नि.38 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 284/2010 नोंदणी तारीख – 28/12/2010 निकाल तारीख – 21/3/2011 निकाल कालावधी – 83 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. जयंत जगन्नाथ बगाडे रा. रहिमतपूर, ता.कोरेगाव 2. सौ जान्हवी जयंत बगाडे रा. रहिमतपूर, ता.कोरेगाव 3. हषिकेश जयंत बगाडे रा. रहिमतपूर, ता.कोरेगाव 4. तृप्ती जयंत बगाडे रा. रहिमतपूर, ता.कोरेगाव अ.नं.2,3, 4 यांचे मुखत्यार अ.नं.1 ...... अर्जदार (अभियोक्ता श्री.एम.वाय.बाचल) विरुध्द 1. यशोदिप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मायणी, ता.खटाव जि.सातारा तर्फे उमेश बाळकृष्ण दानवे शाखाधिकारी, चौकीचा आंबा, ता.खटाव जि. सातारा 2. शिवाजीराव शंकर पाटील, चेअरमन यशोदिप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मायणी 3. महेंद्र प्रेमचंद शहा, व्यवस्थापक, यशोदिप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मायणी, मुख्य कार्यालय मायणी 4. डॉ मकरंद रामचंद्र तोरो, व्हाईस चेअरमन, यशोदिप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मायणी, नं.2 ते 4 ता.खटाव जि. सातारा ----- जाबदार न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्कम ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. सदरच्या ठेवींची मुदत संपलेली आहे. मुदत ठेव पावतीची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्याजसहित देय झालेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अर्जदार यांनी जाबदार यांना दि.6/8/2010 रोजी रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. सदरची नोटीस जाबदार यांना मिळाली. तथापि जाबदार यांनी नोटीशीला उत्तर दिले नाही अथवा अर्जदार यांची रक्कमही परत दिलेली नाही. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी शेअर्सची रक्कम तसेच ठेवींची रक्कम व त्यावरील व्याज तसेच मानसिक त्रासापोटी रकमेची मागणी केलेली आहे. 2. प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी जाबदार क्र.3 व 4 यांना झालेली आहे. परंतु जाबदार क्र.3 व 4 हे या प्रकरणात हजर झालेले नाहीत वा त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत व शपथपत्र दाखल केलेले नाही. सबब याबाबतचा नि.1 वर एकतर्फा आदेश करण्यात आला आहे. जाबदार क्र.1 व 2 हे याकामी वकीलांमार्फत हजर झाले परंतु नेमलेल्या तारखेस त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र दाखल केले नाही. सबब जाबदार क्र.1 व 2 यांचेविरुध्द म्हणणे नाही असा आदेश करण्यात आला. 3. अर्जदार यांनी याकामी दाखल केलेले शपथपत्र, ठेवपावत्या, इतर कागदपत्रे व पुरसिस पाहिली. 4. अर्जदार यांनी दाखल केलेली वर नमूद कागदपत्रे पाहिली असता असे स्पष्ट दिसून येते की, अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या होत्या व आहेत. सदरच्या ठेवींची मुदत पूर्ण झालेनंतर जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीची रक्कम व त्यावर ठेव पावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे होणा-या व्याजाची रक्कम देण्याची होती. तथापि, अर्जदार यांचे शपथपत्र व अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्पष्ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्हणजे ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर व्याजासहित देय झालेली रक्कम ठेवींची मुदत संपलेनंतर दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार यांचेकडून रक्कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे. 5. अर्जदार यांनी याकामी त्यांनी जाबदार संस्थेकडून घेतलेल्या शेअर्सच्या रकमेचीही मागणी केली आहे. परंतु शेअर्सच्या रकमेची मागणी अर्जदार यांना या मंचाकडे करता येणार नाही कारण शेअर्सबाबतच्या वादाचे निराकरण करण्याचे अधिकारक्षेत्र या मंचास नाही. शेअरहोल्डर हा सहकारी संस्थेचा ठेवीदार ग्राहक होत नाही. सबब अर्जदारची शेअर्सच्या रकमेची मागणी मान्य करता येणार नाही. 6. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 ते 4 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. ठेवपावती क्र.4873, 4874, 4884, 4885, 5205, 5206, 5207, 5208, 5209, 5210, 4899, 4900, 5201, 5202, 5203, 5204, 4512, 4849, 5219 वरील मूळ रक्कम ठेवपावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे देय होणा-या व्याजासह रक्कम द्यावी तसेच ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्केंप्रमाणे व्याजासह द्यावी. ब. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. क. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 21/3/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |