श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्यक्ष, यांचेनुसार
:- निकालपत्र :-
सदरची तक्रार तक्रारदार हिने जाबदेणार क्र. 1 ते 3 यांचे विरुध्द प्रवेश फी व नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 29,272/- हि 24 टक्के व्याजाने मिळणेसाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदार हिची तक्रार थोडक्यात अशी आहे की,
1. जाबदेणार क्र. 1 हि व्हिजीटेक अॅकॅडमी असून ती व्हिजीटेक युनिव्हर्सल किड्स या नावाने ओळखली जाते. जाबदेणार क्र.1 यांचा प्री प्रायमरी व प्रायमरी स्कूल चालविणेचा व्यवसाय असून त्यांच्या विमाननगर, गणेशनगर, खराडी व कल्याणीनगर येथे शाखा आहेत. जाबदेणार क्र. 2 हे जाबदेणार क्र.1 यांचे चेअरमन असून जाबदेणार क्र. 3 हे सिनीअर प्रिन्सीपॉल आहेत.
2. तक्रारदार हि कल्याणीनगर येथे राहत असल्यामुळे तसेच जाबदेणार क्र. 1 यांची शाखा कल्याणीनगर येथे असल्यामुळे तिने तिचा मुलगा मास्टर अर्णव जयदेव मोहिते यास ज्युनिअर के.जी.साठी दिनांक 9/1/2010 रोजी रक्कम रुपये 19,200/- जाबदेणार यांचेकडे भरुन सन 2010-2011 या सालासाठी प्रवेश घेतलेला आहे. त्याबाबतची पावती नं.2490 जाबदेणार यांनी तक्रारदार हिस दिलेली आहे. तक्रारदार हि कल्याणीनगर येथे राहत असल्यामुळे व सोईच्या दृष्टीने तिने मुलासाठी जाबदेणार यांचे कल्याणीनगर शाखेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. परंतु प्रवेश घेतल्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजे एप्रिल मध्ये तक्रारदार हिस जाबदेणार यांचेकडून असे सांगण्यात आले की, कल्याणीनगर शाखा काही अडचणीमुळे सुरु करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही मुलाला विमाननगर या शाखेकडे पाठवा. हे ऐकून तक्रारदार हिस मोठा धक्का बसला.
3. तक्रारदार हिला तिचे कामानिमीत्त काही काळासाठी परदेशात जाणेची संधी आली व त्यातच जाबदेणार यांची कल्याणीनगर येथील शाखा सुरु होत नसल्यामुळे तक्रारदार हिने जाबदेणार यांना दिनांक 6/4/2010 रोजी मुलाचा ज्युनिअर के.जी.साठी घेतलेला प्रवेश रद्य करणेसाठी पत्र पाठविले व फोनवरही कळविले. सदरचे पत्र जाबदेणार यांना मिळालेले आहे तरीसुध्दा त्यांनी तक्रारदार हिचे पत्रास उत्तर दिले नाही. म्हणून पुन्हा दिनांक 30/4/2010 रोजी जाबदेणार यांना प्रवेशाची रक्कम परत मिळणेसाठी पत्र पाठविले. सदरचे पत्रही जाबदेणार यांना मिळुनही त्यांनी उत्तर पाठविले नाही व पैसे परत केले नाही. त्यानंतर तक्रारदार हिने स्वत: जाबदेणार यांचेकडे अनेकवेळा जाऊन पैसे परत देणेसाठी विनंती केली. परंतु जाबदेणार यांनी तक्रारदार हिच्या विनंतीचा विचार केला नाही. म्हणून तक्रारदार हिने दिनांक 2/7/2010 रोजी जाबदेणार यांना वकिलामार्फत नोटीस पाठविले. जाबदेणार यांना नोटीस मिळूनही त्यांनी तक्रारदार हिची दखल घेतली नाही. म्हणून सदरची तक्रार. तक्रारदार हिस जाबदेणार क्र.1 ते 3 यांचेविरुध्द तक्रार दाखल करणे भाग पडत आहे.
4. तक्रारदार हिने तक्रारअर्जासोबत शपथपत्र, जाबदेणार यांची प्रवेश फी ची पावती, जाबदेणार यांना दिनांक 6/4/2010 व 30/4/2010 रोजी पाठविलेले पत्र व त्याबाबतची पोस्टाची पावती तसेच जाबदेणार क्र. 1 ते 3 यांना दिनांक 2/7/2010 रोजी वकीलामार्फत पाठविलेली नोटीस. सदरची नोटीस जाबदेणार यांना मिळाल्याची पोस्टाची पावती इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5. मंचानी जाबदेणार क्र.1 ते 3 यांना दिनांक 31/8/2010 रोजी नोटीस पाठविली असता दिनांक 3/9/2010 रोजी जाबदेणार क्र. 1 ते 3 यांना नोटीस मिळाल्याची पोस्टाची पोच पावती मंचास प्राप्त झालेली आहे.
6. जाबदेणार यांना नोटीस मिळूनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत व त्यांनी त्यांचे म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही म्हणून मंचानी जाबदेणार क्र.1 ते 3 यांच्याविरुध्द दिनांक 6/1/2011 रोजी एकतर्फा आदेश निशाणी 1 वर पारित केलेला आहे.
7. मंचानी तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र व दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंचाचे विचारार्थ खालील मुद्ये उपस्थित होतात-
अ.क्र | मुद्या | उत्तर |
1 | जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी ठेवली आहे काय | होय |
2 | आदेश | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा-
मंचानी दिनांक 13/4/2010 रोजी तक्रारदार यांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. तक्रारदार हि कल्याणीनगर येथे राहत असल्यामुळे व जाबदेणार यांची शाखा कल्याणीनगर येथे असल्यामुळे तिने जाबदेणार यांचेकडे तिचा मुलगा मास्टर अर्णव जयदेव मोहिते यास ज्युनिअर के.जी साठी दिनांक 9/1/2010 रक्कम रुपये 19,200/- भरुन प्रवेश घेतला. त्याबाबतची पावती क्र.2490 हि जाबदेणार यांनी तक्रारदार हिस दिलेली आहे. सदरची पावती तक्रारदार हिने यादीसोबत नि.3/1 ने दाखल केलेली आहे. त्यावरुन सिध्द होते. तसेच सदर पावतीचे मंचानी वाचन केले असता त्यामध्ये जाबदेणार यांची शाखा विमाननगर, गणेशनगर, खराडी, कल्याणीनगर येथे असल्याचे स्पष्ट नमूद केलेले दिसून येते. असे असतांनाही प्रवेश घेतल्यानंतर तीन महिन्यांनी जाबदेणार यांनी तक्रारदार यांना कल्याणीनगरची शाखा सुरु करता येणार नाही त्यामुळे तुम्ही मुलाला विमाननगर शाखेमध्ये पाठवावे असे सांगणे हे पुर्णत: चुकीचे आहे. तक्रारदार हिने तिचे सोईसाठी मुलाला जाबदेणार यांचे कल्याणी शाखेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. व सदरची शाखा सुरु होत नसल्यामुळे तक्रारदार हिने जाबदेणार यांना घेतलेला प्रवेश रद्य करणेसाठी व प्रवेश फी ची रक्कम परत मिळणेसाठी दिनांक 6/4/2010 रोजी व दिनांक 30/4/2010 रोजी पत्रही पाठविले. सदरचे पत्र तक्रारदार हिने यादीसोबत नि.3/2 व नि.3/3 ने दाखल केलेले आहे. त्यावरुन सिध्द होते. तसेच वकीलामार्फत दिनांक 2/7/2010 रोजी नोटीसही पाठविली. सदरच्या नोटीसची स्थळप्रत तक्रारदार हिने यादीसोबत नि.4 ने दाखल केलेली आहे. त्यामुळे मंचाचे असे स्पष्ट मत होते की, तक्रारदार हिने जाबदेणार यांना वेळोवेळी पत्रानी कळवूनही व स्वत: त्यांच्याकडे जाऊनही त्यांनी प्रवेश फी ची रक्कम परत न करणे हि जाबदेणार यसांची कृती ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 2 [1] [ ] प्रमाणे सेवेतील त्रुटी ठरते. आणि म्हणूनच तक्रारदार हे जाबदेणार क्र.1 ते 3 यांचेकडून मुलाच्या प्रवेश फी ची रक्कम रुपये 19,200/- हि 9 टक्के व्याजाने मिळणेस हक्कदार ठरतात या निर्णयाप्रत हे मंच आलेले आहे.
जाबदेणार यांना मंचाची नोटीस मिळूनही त्यांनी मंचात हजर राहून त्यांचे म्हणणे व शपथपत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे जाबदेणार हे तक्रारदाराची तक्रार व दाखल केलेली कागदपत्रे नाकारु शकत नाहीत हे स्पष्ट होते.
तक्रारदारानी जाबदेणार यांच्याकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये 5,000/- ची मागणी केलेली आहे. परंतू एकदा रक्कम व्याजासहित दिली असल्यास वेगळी नुकसान भरपाई देण्याची आवश्यकत नाही. त्यासाठी मंच खालील निवाडयाचा आधार घेत आहे.
स्किपर भवन वि. स्किपर स्केल्स प्रा. लि. [1995] CPJ 210 (NC)
वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
:- आ दे श :-
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
2. जाबदेणार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदार यांना एकत्रित व संयुक्तिकरित्या प्रवेश फी ची रक्कम रुपये 19,200/- दिनांक 9/1/2010 पासून ते रक्कम अदा करेपर्यन्त 9 टक्के व्याजाने या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयाच्या आत दयावी.
3. जाबदेणार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदार यांना एकत्रित व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 2,000/- या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयाच्या आत दयावा.
4. निकालपत्राची प्रत दोन्ही बाजूस नि:शुल्क पाठवाव्यात.