न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेकडून वि.प.क्र.3 कंपनीचा सॅमसंग हँडसेट 9154 IMEI NO. 355216061104256 रक्कम रु. 62,500/- या किंमतीस दि. 16/2/2015 रोजी खरेदी घेतलेला होता. सदर हँडसेट खरेदी केल्यानंतर त्यामध्ये वारंवार गरम होणे, हँग होणे या प्रकारची तक्रार निर्माण होत होती. तक्रारदार हे सदरचा हँडसेट वि.प.क्र.2 यांचेकडे दुरुस्तीसाठी देत होते व ते सॉफ्टवेअरमध्ये दुरूस्ती करुन देत होते. परंतु हँडसेट पूर्णतः दुरुस्त झाला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी वि.प.क्र.1 यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली. परंतु वि.प.क्र.1 यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. तदनंतर वि.प.क्र.2 यांनी तक्रारदार यांचेशी संपर्क याधून स्वखर्चाने रक्कम रु.14,000/- चा मदरबोर्ड बदलून दिल्याचे सांगितले. परंतु तरीही पूर्वीप्रमाणेच तक्रारी सुरु झाल्या. म्हणून तक्रारदार यांनी वि.प.क्र.3 यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी अशा प्रकारची मदर बोर्डची दुरुस्ती हँडसेटमध्ये केली नसल्याचे सांगितले. अशा प्रकारे तक्रारदाराची फसवणूक झालेने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारास वि.प. यांचेकडून मोबाईलची रक्कम रु.62,500/-, पॉवर बँक व चार्जरची रक्कम रु. 2,200/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.5,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, नोटीसची पोचपावती, मोबाईल खरेदीचे बिल, मोबाईल चार्जर व पॉवर बँकचे बिल इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प.क्र.1 यांना नोटीस लागू होवूनही ते याकामी नेमलेल्या तारखांना हजर न राहिलेने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
4. वि.प.क्र.2 यांनी याकामी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्हणणे दाखल केले असून तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. वि.प. यांचे कथनानुसार, वि.प.क्र.2 यांनी स्वखर्चाने रु.14,000/- चा मदरबोर्ड बदलून दिला हे कथन खोटे आहे. वि.प.क्र.2 यांना वि.प.क्र.3 कडून सेवा पुरविणेबाबत अत्यल्प मोबदला दिला जातो. त्यामुळे वि.प. क्र.2 कडून मदरबोर्ड बदलून देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वास्तविक वॉरंटी कालावधीत वादातील हँडसेट नादुरुस्त झाला नाही. मंचाची नोटीस येईपर्यंत वि.प.क्र.2 व 3 यांना हँडसेट नादुरुस्त असलेची कल्पना तक्रारदार यांनी दिली नाही. तक्रारदाराची तक्रार मुदतबाहय आहे. हँडसेट खरेदी केल्यानंतर तक्रारदाराने वि.प. यांचे सेवा केंद्रास केवळ दोन वेळा भेट दिली. दि. 22/12/15 रोजी प्रथम भेट दिली, त्यावेळी तक्रारदाराने सदरचा हॅंडसेट सामान्य तपासणीकरिता आणला होता. दि. 11/2/2016 रोजी डिस्प्लेमध्ये थोडासा प्रॉब्लेम निर्मण झाल्याने तक्रारदाराने हॅंडसेट वि.प.क्र.2 यांचेकडे आणला होता. त्यावेळी त्यांनी डिस्पले बदलून दिला. याव्यतिरिक्त तक्रारदाराने कधीही वि.प. यांचेकडे भेट दिलेली नाही. तक्रारदार हे वि.प.क्र.2 यांचेकडे हँडसेटमधील कथित दोषांचे निवारणाकरिता भेट दिली होती ही बाब पुराव्यानिशी शाबीत करु शकत नाही. केवळ हँडसेटचा तीन वर्षे वापर करुन त्याचा पुरेपुर उपभोग घेवून खोटया आशयाची तक्रारदारांनी दाखल केली आहे. वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. सबब, तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी मागणी वि.प.क्र.2 व 3 यांनी केली आहे.
5. वि.प.क्र.2 व 3 यांनी याकामी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
6. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प. क्र.2 व 3 यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
7. तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेकडून वि.प.क्र.3 सॅमसंग हँडसेट 9154 IMEI NO. 355216061104256 रक्कम रु. 62,500/- या किंमतीस दि. 16/2/2015 रोजी खरेदी घेतलेला होता. त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सदरचे मोबाईल बिलाची पावती दाखल केलेली आहे. सदरची रक्कम वि.प यांनी नाकारलेली नाही. सबब, सदरचे रकमेचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयेाग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
8. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. सदरचा हँडसेट खरेदी केलेनंतर वारंवार गरम होणे, हँग होणे या प्रकारची तक्रार निर्माण होत होती. तक्रार निर्माण झाल्यानंतर तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांचेकडे सदरचा हँडसेट दुरुस्तीसाठी दिला. वि.प.क्र.2 यांनी सदरचे हँडसेटचे सॉफ्टवेअर मध्ये दुरुस्ती केली. परंतु हँडसेटची पूर्णतः दुरुस्ती झाली नाही. वि.प.क्र.2 यांनी तक्रारदार यांचेकडे संपर्क साधून स्वखर्चाने रक्कम रु.14,000/- मदरबोर्ड दोषयुक्त हँडसेटमध्ये बदलून दिला तथापि सदरचा हँडसेट तात्पुरत्या स्वरुपात सुरु झालेवर पुन्हा तक्रारी सुरु झाल्या. तसेच वि.प.क्र.3 यांनी त्यांच्याकडे कोणत्याही मदर बोर्डची दुरुस्ती सदर हँडसेटमध्ये केलेचे सांगितले. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांची फसवणूक करुन तक्रारदार यांना दोषयुक्त मोबाईल हँडसेट देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने वि.प.क्र.2 व 3 यांनी दाखल केलेले म्हणणेचे अवलोकन करता वि.प.क्र.2 व 3 यांनी तक्रारदारांची तक्रार पूर्णपणे नाकारलेली आहे. वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.3 यांचे अधिकृत सेवा केंद्र आहे. तक्रारदार यांनी प्रस्तुत हँडसेट खरेदी केलेनंतर वि.प. यांचे सेवा केंद्राला केवळ दोन वेळा भेट दिली. ता.22/12/2015 रोजी सामान्य तपासणीकरिता हँडसेट आणला होता. सामान्य सेटींग करुन सदरचा हँडसेट वि.प.क्र.2 यांनी तक्रारदार यांना परत दिला. दि. 11/2/2016 रोजी डिस्प्लेमध्ये प्रॉब्लेम होता, डिस्प्ले बदलून दिला. सदरचे दोन भेटीव्यतिरिक्त तक्रारदार यांनी वि.प. यांचे सेवा केंद्रास भेट दिलेली नाही अथवा तक्रार नोंदविलेली नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या अॅड आनंद पटवा यांचे नोटीसीचे अवलोकन करता सदर वि.प. यांचेबाबत कोणताही उल्लेख नाही असे वि.प. यांनी म्हणणे दाखल केलेले आहे. प्रस्तुतकामी तक्रारदार यांचेविरुध्द ता. 16/3/2018 रोजी पुरावा नाही आदेश पारीत झालेला होता. तक्रारदार यांनी रक्कम रु.100/- ची कॉस्ट लिगल एड फंडमध्ये जमा करणेचे अटीवर सदरचा पुरावा नाही आदेश रद्द करुन तक्रारदारांचा पुरावा दाखल करुन घेणेत आला. सबब, तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन करता “ वि.प.क्र.2 यांनी माझेशी संपर्क साधून स्वखर्चाने रक्कम रु. 14,000/- चा मदरबोर्ड दोषयुक्त हँडसेट बदलून दिलेला आहे असे सांगण्यात आले. सदर हँडसेट तात्पुरता स्वरुपात सुरु झालेनंतर पूर्वीप्रमाणेच पुन्हा तक्रारी सुरु झालेल्या होत्या. मी वि.प.क्र.3 कंपनी पूणे येथील कार्यालयाकडे चौकशी केली असता अशा प्रकारची कोणत्याही मदर बोर्डची दुरुस्ती माझ्या मोबाईल हँडसेटमध्ये केली नसल्याचे सांगण्यात आले. त्याप्रमाणे माझी फसवणूक झाली. ” सबब, तक्रारदारांचे सदरचे पुराव्याचे शपथपत्रातील कथने वि.प.क्र.1 यांनी संधी असताना देखील नाकारलेली नाहीत. प्रस्तुतकामी तक्रारदारांनी तक्रारीसोबत अ.क्र.1 ला वि.प.क्र.1 यांना वकीलामार्फत दि. 8/2/2016 रोजी नोटीस पाठविलेची प्रत दखल केलेली आहे. सदरचे नोटीसचे अवलोकन करता आपण आमचे अशिलांना आमचे अशिलांच्या सॅमसंग कंपनीच्या मोबाईलचा मदर बोर्ड दिलला असे सांगिततले. आमचे अशिलांनी त्याबाबत कस्टमर केअरला चौकशी केली असता आपण कोणताच मदरबोर्ड दिलले नसल्याने कस्टमर केअरने सांगितले, असे नमूद केले आहे. सबब, सदरचे नोटीसीवरुन व तक्रारदारांचे पुरावा शपथपत्रावरुन वि.प.क्र.1 यांनी तक्रारदारांचा सदरचे हँडसेटचा मदरबोर्ड बदलून दिलेला नव्हता ही बाब दिसून येते. म्हणजेच सदरचा मोबाईल हा दि. 10/2/2015 रोजी खरेदी केला होता. तदनंतर एक वर्षाचे आत ता. 8/2/2016 रोजी तक्रारदारांचे सदरचे मोबाईल हँडसेटमध्ये तक्रारी निर्माण झालेल्या होत्या ही बाब नाकारता येत नाही. वि.प.क्र.2 व 3 यांनी त्यांच लेखी म्हणणेमध्ये ता. 22/12/2015 व दि. 11/2/2016 रोजी सदरचे हँडसेटमध्ये डिस्प्लेचा प्रॉब्लेम असलेचे सदरचा हँडसेट सेवा केंद्रात दोन वेळा आणलेचे वि.प.क्र.2 व 3 यांनी मान्य केले आहे. सबब, सदरचे कागदपत्रांचा विचार करता तक्रारदारांचे मोबाईलमध्ये ता. 10/2/2015 रोजी खरेदी तारखेपासून एक वर्षामध्ये वारंवार प्रॉब्लेम (तक्रारी) उद्भवत होते ही बाब कागदपत्रांवरुन सिध्द होते.
9. सदरचे वादातील मोबाईल हँडसेटची बॅटरी वारंवार बंद पडत असलेने ता. 10/8/2016 रोजी तक्रारदार यांना पॉवर बँक विकत घेणे भाग पडले तसेच ता. 24/4/2016 रोजी कंपनीचा चार्जर विकत घेणे भाग पडलेचे तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. त्यानुसार शपथपत्रातील सदरचे चार्जर व पॉवर बँक खरेदी केलेची बिले दाखल केलेली आहेत. सदरची बिले वि.प. यांनी नाकारलेली नाही.
10. प्रस्तुतकामी तक्रारदारांनी ता. 25/3/2021 रोजी Comp Aid System Kolhapur यांचा दाखला दाखल केला आहे. सदरचे दाखल्याचे अवलोकन करता वादातील मोबाईलची तपासणी ता. 10/3/2021 रोजी केली असता खालील प्रमाणे दोष असल्याचे दिसून आले.
- ब-याच वेळा चार्जिंग लावून, बटन दाबल्यानंतर फोन चालू होत नाही. – मदर बोर्ड प्रॉब्लेम (लोगो येतो व बंद पडतो)
- चार्जिंग लवकर संपणे. बॅटरी सदोष आहे.
-
- सदर फोनमध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे तो चालू होत नाही.
-
- असे नमूद असून त्यावर सदर कंपनीचा सही व शिक्का आहे.
-
सदरचा तज्ञाचा अहवाल आयोगामध्ये दाखल केलेनंतर तक्रारदारांनी ता. 27/12/2021 रोजी पुरावा करणेचा नाही अशी पुरसीस आयोगात दाखल केलेली आहे. तदनंतर ता. 25/2/2022 रोजी वि.प.क्र.2 व 3 यांनी प्रस्तुतकामी वि.प.क्र.2 व 3 यांनी दाखल केलेले म्हणणे हाच पुरावा म्हणून वाचणेत यावा व पुरावा बंदची पुरसीस दाखल केलेली आहे. सबब, वरील सर्व कागदपत्रांचा बारकाईने विचार करता तक्रारदार यांनी सदरचा मोबाईल खरेदी केलेपासून एक वर्षाचे कालावधीमध्ये सदरचे मोबाईलमध्ये वारंवार तक्रारी उद्भवत होत्या. तसेच तज्ञांचे अहवालावरुन सदरचे वादातील हँडसेटमध्ये दोष उत्पन्न झालेची बाब दिसून येते. सदरचा तज्ञाचा अहवालातील कथने वि.प. यांनी त्यांना जादा पुरावा देणेची संधी असून देखील नाकारलेली नाहीत. सबब, या सर्व बाबींचा विचार करता, वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून वादातील हँडसेटची पूर्ण रक्कम स्वीकारुन देखील तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचेकडून दोषयुक्त मोबाईल हँडसेट बदलून त्याच मॉडेलचा नवीन हँडसेट मिळणेस पात्र आहेत. तसे करणे शक्य नसल्यास वि.प. यांनी सदरचे हँडसेटची रक्कम रु. 62,500/- तक्रारदारास अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख दि. 23/8/2017 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो वि.प. यांनी द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज अदा करणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
मुद्दा क्र.3
11. उपरोक्त मुद्दा क्र.2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना सॅमसंग हँडसेट 9154 IMEI NO. 355216061104256 या कंपनीचा विक्री केलेला दोषयुक्त हँडसेट बदलून त्याच मॉडेलचा नवीन हँडसेट अदा करावा.
- अथवा
- सदरचे हँडसेटची रक्कम रु. 62,500/- वि.प.क्र.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारास अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख दि. 23/8/2017 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- तक्रारदारांनी दोषयुक्त हँडसेट वि.प. यांना परत करावा.
- वि.प.क्र.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारांना पॉवर बँक व चार्जरची एकूण रक्कमरु. 2,200/- अदा करावी.
- वि.प.क्र.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कमम रु.3,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयामधील तरतुदीप्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|