श्रीमती स्मिता चांदेकर, मा. प्रभारी अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का. अन्वये दाखल केलेली आहे. सदर तक्रारीतील वि.प.क्र. 1 अ व ब कडून विकत घेतलेल्या मोबाईलमध्ये स्फोट झाल्याने झालेल्या क्षतिमुळे नुकसान भरपाई मिळण्याकरीता दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्याने वि.प.च्या एमआय स्टोरवरुन दि.02.06.2021 रोजी रु.14,999/- किंमतीचा “Redmi Note 10 Shadow Black” विकत घेऊन ऑनलाईन मागविला. तक्रारकर्त्याला प्रस्तुत मोबाईल हा दि.07.06.2021 रोजी प्राप्त झाला. मोबाईल खरेदी केल्यानंतर दोन महिन्यानंतर तक्रारकर्ता जेव्हा तो वापरत होता, तेव्हा त्यामध्ये स्फोट झाला आणि तक्रारकर्त्याचा मोबाईल मांडीवर पडला आणि त्यांच्या मांडीला दुखापत झाली. तक्रारकर्ता हा वि.प.च्या अधिकृत सेवा केंद्रावर मोबाईल घेऊन गेला आणि काही उपाय मिळतो का म्हणून सदर मोबाईल त्यांना सुपूर्द केला व कंपनीला पाठविण्यास सांगितले. त्यानंतर तीन दिवसानंतर तक्रारकर्ता विचारणा करण्याकरीता गेला असता वि.प.चे अधिकृत सेवा केंद्राने मोबाईल हा फुटलेला नाही तो जळालेला असल्याने ते काही मोबदला देऊ शकत नाही असे सांगितले. तसेच काही दिवसानंतर त्यांचे मॅनेजरने फोनवरुन तक्रारकर्त्याला आधी 50% रक्कम व नंतर 25% रकमेची मागणी केली. तक्रारकर्त्याने मोबाईलमध्ये स्फोट होणे ही त्याची चूक नसून त्यांची जबाबदारी आहे असे उत्तर दिले. तक्रारकर्त्याने त्यानंतर वि.प.कंपनीला कायदेशीर नोटीस पाठविला. परंतू वि.प.ने त्याची दखल घेतली नाही, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल करुन मोबाईलची किंमत रु.14,999/- परत मिळावी, मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
3. सदर प्रकरणाची नोटीस वि.प.क्र. 1 अ व ब यांना पाठविली असता ते आयोगासमोर हजर झाले नाही, म्हणून आयोगाने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला.
4. तक्रारकर्त्याचा तोंडी युक्तीवाद त्यांचे वकीलांमार्फत ऐकण्यात आला. असता आयोगाचे विचारार्थ उपस्थित राहीलेले मुद्दे आणि त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे उत्तर
1. तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय.
2. तक्रारकर्त्याची तक्रार विहित कालमर्यादेत आहे काय ? होय.
3. वि.प.च्या सेवेत त्रुटी व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब आहे काय? होय.
4. तक्रारकर्ता कुठली दाद मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे.
5. मुद्दा क्र. 1 – तक्रारकर्त्याने नि.क्र. 5 वर दाखल केलेल्या दस्तऐवजाच्या प्रतीवरुन तक्रारकर्त्याने वि.प.कडून रु.14,999/- किंमतीमध्ये मोबाईल घेतल्याची आणि मोबाईलमध्ये स्फोट झाल्यावर क्षतिपूर्तीकरीता वि.प.च्या अधिकृत सेवा केंद्राला पुढील कार्यवाहीकरीता दिल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यावरुन तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक असल्याचे दिसून येते. म्हणून मुद्दा क्र. 1 चे निष्कर्ष होकारार्थी नोंदविण्यात येतात.
6. मुद्दा क्र. 2 – तक्रारकर्त्याने मोबाईल हा दि.02.06.2021 रोजी बोलाविल्याचे आणि दि.09.06.2021 रोजी त्याला प्राप्त झाल्याचे अनुक्रमे पृ.क्र. 16 व 17 वरील दस्तऐवजावरुन दिसून येते. तसेच मोबाईलचा स्फोट हा तो खरेदी केल्यापासून तीन महिन्यानंतर झाल्याचे आणि पुढे मोबाईल वि.प.चे अधिकृत सेवा केंद्रामध्ये क्षतीपूर्ती मिळण्याकरीता देण्यात आल्याचे दाखल दस्तऐवजांवरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार ही विहित कालमर्यादेत असल्याचे आयोगाचे मत आहे. तक्रारकर्त्याची मागणी पाहता सदर तक्रार ही आयोगाचे आर्थिक अधिकारीतेत असल्याचे आयोगाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. 2 चे निष्कर्ष होकारार्थी नोंदविण्यात येतात.
7. मुद्दा क्र. 3 – तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत मोबाईल खरेदी केल्याबाबतचे जे दस्तऐवज दाखल केले आहे, त्यावरुन मोबाईल हा अत्यंत कमी कालावधीमध्ये म्हणजेच वारंटी किंवा ग्यारंटी कालावधीच्या आत स्फोट होऊन खराब झालेला आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या प्रतीमध्ये मोबाईलमध्ये स्फोट होऊन जळालेल्या मोबाईलचे छायाचित्र, मोबाईल वि.प.च्या अधिकृत सेवा केंद्राला त्याने क्षतिपूर्तीबाबत करावयाच्या कारवाईकरीता तो जमा केल्याचे दस्तऐवज समाविष्ट आहे. त्यावरुन तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन हे दस्तऐवजावरुन सिध्द होते. मोबाईल खरेदी केल्यानंतर इतक्या कमी कालावधीत तो क्षतिग्रस्त झाल्याने मोबाईलच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. तसेच वि.प.च्या अधिकृत सेवा केंद्राने मोबाईल दुरुस्तीला दिल्यावर Service Record (नि.क्र.7) मध्ये Fault Description - Battery Bulge झाल्याने मोबाईल हँडसेट जळाल्याचे नमूद केले आहे. मोबाईल खरेदी केल्यानंतर खुप कमी कालावधीत त्याची बॅटरी फुगणे आणि त्यामुळे क्षतिग्रस्त होणे ही वि.प.ने पुरविलेल्या मोबाईलची आणि त्यामध्ये वापरण्यात आलेल्या सुट्या भागांची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची असल्याचे सिध्द होते आणि अशा प्रकारचा निकष्ट दर्जाचा मोबाईल वि.प.ने पुरविल्याचे व क्षतिग्रस्त झाल्यावर त्याची भरपाई न दिल्याने वि.प.ने ग्राहकास सेवा देण्यास कसूर केल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे मोबाईल जळाल्यामुळे तक्रारकर्त्याला झालेली इजा व शारिरीक दुखापत होण्याचा धोका अतिशय गंभीर बाब आहे. तसेच पुढे तक्रारकर्त्याने त्याबाबत तक्रार केली असता त्याला मोबाईल बदलवून देण्याकरीता 25% रकमेची मागणी करुन वि.प.ने सेवेत उणिव ठेवल्याचे दिसून येते. तसेच किमतीबाबतची संपूर्ण रक्कम स्विकारुन गुणवत्ताहीन वस्तू पुरविल्याने आणि पुढे त्याची भरपाई न केल्याने वि.प.ने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र. 3 चे निष्कर्ष होकारार्थी नोंदविण्यात येतात.
8. मुद्दा क्र. 3 – तक्रारकर्त्याच्या तक्रारीची वि.प.ला आयोगाद्वारे सदर तक्रारीची नोटीस पाठविण्यात आली होती. परंतू वि.प. आयोगासमोर हजर झाले नाही किंवा तक्रारीस लेखी उत्तर दाखल करुन तक्रारकर्त्याची तक्रार नाकारलेली नाही, यावरुन वि.प.ला तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन मान्य असल्याचे दिसून येते. दाखल जळालेल्या मोबाईलच्या फोटोवरुन मोबाईल हा दुरुस्त होण्यासारखा नाही आणि परत बदलवून मागितला असता त्यामध्ये परत तोच दोष उत्पन्न झाला तर वि.प.ची एकूण व्यवहार व सेवेतील त्रुटी बघता. अशा परिस्थितीमध्ये तक्रारकर्त्याला मोबाईलची रक्कम परत करणे उचित होईल असे आयोगाचे मत आहे. तक्रारकर्त्याचा मोबाईल हातात असतांना जळाला व हातातुन मांडीवर पडल्यामुळे त्याच्या मांडीला इजा झाल्याचे दिसून येते. वि.प.ने पुरविलेल्या निकृष्ट दर्जाच्या मोबाईलमुळे थोडक्यात दुखपात झाली असली तरी त्यापेक्षा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे साहजिकच भितीपोटी मानसिक धक्का व शारिरीक त्रास झालेला आहे. तसेच तक्रारकर्त्याला मोबाईलच्या नसण्याने जो मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला, त्याकरीता तक्रारकर्ता त्याची नुकसान भरपाई मिळण्यास आणि तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र असल्याचे आयोगाचे मत आहे.
- अंतिम आ दे श –
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत असून वि.प.क्र. 1 व 2 ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला मोबाईलची किंमत रु.14,999/- परत करावी.
2) वि.प.क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला शारिरीक आणि मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाईदाखल रु.10,000/- द्यावे आणि तक्रारीच्या खर्चादाखल रु.10,000/- द्यावे.
3) सदर आदेशाचे पालन वि.प.क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 45 दिवसांचे आत करावे.
4) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरविण्यात यावी.