Final Order / Judgement | आदेश (आदेश पारित दिनांक 25.06.2019) मा. सदस्य, श्री. सुभाष रा. आजने यांच्या आदेशान्वये - तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली असून तक्रारीत असे कथन केले आहे की, विरुध्द पक्ष ही बॅंकिंग रेग्युलशन अॅक्ट अंतर्गत नोंदणीबध्द असून रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया कायदा अंतर्गत मार्गदर्शन घेते. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाचे टेलिफोन एक्सचेंज येथील शाखेत खाता क्रं. 0540901000001212 हे बचत खात उघडले होते. सदरचे खाते योग्य कारवाई करुन रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनेनुसार उघडण्यात आले होते. तक्रारकर्त्याने संपूर्ण कागदपत्रे KYC अंतर्गत आर.बी.आय.चे दिनांक 15.12.2004 चे मार्गदर्शन सुचनानुसार सादर केली होती. तक्रारकर्त्याने येस बॅंकेचा दिनांक 12.09.2017 चा रुपये 1,00,000/- चा धनादेश क्रं.859611 विरुध्द पक्षाकडे वटविण्याकरिता दिला असता सदर धनादेश बॅंकेने तक्रारकर्त्याच्या खात्यात भरपूर रक्कम शिल्ल्क असतांना ही न वटविता परत केला. विरुध्द पक्षाने Systematic Investment Plan की, ज्याबाबत Auto debited सूचना असतांना ही व तक्रारकर्त्याच्या खात्यात रक्कम शिल्लक असतांना ही न वटविता परत केले. विरुध्द पक्षाच्या सूचनेनुसार तक्रारकर्त्याने पुनःश्च धनादेश आणि Systematic Investment Plan दि. 12.09.2017 रोजी बॅंकेत सादर केले. विरुध्द पक्षाने आश्वासन दिले की, सदरचा धनादेश आणि Systematic Investment Plan पुन्हा न वटविता परत येणार नाही. विरुध्द पक्षाच्या आश्वासनानंतर SIP आणि धनादेश न वटविता परत आले. ज्याचे कारण विरुध्द पक्षाला माहिती असावे. तक्रारकर्त्याला KYC ची गरज असल्याबाबत विरुध्द पक्षाकडून नोटीस किंवा पत्र व्यवहार करण्यात आला नाही. सदर SIP आणि धनादेश KYC ची पूर्तता प्रलंबित असल्यामुळे आणि विरुध्द पक्षाने खाते बंद केल्यामुळे वटविण्यात आले नाही. विरुध्द पक्षाने खाते बंद केल्यानंतर ही तक्रारकर्त्याच्या खात्यात रक्कम जमा झाली. यावरुन लक्षात येते की, विरुध्द पक्षाने धनादेश व SIP हे तक्रारकर्त्याच्या चुकिमुळे परत केले नसून विशिष्ट काही दृष्ट हेतूने परत केले आहे.
- तक्रारकर्त्याने पुढे असे नमूद केले की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षाच्या निवडीच्या मुयच्युअल फंडची ऑफर दिली होती. परंतु तक्रारकर्त्याने सदरची ऑफर न स्वीकारल्यामुळे विरुध्द पक्षाने हेतुपुरस्सर वरीलप्रमाणे कार्यवाही केली. तक्रारकर्त्याचे खाते बंद करण्यात आल्यावर ही त्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाल्याची नोंद घेण्यात आली. यावरुन असे दिसून येते की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा धनादेश आणि SIP जाणूनबुजून परत केलेले आहे. तक्रारकर्त्याने खाते सुरु करते वेळी आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर संबंधित दस्तावेज दिली आहेत. खाते संपूर्णपणे सुरु होते. पासबुक तपासल्यानंतर असे निदर्शनास आले की, खात्यामध्ये कोणता संशयास्पद व्यवहार झालेला नाही. जेणे करुन खाते गोठवून बंद करण्यात आले. सदरची कार्यवाही करावयाची असल्यास विरुध्द पक्षाने खाते गोठवण्यापूर्वी KYC पूर्तता करण्याबाबत तक्रारकर्त्याला 3 महिन्यापूर्वी नोटीस द्यावयास पाहिजे होती. त्यानंतर 3 महिन्याने स्मरणपत्र द्यावयास पाहिजे होते व त्यानंतर खाते Partly बंद करावयास पाहिजे होते. KYC माहितीचे periodic objection प्रत्येक 10 वर्षाच्या कालावधीनंतर घेऊ शकले असते. विरुध्द पक्षाने केलेली कार्यवाही ही बेकायदेशीर असून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करणारी आहे. विरुध्द पक्षाने वरीलप्रमाणे तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिल्यामुळे तक्रारकर्त्याची प्रतिष्ठेला धक्का पोहचला व त्याचे आर्थिक नुकसान ही झाले. म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
- तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की, विरुध्द पक्षाने दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश व्हावा.
- विरुध्द पक्ष यांना मंचाद्वारे पाठविलेली नोटीस प्राप्त होऊन ही विरुध्द पक्ष मंचासमक्ष हजर झाले, त्यामुळे विरुध्द पक्ष यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 18.03.2019 रोजी पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज, लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद ऐकून मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्यावरील खालीलप्रमाणे निष्कर्ष नोंदविले.
मुद्दे उत्तर - तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे कायॽ होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली कायॽ होय
- काय आदेश ॽ अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्ष - मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाच्या बॅंकेत खाता क्रं. 0540901000001212 हे उघडले होते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला देत असलेल्या सेवेपोटी सेवा शुल्क आकारलेले आहे, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे सिध्द होते. तक्रारकर्त्याच्या बचत खात्यामध्ये दिनांक 12.09.2017 रोजी रुपये 3,01,352.23 पैसे शिल्लक असल्याचे नि.क्रं.3(1) वरुन दिसून येते. तक्रारकर्त्याने नि.क्रं. 3(2) वर दाखल केलेला दि.12.09.2017 ला रुपये 1,00,000/- चा धनादेश क्रं.859611 वटविण्याकरिता टाकला असता, सदरचा धनादेश तक्रारकर्त्याचे खाते बंद (Account Blocked) या कारणास्तव न वटविता परत करण्यात आला. तसेच SIP बाबत Auto Debit च्या सूचना असतांना ही SIP Auto Debit न होता परत करण्यात आला. परंतु तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या नि.क्रं.3(1) वरील दस्तावेजावरुन असे दिसून येते की, दि. 13.09.2017 रोजी तक्रारकर्त्याच्या खात्यात रक्कम रुपये 2,00,000/- जमा व दि. 20.09.2017 रोजी रक्कम रुपये 2,000/- काढल्याची नोंद असणे ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील न्यूनता दर्शविते. म्हणून तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडून त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येते. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्हणून रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 3,000/- द्यावे.
- वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत विरुध्द पक्षाने करावी.
- उभय पक्षानां आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |