तक्रारदार स्वत:
अॅड एच.व्ही.गाडगीळ जाबदेणारांतर्फे
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा मा. श्री. व्ही.पी.उत्पात, अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 05/05/2014
प्रस्तुतची तक्रार तक्रारदार यांनी जाबदेणार बँके विरुध्द सेवेतील त्रुटी संदर्भात ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. यातील कथने थोडक्यात खालील प्रमाणे-
1. तक्रारदार क्र 1 व 2 हे भाऊ असून त्यांचे संयुक्त चालू खाते जाबदेणार यांच्या भवानी पेठ शाखेत होते. या खात्यामध्ये दिनांक 8/4/2010 रोजी तक्रारदार यांनी विश्वेश्वर सहाकारी बँक यांनी दिलेल्या दोन पे ऑर्डर प्रत्येकी रक्कम रुपये 12,163/- जमा केलेल्या होत्या. सदर पे ऑर्डर पैकी पे ऑर्डर क्र.17024 ची रक्कम तक्रारदार यांच्या खात्यात दिनांक 9/4/2010 रोजी जमा झाली व नंतर सदर खाते बंद करण्यात आले. परंतू दुसरी पे ऑर्डर क्र.17023 ही त्यांच्या खात्यात जमा झाली नाही. याबाबत तक्रारदार यांनी खुलासा विचारला व त्यांनी विश्वेश्वर सहकारी बँकेमध्ये सुध्दा यासंदर्भात चौकशी केली. सदरची पे ऑर्डर वेळेन जमा न केल्यामुळे तक्रारदार यांना 45 ते 50 वेळा हेलपाटे मारावे लागले. त्यानंतर जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्या खात्यामध्ये रुपये 5000/- पेक्षा कमी रक्कम आहे या कारणावरुन चार वेळा प्रत्येकी रुपये 295/- नावे टाकली. अखेर दिनांक 21/10/2010 रोजी जाबदेणार यांनी पे ऑर्डरची रक्कम रुपये 12,163/- तक्रारदारांच्या खात्यामध्ये जमा केली. परंतू ही माहिती जाबदेणार यांनी तक्रारदार यांना कळविली नाही. अशा प्रकारे दिनांक 9/4/2010 ते 21/10/2010 या कालावधीत सदरच्यसा रकमेवर जाबदेणार यांनी कोणतेही व्याज दिले नाही व रक्कम उशीरा जमा केली. तक्रारदार यांना वेळोवेळी हेलपाटे मारावे लागले, म्हणून तक्रारदारांनी प्रस्तूतची तक्रार जाबदेणार यांच्याविरुध्द दाखल केली आहे. तक्रारदार यांनी सदर रकमेवर द.सा.द.शे 18 टक्के दराने 6.5 महिन्यांचे व्याज, मानसिक व शारिरीक त्रासासाठी रुपये 10,000/- व बँकेत हेलपाटे मारावे लागले त्यासाठी झालेला खर्च रुपये 2500/- व इतर खर्च असे मिळून एकूण रुपये 14,076/- ची मागणी केली आहे.
2. या प्रकरणात जाबदेणार यांनी लेखी कैफियत दाखल करुन तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. जाबदेणार यांच्या कथनानुसार रक्कम त्यांनी तक्रारदार यांच्या खात्यामध्ये जमा केल्यानंतर विलंबाने तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांनी जाबदेणार यांना कोणत्याही स्वरुपात लेखी संपर्क साधलेला नाही. तक्रारदार यांनी मागणी केलेली शारिरीक व मानसिक त्रासासाठी, प्रवास खर्चासाठीची रक्कमही चुकीची आहे. सबब प्रस्तूतची तक्रार फेटाळण्यात यावी, अशी विनंती जाबदेणार यांनी केलेली आहे.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्रे, पुरावा व युक्तीवाद यांचा विचार करुन खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदरहू मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालील प्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | जाबदेणार यांनी तक्रारदार यांची पे ऑर्डर वेळेत जमा न करुन सेवेतील त्रुटी दर्शविली आहे काय | होय |
2 | अंतिम आदेश काय | तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. |
कारणे-
मुद्या क्र 1 व 2-
4. या प्रकरणात दोन्ही पक्षकारांना मान्य असणा-या बाबी म्हणजे तक्रारदार यांचे जाबदेणार यांच्याकडे चालू ठेव खाते होते व त्यामध्ये तक्रारदार यांनी विश्वेश्वर सहकारी बँक लि. यांच्याकडून मिळालेल्या दोन पे ऑर्डर जमा केलेल्या होत्या. त्यापैकी एक पे ऑर्डर तक्रारदार यांच्या खात्यामध्ये जमा केली होती. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ कागदोपत्री पुरावा दाखल केलेला आहे. त्यामध्ये सदर पे ऑर्डर खात्यामध्ये जमा केल्याबद्यलची पे स्लीप जमा केली आहे. जाबदेणार यांनी 6.5 महिन्यांच्या कालावधीत सदर पे ऑर्डरची रक्कम जमा न करण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण दिलेले नाही. यावरुन असे स्पष्ट होते की, जाबदेणार यांनी सेवेतील त्रुटी दर्शविली आहे. तक्रारदार यांनी सदर रकमेवर द.सा.द.शे 18टक्के दराने व्याजाची मागणी केलेली आहे. ती अवास्तव आहे. तक्रारदारांना त्या रकमेवर द.सा.द.शे 6 टक्के दराने व्याज देणे योग्य ठरेल असे मंचाचे मत आहे. तक्रारदार रक्कम रुपये 12,163/- वर द.सा.द.शे 6 टक्के दराने 6.5 महिने कालावधीसाठी रक्कम रुपये 395/- मिळण्यास पात्र आहेत. त्याचप्रमाणे तक्रारदार यांना शारिरीक व मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई पोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 5000/- देणे योग्य ठरेल.
वरील विवेचनावरुन मुद्यांचे निष्कर्ष काढण्यात येऊन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी पे ऑर्डरची रक्कम तक्रारदारांच्या खात्यामध्ये वेळेत जमा न करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे, असे जाहिर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार यांनी तक्रारदारांना शारिरीक व मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई पोटी, तक्रारीचा खर्च व व्याजापोटी एकत्रित रक्कम रुपये 5395/- [रुपये पाच हजार तीनशे पंचाण्णव फक्त ] आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
4. उभय पक्षकारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या तारखेपासून एका महिन्याच्यात आत घेऊन जावेत, अन्यथा संच नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शूल्क पाठविण्यात यावी.
स्थळ : पुणे
दिनांक : 05/05/2014