निकालपत्र :- (दि.25/10/2010) ( श्री एम.डी.देशमुख,अध्यक्ष) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 ते 14 यांना सदर कामी नोटीस लागू होऊनही त्यांनी सदर कामी हजर झाले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही. सामनेवाला क्र.15 हे वकीलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. सुनावणीचे वेळेस तक्रारदाराचे वकीलांनी व सामनेवाला क्र.15 चे वकीलांनी युक्तीवाद केला. (02) यातील तक्रारदार हे वरील पत्तयावर कायमचे रहिवासी आहेत. सामनेवाला क्र.1 ही बँकींग व्यवसाय करणारी संस्था आहे. सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 संस्थेचे चेअरमन असून सामनेवाला क्र.2 ते 14 यांचेमार्फत सामनेवाला क्र.1 चा कारभार चालतो. तक्रारदाराने सामनेवाला क्र. 2 ते 14 यांचेवर विश्वास ठेवून सामनेवाला यांचेकडे अमृतसिध्दी दामदुप्पट ठेव पावती क्र.80 अन्वये दि.12/09/2002 रोजी रक्कम रु.30,000/- ठेवले होते त्याची मुदत दि.13/0/2007 होती व मुदतीनंतर रक्कम रु.60,000/- मिळणार होते. तसेच मागणी ठेव पावती क्र.1610 अन्वये दि.13/12/2004 रोजी रक्कम रु.20,000/- द.सा.द.शे.7 टक्के व्याज दराने ठेवले होते. तसेच मागणी ठेव पावती क्र.1635 अन्वये दि.27/04/2005 रक्कम रु.15,000/-द.सा.द.शे.7 टक्के व्याज दराने ठेवले होते. (03) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, यातील तक्रारदार हे रिक्षा चालवून कुटूंबाची उपजिविका करतात. तक्रारदारांनी कुटूंबातील व्यक्तींच्या कल्याणाकरिता सदरच्या ठेवी सामनेवाला यांचेकडे ठेवल्या होत्या. सदर ठेवींची मुदत संपलेनंतर तसेच तक्रारदारांना वेळोवेळी सदर रक्कमांची गरज भासलेने तक्रारदाराने सामनेवाला संस्थेकडे वरील रक्कमांची व्याजासह मागणी केली असता सदर ठेवींच्या रक्कमा देणेचे टाळाटाळ करुन सामनेवाला यांची सेवेत त्रुटी ठेवली आहे. सामनेवाला क्र.1 संस्थेच्या सर्व आर्थिक कारभारास सामनेवाला क्र. 2 ते 15 हे जबाबदार आहेत. त्यामुळे तक्रारदाराची ठेव रक्कम व्याजासह परत करणेची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी सर्व सामनेवाला यांची आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांची सदरची ठेव रक्कम व्याजासह न दिलेने प्रस्तुतची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराच्या ठेवीची रक्कम व्याजासह मिळावी तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (04) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्यांच्या सत्यप्रत दाखल केल्या आहेत व शपथपत्र दाखल केलेले आहे. (05) सामनेवाला क्र.1 ते 14 यांना नोटीस लागू होऊनदेखील ते सदर कामी हजर झाले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केले नाही. (06) सामनेवाला क्र.15 यांनी ठेवीचा तपशील वगळता तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. प्रस्तुत सामनेवाला आपल्या लेखी कथनात पुढे सांगतात की, उपनिबंधक सहकारी संस्था,कोल्हापूर यांचे दि.06/08/2009 चे आदेशान्वये सामनेवाला संस्था क्र.1 ही प्रस्तुत सामनेवाला संस्थेमध्ये विलीनीकरण झाले आहे. सदर विलिनीकरणाकरिता ठरले मसुदा प्रकरणी दि.04/07/2007 रोजी वर्तमानपत्रात नोटीस देऊन ठेवीदार, कर्जदार अगर ध्नको अगर सभासद यांना हरकतीबाबत कळविलेले होते. परंतु कोणच्याही हरकती आलेल्या नव्हत्या व नाहीत.त्यामुळे सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील लिहीलेल्या अटी व शर्तीनुसार कार्यवाही करणेचे आदेश पारीत केलेले आहेत. विलीनीकरणातील मसुदा क्र.4 (अ) प्रमाणे ठेवीदारांच्या मुळ ठेवीमधून 20 टक्के इरोजन करणेचे ठरलेले होते व आहे व तसेच कलम 4(ब) मध्ये विलीनीकरण आदेश झालेपासून सदर कलम 4(अ) मध्ये ठरलेप्रमाणे ठेवीदारास देय असणा-या रक्कमेपैकी मूळ ठेवीच्या 80 टक्के रक्कमेपैकी 25 टक्के रक्कम ठेवीदारांना अदा करुन उर्वरित रक्कम प्रस्तुत सामनेवाला संस्थेत एक वर्षाच्या ठेवीमध्ये नुतनीकरण करणेबाबत ठरलेले होते व आहे. सबब प्रस्तुत सामनेवाला हे तक्रारदाराचे मूळ ठेवीमधून 20 टक्के इरोजन करुन होणारी रक्कम ठरलेल्या मसुदयाप्रमाणे तक्रारदारास केव्हाही अदा करणेस तयार होते व आहेत. तसेच मसुदयातील कलम 7 मध्ये ठेवीदारांना देय असणा-या रक्कमेवर कोणतेही व्याज मागणेचा अधिकार ठेवीदारांना असणार नाही असे स्पष्ट नमुद केलेले आहे. सदर आदेशाविरुध्द तक्रारदाराने कोणतीही हरकत व अथवा तक्रार कधीही व केव्हाही केलेली अगर घेतलेली नव्हती व नाही. सबब प्रस्तुत सामनेवाला हे सदर मे.उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांनी केलेल्या आदेशाप्रमाणे व ठरले मसुदयातील अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदारास रक्कम देणेस तयार असलेने तक्रारदाराचा सदर तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करावा अशी विनंती प्रस्तुत सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (07) सामनेवाला क्र.15 यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत सामनेवाला क्र.1 संस्थेचा सामनेवाला क्र.15 संस्थेमध्ये झालेल्या विलीनीकरणाचा मसुदा दाखल केला आहे. (08) तक्रारदारांचा शपथेवरील तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे तसेच सामनेवाला क्र.15 यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे यांचा साकल्याने विचार करता तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेप्रमाणे सामनेवाला यांचेकडे दामदुप्पट ठेव व मागणी ठेव स्वरुपात रक्कम ठेवल्याचे निदर्शनास येते व सदरच्या रक्कमा सामनेवाला यांनी नाकारलेल्या नाहीत. तथापि, सदर रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कम परत न केल्याने तक्रारदारांनी सदरील तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेले आहेत. (09) यातील सामनेवाला क्र.15 यांनी दाखल केलेल्या अर्जासोबत उपनिबंधक, सहकारी संस्था,कोल्हापूर यांचेकडील दि.06/08/2009चा आदेश जोडलेला आहे. सदर सामनेवाला क्र.15 हे आपल्या लेखी म्हणणेत कथन करतात की, सदर उपनिबंधक, सहकारी संस्था,कोल्हापूर यांचेकडील आदेशान्वये सामनेवाला क्र.1 ही संस्था प्रस्तुत सामनेवाला संस्थेत विलीन झालेली आहे. त्यामुळे सदर सामनेवाला हे सदर मसुदयातील कलम 4(अ) व (ब) प्रमाणे तक्रारदाराची रक्कम देणेस तयार आहेत. परंतु सदरचा विलीनीकरणाचा मसुदा हा सामनेवाला क्र.1 व सामनेवाला क्र.15 या संस्थेमध्ये झालेला आहे. तो तक्रारदार ठेवीदारास बंधनकारक असणेचा संबंध नाही. त्यामुळे प्रस्तुत सामनेवाला हे आपली जबाबदारी अशा त-हेने झटकू शकत नाहीत. त्यामुळे तक्रारदाराची दामदुप्पट ठेव रक्कम व मागणी ठेव रक्कम व्याजासह देणेस सामनेवाला क्र. 1 ते 15 हे संयुक्तिकरित्या व वैयक्तिकरित्या जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (10) तक्रारदाराने दाखल केलेल्या दामदुप्पट ठेव पावती क्र.80 ची मुदत संपलेली आहे. त्यामुळे सदरच्या ठेव पावतीवरील दामदुप्पट ठेव रक्कम रु.60,000/-मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सदर रक्कमेवर मुदत संपले तारखेपासून म्हणजे दि.13/07/2007पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत सदर रक्कमेवर द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच मागणी ठेव पावती क्र. 1610 व 1635 चे अवलोकन केले असता सदर ठेव पावतीच्या मागील बाजूस दि.31/07/2005 अखेर व्याज अदा केलेचे दिसून येते. सबब तक्रारदार सदर ठेव पावत्यांवरील ठेव रक्कम रु.20,000/- व रु.15,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर रक्कमांवर ठेव ठेवले तारखेपासून ते दि.16/01/2010 अखेर पर्यंत ठेवपावतीवर नमुद व्याजदर 7 टक्के दराने व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत तसेच दि.17/01/2010 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 6टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदरच्या सर्व रक्कमा सामनेवाला क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना अदा कराव्यात या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदाराच्या तक्रारी मंजूर करण्यात येतात. (2) सामनेवाला क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना अमृतसिध्दी दामदुप्पट ठेव पावती क्र.80 वरील दामदुप्पट ठेव रक्कम रु.60,000/-(रु.साठ हजार फक्त) अदा करावी व सदर रक्कमेवर दि.13/06/2007 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याज अदा करावे. (3) सामनेवाला क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना त्यांची मागणी ठेव पावती क्र.1610 व 1635 वरील अनुक्रमे ठेव रक्कम रु.20,000/-(रु.वीस हजार फक्त) व रु.15,000/-(रु.पंधरा हजार फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर ठेव ठेवले तारखेपासून ते दि.16/01/2010 पर्यंत ठेव पावतीवर नमुद व्याजदराप्रमाणे व्याज अदा करावे व तदनंतर संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के दराने व्याज अदा करावे (4) सामनेवाला क्र.1ते15 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |