( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष )
आदेश
( पारित दिनांक : 16 डिसेंबर, 2011 )
यातील तक्रारदाराने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
यातील तक्रारदाराची गैरअर्जदाराविरुध्द थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं2 कडुन 2/6/2011 रोजी सोयाबीन यशोदा -362 या नावाचे प्रती बॅग 25 किग्रॅ. प्रमाणे एकुण 30 बॅग खरेदी केल्या. त्याचा पावती क्रं.एसएस00281 आहे. सदर बियाणांची अंदाजे 20 एकर शेतात पेरणी केली. त्याचा लॉट नं.वायएचबी-10-1321 असा आहे. बियाणंची पेरणी केल्यानंतर 5-7 दिवसांनी बियाणाची उगवण होत नाही असे दिसुन आले म्हणुन गैरअर्जदार क्रं.2 यांचेशी संपर्क साधला व माहिती दिली. परंतु गैरअर्जदाराने त्यांकडे दुर्लैक्ष केले व मदत केली नाही म्हणुन तक्रारदाराने तालुका कृषी अधिकारी , उमरेड, खंडविकास अधिकारी पंचायत समिती, उमरेड, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर विभाग, नागपूर यांचेकडे केली. सदर तक्रारीवरुन दिनांक 12/7/2011 रोजी जिल्हा स्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने तक्रारदाराच्या शेतीला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता सोयाबीन बियाणची उगवण झाली नाही बियाणे मोड करुन घरगुती सोयाबीन बियाणाची दिनांक 28 व 29 जुन 2011 रोजी 15 दिवसांनी दुबार पेरणी केली असे आढळुन आले. म्हणुन शेवटी तक्रारदाराने गैरअर्जदारास नोटीस दिली.
परंतु गैरअर्जदाराने कोणतीही कार्यवाही केली नाही. तक्रारदाराने कबाडकष्ट करुन पेरणी केली परंतु बियाणांची उगवण न झाल्याने तक्रारदाराची मेहनत वाया गेली व पैसाही खर्च झाला व तक्रारदार कर्जबाजारी झाला व त्यास आर्थिक अडचणीस तोंड द्यावे लागले म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल करुन बियाणे न उगवल्यामुळे झालेल्या मालाची नुकसान भरपाइ्र रुपये 30,000/- , उत्पन्न न झाल्याने नुकसानीची भरपाई रुपये 3,00,000/- आर्थिक खर्च रुपये 1,00,000/-, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- मिळावे अशी मागणी केली.
सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांना नोटीस बजाविण्यात आली, नोटीस मिळुन गैरअर्जदार क्रं.1 हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला. गैरअर्जदार क्रं.2 हजर झाले नाही म्हणुन त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 14/11/2011 रोजी पारित करण्यात आला.
यातील गैरअर्जदार क्रं.1 आपले जवाबात नमुद करतात की जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने अर्जदाराचे शेतीला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्यानंतर तक्रारदाराने बियाणांची मोड करुन घरगुती बियाणांची दुबार पेरणी केली ही बाब अमान्य केली. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं.2 कडुन बियाणे खरेदीची संपुर्ण रक्कम परत घेतली आहे व तसे लिहुन सुध्दा दिले आहे. तसेच तक्रारदाराने शेतात दुबार पेरणी केली त्यामुळे तक्रारदाराचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही. तक्रारदाराने बियाणाची संपुर्ण रक्कम परत घेतली व त्याबात कोणताही दावा अथवा तक्रार करणार नाही असे लिहुन दिल्याचे गैरअर्जदार क्रं.2 ने सांगीतल्याचे गैरअर्जदार क्रं.1 नमुद करतात. तक्रारदाराची तक्रार गैरकायदेशीर आहे कारण बियाणे खराब असल्याबाबत कुठलाही आरोप अथवा पुरावा तक्रारीत जोडलेला नाही. तक्रारदाराच्या हया खोटया तक्रारीमुळे गैरअर्जदाराची बदनामी झाल्यामुळे योग्य ती नुकसान भरपाई मिळावी व तक्रार खारीज करण्यात यावी अशी मागणी केली.
यातील तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून, एकुण 11 दस्तऐवज दाखल केले आहेत. त्यात पावती खंडविकास अधिका-यांकडे केलेला अर्ज, तालुका कृषी अधिकारी यांचेकडे केलेला अर्ज, इतर अर्ज चौकशी अहवाल, नोटीस पोस्टाची पावती, इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केलेले आहेत.
सदर प्रकरणात दोन्ही पक्षांचा तोंडी युक्तीवाद ऐकला.
-: कारणमिमांसा :-
यातील तक्रारदाराने पेरलेले बियाणे निघाले नाही व त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली ही बाब दोन्ही पक्षांना मंजूर आहे. उघडपणे तक्रारदारास पहिल्यांदा केलेली मशागत, पेरणी, दिलेली खते इत्यांदी संबंधीचा खर्च आला. त्यासंबंधी तक्रारदाराने 30 एकर जमीनीकरिता केवळ 1,00,000/- रुपयाची मागणी केलेली आहे. वरील सर्व बाबी अंर्तभुत केल्याअसता ती योग्य असल्याचे दिसुन येते व ती अवास्तव नाही. त्यामुळे ती मंजूर होण्यास पात्र आहे. कारण की शेतक-यांला पुन्हा नव्याने नविन बियाणे पेरण्यासाठी जांभुळवाही, पेरणी खतांचा वापर, इत्यादी सर्व कामे नव्याने करावी लागलेली आहे.
तक्रारदाराने या तक्रारीत 3,00,000/- रुपये पिक न आल्याबद्दल नुकसान भरपाईची मागणी केली आहे मात्र त्यासंबंधी योग्य आधार दिलेला नाही आणि मंचासमोर सुध्दा पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदाराने संबंधीत नुकसानी दुबार पेरणी करावी लागल्याने उत्पन्न कमी आले असा युक्तिवाद केला, मात्र त्यासबंधी तक्रारदाराने यापुर्वीच्या वर्षी साधारण परिस्थीतीत याच जमीनीत किती उत्पन्न आले व आता किती कमी आले यासबंधी दस्तऐवज दाखल केलेले नाहीत.
मात्र ही बाब खरी आहे की जुन महिन्यात मृगाचा पाऊन पडला असता जमीनचे असलेले तापमान व त्यावेळी केलेली पेरणी संबंधीत पिकास सुरवातीला चांगला जोर येऊन फायदा होतो व पिक उशीरा घेतले असता किड व रोगराईला बळी पडते योग्य वाढ होत नाही असा सर्वाचा अनुभव आहे. त्यामुळे एकरी उत्पन्न कमी आले असावे असा निष्कर्ष काढणे काहीही वावगे होणार नाही. यास्तव तक्रारदारास रुपये 2000/- प्रती क्वींटल याप्रमाणे एकुण प्रती एकरी रुपये 4000/- एवढी नुकसानभरपाई योग्य ठरेल व 30 एकर जमीनीला रुपये 1,20,000/- एवढी नुकसानी झालेली आहे.
यातील तक्रारदाराने जरी त्यास बियाणाची रक्कम मिळाली नाही असे म्हटले असले तरी या प्रकरणात ज्या अहवालावर तक्रारदाराने भिस्त ठेवली आहे त्या बियाणे जिल्हा तक्रार निवारण समितीच्या अहवालात नमुद आहे की संबंधीत शेतक-यांला त्याचे बियाणाचे रुपये 30,000/- मिळाले अशी माहिती त्याने दिली आहे. त्यामुळे ती बाब नुकसानीबद्दल मान्य करता येणार नाही. गैरअर्जदाराने आपल्या अयोग्य बियाणांचा पुरवठा केलेला आहे त्यामुळे शेतक-यांस नुकसान झालेले आहे व मानसिक त्रास झालेला आहे. त्यामुळे रुपये 30,000/- त्या कारणास्तव मिळावे असे आमचे मत आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-000 अं ती म आ दे श 000-
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांनी तक्रारदारास संयुक्तिक अथवा एकलरित्या रुपये 2,50,000/- एवढी रक्कम द्यावी. तसेच रक्कम रुपये 2,20,000/- वर तक्रारदाखल दिनांक 30/8/2011 पासुन रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह येणारी रक्कम आदेश प्राप्त झाल्यापासुन 1 महिन्याचे आत द्यावी. न पेक्षा गैरअर्जदार वरील रक्कमेवर 9 टक्के एवजी 12 टक्के व्याज देणे लागतील.
3) गैरअर्जदाराने तक्रारदारास दाव्याच्या खर्चापोटी रुपये 2,000/-(रुपये दोन
3)हजार फक्त) एवढी रक्कम द्यावी.
4) गैरअर्जदार यांनी सदर आदेशाचे पालन त्यांना आदेशाची प्रत प्राप्त
झाल्यापासून एक महिन्याचे आत करावे.