::: आ दे श :::
( पारित दिनांक : 28/05/2018 )
माननिय अध्यक्षा, सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1) तक्रारकर्ता यांनी सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, दोषपूर्ण सेवे संदर्भात विरुध्द पक्षाविरुध्द दाखल केली आहे.
2) तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्तऐवज व विरुध्द पक्षाचा युक्तिवाद, यांचे अवलोकन करुन खालील निर्णय पारित केला.
सदर प्रकरणात तक्रारदारास पुरेशी संधी देवूनही, त्यांनी युक्तिवाद केला नाही. त्यामुळे तक्रारदाराने दाखल केलेले सर्व दस्त तपासुन निर्णय पारित केला.
3) तक्रारकर्ते यांचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, विरुध्द पक्ष बोअरवेल ची सुविधा देणारे आहेत व दिनांक 05/05/2017 रोजी विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्याला बोअरवेल सुविधा पुरविली. त्यासाठी तक्रारकर्त्याने केसींग पाईप विरुध्द पक्षाकडून विकत घेतला. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास बोअरवेल कामाचे रुपये 31,775/- रोख दिले. तक्रारदाराने गणेश एजन्सी यांच्याकडून सदर बोअरवेल मध्ये टाकण्यासाठी मोटर पंप व ईतर साहित्य खरेदी केलेंडर होते. तक्रारकर्ते यांनी सदरहू बोअरमध्ये मोटर पंप टाकण्यास सुरुवात केली असता, 50 फुटापर्यंत मोटरपंप व्यवस्थीत गेला परंतु त्यानंतर असे लक्षात आले की, सदरहू बोअरवेल हा 50 फुटाच्या समोर ब्लॉक झालेला आहे व विरुध्द पक्षाने बोअरवेल मध्ये टाकलेला केसींग पाईप हा हलक्या दर्जाचा असल्यामुळे तो चिपकला गेला व त्यामुळे बोअरवेल गळाला गेलेला आहे. विरुध्द पक्षाला याची माहिती देवूनही त्यांनी बोअरवेल दुरुस्त करुन दिला नाही. म्हणून तक्रारकर्ते यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल केली.
4) विरुध्द पक्षाने युक्तिवादात तक्रारकर्त्याचे सर्व कथन नाकारले आहे, व ते सेवा पुरवठादार नाही, असे मंचाला सांगितले. विरुध्द पक्षाने लेखी जबाबात, ज्या मशिनने तक्रारकर्त्याच्या आवारात बोअरवेल केले ती मशीन के. नरसा रेड्डी रा. आंध्र प्रदेश यांची आहे व त्यांनीच त्याच्याकडील केसींग पाईप टाकला. विरुध्द पक्ष केवळ नमुद बोअरवेल मशिनच्या मालकाचा नोकरदार म्हणून काम करतो, असे कथन केले आहे.
5) तक्रारदाराने रेकॉर्डवर विरुध्द पक्षाला कोणती रक्कम वादातील कामाबद्दल दिली होती, याचा पुरावा, दाखल केला नाही. त्यामुळे तक्रारदार विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे, हे दर्शविणारा कोणताही कागदोपत्री पुरावा, रेकॉर्डवर नाही. तसेच तक्रारदाराने मशिन मालकाचे नाव लेखी जबाबात आल्यावर देखील त्यांना या तक्रारीत पक्ष करण्याची तसदी घेतली नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार सिध्दतेअभावी खारिज करण्यात येते.
सबब, अंतिम आदेश पुढीलप्रमाणे पारित केला.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार सिध्दतेअभावी खारिज करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित करण्यात येत नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निःशुल्क पुरवाव्या.
(श्री. कैलास वानखडे) (श्रीमती शिल्पा एस. डोल्हारकर) (सौ. एस.एम.उंटवाले)
सदस्य. सदस्या. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri