::निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, प्र.अध्यक्ष)
(पारित दिनांक- 31 मे, 2017)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्षा विरुध्द अनुचित व्यापारी प्रथेच अवलंब केल्याचे आरोपा वरुन ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारकर्त्याचे तक्रारीचा थोडक्यात सारांश खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-1) हा वादातील ले आऊट मधील जमीनीचा मालक आहे. विरुध्दपक्ष क्रं-2) ही नोंदणीकृत भागीदारी संस्था असून तिचे विरुध्दपक्ष क्रं-3) व क्रं-4) भागीदार आहेत. विरुध्दपक्ष संस्थेचा मुख्य व्यवसाय शेतीचे निवासी भूखंडामध्ये रुपांतरण करुन भूखंड विक्री करण्याचा आहे. तक्रारकर्त्याला एका निवासी भूखंडाची आवश्यकता होती, त्यामुळे त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) भागीदारी संस्थेशी संपर्क केला. विरुध्दपक्ष क्रं-2) संस्थेचे मौजा पेवटा, खसरा क्रं-58/1, पटवारी हलका क्रं-41 येथील प्रस्तावित ले आऊट मधील भूखंड क्रं-278 व 279 ज्यांचे एकूण क्षेत्रफळ-3225 चौरसफूट असून सदर भूखंड एकूण किम्मत रुपये-4,03,125/- मध्ये विकत घेण्या संबधी तक्रारकर्त्याने नोंदणी दिनांक-15/11/2005 रोजी विरुध्दपक्ष क्रं-2) संस्थे कडे केली व त्याच दिवशी अग्रीम रक्कम रुपये-4000/- देऊन त्याने दिनांक-06/02/2007 पर्यंत वेळावेळी एकूण रक्कम रुपये-1,15,665/- विरुध्दपक्ष संस्थे मध्ये जमा केली. उर्वरीत रक्कम रुपये-2,87,460/- तक्रारकर्ता आजही देण्यास तयार आहे. परंतु तक्रारकर्त्याच्या लक्षात आले की विरुध्दपक्ष क्रं-1) ते 4) हे भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देण्यास टाळाटाळ करीत आहेत, त्यामुळे तक्रारकर्त्याने भूखंडाच्या पुढील रकमा देणे थांबविले परंतु काही दिवसा नंतर तो स्वतः विरुध्दपक्ष संस्थेच्या कार्यालयात गेला व त्याने उर्वरीत रक्कम देण्याची तयारी दर्शवून भूखंडचे विक्रीपत्र नोंदवून देण्याची विरुध्दपक्षानां विनंती केली.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं-2) तर्फे विरुध्दपक्ष क्रं-1) जमीन मालक व क्रं-2) भागीदारी फर्म यांचे मध्ये झालेल्या करारा संबधी काही दस्तऐवज विरुध्दपक्ष क्रं-3) याने तक्रारकर्त्याला दाखविले, त्यावरुन विरुध्दपक्ष क्रं-1) जमीनीचा मालक असून त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) संस्थेला भूखंडाची ग्राहकां कडून नोंदणी व विक्री करण्या बाबत अधिकार दिलेले आहेत, सदर दस्तऐवजाचे नाव “MEMORANDUM OF UNDERSTANDING” असे असून सदर दस्तऐवज विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांचे मधील असून तो दिनांक-03/12/2005 रोजी नोंदविलेला आहे. त्याने वेळोवेळी विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांचे कडे भूखंडाचे विक्रीपत्र करुन देण्या बाबत विनंती केली असता ते कारणे सांगून टाळाटाळ करीत राहिले व भूखंडाची उर्वरीत रक्कम स्विकारण्यास नाकारत आहेत. विरुध्दपक्षाचीं सदरची कृती ही सेवेतील त्रृटी व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब या मध्ये मोडते म्हणून त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्ष क्रं-1) ते 4) यांनी करारा प्रमाणे भूखंडाची उर्वरीत रक्कम स्विकारुन करारातील भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून द्दावे.
- विरुध्दपक्ष क्रं-1) ते 4) यांना करारातील भूखंडाचे विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून देण्यास काही तांत्रिक अडचण असल्यास आवंटीत भूखंडाची आजचे बाजारभावा प्रमाणे येणारी किम्मत तक्रारकर्त्यास देण्याचे विरुध्दपक्षांना आदेशित व्हावे.
- विरुध्दपक्षांचे दोषपूर्ण सेवेमुळे तसेच अनुचित व्यापारी प्रथेच्या अवलंबामुळे त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-25,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-10,000/- देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) यशवंत माधव इंगळे, जमीन मालक याने ग्राहक मंचा समक्ष उपस्थित होऊन आपले लेखी उत्तर सादर केले. त्याने आपल्या उत्तरात असे नमुद केले की, तक्रारकर्त्या सोबत त्याचा वादातील भूखंडा संबधाने कोणताही व्यवहार झालेला नाही व त्याने तक्रारकर्त्या कडून कोणतीही रक्कम स्विकारलेली नाही त्यामुळे तक्रारकर्ता आणि त्याच्यात ग्राहक व सेवा देणारे असे कोणतेही संबध प्रस्थापित होत नाही म्हणून त्याचे विरुध्दची तक्रार खारीज व्हावी अशी विनंती केली.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) प्रॉस्पर रियल इस्टेट मॅनेजमेंट ग्रुप या भागीदारी फर्मचे नोटीस तामीली संदर्भात तक्रारकर्त्याला वेळोवेळी मंचा तर्फे संधी देण्यात येऊनही त्याने कोणतेही पाऊल उचललेले नसल्याने विरुध्दपक्ष क्रं-2) फर्म विरुध्दची तक्रार खारीज करण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिनांक-16/11/2016 रोजी पारीत केला.
05. विरुध्दपक्ष क्रं-3) मुकेश चंद्रशेखर कुमारन विरुध्दपक्ष क्रं-2) संस्थेचा भागीदार याला ग्राहक मंचा तर्फे नोंदणीकृत डाकेने पाठविलेली नोटीस प्राप्त होऊनही तो मंचा समक्ष उपस्थित झाला नाही व त्याने कोणतेही लेखी निवेदन सादर केले नाही म्हणून त्याचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिनांक-16/11/2016 रोजी प्रकरणात पारीत केला.
06. विरुध्दपक्ष क्रं-4) श्रीमती सुमन विठ्ठलराव इखनकर हिने ग्राहक मंचा समक्ष नि.क्रं-8) प्रमाणे लेखी उत्तर सादर केले, तिने आपल्या लेखी उत्तरात विरुध्दपक्ष क्रं-1) वादातील जमीनीचा मालक आहे तर विरुध्दपक्ष क्रं-2) ही भागीदारी संस्था असून विरुध्दपक्ष क्रं-3) व क्रं-4) तिचे भागीदार असल्याची बाब मान्य केली. परंतु ती विरुध्दपक्ष क्रं-2) प्रॉस्पर रियल इस्टेट या संस्थेची
निष्क्रीय भागीदार असल्याचे नमुद केले, त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 भागीदारी संस्थेशी भूखंडा बाबत जी नोंदणी केलेली आहे, त्याचेशी तिचा
काहीही संबध नाही. विरुध्दपक्ष क्रं-3) मुकेश चंद्रशेखर कुमारन हा विरुध्दपक्ष क्रं-2) प्रॉस्पर रियल इस्टेट मॅनेजमेंट ग्रुप या भागीदारी संस्थेचा सक्रीय भागीदार आहे. भूखंडाची एकूण किम्मत ही रुपये-4,03,125/- ठरविण्यात आली होती, पैकी आजही तक्रारकर्त्या कडे भूखंडापोटी रुपये-2,87,460/- घेणे बाकी आहे. तक्रारकर्त्याने उर्वरीत भूखंडाची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केलेली आहे त्यामुळे भूखंडाची पुढे विक्री होऊ शकलेली नाही. विरुध्दपक्ष क्रं-2) संस्थे कडे वादातील भूखडाचे मालकी हक्क नाहीत, त्यामुळे ते तक्रारकर्त्याला भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देऊ शकत नाही. करीता तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार ही खोटी असून ती खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
07. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत अक्रं 1 ते 10 दस्तऐवजांच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये प्रामुख्याने रकमा दिल्या बाबतच्या पावत्या, बुकींग फॉर्म, स्टेट बँकेचे पत्र, मेमोरन्डम ऑफ अंडरस्टॅन्डींग दस्तऐवज इत्यादीचा समावेश आहे.
08. विरुध्दपक्ष क्रं-4) हिने उत्तरा सोबत विरुध्दपक्ष क्रं-1) यशवंत माधव इंगळे याने आयकर विभागात दाखल केलेले शपथपत्र तसेच पार्टनरशिप डीड मध्ये दिनांक-09/09/2005 रोजीच्या दुरुस्ती लेखाची प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात.
09. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-4) हिचे लेखी उत्तर आणि त्यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांच्या प्रतींचे ग्राहक मंचा तर्फे अवलोकन करण्यात आले व त्यावरुन ग्राहक मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे अहे.
निष्कर्ष
10. दाखल दस्तऐवजांच्या प्रतीं वरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने भूखंडापोटी ज्या पावत्यांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत त्या प्रॉस्पर रियल इस्टेट मॅनेजमेंट ग्रुप (PROSPER REAL ESTATE MANAGEMENT GROUP) तर्फे निर्गमित केल्याचे दिसून येते. तक्रारकर्त्याचे नावे जो भूखंडाचा बुकींग फॉर्म दिनांक-15/11/2005 रोजी करुन दिलेला आहे तो PROSPER RELA ESTATE MANAGEMENT GROUP तर्फे करुन दिल्याचे दिसून येते व त्यावर BUSINESS CONSULTANT –SUDHIR J. KOMALKAR याची स्वाक्षरी असल्याचे दिसून येते. MEMORUNDOM OF UNDERSTANDING DATED-13TH SEPETEMBER 2006 चे प्रतीवरुन असे दिसून येते की, तो दस्तऐवज विरुध्दपक्ष क्रं-1) यशवंत माधवराव इंगळे आणि विरुध्दपक्ष क्रं-2) मे. प्रॉस्पर रियल इस्टेट मॅनेजमेंट ग्रुप या भागीदारी फर्म मधील एक करार असून त्याव्दारे विरुध्दपक्ष क्रं-1) चे मालकीचे जमीनीवरील भूखंड विक्री करण्याचे अधिकार विरुध्दपक्ष क्रं-2 मे. प्रॉस्पर रियल इस्टेट मॅनेजमेंट ग्रुपला दिल्याचे दिसून येते. थोडक्यात भूखंड विक्रीचे संपूर्ण व्यवहार करण्याचे अधिकार हे विरुध्दपक्ष क्रं-2) फर्मला दिल्याचे दिसून येते.
11. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याने वादातील दोन्ही भूखंडे विकत घेण्याचा करार दिनांक-15/11/2005 रोजी एकूण किम्मत रुपये-40,3125/- मध्ये विरुध्दपक्ष क्रं-2) संस्थेशी केला व त्याच दिवशी अग्रीम रक्कम रुपये-4000/- देऊन दिनांक-06/02/2007 पर्यंत वेळावेळी एकूण रक्कम रुपये-1,15,665/- विरुध्दपक्ष संस्थे मध्ये जमा केली. उर्वरीत रक्कम रुपये-2,87,460/- आजही देण्यास तो तयार आहे.
12. विरुध्दपक्ष क्रं-4) हिचे लेखी उत्तरा प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-1) वादातील जमीनीचा मालक आहे तसेच विरुध्दपक्ष क्रं-2) ही भागीदारी संस्था असून विरुध्दपक्ष क्रं-3) व क्रं-4) तिचे भागीदार आहेत परंतु ती विरुध्दपक्ष क्रं-2) संस्थेची निष्क्रीय भागीदार आहे त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 भागीदारी संस्थेशी भूखंडा बाबत जी नोंदणी केलेली आहे, त्याचेशी तिचा काहीही संबध नाही. विरुध्दपक्ष क्रं-3) मुकेश चंद्रशेखर कुमारन हा विरुध्दपक्ष क्रं-2) भागीदारी संस्थेचा सक्रीय भागीदार आहे. विरुध्दपक्ष क्रं-4) श्रीमती सुमन विठ्ठलराव इखनकर हिने आपल्या या म्हणण्याचे पुष्टयर्थ पार्टनरशिप डीड मध्ये दिनांक-09/09/2005 रोजीच्या दुरुस्ती लेखाची प्रत दाखल केली. सदर दुरुस्ती लेख हा विरुध्दपक्ष क्रं-3) श्री मुकेश चंद्रशेखर कुमारन आणि विरुध्दपक्ष क्रं-4) श्रीमती सुमन विठठलराव इखनकर यांचे मधील असून त्यामध्ये असे नमुद आहे की, विरुध्दपक्ष क्रं-4) हिचे वय झालेले असल्याने ती मे. प्रॉस्पर रियल इस्टेट मॅनेजमेंट ग्रुप मध्ये सक्रीय राहणार नाही तसेच या संस्थेचे संपूर्ण व्यवहार हे विरुध्दपक्ष क्रं-3) श्री मुकेश चंद्रशेखर कुमारन पाहतील व संस्थेला झालेल्या नफया व तोटयाशी तेच संपूर्ण जबाबदार राहतील, विरुध्दपक्ष क्रं-4) हिची जबाबदारी ही निरंक राहिल.
13. असे दिसून येते की, तक्रारकर्त्या सोबत जो वादातील भूखंडचा व्यवहार झालेला आहे तो दिनांक-15/11/2005 रोजी झालेला आहे आणि उपरोक्त दुरुस्तीचा लेख हा त्यापूर्वीचा म्हणजे दिनांक-09/09/2005 रोजीचा आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-2) भागीदारी संस्थे तर्फे केलेल्या व्यवहारासाठी विरुध्दपक्ष क्रं-3) मुकेश चंद्रशेखर कुमारन याचीच जबाबदारी येत असल्याचे दिसून येते.
14. विरुध्दपक्ष क्रं-3) मुकेश चंद्रशेखर कुमारन याला ग्राहक मंचाची नोटीस मिळूनही तो प्रकरणात ग्राहक मंचा समक्ष उपस्थित झाला नाही व त्याने कोणतेही लेखी निवेदन सादर केलेले नाही तसेच तक्रारकर्त्याने त्याचे विरुध्द केलेले आरोपही खोडून काढलेले नाहीत, त्यामुळे त्याचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश ग्राहक मंचाने पारीत केला.
15. तक्रारकर्त्याने नोंदणी केलेल्या भूखंडाचा व्यवहार हा विरुध्दपक्ष क्रं-2) प्रॉस्पर रियल इस्टेट मॅनेजमेंट ग्रुप यांचे सोबत केलेला आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) यशवंत माधवराव इंगळे हा जरी जमीन मालक असला तरी त्याने मेमोरन्डम ऑफ अंडरस्टॅन्डींग या दस्तऐवजा व्दारे जमीनी वरील भूखंड विक्री करण्याचे संपूर्ण अधिकार हे विरुध्दपक्ष क्रं-2) संस्थेला दिलेले आहेत आणि तसेही तक्रारकर्त्याने भूखंड नोंदणी बाबत जो काही व्यवहार केलेला आहे तो विरुध्दपक्ष क्रं-2) फर्म सोबत केलेला आहे तसेच जी काही रक्कम भूखंडापोटी दिलेली आहे ती विरुध्दपक्ष क्रं 2 संस्थेत जमा केलेली आहे आणि विरुध्दपक्ष क्रं-3) मुकेश चंद्रशेखर कुमारन हा त्या संस्थेचा सक्रीय भागीदार असल्याची बाब सिध्द झालेली आहे, त्यामुळे या प्रकरणात जी काही जबाबदारी येते ती विरुध्दपक्ष क्रं-2) भागीदार फर्म आणि तिचा सक्रीय भागीदर मुकेश चंद्रशेखर कुमारन याचीच येते असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
16. तक्रारकर्त्याने भूखंडाचे नोंदणी संबधाने जो व्यवहार केला त्या संबधाने भूखंड विक्री कराराची प्रत अभिलेखावर दाखल केलेली नाही, भूखंडाची नेमकी किम्मत करारा प्रमाणे किती होती या संबधाने योग्य असा दस्तऐवजी पुरावा ग्राहक मंचा समक्ष आलेला नाही तसेच भूखंडाचे किम्मती संबधाने तक्रारकर्त्याची तक्रार आणि विरुध्दपक्ष क्रं 4 हिचे लेखी उत्तर या मध्ये तफावत आढळून येते. अशापरिस्थितीत अभिलेखावर दाखल विरुध्दपक्ष क्रं-2) भागीदारी फर्म तर्फे निर्गमित पावत्यांच्या प्रतीचे पुराव्या वरुन तक्रारकर्त्याने भूखंडापोटी वेळोवेळी विरुध्दपक्ष क्रं-2) भागीदारी फर्म मध्ये नोंदणी दिनांक-29/11/2005 पासून ते दिनांक-06/02/2007 या कालावधी मध्ये एकूण रक्कम रुपये- 1,15,665/- जमा केल्याची बाब सिध्द होते त्यामुळे तक्रारकर्त्याने नोंदणी केलेल्या भूखंडापोटी जमा केलेली एकूण रक्कम रुपये-1,15,665/- शेवटचा हप्ता जमा केल्याचा दिनांक-06.02.2007 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.- 12% दराने व्याजासह विरुध्दपक्ष क्रं-2) भागीदारी फर्म आणि तिचे तर्फे तिचा भागीदार विरुध्दपक्ष क्रं-3) मुकेश चंद्रशेखर कुमारन याचे कडून मिळण्यास तो पात्र आहे. विरुध्दपक्ष क्रं-2) भागीदारी फर्म तर्फे भागीदार विरुध्दपक्ष क्रं-3) याचे दोषपूर्ण सेवेमुळे तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब यामुळे तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- मिळण्यास तो पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारकर्त्याच्या अन्य मागण्या या प्राप्त परिस्थितीत नामंजूर करण्यात येतात.
17. विरुध्दपक्ष क्रं-2) भागीदारी फर्म आणि तिचे तर्फे तिचा भागीदारी विरुध्दपक्ष क्रं-3) यांचे कार्यपध्दती संबधाने हे न्यायमंच पुढील मा.राष्ट्रीय ग्राहक आयोग, न्यु दिल्ली यांनी पारीत केलेल्या निवाडयावर आपली भिस्त ठेवीत आहे- “Juliet V. Quadros-Versus-Mrs.Malti Kumar & Ors.”- 2005(2) CPR-1 (NC). सदर निवाडयामध्ये मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले आहे की, जर भूखंडाचा विकास करणारा विकासक करारा प्रमाणे
भूखंडाचा कब्जा संबधित ग्राहकास देण्यास किंवा त्याने जमा केलेली रक्कम परत करण्यास असमर्थ ठरला तर तक्रार दाखल करण्यास सतत कारण (Continuous cause of action) घडत असते. मा. राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे
निवाडयात असेही नमुद केले आहे की, जर भूखंडाचा विकास करण्यास विकासक/बांधकाम व्यवसायिक काही प्रयत्न करीत नसेल किंवा त्याठिकाणी कुठलेच बांधकाम होत नसेल तर खरेदीदारास मासिक हप्ते नियमित भरणे अपेक्षित नाही. त्यामुळे असा आक्षेप जर विरुध्दपक्ष घेत असेल तर त्या आक्षेपाचा कुठलाही विचार करण्याची गरज नसते.
18. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करुन मंच तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश ::
(01) तक्रारकर्ता श्री जयप्रकाश श्यामसुंदर गायकवाड यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-2) प्रॉस्पर रियल इस्टेट मॅनेजमेंट ग्रुप या भागीदारी फर्म तर्फे तिचे भागीदार विरुध्दपक्ष क्रं-3) मुकेश चंद्रशेखर कुमारन याचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-2) प्रॉस्पर रियल इस्टेट मॅनेजमेंट ग्रुप भागीदारी फर्म तर्फे तिचा भागीदार विरुध्दपक्ष क्रं-3) मुकेश चंद्रशेखर कुमारन यास आदेशित करण्यात येते की, त्याने तक्रारकर्त्यास त्याने नोंदणी केलेल्या भूखंडापोटी विरुध्दपक्ष फर्म मध्ये जमा केलेली एकूण रक्कम रुपये-1,15,665/-(अक्षरी रुपये एक लक्ष पंधरा हजार सहाशे पासष्ट फक्त) भूखंडापोटी शेवटचा हप्ता जमा केल्याचा दिनांक-06/02/2007 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह तक्रारकर्त्यास परत करावी.
(03) तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-2) प्रॉस्पर रियल इस्टेट मॅनेजमेंट ग्रुप भागीदारी फर्म तर्फे भागीदार विरुध्दपक्ष क्रं-3) मुकेश चंद्रशेखर कुमारन याने तक्रारकर्त्यास द्दावेत.
(04) विरुध्दपक्ष क्रं-1) यशवंत माधव इंगळे आणि विरुध्दपक्ष क्रं-4) श्रीमती सुमन विठ्ठलराव इखनकर यांचे विरुध्द निकालपत्रात नमुद केलेली वस्तुस्थिती पाहता कोणतेही आदेश नाहीत.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(2) प्रॉस्पर रियल इस्टेट मॅनेजमेंट ग्रुप पार्टनरशिप फर्म तर्फे भागीदार विरुध्दपक्ष क्रं-(3) मुकेश चंद्रशेखर कुमारन याने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसाचे आत करावे.
(06) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षांना निःशुल्क
उपलब्ध करुन देण्यात याव्यात.