ग्राहक तक्रार अर्ज क्रं.309/2010 तक्रार अर्ज दाखल दि.28/10/2010 अंतीम आदेश पारीत दि.30/06/2011 जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नाशिक श्री.विजय दशरथ नायडू, ) अर्जदार उ. वय- 67 वर्षे, धंदा- काही नाही, (श्री.वाय.एच.आहेर,वकिल) रा. फ्लॅट नं.2, शितल विहार, उन्मेश हॉलजवळ, डॉ.भाभानगर, नाशिक. विरुध्द 1) वोक्हार्ट हॉस्पिटल्स, ) सामनेवाले वाणी हाऊस, वडाळा नाका जवळ, (श्रीमती गिता हंडा खनुजा,वकिल) मुंबई आग्रा रोड, नाशिक. 2) डॉ. अभिजित मचनुरकर, ) उ. वय- सज्ञान, धंदा- डॉक्टर 3) डॉ. मुकेश मोरे, ) उ. वय- सज्ञान, धंदा- डॉक्टर 4) डॉ. डी.एस. वाघ, ) उ. वय- सज्ञान, धंदा- डॉक्टर 5) डॉ. पी.डी. शिंदे, ) उ. वय- सज्ञान, धंदा- डॉक्टर सर्व- वोक्हार्ट हॉस्पिटल्स, वाणी हाऊस, वडाळा नाका जवळ, मुंबई आग्रा रोड, नाशिक. मा.सदस्या अँड.सौ.विणा दाणी यांनी आदेश कथन केला. नि का ल प त्र अर्जदार यांना यांचेकडून तक्रार अर्ज कलम 32 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे जाबदेणार नं.1 ते 5 यांचकडून वैयक्तीक व संयुक्तीकरित्या मानसिक,शारिरीक,आर्थिक नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.19,00,000/- मिळावी व या रकमेवर प्रत्यक्ष रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.15टक्के दराने व्याज मिळावे तसेच तक्रार अर्जाचा खर्च मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. जाबदेणार क्र.1 ते 5 यांनी या कामी नि.8 लगत एकत्रीत लेखी म्हणणे व नि.9 लगत जाबदेणार क्र.4 यांचे प्रतिज्ञापत्र, नि.10 लगत जाबदेणार क्र.5 यांचे प्रतिज्ञापत्र, नि.11 लगत डॉ.राहूल बाविस्कर यांचे प्रतिज्ञापत्र, नि.12 लगत जाबदेणार नं.3 यांचे प्रतिज्ञापत्र, नि.13 लगत राहूल शर्मा यांचे प्रतिज्ञापत्र व नि.14 लगतच्या यादीप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत. 1) अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय?------------------------- होय. 2) सामनेवाला यांनी वैद्यकिय सेवा देण्यामध्ये निष्काळजीपणा केला आहे काय?- नाही. 3) अंतिम आदेश? ------- अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजुर करण्यात येत आहे. विवेचन -- याकामी अर्जदार यांचेवतीने अँड.वाय.एच.आहेर यांनी युक्तीवाद केलेला आहे. सामनेवाले यांचे वतीने अँड.गिता हंडा खनुजा यांनी युक्तीवाद केलेला आहे. अर्जदार यांनी नि.60 लगत व सामनेवाले नं.1 ते 5 यांनी नि.66 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेले आहेत. सामनेवाले यांनी त्याचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये अर्जदार हे ग्राहक असल्याची बाब अमान्य केलेली नाही तसेच सामनेवाला यांनी अर्जदार यांचेकडून रक्कम रु.33,000/- फी घेतल्याची बाब नि.59 वरील सामनेवाला यांनी दिलेल्या पावतीवरुन स्पष्ट होते नि.59 वरील पावतीचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांचा मुलगा नामे श्री.रविंद्र वय 32 यांचे नाकातून रक्त येत असल्याने त्यांना वोक्हार्ट हॉस्पीटल मध्ये दि.15/4/2010 रोजी रात्री 10 ते 10.30च्या दरम्यान भरती केले. त्यावेळेस जाबदेणार क्र.2 यांनी रविंद्रची तपासणी केल्यानंतर पेशंट नॉर्मल आहे असे सांगितले व त्यावेळेस पेशंटला स्पेशल रुममध्ये ठेवण्यात आले होते. दि.15/4/2010 पासून दि.16/4/2010 प्राथमिक चाचण्या, उपचार सुरु होते. त्यादरम्यान जाबदेणार नं.2 ते 5 यांनी रविंद्र यांना तपासून उपचार केलेले आहेत.” असा उल्लेख केलेला आहे. तसेच अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये “दि.16/4/2010 चे पहाटे 3 वाजेच्या सुमारास रविंद्र बाथरुमला जात असतांना पडला. त्यावेळेस त्याला अस्वस्थ वाटु लागले व छातीत वेदना सुरु झाल्या. त्यावेळेस संबंधीत डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही व त्वरीत उपचार केले नाहीत तसेच पेशंटला आय.सी.यु.मध्ये दाखल केले नाही. सकाळी 7 वाजेच्या दरम्यान रविंद्रची परिस्थिती गंभीर झाल्याचे दर्शवून घाईगर्दीत आय.सी.यु.मध्ये दाखल केले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास अर्जदार यांच्या पुतन्याची एका कागदावर सही घेतली व रविंद्रला आर्टिफिशीयल हार्टवर ठेवून औषधोपचार करण्यात आल्याचे सांगितले. त्यांनतर 12.30 वाजता रविंद्र मयत झाल्याचे अर्जदार यांना सांगण्यात आले” असा उल्लेख केलेला आहे. तसेच अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये “अर्जदार यांच्या माहितीनुसार त्यांचा मुलगा दि.16/4/2010 रोजी सकाळी 8.30 लाच मयत झाला होता. रविंद्रचा मृत्यु हायपरटेन्शने झाल्याचे सांगण्यात आले. वास्तवात जर पेशंटला असा आजार असल्याचे प्रथमतः आढळले होते तर डॉक्टरांनी पेशंटला अगोदरच आय.सी.यु.त का दाखल केले नाही? तसेच ब्रेन हॅमरेज झाला का इंटरनल हॅमरेज झाले, याची तपासणी का केली नाही? त्याचप्रमाणे पेशंट बेशुध्द झाल्यावर 3 ते 4 तासाची दिरंगाई का करण्यात आली? तसेच डॉक्टरांना त्वरीत पेशंटला बघण्यासाठी न बोलावता त्यांचेकडून फोनवरुन माहिती घेण्यात आली. अशा प्रकारे जाबदेणार हॉस्पीटलचे डॉक्टर, संबंधीत नर्सेस यांनी कुठल्याही प्रकारची योग्य ती काळजी न घेता निष्काळजीपणा दाखवला आहे.” असा उल्लेख केलेला आहे. तसेच अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये “मयत रविंद्र यांस वारंवार त्रास होत असल्याची जाणीव रविंद्र यांची पत्नी हिने संबंधीत डॉक्टर व नर्सेस यांना करुन दिली होती. तसेच रविंद्रची तब्येत सिरीयस झाल्यानंतरही त्याबाबत रविंद्रच्या आई, वडील व पत्नी यांना कळविले नाही. तसेच इतर स्पेशालिस्ट डॉक्टरांना बोलावून अथवा दुसरे ठिकाणी हलवून रविंद्रचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत. तसेच रविंद्र यास हॉस्पीटलला भरती करतांना त्यांचा ब्लडप्रेशर 180/120 असा दर्शवत असतांना व हायपरटेन्शनचा त्रास असतांना अशा परिस्थितीत फक्त नाकातून रक्त येण्याबाबतचे उपचार केले परंतु पेशटला ब्रेन हॅमरेज होण्याची शक्यतेच्या दृष्टीने सिटी स्कॅन केले नाही अगर ब्लेडप्रेशर कमी होण्यासाठी उपचार न करता त्यास स्पेशल रुममध्येच ठेवले. जाबदेणार नं.2 हे कॉर्डीऑलॉजीस्ट असतांना त्यांनी दि.16/4/2010 रोजी सकाळी 7 वाजता रविंद्रची तपासणी केली. दि.16/4/2010 रोजी सकाळी जाबदेणार नं.2 यांनी फक्त नाकातून येणारे रक्ताबाबत उपचार केले. तसेच 7.55 वाजता जे शॉक देण्यात ते देखील चुकीच्या पध्दतीने दिलेले आहेत, त्यात सातत्य नव्हते. अशाप्रकारे जाबदेणार यांनी मयत रविंद्र यास उपचार करतांना निष्काळजीपणा केलेला असून रविंद्र यांच्या मृत्युस जाबदेणार कारणीभुत आहेत.” असा उल्लेख केलेला आहे. तसेच अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये “यांनी स्वतःच्या चुका लपवण्याच्या हेतुने सोयीस्कररित्या रविंद्र यावर केलेल्या उपचारांच्या टिपण्यामध्ये सोयीस्कररित्या अनेक ठिकाणी खाडाखोड केलेली आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी ओव्हररायटींग तर काही मजकूर हा नंतर लिहीण्यात आलेला आहे. डॉक्टरांच्या व्हिजीट वेळा व पेशंटच्या उपचाराबाबतचे दिलेले औषधे याचा कुठलाही ताळमेळ दिसत नाही. तसेच मयत रविंद्रचे पोस्टमार्टेम करणे गरजेचे होते परंतु सदर बाब हेतुतः टाळून त्यांचे सोयीनुसार हॉस्पीटलमधील डॉक्टर प्रोग्रेस नोट्समध्ये फेरबदल केलेले आहेत. सदर हॉस्पीटलमधील संबंधीत स्टाफ,नर्स,डॉक्टर,वार्डबॉय,शिपाई यांचे सर्वांचे वर्तन उर्मट व बेजबाबदारपणाचे होते. तसेच रविंद्रच्या मृत्युनंतर मयताच्या उपचाराची कागदपत्रे मागितली असता ती टाळाटाळ करुन 1 महिन्याने देण्यात आली” असा उल्लेख केलेला आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “त्यांचे हॉस्पीटल स्पेशलाईज्ड इस्पितळे चालवतात, त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अनेक वैद्यकिय सुविधा उपलब्ध आहेत. पेशंट रविंद्र हे हॉस्पीटलला दि.15/4/2010 रोजी रात्री 10.45 वाजता भरती झाले त्यावेळी त्यांचा रक्तदाब 160/120 एमएम एचजी इतका होता तो रात्री 11 वाजता 164/122 इतका वाढला होता. क्लिनीकल रेकॉर्डमध्ये रुग्ण लठ्ठ होता, त्याची जिवनशैली बैठी होती, भरती होण्याच्या वेळी रविंद्र यांनी उच्च रक्तदाब व त्यावरील औषधोपचार 8 ते 10 दिवसांपासून बंद करणे, उजव्या नाकपुडीतून रक्तस्त्राव, हायपरटेन्सीव्ह एपीस्टॅक्सीस, डिसलिपीडेमिया, डोकेदुखी, खुप जास्त प्रमाणात धुम्रपान आणि लठ्ठपणा असा पेशंट रविंद्र यांचा वैद्यकिय इतिहास होता. रविंद्र हे उच्चरक्तदाबासाठी बिटालॉक 25 मि.ग्रॅ.ही गोळी नियमितपणे घेत असून गेल्या 8 ते 10 दिवसांपासून वैद्यकिय सल्ल्याशिवाय ही गोळी घेणे थांबवले होते.” असा उल्लेख केलेला आहे. तसेच सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये “पेशंटला तात्काळ आय.सी.यु. मध्ये भरती होण्याचा सल्ला दिला होता परंतु पेशंट व त्यांच्या नातेवाईकांनी तो नाकारला. त्यामुळे रविंद्र यांना वार्डमध्ये भरती करण्यात आले. तेथे ते सतत वैद्यकिय निरीक्षणाखाली होते. पेशंट रविंद्र यास याच वैद्यकिय कारणासाठी दुस-या हॉस्पीटलमध्ये इ.एम.टी. तज्ञांनी तपासले होते.” असा उल्लेख केलेला आहे. तसेच सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये “दि.16/4/2010 रोजी पहाटे 3 वाजता बाथरुमला जातांना रुग्ण खाली पडला ही गोष्ट सामनेवाला नाकारत आहेत. जाबदेणार असे नमूद करतात की, तपासणीमध्ये वॉन्ग बेकर पेन रेटिंग स्केलवर वेदना शुन्य दाखवली गेली होती. तसेच विज्युअल अनालॉग स्केलवरही 1 ते 10 च्या स्केलवर कोणतीही वेदना उघडकीस आली नव्हती. दि.16/4/2010 रोजी रात्री 12 वाजता रुमच्या माहितीबरोबरच नर्सिंग कॉल बेल सिस्टमचीही माहिती दिली गेली होती व रुग्णाच्या बेडला रेलींगही लावले होते. वैद्यकिय नोंदी असे दाखवतात की, लघवीचे मापन बेडपॅन दिल्यानेच होऊ शकते. त्यामुळे रुग्णाचा बेडवरुन पडण्याचा किंवा जाबदेणार नं.2 ते 5 कडून वैद्यकिय सेवा न मिळण्याचा प्रश्नच येत नाही. वैद्यकिय नोंदीनुसार रुग्ण वार्डमध्ये भरती झाल्यापासून सतत निरीक्षणाखाली होता. दि.15/4/2010 रोजी रात्री 11.10 वाजता रुग्णाला तपासले तेंव्हा त्यांचा रक्तदाब 180/120 होता तसेच मध्यरात्री 12 वाजता 180/120 व त्यानंतर रात्री 2 वाजता तपासले तेंव्हा 140/100 इतका नोंदवला गेला. रात्री 2.50 ला डयुटीवरील डॉक्टरांनी पेशंटला तपासले तेंव्हा त्यांच्या उजव्या नाकपुडीतून रक्तस्त्राव होत असल्याचे लक्षात आले. तक्रारदार त्यांच्या तक्रारीत रुग्ण बेडवरुन खाली पडल्याचे नमूद आहे मात्र त्यावेळी पेशंटचा रक्तदाब तपासला जात होता व तो निरीक्षणाखाली होता. पेशंट खाली पडलाच नाही. तसेच पहाटे 3 वाजता रुग्णाला शिरेतून औषध दिले जात होते. क्लिनीकल रेकॉर्डमध्ये लघवीचे प्रमाण नोंदवले गेले आहे जे बेडपॅन दिल्यानेच मोजता येते. त्यामुळे बाथरुमला जाण्यासाठी रुग्णाच्या शिरेतून सुई काढण्याचा प्रश्नच येत नाही.” असा उल्लेख केलेला आहे. तसेच सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये “रुग्ण भरती झाल्यापासून तासाला 5 मि.ली. एन टी जी इन्फयुजन दिले जात होते नंतर ते तासाला 2.5 मिली इतके केले गेले. पण सतत होणा-या रक्तस्त्रावामुळे आय.सी.यु. रजिस्ट्रारने ते तासाला 5 मिली करण्याचा सल्ला दिला. एन.टी. जी. हे शीरेतून देण्याचे औषध असून उच्च रक्तदाबातील इमर्जन्सीच्या वेळी वापरले जाते. पहाटे डयुटीवरील डॉक्टरांनी रक्तदाब 130/100 नोंदवला त्यावर उपाय म्हणून इमर्जन्सी उपाय म्हणून जाबदेणार नं.3 यांनी ताबडतोब नेजल पेकिंग केले व त्यानंतर रक्तस्त्राव संपुर्णपणे थांबला” असा उल्लेख केलेला आहे.. तसेच सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये “जाबदेणार नं.1 यांचेकडे स्टॅन्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर आहे ज्याला कोड ब्ल्यु म्हणतात ज्यावर SOP/NSG/ADMIN/05ISSUE-01 हा नंबर असतो. ही सेवा तात्काळ सेवा असते त्यात तीन मिनीटाचे आत रुग्णाला सर्व पातळीवर वैद्यकियस मदत दिली जाते. त्यात प्रत्येक बेडवर दोन निळया रंगाची बटणे असतात जी डयुटीवरील नर्स किंवा डॉक्टर किंवा रुग्णांचे नातेवाईक दाबु शकतात. सदर बाब दि.15/4/2010 व दि.16/4/2010 रोजी रात्री 12 वाजता रुग्णाना समजावले होते. दोन्ही बटणे वैद्यकिय इमर्जन्सीसाठी सतर्क करतात. नर्सच्या नोंदीनुसार ही माहिती रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दि.15/4/2010 व 16/4/2010 रोजी रुम ओरीएंटेशनच्या वेळी दिली होती.” असा उल्लेख केलेला आहे. तसेच सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये “तक्रारदार यांनी तक्रारीत रविंद्र यांना सकाळी 7 वाजता आय.सी.यु. मध्ये हलवले असे नमूद आहे. परंतु सत्य परिस्थीती अशी आहे की, पहाटे 3.30 ला रुग्णाची परिस्थिती व्यवस्थीत होती, त्यानुसार रक्तदाब नियंत्रणाचे औषध सुरु ठेवण्याचे नेजल पॅक रक्तदाब कमी झाल्यावर किंवा 48 तास झाल्यावर काढण्याचा सल्ला दिला त्यानंतर सकाळी 6 वाजेपर्यंत तपासले असल्याचे वायटल चार्टमध्ये नमूद आहे. पहाटे 6.15 वाजता रुग्णाने छातीतील वेदनेची तक्रार केली. 6.22 ला इ.सी.जी. घेतला त्यात अक्युट अण्ड एक्टेन्सीव अन्टेरियर वॉल मायकार्डियल इन्फार्कशनचे निदान केले गेले व आय.सी.यु. मध्ये हलवण्याचा सल्ला दिला. आय.सी.यु. च्या रजिस्ट्रारने पेशंटला तपासून त्याचा रक्तदाब 110/70 इतका असल्याचे नोंदवले आहे. यावेळेला एन.टी.जी.इन्फयुजन थांबवण्यात आले. गळयातील शिरेचा रक्तदाब त्यावेळी नॉर्मल होता. हृदयाचे ठोके S1 आणि S2 हेही नॉर्मल होते. हृदयात कोणतीही मरमर जाणवली नाही व छाती मोकळी होती.” असा उल्लेख केलेला आहे. तसेच सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये “दि.16/4/2010 रोजी सकाळी 7.30 वाजता रुग्ण कोमॅटोज होवून त्याचे डोळे लाल व बुबुळे सेमी डायलेट झाली होती. रुग्णाची नाडी लागत नव्हती आणि श्वसनासाठी आर्टिफिशियल व्हेंटीलेटर लावला होता. रुग्णाला व्हेंट्रीक्युलर फिब्रीलेशन झाले होते. त्यावेळी स्टँडर्ड मेडीकल प्रोसिजरनुसार रुग्णाला 200 ज्युल्सचा डि.सी. शॉक दिला गेला. तसेच कार्डिओपल्मनरी रेस्युसिटेशही सुरु केले गेले. क्षायलोकार्ड 3 सीसी इन्जेक्शन दिले गेले हेच इन्जेक्शन पुन्हा दिले गेले. कार्डिओपल्मनरी रेस्युसिटेशन ही कार्डिअकअरेस्टच्या वेळी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी केली जाणारी इर्मजन्सी क्रिया आहे. केवळ सी.पी.आर मुळे हृदय सुरु होतेच असे नाही. हृदयाची गती पुन्हा पुर्ववत करण्यासाठी हृदयाला इलेक्ट्रीक शॉक दिला जातो ज्याला डिफिब्रीलेशन असे म्हणतात. पेशंटला थोडेसे सायरन रिदम होते जे व्हेंट्रीक्युलर फिब्रीलेशनकडे पुन्हा पुन्हा जात होते म्हणून सामनेवाला नं.2 यांनी कार्डारोन 150 हे इंजेक्शन देवून इन्फयुजन सुरु केले. तसेच डायल्युटेड मॅग्नेशियम सल्फेटचे इंजेक्शन दिले तसेच कार्डीओपल्मरी रेस्युसिटेशन सुरु ठेवून डोपामाईन इंजेक्यन दिले. हे सर्व उपाय करुनही रुग्णामध्ये वारंवार व्हेंट्रीक्युलर फिब्रीलेशन्स उदभवतच होते.” असा उल्लेख केलेला आहे. तसेच सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये “रक्तस्त्राव होण्याच्या शक्यतेमुळे नातेवाईकांची हाय रिस्क कंसेन्ट घेतली गेली होती. थ्रॉम्बोलिसीस सुरु केले होते. रुग्ण व्हेंटीलेटर व डोपामाईनवर होता. मॉनिटरवर वारंवार होत असलेले व्हेंट्रीक्युलय फिब्रीलेशन दाखवले जात होते. त्यावर डी.सी.शॉक आणि कार्डिओपल्मनरी रेस्युसिटेशन उपायही सुरु होते. दि.16/4/2010 रोजी सकाळी 8.00 वाजता कार्डिहोपल्मनरी रेस्युसिटेशन दिल्यानंतर सायनस रिदम पुर्ववत झाली. त्यानंतर 8.20 वाजता इ.सी.जी.घेतला गेला ज्यामध्ये ST elevation in V1 to V6 and q in II III a VF होते हे दिसून आले. Trop T नकारात्मक होते व CK-MB हे काठावर होते. सकाळी 8.40 वाजता एको गाईडन्सखाली सबक्लेविअन व्हेन मधून एक टेम्पररी पेस मेकर बसवण्यात आला. रुग्णाची गती 40 मिमि इतकी असून अधूनमधून व्हेंट्रीक्युलर फिब्रीलेशन होत होते. त्यासाठी पेसिंग व शॉक दिले गेले होते. रुग्णाची एकंदर परिस्थिती वाईट असून त्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे हे रुग्णाच्या नातेवाईकांना समजावून सांगितले होते. रुग्णाच्या न्युरोलॉजीकल अवलोकन करण्यासाठी सामनेवाला नं.5 यांना बोलावले गेले. रुग्णाला व्हेंट्रीक्युलर फिब्रीलेशन आणि अधूनमधून ब्रॅडकार्डिया होतच राहीले यात पेशंटचा जीव वाचवणे कठीण असते हे सुध्दा पेशंटच्या नातेवाईकांना सांगितले होते. दि.16/4/2010 रोजी 12.45 वाजता रुग्ण स्वतः श्वास घेत नव्हता, पल्स लागत नव्हते, रक्तदाब मोजला जात नव्हता, कार्डिअकमॉनिटरवर काहीतरी हालचाल दिसत होती पण सेंट्रल नर्व्हस सिस्टममध्ये मेंदुचे कोणतेही कार्य दिसत नव्हते. दुपारी 12.50 ला सामनेवाला नं.4 यांनी तपासले आणि हृदयाचे कार्य बंद असल्याचे निदान केले. तसेच रुग्णाचा श्वास सुरु नव्हता व रुग्ण सजीव असल्याची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती. त्यामुळे रुग्णाला 12.50 वाजता मयत घोषीत करण्यात आले. तसे रुग्णाच्या नातेवाईकांना लगेच कळविण्यात आले. रुग्णाचा मृत्यु हा व्हेंटीक्युलर फिब्रीलेशन विथ अक्युट कॉरोनरी सिंड्रोम आणि अति उच्च रक्तदाबामुळे झाला असे जाहीर करण्यात आले.” असा उल्लेख केलेला आहे. तसेच सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये “सामनेवाला सर्व डॉक्टरांनी रुग्णाचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सामनेवाला यांचेकडून कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा झालेला नाही. याउलट तक्रारदार यांनाच रुग्णाला झालेले आजार, त्याची बिघडलेली तब्येत आणि वैद्यकिय गुंतागुंत समजली नाही.” असा उल्लेख केलेला आहे. सामनेवाला यांनी मयत रविंद्र यांचेवर उपचार करतांना नक्की कोणता निष्काळजीपणा केलेला आहे याचा कोणताही स्पष्ट उल्लेख अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्रामध्ये केलेला नाही. मयत रविंद्र यांचेवर या पुर्वी इ.एन.टी डॉक्टरांचेकडे उपचार केलेले होते असा स्पष्ट उल्लेख सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये केलेला आहे. परंतु याबाबत व पुर्वीच्या उपचाराबाबतचा कोणताही उल्लेख अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये केलेला नाही. अर्जदार यांनी सामनेवाला यांचे लेखी म्हणण्याबाबत नि.32 लगत लेखी प्रतिउत्तर दाखल केलेले आहे. या लेखी प्रतिउत्तरामधील कलम 9 मध्ये अर्जदार यांनी मयत रविंद्र यांना इ.एन.टी डॉक्टरांकडे दाखविले होते हे मान्य केलेले आहे. परंतु इ.एन.टी.डॉक्टरांचे नाव व त्यांनी मयत रविंद्र यांचेवर केव्हा किती तारखेस व किती दिवसांकरीता कोणकोणते उपचार केले याचा उल्लेख अर्जदार यांनी या प्रतिउत्तरामध्ये केलेला नाही. पुर्वीच्या उपचाराबाबतची माहिती अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये व प्रतिउत्तरामध्ये का दिलेली नाही याचा कोणताही खुलासा अर्जदार यांनी योग्य रित्या केलेला नाही. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र यामध्ये मयत रविंद्र यास हाय ब्लड प्रेशरचा पुर्वविकार व चार महिन्यापासून आजार होता व रविंद्र यांनी 8 दिवसापुर्वीपासून औषधे बंद केलेली आहेत असा उल्लेख केलेला आहे. याबाबतची नोंद पान क्र.14/3 चे केसपेपरवरती सामनेवाला यांनी केलेली आहे. रविंद्र यांचेबाबतीतील आरोग्याची व आजाराची माहिती त्यांनी स्वतः किंवा नातेवाईकांनी सामनेवाला यांना दिल्याशिवाय अशी नोंद पान क्र.14/3चे केसपेपरवर होऊ शकत नाही. रविंद्र यांचे पुर्व आजाराबाबत सामनेवाला यांना माहिती असण्याचे कोणतेही कारण नाही. अर्जदार यांनी तक्रार अर्ज कलम 2 मध्ये “दि.16/4/2010 चे पहाटे 3 वाजता रविंद्र बाथरुमला जात असतांना पडला.” असा उल्लेख केलेला आहे. परंतु सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये अर्जदार यांचे हे कथन स्पष्टपणे नाकारलेले आहे. पान क्र.14/1 ते 14/39 लगतचे केसपेपरवरील नोंदीमध्ये मयत रविंद्र हे दि.16/4/2010 रोजी पहाटे 3 चे सुमारास बाथरुमला जात असतांना पडले याबाबतची कोणतीही नोंद दिसून येत नाही. याउलट केसपेपरवरील दि.16/4/2010 चे नोंदीनुसार मयत रविंद्र यांचे ब्लडप्रेशर व अन्य बाबीची तपासणी पहाटे 3.30 वाजता करण्यात आलेली आहे हे स्पष्ट होत आहे. मयत रविंद्र यांनी सामनेवाला यांचेकडे दाखल होण्यापुर्वी आठ दिवस अगोदर कोणत्या कारणास्तव औषधोपचार घेणे थांबवले होते याबाबतचा कोणताही योग्य तो खुलासा अर्जदार यांनी केलेला नाही. अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये “अर्जदार यांनी रविंद्र यास भरती करतेवेळी योग्य ट्रीटमेंट मिळाली असती अगर रात्री 3 वाजेनंतरही त्यास आय सी सी यु मध्ये शिफट केले असते तर रविंद्र यास योग्य ट्रीटमेंट मिळाली असती त्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे याबाबतची कल्पना अगर माहिती अर्जदार किंवा रविंद्रची पत्नी यांना दिली नाही, उपचाराचे टिप्पणीमध्ये ओव्हररायटींग आहे, खाडाखोड केलेली आहे” असे म्हटलेले आहे. परंतु पान क्र.14/2 ते 14/39 लगतची उपचाराची कागदपत्रे तसेच अर्जदार यांनी दाखल केलेली पान क्र.57/1 ते 57/13 लगतची कागदपत्रे यावरील नोंदीचा विचार करीता मयत रविंद्र यास सामनेवाला यांचेकडे अडमीट केल्यापासून प्रत्येक वेळी सामनेवाला यांनी मयत रविंद्र यांचेवर योग्य तेच उपचार केलेले आहेत ही बाब स्पष्ट होत आहे. वैद्यकिय केसपेपरचे नोंदीमध्ये कोठेही जाणीवपुर्वक व मोठया प्रमाणावर नोंदीमधील फेरबदल किंवा खाडाखोड आढळून आलेली नाही. पान क्र.14/2 चे केसपेपरचे पाठीमागील बाजुस विजय नायडु यांची संमती घेतलेली आहे अशी नोंद दिसून येत आहे. अशाच प्रकारची नोंद व विजय नायडु यांची सही पान क्र.14/4 लगतचे केसपेपरवर दिसून येत आहे. पान क्र.14/11 चे केसपेपरवरील नोंदीचा विचार होता मयत रविंद्र यांचे बंधु यांना रविंद्र यांचे आजारपणाची व गंभीर परिस्थितीची संपुर्ण कल्पना सामनेवाला यांनी दिलेली आहे व तशी सही जी.व्ही.नायडु यांनी केलेली आहे ही बाबही स्पष्ट होत आहे. अर्जदार यांनी मयत रविंद्र यांचेबाबतीत दि.15/4/2010 रोजी रात्री 10 वाजेपासून त्यांचे मृत्युपर्यंत तक्रार अर्जामध्ये तारीख व वेळ देवून उपचाराबाबतच्या ज्या तक्रारी घेतलेल्या आहेत त्यामध्ये सामनेवाला यांचेकडून नक्की कोणता निष्काळजीपणा झालेला आहे याबाबत स्पष्ट उल्लेख केलेला नाही. याउलट अर्जदार व सामनेवाला यांनी मयत रविंद्र यांचेबाबतीतील उपचाराची जी कागदपत्रे पान क्र.14/2 ते 14/39 व पान क्र.57/1 ते 57/13 लगत दाखल केलेली आहेत. त्या सर्व कागदपत्रावरील उपचाराची नोंदींचे अवलोकन करता सामनेवाला यांनी मयत रविंद्र यांचेवर अडमिट झाल्यापासून मृत्युपर्यंत योग्य ते सर्व उपचार काळजीपुर्वकपणे केलेले आहेत परंतु मयत रविंद्र यांची प्रकृती गंभीर झालेली होती त्यामुळे उपचारास योग्य तो प्रतिसाद मिळत नव्हता हीच बाब स्पष्ट झालेली आहे. सामनेवाला यांनी नि.14 लगतचे यादीसोबत 14/1 ते 14/40 लगत मयत रविंद्र यांचेवर जे उपचार करण्यात आले त्या उपचाराबाबतची संपुर्ण कागदपत्रे व क्लिनीकल नोटस याच्या झेरॉक्स प्रती हजर केलेल्या आहेत. या कागदपत्रांचे वरील सर्व नोंदीचा विचार करता मयत रविंद्र यांना सामनेवाला यांचे हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यापासून त्याचे मृत्युपर्यंत सामनेवाला यांनी प्रत्येक वेळी मयत रविंद्र यांचेवर आवश्यक व योग्य ते उपचार केलेले आहेत व मयत रविंद्रचा मृत्यु होवू नये यासाठी सर्व प्रयत्न सामनेवाला यांनी केलेलेच आहेत हे स्पष्ट होत आहे. सामनेवाला यांनी नि.11 लगत डॉ.राहूल बाविस्कर, नि.12 लगत डॉ.मुकेश मोरे, नि.13 लगत डॉ.राकेश शर्मा यांची प्रतिज्ञापत्रे दाखल केलेली आहेत. नि.17 लगत डॉ.नितीन घयसास यांचे प्रतिज्ञापत्र व नि.19 अ लगत पेशंट रजिष्टर दाखल केलेले आहेत. नि.23 लगत डॉ.अभिजीत मासनुरकर यांचे प्रतिज्ञापत्र, नि.24 लगत डॉ.पुष्कर लेले यांचे प्रतिज्ञापत्र, नि.27 लगत डॉ.पुष्कर लेले यांचे जादा प्रतिज्ञापत्र व त्यासोबत पान नं.30/1 ते 30/17 लगत उपचाराची कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सामनेवाला यांनी दाखल केलेली व वर उल्लेख केलेली डॉक्टरांची प्रतिज्ञापत्रे व त्यासोबतची कागदपत्रे याबाबत अर्जदार यांनी कोणताही योग्य तो जादा पुरावा दाखल केलेला नाही. फक्त अर्जदार यांनी पान क्र.32 ते 46 लगत जबाब व प्रतिज्ञापत्र दाखल करुन सामनेवाला यांचे प्रतिज्ञापत्रामधील कथन नाकारलेले आहे. सामनेवाला यांनी जी प्रतिज्ञापत्रे दाखल केलेली आहेत त्याबाबत अर्जदार यांनी सामनेवाला यांना प्रश्नावली देवून त्याबाबतची सामनेवाला यांची उत्तरे प्रतिज्ञापत्रासह (इंटरॉगेटरीज) मंचासमोर येण्याकरीता अर्जदार यांनी पान क्र.47 लगत दि.15/3/2011 रोजी दुपारी उशिरानंतर अर्ज दिलेला होता हा अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे. परंतु त्यानंतर अर्जदार यांनी सामनेवाला यांची उलटतपासणी घेण्याकरीता कोणतीही मागणी मंचासमोर केलेली नाही. सामनेवाला यांनी अर्जदार यांना जी प्रश्नावली दिलेली होती त्याबाबत अर्जदार यांनी पान क्र.44 लगत जबाब पान क्र.45 लगत प्रतिज्ञापत्र, पान क्र.46 लगत प्रतिज्ञापत्र दि.15/3/2011 रोजी सकाळचे सत्रात दाखल केलेले आहे. परंतु त्याचवेळी सकाळचे सत्रात अर्जदार हे सुध्दा सामनेवाला यांना प्रश्नावली देणार आहेत याचा कोणताही उल्लेख अर्जदार यांचे वकिल यांनी मंचासमोर केलेला नव्हता. अर्जदार यांनी पान क्र.57/1 ते 57/13 लगत सामनेवाला यांचेकडील मयत रविंद्र यांचेवरील उपचाराचे कागदपत्रांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. या उपचाराच्या कागदपत्रांवरील नोंदी व सामनेवाला यांनी पान क्र.14/1 ते 14/39 लगत दाखल केलेल्या मयत रविंद्र यांचेवरील उपचाराच्या कागदपत्रांमधील नोंदी व अर्जदार यांचे मुळ तक्रार अर्जमधील कथन तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणण्यामधील कथन या सर्व कागदपत्रांचा तुलनात्मक दृष्टया एकत्रीतरित्या विचार करता मयत रविंद्र यांचेवर सामनेवाला यांनी शेवटपर्यंत योग्य ते सर्व उपचार केलेले आहेत हेच स्पष्ट होत आहे. मयत रविंद्र यांचेवर उपचार करतांना सामनेवाला यांचेकडून नक्की कोणता निष्काळजीपणा झालेला आहे हे स्पष्ट करण्याकरीता अर्जदार यांनी तज्ञ डॉक्टरांची प्रतिज्ञापत्रे दाखल केलेली नाहीत. तसेच वैद्यकिय मंडळ किंवा सिव्हील सर्जन यांचेकडून मयत रविंद्र यांचेवरील उपचाराची कागदपत्रांची तपासणी करुन स्वतंत्रपणे अहवाल मागवण्याबाबत अर्जदार यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. वरील सर्व कारणांचा विचार होता, सामनेवाला 1 ते 5 यांनी मयत रविंद्र यांचेवर उपचार करतांना नक्की कोणता निष्काळजीपणा केलेला आहे ही बाब अर्जदार यांनी स्पष्टपणे शाबीत कलेली नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी या कामी पान क्र.60 चे लेखी युक्तीवादासोबत 2010(5) महाराष्ट्र लॉ जर्नल. सर्वोच्च न्यायालय. पान 52. व्ही किसनराव वि.निखील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल हे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र दाखल कलेले आहे परंतु प्रस्तुतचे तक्रार अर्जा मधील हकिकत व अर्जदार यांनी दाखल केलेले वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रामधील हकिकत यामध्ये फरक आहे. अर्जदार व सांमनेवाला यांनी दाखल केलेले उपचाराचे कागदपत्र व सामनेवाला यांची प्रतिज्ञापत्र यावरुन सामनेवाला यांनी मयत रविंद्र यांचेवर योग्य ते सर्व उपचार केलेले आहेत हीच बाब स्पष्ट झालेली आहे. यामुळे अर्जदार यांनी दाखल केलेले व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रे याकामी लागु होत नाही. सामनेवाला यांनी या कामी नि.66 ब लगत पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे सादर केलेली आहेत 1) 2011 आय एन डी एल ए डबल्यु राष्ट्रीय आयोग. पान 24. स्टीफन्सन हॉस्पीटल वि.जोहरीमल. 2) 1985 आय एन डी एल ए डबल्यु सर्वोच्च न्यायालय. पान 61. पट्टीपथी व्यंकया वि. आंध्रप्रदेश सरकार. 3) 2005 आय एन डी एल ए डबल्यु राष्ट्रीय आयोग. पान 137, गणेशप्रसाद वि.लाल जनमंजयनाथ सहदेव 4) 2009 आय एन डी एल ए डबल्यु सर्वोच्च न्यायालय. पान 361. आयएनएस.मल्होत्रा वि. डॉ.ए कृपलानी 5) 2010 आय एन डी एल ए डबल्यु राष्ट्रीय आयोग. पान 266. सेंट स्टिफन हॉस्पीटल वि.मनोहरलाल ठाकूर. 6) 2011 आय एन डी एल ए डबल्यु राष्ट्रीय आयोग. पान 16. मोस्टी. मिरादेवी वि.डॉ.अरुणकुमार चौधरी. 7) 2005 आय एन डी एल ए डबल्यु सर्वोच्च न्यायालय. पान 451. जेकब मॅथ्यु वि.पंजाब राज्य सरकार. 8) 2011 आय एन डी एल ए डबल्यु राष्ट्रीय आयोग. पान 87. लाडकुवर घनशाम लाल माहेश्वरी वि.आर.एम.संघवी वगैरे. वरील वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रामधील हकिकत व प्रस्तुतच्या तक्रार अर्जामधील हकिकत यामध्ये साम्य आहे. सामनेवाला नं. 1 ते 5 यांनी मयत रविंद्र यांचेवर उपचार करतांना नक्की कोणता निष्काळजीपणा केलेला आहे ही बाब अर्जदार यांनी स्पष्टपणे शाबीत केलेली नाही यामुळे सामनेवाला यांनी दाखल केलेली पान क्र.66 ब लगतचे व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार या कामी घेतलेला आहे. सामनेवाला यांनी नि.66 क लगत प्रेझेंटेशन्स दाखल केलेली आहेत. यामध्ये सामनेवाला यांनी केलेले निवेदन व अर्जदार यांचा तक्रार अर्ज उपचाराची सर्व कागदपत्रे व सामनेवाला यांचे लेखी म्हणणे यांची एकत्रीत तुलना करीता नि.66 क लगतचे प्रेझेंटेशन्स योग्य व बरोबर दिसून येत आहेत. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्रे, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, अर्जदार यांचे वतीने अँड.वाय एच आहेर यांचा तोंडी युक्तीवाद, अर्जदार यांचे वतीने पान क्र.60 लगतचा लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे वतीने दाखल करण्यात आलेले लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्रे, सामनेवाला यांचे वतीने अँड. श्रीमती गिता हंडा खनुजा यांचा तोंडी युक्तीवाद, सामनेवाला यांचेवतीने दाखल करण्यात आलेला नि.66 लगतचा लेखी युक्तीवाद, सामनेवाला यांनी दाखल केलेली नि.66 ब लगतची वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे, सामनेवाला यांनी दाखल केलेले नि.66 क लगतचे प्रेझेंटेशन्स आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे (आर. एस. पैलवान) (अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी) अध्यक्ष सदस्या ठिकाणः- नाशिक. दिनांकः- 30/06/2011 |