नि.17 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
तक्रार क्र.79/2011 नोंदणी तारीख -09/06/2011 निकाल तारीख -19/11/2011 निकाल कालावधी-163 दिवस
श्री महेंद्र एम गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. श्रीमती गिरजाबाई सावळा पिंगळे, रा. हिंगणे,ता.खटाव,जि.सातारा ----- तक्रारदार (वकील श्री.पी.आर.इनामदार) विरुध्द 1. यशोदीप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मायणी रा.मायणी ता. खटाव जि. सातारा तर्फे चेअरमन श्री शिवाजीराव शंकरराव पाटील यांचेवर समन्स बजावणी करणेत यावी. 2. श्री शिवाजीराव शंकरराव पाटील, चेअरमन यशोदीप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मायणी रा.मायणी ता. खटाव जि. सातारा 3. श्रीमती अनुराधा अयाचित पुसेसावळी शाखाप्रमुख, यशोदीप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.मायणी ता. खटाव जि. सातारा रा.वडूज, ता. खटाव जि. सातारा ----- जाबदार (एकतर्फा ) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेत वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा दामदुप्पट ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. ठेवींची मुदत संपल्यानंतर अर्जदार यांनी दामदुप्पट ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. सबब ठेव रक्कम व्याजासह मिळावी तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे.
2. जाबदार क्र. 1 ते 3 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही ते नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. जाबदार क्र. 1 ते 3 यांनी या कामी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
3. अर्जदार यांची दाखल कागदपत्रे पाहीली तसेच नि. 16 कडील पुरसीस पाहीली. अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 कडे शपथपत्र दाखल केले असून नि.5 सोबत नि. 5/3 कडे दामदुप्पट ठेव पावत्यांच्या मूळ प्रती दाखल केल्या आहेत. प्रस्तुत ठेव पावतींचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्थेत ठेव ठेवलेचे स्पष्ट होते. तसेच प्रस्तुत ठेवींची मुदत संपलेचेही स्पष्ट दिसत आहे. सबब, नि. 2 कडील अर्जदार यांचे शपथपत्र व नि. 5/1 व 5/2 कडील ठेव रक्कम मागणीबाबतचा अर्जदार यांनी जाबदार यांना दिलेली नोटीस पाहिली असता अर्जदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्पष्ट दिसते. सबब ठेवीची मुदत संपलेनंतर अर्जदारने वेळोवेळी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. जाबदार यांनी अर्जदार यांचे कोणतेही कथन मे. मंचासमोर हजर होवून नाकारले नाही. सबब जाबदारने अर्जदारच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरिस्त नि. 5 सोबतच्या नि.5/3 कडील ठेवींच्या दामदुप्पट रकमा द्याव्यात व ठेवीची मुदत संपले तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने होणा-या व्याजासह द्याव्यात या निर्णयाप्रत हा मंच आला आहे.
4. जाबदार क्र. 3 हे व्यवस्थापक असून संस्थेचे संचालक नाहीत किंवा ते संचालक असलेबाबतचा कोणताही पुरावा अर्जदारने दाखल केला नाही. सबब जाबदार क्र. 3 यांना वैयक्तिक अर्जदारची ठेव रक्कम परत करणेस जबाबदार धरणेत येत नसून संस्थेसाठी त्यांना रक्कम परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे. सबब जाबदार क्र.1 व 2 यांना वैयक्तिक व संयुक्तरित्या तसेच जाबदार संस्थेसाठी जाबदार क्र. 3 यांना संयुक्तीकरित्या अर्जदारच्या रकमा परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे.
5. सबब आदेश. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे.
2. जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या व जाबदार संस्थेसाठी जाबदार क्र.3 यांनी संयुक्तीकरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. दामदुप्पट ठेव पावती क्र. 4536 व 4537 कडील ठेव प्रत्येकी रक्कम रु.20,000/- द्यावेत. तसेच सदर संपूर्ण रक्कम अर्जदारांचे पदरी पडेपर्यंत सदर रक्कम दि.12/08/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्केने व्याजासह द्यावी. ब. मानसिक त्रासापोटी व तक्रार अर्जाचे खर्चापोटी एकूण रक्कम रु.5,000/- द्यावेत. 3. जाबदार क्र.1 ते 3 यांनी या निर्णयाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळालेपासून 30 दिवसांचे आत करावी. .4. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 19/11/2011.
(श्री. महेंद्र एम. गोस्वामी) (श्रीमती. सुचेता मलवाडे) अध्यक्ष सदस्या
| Smt.Sucheta A. Malwade, MEMBER | HONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT | , | |