निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 11/12/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 27/12/2012 तक्रार निकाल दिनांकः- 12/03/2014
कालावधी 01वर्ष.02 महिने.13दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
व्दारकादास पिता सुरजमल तोष्णीवाल, अर्जदार
वय 48 वर्षे. धंदा.नोकरी. अॅड.संदिप बा.बजाज.
रा.सुरज निवास, रामकृष्ण नगर,परभणी.
विरुध्द
1 यश कार्स, गैरअर्जदार.
तर्फे व्यवस्थापक, अॅड.एल.एम.काकडे.
प्लॉट नं.3 व 99 तिरुपती नगर, बार्शी रोड,बीड. 2 यश कार्स,
तर्फे व्यवस्थापक,
पिंगळगड पुला जवळ, गंगाखेड रोड, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदार मारोती स्वीफ्ट खरेदी करते वेळी 13,580/- रु. गाडीच्या एकुण किंमती पेक्षा अगाऊ घेवुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तो परभणी येथील रहिवाशी असून त्याने स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी कार खरेदी करायची होती, म्हणून त्यांनी दिनांक 12/03/2012 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 च्या कार्यालयात भेट दिली व Maroti Swift Car खरेदी करण्या संबंधीचे कोटेशन प्राप्त केले व सदर कोटेशनचे बिल नं. 640 असून सदर पावतीवर यश कार तर्फे सही करुन देण्यात आले होते. व सदर कोटेशनवर सदर कारची किंमत रु. 5,63,828/- अशी दर्शविण्यात आले होते.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर कार खरेदी करतांना त्याने State Bank Of Hyderabad मानवत शाखेकडून 4,00,000/- रु. चे कर्ज घेतले होते. व त्या अन्वये सदर बँकेने गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या हक्कात 5,38,828/- रु. चा ड्राफ्ट दिनांक 15/03/2012 रोजी दिला.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी Maroti Swift VXI Car अर्जदारास दिनांक 27/03/2012 रोजी दिली. सदर कारचा चेसीस नं. MA 3 EHKD 1S00226225 व इंजीन नं. K- 12 MN 1158927 असा आहे. सदर कार सोबत गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदारास फॉर्म नं. 21 व फॉर्म नं. 22 व तसेच Tax Invoice दिले आहे. सदर Tax Invoice मध्ये सदर कारची एकुण किंमत 4,75,936/- रु. अशी दर्शविलेली आहे. म्हणजेच कोटेशनवर दर्शविलेली किंमत व Tax Invoice वर दर्शविलेली किंमत एकच आहे. सदर कारचा विमा न्यु इंडीया अॅशुरंस कंपनी शाखा परभणीकडे काढण्यात आला होता. त्यापोटी 13,742/- रु. गैरअर्जदाराने अर्जदाराकडून घेतलेले आहेत.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी सदर कारला Accessories लावल्या बद्दल 27,635/- रु. व वाढीव वॉरंटीसाठी 7500/-, R.T.O. Road Tax, पोटी 33,316/- व Smart Card Fees म्हणून 350/- असे एकुण 5,58,479/- चे विवरण दिले, परंतु प्रत्यक्षात गैरअर्जदारानी अर्जदाराकडून दिनांक 25/02/2012 रोजी 10,000/- व दिनांक 01/03/2012 रोजी 15,000/- व 27/03/2012 रोजी 8,231/- व दिनांक 15/03/2012 रोजील 5,38,828/- म्हणजेच एकुण 5,72,059/- रु. घेतले आहेत व Tax Invoice वरील रक्कम (कोटेशन) व प्रत्यक्षात घेतलेली रक्कम बघीतल्यास गैरअर्जदाराने अर्जदाराकडून 13,580/- रु. अगाऊ घेतले आहेत.
अर्जदाराचे म्हणणे की, सदरची बाब अर्जदारास समजल्यानंतर त्याने गैरअर्जदार क्रमांक 2 च्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन आगाऊ घेतलेली रक्कम परत करण्यास विनंती केली असता, गैरअर्जदार क्रमांक 2 च्या कार्यालयातील श्री. सचीन सर व गौतम सर यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याशी संपर्क करुन आपल्या अगाऊ रक्कमेचा डि.डि. देतो असे सांगीतले, परंतु प्रत्यक्षात गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आज पर्यंत आगाऊ घेतलेली रक्कम आजतागायत पर्यंत अर्जदारास दिलेली नाही व आगाऊ रक्कम घेवुन गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली. म्हणून अर्जदाराने दिनांक 14/08/2012 रोजी वकिला मार्फत गैरअर्जदारास नोटीस दिली व सदर नोटीसीस गैरअर्जदाराने दिनांक 24/09/2012 रोजी अर्जदारास उत्तर दिले व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, डाटा ऑपरेटरच्या नजर चुकीने रक्कमेच्या मजकुरामध्ये चुक झालेली आहे व त्याने अर्जदाराकडून कोणतीही आगाऊ रक्कम घेतली नाही असे म्हणणे आहे. म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर करुन गैरअर्जदारांना असा आदेश द्यावा की, त्याने अर्जदार मारोती स्वीफ्ट कार खरेदी करते वेळी त्यांनी आगाऊ घेतलेली रक्कम रु. 13,580/- अर्जदारास परत करावी व तसेच मानसिक त्रासापोटी 10,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 5,000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने नि.क्रमांक 4 वर 18 कागदपत्राच्या यादीसह 18 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये कोटेशनची पावती, 10,000/- ची पावती, 15,000/- रु.ची पावती, एस.बी.एच. यांनी दिलेले पत्र, रु. 5,38,828/- च्या डी.डी.ची प्रत, Tax Invoice, फॉर्म नं. 21, फॉर्म नं. 22, आर.टी.ओ.ने दिलेले फॉर्म, पॉलिसी, अर्जदाराने गैरअर्जदारांना दिलेले पत्र, पोष्टाची पावती, नोटीसीची प्रत, गैरअर्जदाराचे नोटीसीस उत्तर,पोष्टाची पावती इ.कागदपत्रे दाखल केले आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यास मंचाची नोटीस तामील होवनुही वेळेत मंचासमोर हजर नाहीत. त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
तक्रार अर्जावरुन व दाखल केलेल्या कागदपत्रावरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 याने त्यांच्याकडून अर्जदार
Maroti Swift VXI कार खरेदी करते वेळी किंमती पेक्षा
अधीक रक्कम घेवुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन
अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराने गैरअर्जदाराकडून Maroti Swift VXI खरेदी करण्यापूर्वी गैरअर्जदाराकडून दिनांक 12/03/2012 रोजी कोटेशन घेतले होते व सदर कोटेशन मध्ये गाडीची EX Show Room किंमत 4,75,936/- विम्याचे 13,577/-, रोड टॅक्स 36,816/-, वाढीव वॉरंटी 7500/- व इतर 30,000/- रु. असे एकुण 5,63,828/- रु. चे कोटेशन गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास दिले होते. ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या 4/1 वरील कोटेशनच्या प्रतीवरुन सिध्द होते.
तसेच सदर कार खरेदी करते वेळी अर्जदाराने दिनांक 25/02/2012
रोजी 10,000/- रु. दिनांक 01/03/2012 रोजी 15,000/- रु. दिनांक 27/03/2012 रोजी 8,231/- रु. व दिनांक 15/03/2012 रोजी डी.डी.व्दारे 5,38,828/- रु. असे एकुण 5,72,059/- रु. गैरअर्जदारास दिले होते. ही बाब गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेल्या नोटीसीच्या उत्तरामध्ये मान्य केले आहे. ही बाब नि.क्रमांक 4/18 वरील दाखल केलेल्या नोटीसीच्या उत्तरव्दारे सिध्द होते. याचाच अर्थ असा निघतो की, गैरअर्जदाराने कोटेशन मध्ये दर्शविलेल्या 5,63,828/- रु. च्या ऐवजी प्रत्यक्षात कार खरेदी करते वेळी गैरअर्जदाराने अर्जदाराकडून 5,72,059/- रु. घेतले जे की, गैरअर्जदाराने अर्जदाराकडून 8,231/- रु. अतिरिक्त घेतले आहेत. हे वरील चर्चेवरुन सिध्द होते. अर्जदाराचे म्हणणे की, सदर कार खरेदी करते वेळी गैरअर्जदाराने अर्जदाराकडून 13,580/- रु. ज्यादा घेतले होते, हे वरील कारणास्तव अर्जदाराचे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही.
गैरअर्जदारास मंचाची नोटीस तामील होवुनही गैरअर्जदार मंचासमोर येवुन त्यांनी अर्जदाराकडून घेतलेली रक्कम कशी योग्य होती, हे लेखी जबाबाव्दारे वा शपथेवर सांगीतले नाही, याचाच अर्थ असा निघतो की, गैरअर्जदाराने अर्जदार सदर स्वीफ्ट कार खरेदी करते वेळी अर्जदाराकडून 8,231/- रु. अतिरिक्त घेतले होते. हे गैरअर्जदाराने अप्रत्यक्षपणे गैरहजर राहून मान्य केले आहे.
गैरअर्जदाराने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन अर्जदाराकडून 8,231/- रु. अतिरिक्त घेवुन अर्जदारास निश्चित सेवेत त्रुटी दिली आहे. असे मंचाचे
ठाम मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 याने वैयक्तिक वा संयुक्तिकरित्या ( Jointly and
Severally ) आदेश तारखे पासून 30 दिवसाच्या आत त्यांनी अर्जदाराकडून
घेतलेली आगाऊ रक्कम रु. 8,231/- फक्त ( अक्षरी रु. आठहजार दोनशे
एकतिस फक्त ) अर्जदारास परत द्यावेत.
3 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी मानसिक त्रासापोटी रु.1,000/- फक्त ( अक्षरी
रु. एकहजार फक्त ) व तक्रार अर्ज खर्चापोटी रु.1,000/- फक्त ( अक्षरी रु.
एकहजार फक्त ) आदेश मुदतीत अर्जदारास द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.