न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींप्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून वॉशिंग मशीन खरेदी करणेचे ठरविले, म्हणून त्यांनी वि.प. क्र.2 यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी वि.प.क्र.1 कंपनीचे Whirlpool’s Front – loan 8 kg 1400 RPM high end Europe made washing machine – Whilrpool WM Supreme Care 8014 या मॉडेलचे मशीन सर्वोत्तम असल्याचे भासविले व सदरचे मशीन विकत घेण्यास तक्रारदारांना उद्युक्त केले. तक्रारदारांनी वि.प. यांना रु 41,110/- इतकी रक्कम अदा करुन सदरचे वॉशिंग मशीन दि. 1 जानेवारी 2020 रोजी खरेदी केले. सदर मशिनची जोडणी वि.प. यांचे प्रतिनिधींनी केल्यानंतर सदर मशीन हे दोन ते तीन दिवस व्यवस्थित चालले होते. तकारदार यांनी सदर मशिनचा वापर हा वि.प. क्र.1 व 2 यांचे सूचनेनुसार व युजर्स मॅन्युएलमध्ये दिलेल्या निर्देशाप्रमाणे केला होता. तक्रारदार यांचे घरी असणारे वीज जोडणीमध्ये अथवा त्याचे क्षमतेमध्ये कोणताही बिघाड झाले नसताना देखील सदरचे मशीन हे सातत्याने बंद पडत होते. सदरचे मशीन बंद पडलेनंतर पुन्हा चालू करणेचा प्रयत्न केलेस ते चालू होत नव्हते अथवा चालू झाले तरीही अल्प वेळात लगेच बंद पडत होते. सदरचे मशीनमध्ये सेट केलेल्या प्रोग्रॅममध्ये/ सायकल पूर्ण होणे आधीच मध्ये अनेकवेळा ते बंद पडत असल्यामुळे सदर मशीनमध्ये कपडयांची धुलाई नीट होत नव्हती. त्याचप्रमाणे सदर मशीनमधून पाणी जाणेचे वाटे व्यतिरिक्त इतर भागातून पाणी गळत होते. त्याचप्रमाणे सदर वॉशिंग मशीन काही प्रोग्राम करिता विकल्प असून देखील त्याचा प्रोग्रॅम सेट होत नव्हता. तक्रारदार यांनी याबाबत वि.प. क्र.1 व 2 यांचे प्रतिनिधींना कळविलेनंतर ते सदर मशीनची जुजबी दुरुस्ती करुन देत होते, परंतु त्यानंतर सदरचे मशीन हे केवळ दोन ते तीन आठवडे चालून पुन्हा बंद पडत होते. सदरचे मशीनमध्ये बिघाड होवून त्याचा प्रोग्राम बंद पडलेनंतर सदरचा मशिनचा दरवाजा उघडणेकरिता सदर वॉशिंग मशिनमध्ये कोणतीही इतर वैकल्पिक सुविधा नव्हती. त्यामुळे सदर मशीनचा दरवाजा उघडता येत नव्हता. त्यामुळे वि.प. क्र.1 व 2 यांचे तंत्रज्ञ यांनी येवून दुरुस्ती केलेशिवाय सदर मशिनचा दरवाजा उघडता येत नसे. अशा वेळेत तक्रारदार यांना वि.प. क्र.1 व 2 यांचे तंत्रज्ञांना कळविलेनंतर दोन ते तीन दिवसांनी ते येत असले कारणामुळे सदर कालावधीमध्ये तक्रारदार यांनी सदर मशिनमध्ये धुलाईकरिता टाकलेले कपडे तसेच आत रहात होते. तसेच कपडे तसेच मशीनमध्ये ओल्या अवस्थेत राहिल्याने सदरचे कपडयांना दुर्गंध येत होता. त्यामुळे तक्रारदार यांचे कपडे खराब झाले आहेत. तक्रारदार यांनी वि.प. क्र.1 व 2 यांना दि.2 जुलै 2020, 14 ऑक्टोबर 2020, 14 डिसेंबर 2020 तसेच 21 जानेवारी 2021 रोजी वॉशिंग मशिनबाबत तक्रारी दिल्या आहेत. परंतु वि.प. क्र.1 व 2 यांचे तंत्रज्ञांनी मशीनमध्ये जुजबी दुरुस्त्या केल्या आहेत. पंरतु आजतागायत सदर मशिनमध्ये होणारे बिघाडाचे व दोषांचे निराकरण वि.प. क्र.1 व 2 यांनी केलेले नाही. काही कालावधीनंतर तक्रारदारांच्या असे लक्षात आले की, सदरचे मशिनीकरिता वापरणेत आलेले मटेरियल हे सुमार दर्जाचे असलेमुळे सदरचे मशिनच्या कॅबिनेटला गंज चढलेला होता. वास्तविकतः सदर मशिनचे कॅबिनेटला गंज चढणेचा प्रकार हा निव्वळ कॅबिनेटसाठी वापरणेत आलेला पत्र व त्यावर लावणेत आलेली रसायणे व रंग हे चांगले दर्जाचे नसलेने घडलेला आहे. सबब, सदरचे मशिन पूर्णतः बदलून देणे हे वि.प. यांची नैतिक जबाबदारी असून देखील वि.प. यांनी मशीन बदलून देणेस टाळाटाळ केली आहे. बराच काळ पाठपुरावा केलेनंतर वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरचे मशीनचे मॉडेलचे उत्पादन बंद झाले असून तक्रारदार यांना त्याच क्षमतेचे दुस-या मॉडेलचे मशीन बदलून दिले जाईल व त्याकरिता तक्रारदार यांचेकडून कोणतीही रक्कम घेतली जाणार नाही असे कळविले आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी सदोष मशीनचा पुरवठा करुन तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या आयोगात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून मशीनकरिता दिलेली मोबदला रक्कम रु.41,110/- व सदर रकमेवर व्याज मिळावे तसेच मानसिक त्रासापोटी रु.1,50,000/-, तक्रारीचा खर्च वि.प. कडून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत मशीनचे टॅक्स इन्व्हॉईस, तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस व त्याची पोहोचपावती वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. प्रस्तुत कामी वि.प.क्र.1 यांना नोटीस लागू झालेनंतर ते याकामी हजर झाले. परंतु विहीत मुदतीत त्यांनी आपले म्हणणे दाखल केले नसलेने त्यांचेविरुध्द नो से आदेश नि.1 वर पारीत झालेला आहे.
5. प्रस्तुत कामी वि.प.क्र.2 यांना नोटीस लागू होऊनही सदर वि.प.क्र.2 याकामी गैरहजर राहिलेने वि.प. यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत झालेला आहे.
6. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मशीनचे खरेदीपोटी स्वीकारलेली रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
7. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांचेकडून वि.प.क्र.1 कंपनीचे Whirlpool’s Front – loan 8 kg 1400 RPM high end Europe made washing machine – Whirlpool WM Supreme Care 8014 या मॉडेलचे मशीन रक्कम रु.41,110/- इतकी रक्कम अदा करुन दि. 1 जानेवारी 2020 रोजी खरेदी केले. सदर मशीन खरेदीचे इन्व्हॉईस तक्रारदारांनी याकामी दाखल केले आहे. वि.प.क्र.1 व 2 यांनी याकामी हजर होवून प्रस्तुत बाब नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प.क्र.1 व 2 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट सिध्द झाली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
8. तक्रारदारांचे तक्रारअर्जातील कथनानुसार, तकारदार यांनी सदर मशिनचा वापर हा वि.प. क्र.1 व 2 यांचे सूचनेनुसार व युजर्स मॅन्युएलमध्ये दिलेल्या निर्देशाप्रमाणे केला होता. तथापि सदरचे मशीन हे सातत्याने बंद पडत होते. सदरचे मशीनमध्ये सेट केलेल्या प्रोग्रॅममध्ये/ सायकल पूर्ण होणे आधीच मध्ये अनेकवेळा ते बंद पडत असल्यामुळे सदर मशीनमध्ये कपडयांची धुलाई नीट होत नव्हती. त्याचप्रमाणे सदर मशीनमधून पाणी जाणेचे वाटे व्यतिरिक्त इतर भागातून पाणी गळत होते. त्याचप्रमाणे सदर वॉशिंग मशीन काही प्रोग्राम करिता विकल्प असून देखील त्याचा प्रोग्रॅम सेट होत नव्हता. तक्रारदार यांनी याबाबत वि.प. क्र.1 व 2 यांचे प्रतिनिधींना कळविलेनंतर ते सदर मशीनची जुजबी दुरुस्ती करुन देत होते, परंतु त्यानंतर सदरचे मशीन हे केवळ दोन ते तीन आठवडे चालून पुन्हा बंद पडत होते. सदरचे मशीनमध्ये बिघाड होवून त्याचा प्रोग्राम बंद पडलेनंतर सदरचा मशिनचा दरवाजा उघडणेकरिता सदर वॉशिंग मशिनमध्ये कोणतीही इतर वैकल्पिक सुविधा नव्हती. त्यामुळे सदर मशीनचा दरवाजा उघडता येत नव्हता. त्यामुळे वि.प. क्र.1 व 2 यांचे तंत्रज्ञ यांनी येवून दुरुस्ती केलेशिवाय सदर मशिनचा दरवाजा उघडता येत नसे. अशा वेळेत तक्रारदार यांना वि.प. क्र.1 व 2 यांचे तंत्रज्ञांना कळविलेनंतर दोन ते तीन दिवसांनी ते येत असले कारणामुळे सदर कालावधीमध्ये तक्रारदार यांनी सदर मशिनमध्ये धुलाईकरिता टाकलेले कपडे तसेच आत रहात होते. तसेच कपडे तसेच मशीनमध्ये ओल्या अवस्थेत राहिल्याने सदरचे कपडयांना दुर्गंध येत होता. त्यामुळे तक्रारदार यांचे कपडे खराब झाले आहेत. तक्रारदार यांनी वि.प. क्र.1 व 2 यांना दि.2 जुलै 2020, 14 ऑक्टोबर 2020, 14 डिसेंबर 2020 तसेच 21 जानेवारी 2021 रोजी वॉशिंग मशिनबाबत तक्रारी दिल्या आहेत. परंतु वि.प. क्र.1 व 2 यांचे तंत्रज्ञांनी मशीनमध्ये जुजबी दुरुस्त्या केल्या आहेत. पंरतु आजतागायत सदर मशिनमध्ये होणारे बिघाडाचे व दोषांचे निराकरण वि.प. क्र.1 व 2 यांनी केलेले नाही. काही कालावधीनंतर तक्रारदारांच्या असे लक्षात आले की, सदरचे मशिनीकरिता वापरणेत आलेले मटेरियल हे सुमार दर्जाचे असलेमुळे सदरचे मशिनच्या कॅबिनेटला गंज चढलेला होता. वास्तविकतः सदर मशिनचे कॅबिनेटला गंज चढणेचा प्रकार हा निव्वळ कॅबिनेटसाठी वापरणेत आलेला पत्र व त्यावर लावणेत आलेली रसायने व रंग हे चांगले दर्जाचे नसलेने घडलेला आहे. बराच काळ पाठपुरावा केलेनंतर वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरचे मशीनचे मॉडेलचे उत्पादन बंद झाले असून तक्रारदार यांना त्याच क्षमतेचे दुस-या मॉडेलचे मशीन बदलून दिले जाईल व त्याकरिता तक्रारदार यांचेकडून कोणतीही रक्कम घेतली जाणार नाही असे कळविले आहे असे तक्रारदारांचे कथन आहे. सदर कथनांचे पुष्ठयर्थ तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच वादातील मशीनचे फोटो दाखल केले आहेत. सदर फोटोंचे अवलोकन करता सदरचे मशीनचे कॅबिनेट सदोष असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सदरची कथने वि.प.क्र.1 व 2 यांनी नाकारलेली नाहीत. वि.प.क्र.2 यांना तक्रारअर्जाची नोटीस लागू होऊनसुध्दा ते याकामी मंचात हजर झाले नाहीत. म्हणून, वि.प.क्र.1 यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. वि.प.क्र.1 हे याकामी हजर झाले परंतु त्यांनी आपले म्हणणे विहीत मुदतीत दाखल केले नाही. म्हणजेच वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. तक्रारदारांनी त्यांचे कथनाचे पुष्ठयर्थ पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. सबब, तक्रारदाराने तक्रारअर्जात केले कथनांवर विश्वासार्हता ठेवणे न्यायोचित वाटते. सदरची बाब विचारात घेता, वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना सदोष वॉशिंग मशीनचा पुरवठा करुन तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
9. तक्रारदारांनी त्यांचे तक्रारअर्जात, तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे बराच काळ पाठपुरावा केलेनंतर वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरचे मशीनचे मॉडेलचे उत्पादन बंद झाले असून तक्रारदार यांना त्याच क्षमतेचे दुस-या मॉडेलचे मशीन बदलून दिले जाईल व त्याकरिता तक्रारदार यांचेकडून कोणतीही रक्कम घेतली जाणार नाही असे कळविले आहे असे कथन केले आहे. सदरची बाब वि.प. यांनी नाकारलेली नाही. सबब सदरची बाब विचारात घेता वि.प.क्र.1 व 2 हे तक्रारदार यांना वादातील मशीन बदलून त्याच मॉडेलचे मशीन देण्यास असमर्थ आहेत ही बाब स्पष्टपणे शाबीत होते. सबब, तक्रारदार हे सदर मशीनची किंमत रक्कम रु. रु.41,110/- ही वि.प.क्र.1 व 2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या परत मिळणेस पात्र आहेत. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार यांनी मशीन खरेदी केले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. क्र.1 व 2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तक्रारदारांनी वादातील सदोष वॉशिंग मशीन वि.प. यांना परत करावे. सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना वादातील मशीनचे खरेदीची किंमत रक्कम रु. 41,110/- परत अदा करावी व सदर रकमेवर मशीन खरेदी केले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे. तक्रारदारांनी वादातील सदोष वॉशिंग मशीन वि.प. यांना परत करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 व 27 अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.