मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
प्रशासकिय इमारत, तिसरा मजला, चेतना कॉलेजजवळ, बांद्रा-पूर्व,
मुंबई - 400051.
तक्रार क्रं.ग्रातनिमं/मुंउजि 295/2015
तक्रार दाखल दिनांक 02/09/2015
आदेश दिनांकः- 20/12/2018
श्री. विशाल श्रीधर कांबळे,
रा. 3/7, अनुभुती अपार्टमेंट,
राधाबाई म्हात्रे रोड, दहीसर (प.),
मुंबई – 400068. ....... तक्रारदार
विरुध्द
1. झोलो केअर (XOLO CARE),
मुख्य कार्यालय – ए – 56,
सेक्टर 64, नोडीया, उत्तर प्रदेश.
2. सिलेक्शन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स (डिलर),
च्या वतीने मालक श्री. मुकेश,
शॉप नं. 3, पुरुषोत्तम निवास,
हरी शंकर जोशी रोड,
दहिसर (पूर्व), मुंबई – 400068.
3. हलीमा मार्केटींग अँड सोल्यूशन्स प्रा. लि.,
(सर्वीस सेंटर), च्या वतीने श्री भुक्ता,
104 / बी, सुमित समर्थ आर्केड,
पहिला मजला, आरे रोड, गोरेगांव (पश्चिम),
मुंबई – 400062. ...... सामनेवाले क्र. 1 ते 3
मंचः- मा. श्री.एम. वाय. मानकर, अध्यक्ष,
मा. श्री. एम. ए. एच. खान, सदस्य,
तक्रारदार स्वतः हजर
सामनेवाले क्र. 1 ते 3 विना लेखी कैफियत / गैरहजर
(युक्तीवादाचे वेळेस )
आदेश - मा. श्री.एम.ए. एच. खान, सदस्य ठिकाणः बांद्रा (पू.)
- न्यायनिर्णय -
(दि. 20/12/2018 रोजी घोषीत)
1. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. 2 यांचेकडून झोलो कंपनीचा मॉडेल A600, Colour – white, IMEI No. 911332300448672 हा नवीन मोबाईल खरेदी केला. परंतु खरेदी केल्यानंतर एका आठवडयाच्या आतच त्याच्यामध्ये बिघाड झाल्याने, तक्रारदारांनी सामनेवाले यांचे बोरीवली पश्चिम येथील ठक्कर मॉलमधील सर्वीस सेंटरला मोबाईलची समस्या सांगितल्यावर त्यांनी मोबाईल ठेवून घेतला व 15 दिवसांनी देतो असे तक्रारदारांना सांगितले. परंतु त्यांनी एक महिन्यांनी तक्रारदारांना मोबाईल परत केला. परंतु त्यानंतरही मोबाईल 4 ते 5 वेळा दुरुस्तीसाठी देऊनही त्यामधील समस्येचे निराकरण झाले नाही त्यामुळे मोबाईल सामनेवाले क्र. 3 कडे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आला. सामनेवाले क्र. 3 यांनी तक्रारदारांना त्यांचा मोबाईल दुरुस्त होईपर्यंत दोनदा दुसरा पर्यायी मोबाईल वापरण्यासाठी दिला. परंतु आजपर्यंत तक्रारदारांचा मोबाईल दुरुस्त झालेला नाही व सामनेवाले यांनी दिलेला पर्यायी मोबाईल सुध्दा सदोष व जुना असल्याने तक्रारदारांना त्यांच्या कामकाजामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या व सामनेवाले यांनी तक्रारदारांना अद्यापपर्यंत मोबाईल दुरुस्त करुन दिलेला नाही. तसेच सामनेवाले यांनी दिलेला पर्यायी मोबाईल सुध्दा सदोष व जुना असल्याने त्याची बॅटरी फुगली असल्याने मोबाईलच्या बॅटरीचा कधीही स्फोट होण्याची शक्यता आहे. याबाबत सामनेवाले यांना सांगितले असता, त्यांनी तक्रारदारांना उलट उत्तर दिले व मोबाईलची समस्येचे निराकरण केलेले नाही तसेच नवीन मोबाईल दिलेला नाही व गेली दीड वर्षे तक्रारदारांना मानसिक व शारिरिक त्रास देत आहेत.
तक्रारदारांनी सामनेवाले विरुध्द गोरेगांव पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांना वकीलांमार्फत नोटीस पाठविली परंतु त्यास सामनेवाले यांनी प्रतिसाद न दिल्याने तक्रारदारांना नाईलाजाने मंचात तक्रार दाखल करावी लागली. त्यामुळे तक्रारदारांनी मोबाईलची किंमत व्याजासहीत परत मागितली व त्रुटीची सेवा दिल्याने सामनेवाले यांचेकडून मानसिक व शारिरिक त्रासासाठी नुकसानभरपाई व तक्रारीच्या खर्चाची मागणी केली.
2. तक्रारीचा तपशिल असा आहे की, तक्रारदारांनी दि. 12/01/14 रोजी सामनेवाले क्र. 2 कडून झोलेा कंपनीचा मॉडेल A600, Colour – white, IMEI No. 911332300448672 रु. 7,350/- सर्व करांसहीत अदा करुन खरेदी केला व सोबत खरेदीची पावती प्रकरणात सादर केली. मोबाईल खरेदी केल्यानंतर 8 दिवसांतच त्यामध्ये दोष निर्माण झाला व मोबाईल नीट चालत नसल्याने तो सामनेवाले क्र. 3 कडे दुरुस्ती साठी पाठविला. सामनेवाले क्र. 3 ने एक महिन्यांनंतर मोबाईल दुरुस्त करुन दिला परंतु तरीदेखील मोबाईलमधील दोष दूर झाला नाही व त्यामधील समस्या कायम राहिली. त्यानंतर चार – पाच वेळा दुरुस्तीसाठी देऊनही मोबाईलमधील दोष दूर झाला नाही. तक्रारदारांनी मोबाईल दुरुस्तीबाबतची कागदपत्रे, पावत्या प्रकरणात सादर केल्या आहेत.
सामनेवाले क्र. 3 यांनी मोबाईलमधील दोष दूर झाला नाही त्यामुळे दुसरा पर्यायी मोबाईल तक्रारदारांना दिला व तीन महिन्यांनी तक्रारदारांचा मूळ मोबाईल दुरुस्त करुन देण्याबाबत आश्वासन दिले. दुसरा पर्यायी मोबाईल देखील सदोष असल्याने सामनेवाले क्र. 3 यांनी तक्रारदारांचा मूळ मोबाईल परत केला. त्याबाबत तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 3 विरुध्द पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली व सामनेवाले क्र. 3 यांना वकीलांमार्फत नोटीस पाठविली. सामनेवाले क्र. 3 यांनी गेल्या दीड वर्षांपासून तक्रारदारांच्या मोबाईलची दुरुस्ती केलेली नाही. तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 3 सोबत झालेल्या संभाषणाची टंकलिखीत प्रत प्रकरणात सादर केली.
3. सामनेवाले क्र. 1 ते 3 यांना मंचाद्वारे नोटीस पाठविण्यात आली. मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर सामनेवाले क्र. 1 करीता वकील कमलेश सिंग यादव हे हजर झाले व त्यांनी सामनेवाले क्र. 1 करीता वकीलपत्र व लेखी कैफियत सादर करणेकामी हमीपत्र दिले. परंतु तरी सुध्दा त्यांनी लेखी कैफियत सादर केली नाही. व सामनेवाले क्र. 2 व 3 यांनी सुध्दा लेखी कैफियत सादर केली नाही व ते गैरहजर राहिल्याने सामनेवाले विरुध्द प्रकरण विना लेखी कैफियत चालविण्याबाबत मंचाने दि. 20/06/18 रोजी आदेश पारीत केले
4. तक्रारदारांनी, सर्वीस सेंटरमध्ये मोबाईल जमा केल्याच्या पावत्या, सामनेवाले सोबत झालेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती, वकीलांमार्फत सामनेवाले यांना पाठविलेल्या नोटीसा, पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या तक्रारीच्या प्रती व लेखी युक्तीवाद प्रकरणात पुरावा शपथपत्रासहीत दाखल केल्या. तक्रारदारांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
5. प्रकरणात सामनेवाले यांची सतत गैरहजेरी व त्यांचे विरुध्द प्रकरण विना लेखी कैफियत चालविण्याबाबत पारीत केलेला आदेश, यांचा विचार करता, तसेच तक्रारदारांनी दाखल केलेली कागदपत्रे व पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व तोंडी युक्तीवाद विचारात घेता, तक्रारदारांचा पुरावा अबाधित राहिला आहे. तक्रारदारांना सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी दिलेली दोषपूर्ण सेवा, वॉरंटी कालावधीत मोबाईलमध्ये वारंवार होणारा बिघाड लक्षात घेता, व त्या अनुषंगाने तक्रारदारांनी केलेला तोंडी युक्तीवाद इत्यादी बाबींवरुन सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदोष मोबाईल पुरविल्याचे सिध्द होते व त्यांनी तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिल्याचे सिध्द झाल्याने खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1) तक्रार क्रमांक 295/2015 अंशतः मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदार यांना दोषपूर्ण मोबाईल पुरवून त्रुटीची सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3) सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी व्यक्तीशः किंवा संयुक्तरित्या तक्रारदार यांना झोलो कंपनीचा मोबाईल मूळ किंमत रक्कम रु. 7,350/- (रु. सात हजार तीनशे पन्नास मात्र) सर्व करांसहीत ही रक्कम दि. 12/01/2014 पासून ते आदेश पारीत दिनांकापर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह दोन महिन्यांचे आत परत करण्याबाबत आदेशित करण्यात येते.
4) सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी व्यक्तीशः किंवा संयुक्तरित्या तक्रारदारांना मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु. 10,000/- (रु. दहा हजार मात्र) आदेश पारीत दिनांकापासून दोन महिन्यांचे आत अदा करावेत.
5) सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी व्यक्तीशः किंवा संयुक्तरित्या तक्रारदारांना तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु. 5,000/- (रु. पाच हजार मात्र) आदेश पारीत दिनांकापासून दोन महिन्यांचे आत अदा करावेत.
6) वरील क्लॉज क्र. 3 ते 5 मधील सर्व रकमा दोन महिन्यांत सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदारांना अदा न केल्यास वरील रकमा सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी व्यक्तीशः किंवा संयुक्तरित्या दि. 20/02/2019 पासून तक्रारदारांना सर्व रक्कमा अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह परत करावेत.
7) तक्रारीचे अतिरिक्त संच तक्रारदारांना परत करण्यात यावेत.
8) न्यायनिर्णयाच्या प्रती उभयपक्षांना विनामूल्य पाठविण्यात याव्यात.
ठिकाणः बांद्रा (पू.) मुंबई.
दिनांकः 20/12/2018.