सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 26/2014.
तक्रार दाखल दि.04-03-2014.
तक्रार निकाली दि.19-09-2015.
कु.उषा विठ्ठल तारळकर,
रा. मु.पो. पुसेगांव (भवानीनगर),
ता.खटाव, जि.सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. यशोदीप ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या.
मायणी, ता.खटाव, जि.सातारा तर्फे-
व्यवस्थापक.
2. चेअरमन, शिवाजीराव शंकरराव पाटील,
यशोदीप ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या.
मायणी, ता.खटाव, जि.सातारा
3. व्हा.चेअरमन, चंद्रकांत लक्ष्मण पवार,
यशोदीप ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या.
मायणी, ता.खटाव, जि.सातारा
4. व्यवस्थापक, जावेद गणीभाई मुल्ला
यशोदीप ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या.
मायणी, ता.खटाव, जि.सातारा
5. संचालिका,डॉ.सौ. उर्मिला दिलीप येळगांवकर,
यशोदीप ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या.
मायणी, ता.खटाव, जि.सातारा
6. संचालक, डॉ.मकरंद रामचंद्र तोरो,
यशोदीप ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या.
मायणी, ता.खटाव, जि.सातारा
7. संचालक, चंद्रकांत लक्ष्मण पवार,
यशोदीप ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या.
मायणी, ता.खटाव, जि.सातारा
8. संचालक, अजित अशोक सिंहासने,
यशोदीप ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या.
मायणी, ता.खटाव, जि.सातारा
9. शाखाधिकारी,महेंद्र प्रेमचंद शहा,
यशोदीप ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या.
मायणी, ता.खटाव, जि.सातारा .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.व्ही.ए.गायकवाड.
जाबदार क्र.2 व 9 तर्फे अँड.ए.आर.कदम.
जाबदार क्र.1,3 ते 8 – एकतर्फा.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार ही रा.मु.पो. पुसेगाव (भवानीनगर), ता. खटाव, जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवासी आहे. जाबदार क्र.1 ही सहकारी पतसंस्था असून जाबदार क्र. 2 ते 9 हे प्रस्तुत संस्थेचे संचालक आहेत. प्रस्तुत पतसंस्थेत तक्रारदार यांनी खालील कोष्टकात नमूद केलेप्रमाणे मुदत ठेव योजनेत व बचत खात्यामध्ये रक्कम गुंतवली होती व आहे.
अ.क्र. | ठेव रक्कम | ठेवपावती क्र. | ठेव ठेवली तारीख | मुदत संपते तारीख | मुदतीनंतर देय रक्कम |
1 | 36,000/- | 0261 | 26/10/2011 | 26/11/2012 | 39,900/- |
2 | 7,969/- | बचत खाते क्र. 1228 | | | |
वरील परिशिष्टात नमूद ठेवीची रक्कम व बचत खात्यावरील रक्कम तक्रारदार यांनी जाबदार पतसंस्थेत गुंतविली असून मुदत ठेवपावतीची मुदत संपलेनंतर व बचत खात्यावरील वर नमूद रकमांची व्याजासह मागणी तक्रारदाराने जाबदाराकडे केली. परंतू जाबदाराने ‘वसूली चालू आहे, वसूली झाल्यानंतर देतो,’ अशी कारणे सांगून रक्कम परत अदा करणेस टाळाटाळ केली व रक्कम अदा केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांना जाबदार यांनी सदोष सेवा पुरविली आहे. म्हणून तक्रारदाराने जाबदार यांचेकडून प्रस्तुत ठेवींची व बचत खात्यावरील एकूण रक्कम रु.47,969/- (रुपये सत्तेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर मात्र) जाबदार क्र. 1 ते 9 यांचेकडून व्याजासह वैयक्तीक व संयुक्तिकरित्या वसूल होऊन मिळावी व नुकसानभरपाई मिळावी म्हणून तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 ते 9 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या रक्कम रु.47,969/- (रुपये सत्तेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर मात्र) नमूद व्याजासह वसूल होवून मिळावी, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-, जाबदार क्र. 1 ते 9 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकपणे मिळावेत, तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- जाबदार क्र. 1 ते 9 यांचेकडून वसूल होऊन मिळावा, वरील सर्व रक्कम तक्रारदार यांना प्रत्यक्ष मिळेपर्यंत प्रस्तुत रकमेवर द.सा.द.शे. 20 टक्के दराने व्याज अदा करावे अशी विनंती तक्रारदाराने या कामी केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/2 कडे अनुक्रमे तक्रारदाराने जाबदार संस्थेत मुदत ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेची मूळ ठेवपावती व मुळ बचत खाते पासबुक क्र.1228 नि.25 कडे प्रस्तुत तक्रार अर्जासोबत दाखल शपथपत्र हेच पुराव्याचे शपथपत्र समजण्यात यावे म्हणून पुरसिस, नि. 26 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि.28 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1,3 ते 8 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि. 1 वर पारीत झालेला आहे. तर जाबदार क्र. 2 व 9 यांचेविरुध्द झालेला एकतर्फा आदेश रद्द होवून मिळावा म्हणून सदर जाबदार यांनी मे. मंचात अर्ज नि. 17 कडे दाखल केला. प्रस्तुत अर्जावर सदर जाबदार क्र. 2 व 9 यांचेविरुध्द केलेला एकतर्फा आदेश रद्द करणेचे आदेश झालेमुळे जाबदार क्र. 2 व 9 यांनी नि.20 कडे म्हणणे व नि. 21 कडे अॅफीडेव्हीट दाखल केले आहे. प्रस्तुत म्हणण्यामध्ये जाबदार क्र. 2 व 9 यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथन फेटाळलेले आहे. त्यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवले आहेत. तक्रारदार यांनी दाखल केले ठेवपावतीवर व बचत खात्यावर जाबदार क्र. 2 व 9 च्या कोठेही सहया नाहीत. सदर ठेवपावत्या व बचत खात्याचे पासबुक सदर जाबदाराला मान्य नाही अगर त्याबाबत माहिती असणेचे कारण नाही. प्रस्तुत तक्रारदार सदर जाबदार यांचेकडे रक्कम ठेवणेस अगर परत मागणेस आलेले नव्हते व नाहीत. जाबदार क्र. 2 चा सध्या सदर जाबदार पतसंस्थेशी कोणताही संबंध राहीलेला नाही. कारण जाबदार क्र. 2 ने दि.2/6/2014 रोजी जाबदार पतसंस्थेच्या चेअरमन पदाचा राजीनामा रजिस्टर पोस्टाने पतसंस्थेचे व्यवस्थापक व जिल्हा उपनिबंधक,वडूज यांचेकडून पाठवून दिलेला होता व आहे. त्यामुळे दि. 2/6/2014 पासून प्रस्तुत पतसंस्थेशी व व्यवहाराशी काडीमात्र संबंध नाही. याबाबतची माहिती तक्रारदाराला असतानाही तक्रारदाराने सदर जाबदार यांस नाहक त्रास देणेसाठी प्रस्तुत कामी जाबदार क्र. 2 ला पक्षकार केले आहे. तर जाबदार क्र. 9 हे जाबदार संस्थेचे व्यवस्थापक आहेत. पतसंस्थेच्या कोणत्याही कार्यालयीन संचालकीय कारभारात जाबदार क्र. 9 यांचा सहभाग नसतो. केवळ संचालक मंडळाने घेतले निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे व संस्था संचालकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे व त्यादृष्टीने मिळाले निर्देशानुसार कामकाज करणे एवढीच जाबदार क्र. 9 यांची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रार अर्ज जाबदार क्र. 2 व 9 यांचेविरुध्द चालणेस पात्र नाही. तो फेटाळण्यात यावा असे म्हणणे जाबदार क्र. 2 व 9 यांनी दाखल केले आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्तुत कामी प्रस्तुत तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक होतात काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदाराना सदोष सेवा पुरवली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? खालील नमूद
केलेप्रमाणे.
विवेचन
मुद्दा क्र.1 ते 3-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण-
प्रस्तुत तक्रारदाराने जाबदार क्र1 पतसंस्थेत खालील नमूद केले कोष्टकात वर्णन केलेली रक्कम मुदतठेव योजनेत व बचत खात्यामध्ये गुंतविली होती व आहे.
अ.क्र. | ठेव रक्कम | ठेवपावती क्र. | ठेव ठेवली तारीख | मुदत संपते तारीख |
1 | 36,000/- | 0261 | 26/10/2011 | 26/11/2012 |
2 | 7,969/- | बचत खाते क्र. 1228 | | |
प्रस्तुत कामी मुळ ठेवपावती व बचत खाते पुस्तक तक्रारदाराने नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि.5/2 कडे दाखल केले आहे. यावरुन तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत व जाबदार तक्रारदारांचे सेवापुरवठादार आहेत हे सिध्द होते. तक्रारदाराने याकामी जाबदार क्र. 1 पतसंस्थेच्या संचालक मंडळाची यादी दाखल केलेली नाही. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 व 3 ते 8 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि. 1 वर पारीत झाला आहे. तर जाबदार क्र. 2 व 9 यांचेविरुध्द झालेला एकतर्फा आदेश प्रस्तुत जाबदार क्र. 2 व 9 यांनी रद्द करुन घेऊन त्यांचे म्हणणे याकामी दाखल केले आहे. जाबदार क्र. 2 ने चेअरमन पदाचा राजीनामा उपनिबंधक, सहकारी संस्था, वडूज यांचेकडे पाठविला असून त्याची पोहोचपावती मे. मंचात दाखल आहे. तसेच जाबदार क्र. 2 हे या जाबदार क्र. 1 पतसंस्थेचे चेअरमन/संचालक होते हे सिध्द करणेसाठी तक्रारदाराने संचालक मंडळाची वैध यादी किंवा पुरावा या मे. मंचात दाखल केलेली नाही. सबब जाबदार क्र. 2 ला जबाबदार धरता येणार नाही. जाबदार क्र. 9 हे जाबदार क्र. 1 पतसंस्थेचे व्यवस्थापक आहेत ते संचालक नाहीत, संचालक असलेबाबत कोणताही पुरावा किंवा संचालक मंडळाची यादी याकामी दाखल केली नाही. व्यवस्थापक असलेने जाबदार क्र. 9 यास जबाबदार धरता येणार नाही.
प्रस्तुत कामी तक्रारदाराने वर नमूद परिशिष्टातील ठेवीची मुदत संपलेनंतर व बचत खात्यामधील रक्कम जाबदार यांचेकडे वारंवार मागणी करुनही जाबदार क्र. 1,3 ते 8 यांनी रक्कम अदा केली नाही. त्यामुळे त्यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. याकामी जाबदार क्र. 1,3 ते 8 हे नोटीस लागू होवूनही मंचात गैरहजर असलेने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि. 1 वर झाला आहे. प्रस्तुत जाबदार क्र.1 व 3 ते 8 यांनी तक्रार अर्जातील तक्रारदाराचे कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. त्यामुळे जाबदार क्र. 1 व 3 ते 8 यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविलेचे स्पष्ट होते. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे. प्रस्तुत जाबदार क्र. 1,3 ते 8 यांना तक्रारदार यांचे खाली नमूद ठेवपावतीची प्रस्तुत ठेवपावतीवरील नमूद व्याजासह व बचत खात्यामधील नियमाप्रमाणे होणा-त्या व्याजासह रक्कम तक्रारदाराना अदा करणेस वैयक्तिक व संयुक्तीकरित्या Co-operative corporate veil नुसार जबाबदार धरणेत येते. सबब प्रस्तुत कामी आम्ही मा.उच्च न्यायालय मुंबई यांचे रिट पिटीशन क्र.117/2011- मंदाताई संभाजी पवार विरुध्द स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र या न्यायनिवाडयाचा व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे.
7. सबब आम्ही प्रस्तुत कामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-
-ः आदेश ः-
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार क्र. 1 व 3 ते 8 यांना तक्रारदाराची ठेवपावती वर नमूद कोष्टकातील ठेवीची रक्कम ठेवपावतीवर नमूद व्याजासह व बचत खात्यामधील शिल्लक रकमेवर नियमाप्रमाणे होणा-या व्याजासह तक्रारदार यांना अदा करणेसाठी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या जबाबदार धरणेत येते.
3. जाबदार क्र. 2 ने राजीनामा दिल्याने व जाबदार क्र. 9 हे व्यवस्थापक असलेने त्यांना जबाबदार धरता येत नाही.
4. जाबदार क्र. 1 व 3 ते 8 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना ठेवपावती क्र. 0261 रक्कम रु.36,000/- मुदत संपले तारखेपासून तक्रार दाखल तारखेपर्यंत त्या ठेवपावतीवर नमूद व्याजदराने होणा-या व्याजासह अदा करावी.
5. जाबदार क्र. 1 व 3 ते 8 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना बचत खाते क्र. 1228 मधील शिल्लक रक्कम रु.7,969/- दि.8/05/12 पासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत बचतखात्याचे नियमाप्रमाणे होणा-या व्याजासह अदा करावी.
6. वरील ठेवपावतीचे रकमेवर ठेवीची तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याज जाबदार क्र. 1,3 ते 8 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदाराला अदा करावे.
7. तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी जाबदार क्र. 1, 3 ते 8 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे रक्कम रु.5,000/-(रुपये पाच हजार मात्र) अदा करावेत व अर्जाचा खर्च रक्कम रु.3,000/- (रुपये तीन हजार मात्र) अदा करावेत.
8. वरील सर्व आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात जाबदार क्र. 1, 3 ते 8 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे करावे.
9. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
10. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.19-09-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.