलाईन दुरुस्ती करणे, पाणी कर वसूल करणे व नळ धारकाच्या त्रुट्या किंवा इतर समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारीही गैरअर्जदार क्र. 1 ची आहे व तसा करार गैरअर्जदार क्र. 1 ने गैरअर्जदार क्र. 2 सोबत केलेला आहे. नळाला पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 कडे दिनांक 8/3/2018 केली असता गैरअर्जदार क्र. 2 यांनी गैरअर्जदार क्र. 1 ला तक्रारीचे निराकरण करण्यास कळविले. गैरअर्जदार क्र. 1 यांनी दिनांक 29/3/2018 ला पत्र लिहून कळवले की अर्जदाराचे नाव दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे. परंतु त्यानंतरही तक्रारकर्त्याची तक्रार प्राप्त झाल्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 ने दिनांक 17/4/2018 ला गैरअर्जदार क्र. 1 ला पत्र देऊन तात्काळ तक्रारीचे निवारण करून पाणीपुरवठा सुरळीत करून अहवाल सादर करण्याबाबत कळविले तसेच त्यानंतर पुन्हा पत्र पाठवून अर्जदाराच्या तक्रारीबाबत कारवाई करावी अन्यथा नियम 108 नुसार कार्यवाही करण्यात येईल असे सुचवले. करारानुसार ग्राहकांच्या नळाला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा याची संपूर्ण जबाबदारी गैरअर्जदार क्र. 1 ची आहे गैरअर्जदार क्र. 2 ची नाही व त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्णपणे पार पडली आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 विरुद्ध तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. सबब तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
४.. अर्जदाराची तक्रार, दस्तावेज, शपथपञ, लेखी युक्तीवाद, तसेच गैरअर्जदार क्रं 1 व 2 यांचे लेखीउत्तर, शपथपत्र व लेखी युक्तिवाद, अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(१ ) गैरअर्जदार क्रं. 1 व २ यांनी तक्रारकर्तीस न्युनतापूर्ण
सेवा दिली आहे काय ? होय.
(२ ) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
५ . मुद्दा क्रं. १ व २ बाबत ः-
अर्जदाराची तक्रार दाखल दस्तावेज तसेच अर्जदार क्र. 1 व 2 यांनी केलेले कथन व दस्तऐवज यावरून असे निर्देशनास येतेकी अर्जदाराने त्याचे घरच्या नळाला पाणी येत नसल्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 यांना दिनांक 22/1/2018 रोजी पत्र दिलेअसता गैरअर्जदार क्र. 1 ने स्पॉट पाहणी करून सुद्धा पाणी पुरवठयाची व्यवस्था न केल्यामुळे अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडे दिनांक 16 .3 .2018 रोजी तक्रारअर्ज केला त्यावर गैरअर्जदार क्र. 2 यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना पत्र देऊन दुरुस्तीचे काम त्वरित करण्यास सांगितले. सदर पत्र गैरअर्जदार क्र. 2 यांनी तक्रारीत दाखल केलेले आहे. त्यावर दिनांक 5/4/2018 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांनी गैरअर्जदार क्र.2 ला, अर्जदाराच्या नळाचे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले असून पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला असे कळवले. सदर पत्र निशाणी क्र. 13 दस्त क्र. 2 वर दाखल आहे. पण त्यानंतरही गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराच्या नळाचे दुरुस्तीचे काम करून पाणीपुरवठा चालू केला नाही. सबब अर्जदार यांनी ग्राहक मंचात गैरअर्जदार क्र. 1 व 2 विरुद्ध 29/6/2018 रोजी तक्रार दाखल केल्यानंतर दिनांक 3/10/2018 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांनी पाणीपुरवठा सुरू केला असे अर्जदाराने त्याच्या युक्तिवादात कथन केलेले आहे. वरील सर्व विवेचनावरून मंत्राचे असे मत आहे की गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराकडून पाईपलाईन दुरुस्ती करिता शुल्क घेवूनसुद्धा ती दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू करून दिला नाही. परंतु क्र. 1 यांनी अर्जदाराकडून कनेक्शन दुरूस्तीकरीता रू.1800/- शुल्क स्विकारूनदेखील पाण्यासारखी जीवनावश्यक सेवा देण्यांत हयगय केली ही बाब स्पष्ट होत असल्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.
गैरअर्जदार क्र. 2 यांनी करारानुसार गैरअर्जदार क्र.1 यांना नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी दिलेली आहे व गैरअर्जदार क्र. 2 यांनी त्याप्रमाणे अर्जदाराचा पाणी पुरवठा चालू करण्यासंबंधी गैरअर्जदार क्र. 1 शी पत्र व्यवहारही केला याबद्दल वाद नाही,परंतु कंत्राटी पध्दतीने ग्राहक नागरीकांना पाणीपुरवठा व त्याचेशी संबंधीत देखभाल कामांसाठी नियुक्त केलेले असले तरीदेखील नागरिकांच्या पाणीपुरवठयाची व त्यानुषंगाने सदर काम पहाणा-या गैरअर्जदार क्र.1 चे कामकाजावर नियंत्रण व देखरेख ठेवण्याची प्राथमीक जबाबदारी ही गैरअर्जदार क्र.2 यांचीच आहे. ग्राहक तक्रारदाराला मंचात तक्रार दाखल होईपर्यंत पाणीपुरवठयासारख्या जिवनावश्यक सेवेपासून वंचीत ठेवणे ही बाब संयुक्तीक नसल्यामुळे गैरअर्जदार क्र.2 हयांनीदेखील अर्जदाराप्रती सेवा पुरविण्यांत कसूर केलेला आहे ही बाब सिध्द होते. सबब मंच खालील आदेश पारित करीत आहे.
अंतीम आदेश
१. अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
२ गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक वा संयुक्तीकरीत्या अर्जदारांस शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाईदाखल रू.१०,०००/- तसेच तक्रार खर्चापोटी रू ५०००/-द्यावेत.
3. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष