नि. 18 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 214/2010 नोंदणी तारीख – 09/09/2010 निकाल तारीख – 30/12/2010 निकाल कालावधी – 111 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री जयसिंगराव मारुती जाधव रा.उंबर्डे, ता. खटाव जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री दत्तात्रय पवार) विरुध्द व्होरा इलेक्ट्रॉनिक्स, वडूज, शहा चेंबर्स, वडूज-कराड रोड, वडूज, ता.खटाव जि. सातारा तर्फे श्री किशोर जयकुमार व्होरा रा.वडूज ता.खटाव जि. सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री एस.एम.भरमगुंडे) न्यायनिर्णय 1. अर्जदार हे मौजे उंबर्डे येथील रहिवासी आहेत. जाबदार यांचा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री, दुरुस्ती व डीश टीव्ही विक्रीचा व्यवसाय आहे. अर्जदार यांनी जाबदार यांचेकडून डीश टीव्ही खरेदी केला. त्यावर प्लॅटिनम स्कीम जाबदार यांनी चालू केली. त्यानंतर अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे दि.23/10/2008 रोजी रु.3,144/- भरले. त्याप्रमाणे जाबदार यांनी त्याचा रिचार्ज मारला. त्यानंतर अर्जदार यांनी पुन्हा दि.6/11/2009 रोजी रु.3,860/- चा प्लॅटिनम स्कीमसाठी भरले. जाबदार यांनी त्याची पावती दिली परंतु त्यावर दि.6/11/2008 अशी तारीख नमूद केली आहे. याबाबत अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे विचारपूस केली असता जाबदार यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. जाबदार यांचे धोरणामुळे अर्जदार यांची रु.860/- ची फसवणूक झाली आहे व त्यांना तीन महिने टीव्हीचे करमणुकीपासून वंचित रहावे लागले आहे. सबब रक्कम रु.860/- व्याजासह मिळावेत, तीन महिन्याचा रिचार्ज मारणेचा आदेश व्हावा, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.2,500/- मिळावेत म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार यांनी नि. 14 कडे म्हणणे देऊन तक्रार नाकारली आहे. जाबदार यांचे कथनानुसार दि.6/11/08 चे पावतीप्रमाणे जाबदार यांनी 1 वर्षाची प्लॅटिनम पॅकची सुविधा अर्जदार यांना दिलेली आहे. त्यानुसार अर्जदार यांना तेवढया रकमेचा फायदा डीश कंपनीकडून मिळालेला आहे. सदरचे पावतीची मुदत संपलेनंतर अर्जदार यांनी पुन्हा रु.1,000/- चा रिचार्ज मारला तसेच त्यानंतर दि.8/11/09 रोजी सकाळी रु.1,000/- व दुपारी रु.1,000/- अर्जदार यांनी जमा केले. त्याव्यतिरिक्त कोणतीही रक्कम अर्जदार यांनी दिलेली नाही. अर्जदार यांनी जर रु.3,860/- भरले असतील तर त्याची पावती त्यांनी दाखल करणे आवश्यक आहे. जाबदार यांचेकडे अर्जदारची कोणतीही रक्कम शिल्लक नाही. अर्जदारची तक्रार मुदतबाहय आहे. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 3. अर्जदार व जाबदारतर्फे युक्तिवाद ऐकणेत आला तसेच दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 4. अर्जदारची तक्रार पाहता अर्जदारने जाबदारकडे डीश टीव्हीचे एक वर्षासाठीचे प्लॅटिनम पॅकच्या रिचार्ज करणेसाठी दि.6/11/2009 रोजी एकदम रु.3,860/- जमा केले परंतु जाबदारने एकदम सदर रकमेचा रिचार्ज न करता दि.6/11/2009 रोजी रक्कम रु.1,000/- चा रिचार्ज केला. दि.8/11/2009 रोजी रु.1,000/- व रु.1,000/- चा असे एकूण रु.3,000/- चा रिचार्ज केला व रक्कम रु.860/- चे काहीच केले नाही, स्वतःजवळ ठेवले. सबब डीश टीव्हीची सेवा दि.23/8/2010 पर्यंतच चालू राहिली. पुढील 3 महिन्यांची सेवा मिळाली नाही. सबब अर्जदारास करमणुकीपासून वंचित रहावे लागले व जाबदारने अर्जदारचे रक्कम रु.860/- स्वतःजवळच ठेवले. सबब सदर रु.860/- वरती 18 टक्के व्याज, मानसिक त्रासपोटी रु.5,000/- व तक्रारीचा खर्च मिळावा अशी अशी तक्रार आहे. तसेच आम्ही दि.6/11/2009 रोजी रक्कम भरली असताना जाबदारने मुद्दाम दि.6/11/2008 अशी तारीख घालून फसवणूक केली अशीही तक्रार दिसते. 5. जाबदारने नि.14 कडे कैफियत तसेच म्हणणे देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदारचे कथनानुसार अर्जदारने नि.5/1 कडे दाखल केलेली पावती दि.6/11/08 ची आहे. सदर पावतीनुसार अर्जदारने 2008 सालची सेवा घेतली आहे. तसेच अर्जदार आमचे ग्राहक नाहीत. डीश टीव्ही कंपनीला पक्षकार केलेले नाही. अर्जदार डीश टीव्ही कंपनीचे ग्राहक आहे. अर्जदारने खोटी तक्रार दाखल केली आहे. तक्रार फेटाळून लावावी असे मुद्दे उपस्थित केले आहेत. 6. अर्जदारने नि.5 कडे तसेच जाबदारने नि.18 कडे कागदपत्रे दाखल केली आहेत. अर्जदारने नि.5/1 कडे जाबदार यांचे टॅक्स इन्व्हॉईस दाखल केले असून त्यावरती व्होरा इलेक्ट्रॉनिक्स वडूज नाव जयसिंग जाधव मालाचे वर्णन मध्ये V.C.No. 01504462331 1 year Platinum + service रक्कम रु.3,860/- असे नमूद असून इन्व्हॉइसवरती 6/11/2008 असा दिनांक नमूद आहे. अर्जदारचे म्हणणेनुसार सदर रक्कम रु.3,860/- मी दि.6/11/2009 ते 6/11/2010 या एक वर्षाचे कालावधीसाठी दि.6/11/2009 रोजी जमा केली आहे, दि.6/11/2008 रोजी नाही. सन 2008 साली मी रक्कम रु.3,144/- जमा केली होती ती 23/10/2008 रोजी जमा केली होती. परंतु त्यावेळेसही जाबदारने मात्र तो रिजार्च दि.25/10/2008 रोजी केला. म्हणजेच अर्जदारने त्याच्या दूरदर्शन संचावर दि.6/11/2009 रोजी संबंधीत डीश टीव्ही जोडणीद्वारे निरनिराळया चित्रवाहिन्या दाखविण्याची सुविधा संपल्या दिवसानंतर सदरची सुविधा पुन्हा प्राप्त होण्यासाठी पैसे भरुन ठराविक काळासाठी सुविधा प्राप्त करणेसाठी योग्य ती व्यवस्था रिचार्जद्वारे अवलंबिली आहे. 7. निर्विवादीतपणे जाबदार स्वतःच कथन करत आहे की नि.5/1 कडील पावती 2008 सालाचीच आहे म्हणजे पावतीवरील दि.6/11/2008 बरोबर आहे. सबब वादाकरिता परंतु मान्य न करता जाबदारचे कथन बरोबर आहे असे गृहीत धरले तर दि.6/1/2008 पासून एक वर्ष म्हणजे दि.6/11/2009 पर्यंत अर्जदारकडे डीश टीव्हीची सेवा चालू होती म्हणजे दि.6/11/2009 पर्यंत अर्जदारचे अकाउंटवरती रक्कम शिल्लक होती म्हणूनच दि.6/11/2009 पर्यंत अर्जदारची डीश टीव्ही सेवा चालू होती असा जाबदारचे कथनचा अर्थ आहे. परंतु अर्जदारने स्वतःचे आयडी नंबरचा Transaction data दाखल केला आहे. तो पाहता दि. 1/4/2009 रोजी (म्हणजे 6/11/2009 पूर्वी) अर्जदारचे अकाउंटरवरती रक्कम शिल्लक पाहिजे होती परंतु तसे दिसून येत नाही. सबब जाबदारचे कथन खरे वाटत नाही व अर्जदार कथन करतात की 2008 साली आम्ही दि.23/10/2008 रोजी रिचार्जसाठी रक्कम जमा केली परंतु जाबदारने दि.25/10/2008 रोजी रिचार्ज केले. 8. परंतु अर्जदारचे कथन खरे वाटते की, 2008 ते 2009 साठीचे रिचार्ज करणेसाठी अर्जदारने दि.23/10/2008 रोजी रक्कम भरली परंतु जाबदारने दि.25/10/2008 रोजी रिचार्ज केले. सबब 1 वर्ष पूर्ण झालेनंतर दि.6/11/2009 रोजी अर्जदारने दि.6/11/2009 ते 6/11/2010 साठीचे रक्कम दि. 6/11/2009 रोजीच जमा केली आहे हे बरोबर वाटते व नि.5/1 कडील पावती दि.6/11/2008 ची नसून दि.6/11/2009 रोजीचीच आहे हे सत्य वाटते व त्यानुसार दि.6/11/2009 ते 6/11/2010 पर्यंतचा एकदम रक्कम रु.3,860/- चा रिचार्ज जाबदारने करावयास पाहिजे होता. परंतु जाबदारने तसे केले नाही. या बाबीसाठी जाबदार असा बचाव करत आहे की अर्जदारकडे रक्कम नव्हती सबब अर्जदार दि. 6/11/2009 रोजी रक्कम रु.1,000/- घेवून आले त्याप्रमाणे रिचार्ज केला. पुन्हा दि.8/11/2009 रोजी रक्कम रु.1,000/- घेवून आले तसा रिचार्ज केला पुन्हा त्याचदिवशी म्हणजे दि.8/11/2009 रोजीच आणखी रु.1,000/- घेवून आले व तसा रिचार्ज केला. सबब जेवढी रक्कम आणली तसा रिचार्ज केला आहे. जाबदारचे हे कथन विश्वासार्ह वाटत नाही. कारण दि.6/11/2009 नंतर लगेच 2 दिवसांत म्हणजे दि.8/11/009 ला अर्जदारने दोन वेगवेगळया वेळेस रु.1,000/- जमा केले हे खरे वाटत नाही. जाबदार म्हणतात अर्जदारकडे रक्कम नव्हती परंतु 2008 साली सुध्दा अर्जदारचे 1 वर्षासाठी रिचार्ज केला होता म्हणजे अर्जदारची पूर्ण रक्कम भरणेची ऐपत आहे हे दिसून येते. सबब नि.5/1 कडील पावतीवरती दि.6/11/2009 ऐवजी दि.6/11/2008 असा चुकीचा दिनांक लिहून जाबदार स्वतःचेच चुकीचा फायदा घेवू इच्छित आहे हे योग्य नाही. 9. जाबदारने नि.18 कडे काही कोरे फॉर्म्स दाखल केले आहेत. तसेच युक्तिवादामध्ये आम्ही ज्या रकमेचा रिचार्ज करतो ती रक्कम लगेचच सबस्क्रायवरचे मोबाईलवरती एसएमएसने पाठविली जाते. अर्जदारचे कथनानुसार आम्ही दि.6/11/09 रोजी फक्त रु.1,000/- (एक हजार) चा रिचार्ज केला तर कंपनी एसएमएस द्वारा अर्जदारचे मोबाइलवरती तसेच कळवत असते सबब त्याच वेळेस अर्जदारने आमचेकडे तक्रार का केली नाही असा युक्तिवाद जाबदारने केला. निर्विवादीतपणे अर्जदारने जाबदारकडून डीश टीव्ही खरेदी केला नाही, डीश टीव्ही खरेदी करताना जर ग्राहकाने स्वतःचा मोबाईल नंबर विक्रेत्याकडे नोंदवून कंपनीकडे रजिस्टर केला असेल तरच जाबदारचा सदर युक्तिवाद योग्य आहे परंतु जाबदारला डीश टीव्ही खरेदी करतानाची वस्तुस्थिती माहित नाही. अर्जदारसारख्या वय 55 धंदा शेती रा. उंबर्डे ता. खटाव या व्यक्तीकडे त्यावेळेस मोबाईल होताच व त्याचा नंबर कंपनीकडे रजिस्टर केलाच आहे, सबब या मोबाइलवरती रिचार्ज बाबत कळवले गेले आहे हे गृहीत धरणे चुकीचे आहे व वादाकरिता परंतु मान्य न करता एसएमएस झाला होता असे गृहीत जरी धरले तरी तो एसएमएस सबस्क्रायबरला वाचायला आलाच पाहिजे असे बंधनकारक आहे असे म्हणता येणार नाही हे निश्चित सत्य आहे. अलिकडील काळात ग्रामीण भागातीलही लोक मोबाईल वापरु लागले आहेत परंतु त्यातील सुविधांचा वापर कसा करायचा याचे पूर्ण ज्ञान अद्यापही त्यांना झालेले नाही. सदर लोक विक्रेत्यांवरती किंवा रिचार्ज करणारे दुकानदारांवरती विश्वास ठेवून व्यवहार करीत असतात. सबब जाबदारचा सदर युक्तिवाद मान्य करणे योग्य होणार नाही. सबब दाखल कागदपत्रे पाहता जाबदारने एक वर्षाचे रिचार्जसाठी अर्जदारकडून रक्कम रु.3,860/- घेतले परंतु रक्कम रु.3,000/- चेच रिचार्ज केले, सबब एक वर्षापर्यंत रिचार्ज न होता अगोदर तीन महिने कनेक्शन रिचार्ज नसलेने बंद झाले व अर्जदारास करमणुकीपासून वंचित रहावे लागले या अर्जदारचे कथनात तथ्य आहे हे दिसून येत आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 10. प्रस्तुत तक्रारप्रकरणातील एक गोष्ट निश्चित आहे ती अशी की अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी आहे. ग्रामीण भागात आजही दहा ते बारा तास विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण आहे. (विद्युत पुरवठयाचे लोडशेडींग आहे). ग्रामीण भागामध्ये अद्यापही संगणक प्रणालीचा वापर केला जात नाही. वादाकरिता एखाद्या ठिकाणी संगणक असेल तर त्यास इंटरनेट/ब्रॉडबँड आदी आधुनिक सुविधांद्वारे संपर्क यंत्रणा जोडली गेली पाहिजे. यासाठी दूरध्वनी यंत्रणाही जोडली पाहिजे. या सर्व सुविधा विद्युत पुरवठा वेळेवर असेल तरच वापरण्यात येवून दूरदर्शनवर डीश टीव्ही सुविधेअंतर्गत दाखविण्यात यावयाच्या सर्व सूचनांचे पालन होवू शकेल. उदा. संबंधीत अधिकृत सेवा देणा-या व्यक्तीकडे पैसे भरल्यानंतर (रिचार्ज केलेनंतर) अचूक पावती घेणे वा नेटबॅंकींगद्वारे थेट पैसे भरुन रिचार्ज करणे. परंतु ग्रामीण भागातील या सर्व त्रुटींचा गैरफायदा जाबदारसारख्या सेवा देणा-या व्यक्तीने घेता कामा नये. शिक्षित वा अशिक्षित अशा सर्व ग्राहकांसाठी प्रामाणिकपणे सेवा देणे हे जाबदारसारख्या सेवा देणा-या व्यक्तीचे कर्तव्य आहे. परंतु तसे न करता ग्राहकाने ठेवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेवून जाबदारने या प्रकरणी त्यांचे कैफियतीमध्ये खोटी कथने नमूद करुन मे. मंचाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. सबब जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे. 11. सबब आदेश. आदेश 1. अर्जदारचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदारने अर्जदार यास रक्कम रु.860/- परत द्यावेत व सदर रक्कम अर्जदारचे पदरी पडेपर्यंत रक्कम रु.860/- वरती दि.6/11/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे. 3. जाबदार यांनी अर्जदार यास या तक्रारीचा खर्च व मानसिक त्रासासाठी रक्कम रु. 1,500/- (दीड हजार) द्यावी. 4. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करणेचे आहे अन्यथा दरखास्तीशिवाय अर्जदार यांनी जाबदारविरुध्द डीश टीव्ही कंपनीकडे जाबदारचे गैरवर्तणुकीबाबत कारवाई करणेचा तक्रार अर्ज सुध्दा करणेची सुचना करत आहे. तसेच असा अर्ज कंपनीस प्राप्त झालेस त्वरित त्याची दखल घ्यावी अशी सूचना मे. मंच डीश टीव्ही कंपनीस करीत आहे. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 30/12/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |