तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये विरुध्द पक्ष यांच्या विरुध्द दाखल केली असून, तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे आहे.
तक्रारकर्ता हा वर्धा येथील रहिवासी असून वि.प. ही बँकिंग क्षेत्रात कार्य करणारी संस्था असून त.क. यांनी तक्रारीत नमूद केले की, त.क. यांनी रुपये 3,00,000/- ठेवी स्वरुपात जमा केले होते. त.क. यांनी तक्रारीत नमूद केले की, त्याला सदर रक्कमेवर व्याज सुध्दा दिले नाही व वारंवांर विनंती केल्यानंतर रु.1,00,000/- परत केले.
त.क. यांची इच्छा नसतांना सुध्दा वि.प. यांनी रु.2,12,000/- दि. 20.07.2011रोजी 12% व्याजाने एक वर्षाच्या मुदत ठेवीकरिता जमा करण्यास सांगितले. त.क. कडे उपाय नसल्यामुळे त्यांने वि.प. यांच्या बँकेत दि. 20.07.2011 रोजी रुपये 2,12,000/- एक वर्षाच्या मुदतीकरिता 12% व्याजाने ठेवले.
त.क.चे मित्र श्री. प्रमोद वि. माथनकर यांच्या पुतणीचे लग्न असल्यामुळे त्यांना पैशाची गरज होती. त्याकरिता त.क. यांनी वि.प. बँकेकडे दि. 15.05.2012 रोजी अर्ज केला,त्याकडे वि.प. यांनी दुर्लक्ष केल्याचे त.क. चे म्हणणे आहे.
त.क. ने वारंवांर विनंती करुन ही वि.प. यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केल्यामुळे दि. 18.07.2012 रोजी वि.प. यांना नोटीस पाठविली. तरी अद्यापपर्यंत त.क. यांना रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त.क. यांनी सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली असून रु.2,12,000/- व्याजासह मिळावे. तसेच रु.10,000/- शारीरिक, मानसिक त्रास व आर्थिक नुकसान खर्चापोटी व तक्रारीचा खर्च म्हणून रु.5000/-ची मागणी केली.
सदर तक्रारीची नोटीस वि.प. यांना मंचामार्फत बजाविण्यात आली. मंचाची नोटीस प्राप्त होऊन ही उत्तर दाखल केले नाही. वारंवांर उत्तर दाखल करण्याकरितावेळ मागितला. अनेक वेळा लेखी उत्तर दाखल करण्याकरिता संधी देऊन ही उत्तर दाखल न केल्यामुळे मंचाने दि. 20.08.2013 रोजी नि.क्रं. 1 वर विना लेखी जबाब प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश पारित केला.
तक्रारकर्ता यांच्या वकिलांचे कथन, युक्तिवाद व त्यांनी दाखल केलेले दस्ताऐवजांचे मंचाने अवलोकन केले असता, खालील बाबी विचारार्थ उपस्थित झाल्या.
कारणे व निष्कर्ष
तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे रुपये 2,12,000/- दि. 20.07.2011 पासून 12% दराने मुदत ठेवीकरिता ठेवले होते. ही बाब त.क. यांनी दाखल केलेल्या नि.क्रं. 3 दस्ताऐवज क्रं. 1 वरुन स्पष्ट होते. त्यामुळे त.क. हा वि.प. यांचा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे.
त.क. यांनी वि.प. यांना लग्नाचे कार्य असल्यामुळे रक्कम देण्यात यावी याकरिता अर्ज दिला, ही बाब नि.क्रं. 3(2) वरुन स्पष्ट होते.त.क. यांनी वारंवांर विनंती करुन ही वि.प. यांनी त.क. यांना रक्कम परत केली नाही. त्यामुळे त.क. यांनी वि.प. यांना कायदेशीर नोटीस पाठविली. ही बाब नि.क्रं. 3(3) वरुन स्पष्ट होते. सदर प्रकरणामध्ये वि.प. हे रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे ही बाब स्पष्टपणे सिध्द होते. त्यामुळे मंचाचे असे मत आहे की, वि.प. यांनी त.क. यांना दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.
तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षयांच्याकडे रक्कम गुंतविली होती व ती देण्याकरिता विरुध्द पक्ष यांनी टाळाटाळ केली. तक्रारकर्ता रु.2,12,000/- दि. 20.07.2011 पासून 12% दराने रक्कम अदा होईपर्यंत मिळण्यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे.
त.क. यांनी सदर प्रकरणामध्ये नुकसान भरपाईकरिता रुपये 10,000/-ची मागणी केलेली आहे. सदर मागणी अवास्तव आहे. परंतु नैसर्गिक न्याय तत्वाचाविचार करता तक्रारकर्ता शारीरिक, मानसिक त्रास व आर्थिक नुकसानीकरिता रुपये 5,000/- मिळण्यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रु.1,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
वरील निष्कर्षाच्या आधारे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
1) तक्रारकर्ता यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) विरुध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्ता यांना रु.2,12,000/- दि. 20.07.2011 पासून 12% दराने रक्कम अदा होईपर्यंत व्याजसह द्यावे.
3) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.1000/- द्यावे.
4) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात.
निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात.