(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 30/03/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्यानी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 09.06.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्यानी नमुद केले आहे की, त्याने गैरअर्जदार क्र.1 व्दारा निर्मीत व्हर्लपुल प्युराफ्रेश आर.ओ. वॉटर प्युरिफायर गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून खरेदी केले होते. गैरअर्जदार क्र.2 हे गैरअर्जदार क्र.1 चे ग्राहकांना हाताळण्याचे कार्य करतात, तर गैरअर्जदार क्र.4 हे अधिकृत सर्व्हीस सेंटर आहे. 3. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, दि.15.07.2008 रोजी गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून रु.15,750/- चा 12.5% वॅट असलेला ‘व्हर्लपुल प्युराफ्रेश ईलाईट आर.ओ. वॉटर प्युरिफायर’ ज्याचा अनुक्रमांक केआरए07400004 असलेला खरेदी केला. सदर ‘व्हर्लपुल प्युराफ्रेश ईलाईट आर.ओ. वॉटर प्युरिफायर’ दि.22.07.2008 रोजी तक्रारकर्त्याचे घरी सुरु केला त्या दिवशी पासुनच त्यामधे दोष होता, याबाबतची तक्रार तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे केली, परंतु ते सदर दोषांचे निराकरण करण्यास अपयशी ठरले. त्यानंतर सर्व्हीस सेंटरमधील काही लोकांनी सदर मशीन चालू स्थितीत नव्हती म्हणून आपल्या सोबत सर्व्हीस सेंटरमधे घेऊन गेले. परंतु त्या ठिकाणी सुध्दा मशिन दुरुस्त होऊ शकली नाही, त्यामुळे दि.13.11.2008 ला नवीन ‘व्हर्लपुल प्युराफ्रेश ईलाईट आर.ओ. वॉटर प्युरिफायर’ मशिन देण्यांत आली. त्या मशिनने सुध्दा दि.05.10.2009 पासुन स्वच्छ पाणी देण्याचे थांबविले, त्याची सुध्दा तक्रार तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.3 कडे केली त्याचा क्रमांक 433/05.10.2009 असा होता. सदर तक्रार केल्यानंतर गैरअर्जदारांनी त्यामधील दोषांचे निराकरण करण्याची कोणतीही तसदी घेतली नाही व दि.17.10.2009 ला गैरअर्जदारांकडून सर्व्हीस इंजिनिअरला पाठविले, त्यांनी सदर मशिन मधील एल.पी.एस. बरोबर काम करीत नसल्याचे नमुद केले आहे व ते बदलविण्यांस सांगितले. सदर पार्ट बदलवुन देखिल मशिन योग्यरित्या काम करीत नसल्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे व ती व्दारे मशिनमधील दोष दुरुस्त करुन द्यावा किंवा नवीन मशिन बदलवुन द्यावी किंवा मशिनची संपूर्ण किंमत परत करावी. तसेच शरीरिक, मानसिक त्रासाकरीता रु.25,000/-, तक्रारकर्ता व त्याचे कुटूंबियांना झालेल्या आरोग्य विषयक समस्यांमुळे झालेल्या त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- ची मागणी केलेली आहे. 4. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना बजावण्यांत आली असता गैरअर्जदार क्र.2 ने सदर तक्रारीला खालिल प्रमाणे उत्तर दिलेले आहे... गैरअर्जदार क्र.2 ने आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने दि.05.10.2009 ला तक्रार नोंदविली होती, परंतु वॉटर प्युरिफायरची वारंटी दि.15.06.2009 ला संपलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याला वारंटी चार्जेस लागेल असे सांगितले असता त्याने ते देण्यांस नकार दिला. तसेच त्यांनी तक्रारकर्त्याचे इतर सर्व म्हणणे नाकारले असुन सदर तक्रार खारिज करण्यांची मंचास विनंती केलेली आहे. इतर गैरअर्जदार क्र.1,3 व 4 यांना मंचाची नोटीस मिळूनही ते उपस्थित न झाल्याने त्यांचे विरुध्द मंचाने प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित केलेला आहे. 5. सदर तक्रार मंचासमक्ष मौखीक युक्तिवादाकरीता दि.16.03.2011 रोजी आली असता मंचाने उभय पक्षांचा युक्तिवाद त्यांचे वकीलामार्फत ऐकला. तसेच मंचासमक्ष दाखल दस्तावेज व उभय पक्षांचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 6. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून गैरअर्जदार क्र.1 व्दारा निर्मीत ‘व्हर्लपुल प्युराफ्रेश ईलाईट आर.ओ. वॉटर प्युरिफायर’ रु.15,750/- ला खरेदी केले होते, ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.3 व गैरअर्जदार क्र.2 यांचे उत्तरावरुन स्पष्ट होत असल्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’ ठरतो असे मंचाचे मत आहे. 7. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केले आहे की, त्याने दि.15.07.2008 रोजी सदर वॉटर प्युरिफायर खरेदी केले होते, त्यामधे दोष निर्माण झाला व सदर दोष गैरअर्जदारांनी न निस्तरल्यामुळे दि.13.11.2008 ला नवीन मशिन लावुन दिली. याबाबत गैरअर्जदार क्र.2 यांनी आपल्या उत्तरात काहीही नमुद केलेले नाही, यावरुन गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास नवीन मशिन दि.13.11.2008 ला बदलवुन दिल्याचे सिध्द होते. गैरअर्जदार क्र.2 यांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने तक्रार ही दि.05.10.2009 ला केली त्यावेळी वॉरंटी संपूष्टात आलेली होती व ती वॉरंटी दि.15.06.2009 पर्यंतच होती. वॉरंटीच्या कालावधीबद्दल गैरअर्जदार क्र.2 यांनी कोणताही दस्तावेज दाखल केला नाही की, वॉरंटीचा कालावधी कधी पर्यंत होता. त्यामुळे वॉरंटीच्या कालावधी बद्दलचे गैरअर्जदार क्र.2 यांचे विधान मान्य करता येत नाही. 8. सदर प्रकरणामध्ये तक्रारकर्त्याने प्रथम दि.15.07.2008 ला मशिन खरेदी केली होती व त्यामधे सुरवातीपासुनच दोष होता, त्यामुळे सदर मशिन दि.13.11.2008 ला बदलवुन देण्यांत आली त्यामधे सुध्दा वारंवार दोष निर्माण होत होते व अशा परिस्थितीत मशिनच्या उपयोगितेचा कालावधीचा विचार करता ती लावल्यापासुनच त्यामधे दोष निर्माण होत होते. त्यामुळे त्याचे निराकरण करणे हे गैरअर्जदारांचे कर्तव्य होते. परंतु गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याकडून सदर मशिन दुरुस्त करण्याकरीता पैशांची मागणी केली व ती तक्रारकर्त्याने नाकारल्याचे सुध्दा स्पष्ट होत. म्हणून मंचाचे असे मत आहे की, मशिनमधे सुरवाती पासुनच दोष असतील तर अशा परिस्थितीत दोषांचे निराकरण करण्याची जबाबदारी ही गैरअर्जदारांचीच आहे. तसेच गैरअर्जदार क्र.2 यांनी वॉरंटीचे कालावधीचा आक्षेप अमान्य करण्यांत येतो, कारण वॉरंटीचा कालावधी किती काळाकरीता होता याबाबतचा दस्तावेज गैरअर्जदारांनी दाखल केलेला नाही. तसेच सदर प्रकरणात तक्रारकर्त्यास दिलेली पहिली मशिन सुध्दा सदोष होती, त्यामुळे दुसरी मशिन लावुन देण्यांत आली होती व त्यामधे सुध्दा दोष निर्माण झाला होता. त्यामुळे गैरअर्जदारांनी मंचासमक्ष दाखल केलेला (2010) CPJ 380 Orissa State Consumer Disputes Redressal Commission, Cuttak, “HCL Limited & Ors. –v/s- Orissa State Commission for Women & Anr.” हा न्याय निवाडा सदर प्रकरणास लागु पडत नाही, त्यामुळे मंचाचे असे मत आहे की, गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास मशिनची दुरुस्ती विनामुल्य करुन द्यावी. जर सदर मशिन दुरुस्ती होण्याचे स्थितीत नसेल तर मशिनची संपूर्ण किंमत रु.15,750/- तक्रारकर्त्यास परत करावी. 9. तक्रारकर्त्याने तक्रारीमधे शारीरिक, मानसिक त्रासाकरीता रु.25,000/- ची मागणी केलेली आहे, सदर मागणी अवास्तव असल्यामुळे तक्रारकर्ता हा रु.2,000/- मिळण्यांस पात्र ठरतो. तसेच तक्रारीच्या खर्चाचे रु.1,000/- मिळण्यांस पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचे कुटूंबीयांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागले याकरीता झालेल्या त्रासापोटी रु.25,000/- रुपयांची मागणी केलेली आहे. परंतु सदर मागणी पृष्ठर्थ कोणताही पुरावा दाखल केलेला नाही त्यामुळे सदर मागणी अमान्य करण्यांत येते. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे, तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता आम्ही खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास सेवेत त्रुटी दिली असुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे घोषीत करण्यांत येते. 3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला संयुक्तपणे किंवा एकत्रीतपणे ‘व्हर्लपुल प्युराफ्रेश ईलाईट आर.ओ. वॉटर प्युरिफायर’ मशिन विनामुल्य दुरुस्त करुन द्यावे. जर ते दुरुस्त होण्यांचे स्थितीत नसेल तर गैरअर्जदारांनी संयुक्तपणे किंवा एकत्रीतपणे तक्रारकर्त्यास मशिनची किंमत रु.15,750/- आदेश पारित झाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत अदा करावी अन्यथा सदर रकमेवर द.सा.द.शे. 9% व्याज रक्कम अदा होईपर्यंत देय राहील 4. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक त्रासाकरीता रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.1,000/- अदा करावे. 5. गैरअर्जदारांनी वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांका पासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |