तक्रारदारातर्फे : वकील श्री. गंडभीर
सामनेवाले क्रं. 2 तर्फे : प्रतिनिधी, श्री. कमलेश बारवानी
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सामनेवाले क्रमांक 1 हे रेफ्रीजरेटर उत्पादन करणारी कंपनी आहे तर, सामनेवाले क्रमांक 2 हे विक्रेते आहेत. तक्रारदारांनी सामनेवाले क्रमांक 1 यांनी उत्पादीत केलेला रेफ्रीजरेटर सामनेवाले क्रमांक 2 यांचेकडून दिनांक 13/12/2004 रोजी रुपये 32,836/- एवढया किंमतीस खरेदी केला. तक्रारदाराच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे सदर रेफ्रीजरेटर सदोष असून त्यामध्ये वारंवार दुरुस्ती करावी लागली, तसेच कॉम्प्रेसर बदलावा लागला, या सदोष रेफ्रीजरेटरमुळे तक्रारदारांना बराच मानसिक त्रास झाला, तक्रारदारांची गैरसोय व कुंचबना झाली. सामनेवाले यांनी वेळोवेळी रेफ्रीजरेटर दुरुस्त करुन दिला, कॉम्पेसर बदलून दिला, परंतु दुरुस्तीच्या कालावधीमध्ये दुसरा रेफ्रीजरेटर पुरविला नाही. एकूणच सदोष रेफ्रीजरेटर बदलून द्यावा अथवा त्याबद्दल रेफ्रीजरेटरची किंमत व नुकसानभरपाई कामी तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल केली आहे.
2. सामनेवाले क्रमांक 1 उत्पादक यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये सामनेवाले क्रमांक 1 यांनी उत्पादीत केलेला रेफ्रीजरेटर सामनेवाले क्रमांक 2 यांनी तक्रारदारांना विक्री केला, ही बाब मान्य केली. तथापि रेफ्रीजरेटरमध्ये मुलभूत दोष आहेत या आरोपास सामनेवाले क्रमांक 1 यांनी नकार दिला. रेफ्रीजरेटरचा कॉम्प्रेसर दोन वेळा बदलण्यात आला ही बाब मान्य केली, परंतु त्याबद्दल तक्रारदाराकडून कुठलेही शूल्क घेण्यात आले नव्हते असेही कथन केले. नंतर सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या सूचनेप्रमाणे वेळोवेळी दुरुस्ती करुन दिलेली आहे. याप्रकारे सेवा सुविधा पुरविण्यात कसूर झालेली नाही असे कथन केले. वॉरंटीची मुदत फार पूर्वीच संपलेली असल्यामुळे रेफ्रीजरेटर बदलून देता येणार नाही, असेही कथन केले.
3. सामनेवाले क्रमांक 2 विक्रेते यांनी आपली वेगळी कैफीयत दाखल केली व त्यामध्ये सामनेवाले क्रमांक 2 यांनी ते वेगवेगळया उत्पादीत केलेल्या वस्तू केवळ विक्री करतात व वस्तूंमधील दोषांबद्दल सामनेवाले क्रमांक 2 यांना जबाबदार धरले जाऊ शकत नाही असेही कथन केले.
4. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले, तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला. सामनेवाले क्रमांक 1 यांनी आपले पुराव्याचे वेगळे शपथपत्र दाखल केले. तक्रारदारांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला त्यावरुन न्याय निर्णयाकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदोष रेफ्रीजरेटरच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली, ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | अंतीम आदेश ? | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
5. सामनेवाले क्रमांक 1 यांनी उत्पादीत केलेला रेफ्रीजरेटर सामनेवाले क्रमांक 2 यांनी दिनांक 13/12/2004 रोजी तक्रारदारांना विक्री केला, याबद्दल वाद नाही. तक्रारदारांना तो फ्रीज वेळोवेळी दुरुस्त करुन द्यावा लागला. दोन वेळेस कॉम्प्रेसर बदलला, तसेच फ्रीजच्या कॉम्प्रेसरची दुरुस्ती होऊ शकली नाही असे कथन केलेले आहे. फ्रीजमध्ये मुलभूत दोष आहेत, तसेच फ्रीज आजही चालू नाही, व तो निकामी झालेला आहे असे तक्रारदाराचे कथन नाही. त्यातही फ्रीज दिनांक 13/12/2004 रोजी म्हणजेच जवळपास 8 वर्षे 6 महिन्यांपूर्वी विकत घेतलेला असलयाने व तो अद्याप वापरात असल्याने फ्रीज बदलून द्यावा असा आदेश सामनेवाले यांना देणे योग्य व न्याय्य होणार नाही, असे प्रस्तुत मंचाचे मत आहे. तथापि तक्रारदाराने कथन केल्याप्रमाणे फ्रीजचा कॉम्प्रेसर दोन वेळा बदलावा लागला ही बाब सामनेवाले क्रमांक 1 यांनी आपल्या कैफीयतीमध्ये मान्य केली. तसेच दोन वेळा गॅस भरावा लागला हे देखील नमूद केले. सामनेवाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये फ्रीज बदलून द्यावयाची तयारी दर्शविली होती असेही कथन केले आहे. यासर्व बाबी असे दर्शवितात की, फ्रीज वारंवार बिघडल्यामुळे व त्यामध्ये दुरुस्ती आवश्यक झाल्याने तक्रारदारांना गैरसोय व कुचंबना सहन करावी लागली. दरम्यान सामनेवाले यांनी तक्रारदारांना दुसरा फ्रीज त्यांच्या वापरण्याकामी पुरविला होता असे सामनेवाले यांचे कथन नाही व तसा पुरावा देखील नाही. एकूणच तक्रारदाराना फ्रीज वारंवार बिघडल्यामुळे व तो दुरुस्त करुन द्यावा लागल्यामुळे जी गैरसोय व कुचंबना झाली, याबद्दल व तक्रारीच्या खर्चाबद्दल तक्रारदारांना एकत्रितरित्या रुपये 10,000/- सामनेवाले क्रमांक 1 यांनी अदा करावेत असा आदेश देणे योग्य व न्याय्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत आहे.
6. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 350/2009 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना फ्रीज दुरुस्ती संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असे जाहिर करण्यात येते. सामनेवाले क्रमांक 1 यांनी त्याबद्दल तक्रारदारांना रुपये 10,000/- नुकसानभरपाई व तक्रारीच्या खर्चाबद्दल एकत्रित रित्या अदा करावेत असा आदेश सामनेवाले क्रमांक 1 यांना देण्यात येतो.
3. सामनेवाले क्रमांक 1 यांनी वरील आदेशाची पूर्तता आठ आठवडयाच्या आत करावी, अन्यथा मुदत संपल्यानंतर पुढील रक्कमेवर 9 टक्के व्याज अदा करावे.
4. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
5
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 19/08/2013
( एस. आर. सानप ) ( ज. ल. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष
एम.एम.टी./-