निकालपत्र :- (दि.09.12.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या व सामनेवाला क्र.1 वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला क्र.2 यांनी लेखी युक्तिवाद दाखल केलेले आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार हे मयत शरद यशवंत घोरपडे यांचे कायदेशीर व सरळ वारस आहेत. शरद यशवंत घोरपडे हे दि.23.03.2009 रोजी मयत झाले आहेत. सदर शरद घोरपडे हे व्यवसायाने चार्टर्ड अकौंटंट होते व सामनेवाला क्र.1 या कायदेशीर नोंदणीकृत संस्थेचे सदस्य होते. सामनेवाला क्र.2 संस्थेने सामनेवाला क्र.3 विमा कंपनीकडे त्यांच्या सभासदांसाठी मास्टर पॉलीसी सुरु केली होती. सदर पॉलीसी क्रमांक हा 69268 असा असून त्याचा कालावधी दि.02.01.2006 ते दि.02.01.2009 असा असून प्रिमियम रक्कम रुपये 10,390/- व सम अॅश्युरड् रक्कम रुपये 10 लाख अशी होती. तसेच, पॉलीसी अटी व शर्तीनुसार सदर पॉलीसी संपणेपूर्वी सामनेवाला क्र.2 यांनी मास्टर पॉलीसी होल्डर्स यांना दोन महिन्याची आगाऊ नोटीस देणे बंधनकारक तसेच पॉलीसीची मुदत संपलेनंतर 1 महिन्याचा ग्रेस पिरियड असा देणेत आला होता. (3) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, मयत शरद घोरपडे यांनी सदर ग्रुप मास्टर पॉलीसी नुतनीकरण करणेसाठी देय तारखेपूर्वी म्हणजेच दि.19.01.2009 रोजी डी.डी.नं.701109 रक्कम रुपये 10,390/- इतक्या रक्कमेचा डी.डी. सामनेवाला क्र.1 संस्थेकडे दिला व सदर चेक वटवून सदर पॉलीसीची नुतनीकरण करणेत आले आहे व त्याचा पॉलीसी नं.692669 असा देणेत आला. सदर पॉलीसीचे नुतनीकरण केलेनंतर सदर घोरपडे यांचा दि.23.03.2009 रोजी मृत्यू झाला व सामनेवाला क्र.1 यांना दि.04.05.2009 च्या पत्राने कळवून क्लेमची मागणी केली असता सामनेवाला क्र.1 यांनी पाठविलेल्या दि.12.06.2009 च्या पत्रानुसार सामनेवाला क्र.2 विमा कंपनीने चुकीचे कारण देवून तक्रारदारांचा क्लेम नाकारला. (4) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, सदर मास्टर पॉलीसी नुतनीकरण करणेसाठी शरद घोरपडे यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी दि.19.01.2009 रोजी हप्त्याची रक्कम पाठविली. सदर नुतनीकरण हप्ता भरलेची तारीख व मृत्यूची तारीख यामध्ये 63 दिवसांचा कालावधी आहे. असे असतानाही चुकीचे कारण देवून क्लेम नाकारला आहे. याबाबत सामनेवाला यांचेशी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. तक्रारदार या गृहिणी असून त्यांना सद्यस्थितीत नोकरी अथवा स्वंयरोजगार करु शकत नाहीत. सबब, क्लेम रककम रुपये 10 लाख द.सा.द.शे.12 टक्के व्याजासह देणेचा आदेश व्हावा. मानसिक व आर्थिक त्रासापोटी रुपये 1 लाख व तक्रारीचा खर्च रुपये 25,000/- देणेचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (5) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत योजनेसंदर्भातील पत्र, बुलेटिन बोर्डमधील अटी व शर्ती, हप्ता करणेसाठी शरद घोरपडे यांनी काढलेले डी.डी., सामनेवाला क्र.1 यांचेकडे सदर डी.डी.भरलेसंदर्भातील पावती, सामनेवाला क्र.1 यांनी सभासदांना पाठविलेले पत्र, सामनेवाला क्र.2 यांनी शरद घोरपडे यांचे नांवे दिलेले विमा प्रमाणपत्र, सामनेवाला क्र.2 यांनी सुरु करुन घेतलेली मास्टर पॉलीसी नं.692608, सामनेवाला क्र.1 यांनी पॉलीसी नुतनीकरण संदर्भातील पाठविलेले पत्र, शरद घोरपडे यांनी पॉलीसी नुतनीकरणासाठी केलेला अर्ज, सदर नुतनीकरणासाठी काढलेल्या डी.डी.ची स्लीप, वरील पॉलीसी नुतनीकरणासंदर्भातील डी.डी., सामनेवाला क्र.1 यांचेकडे भरलेली पावती, सामनेवाला क्र.1 यांनी हप्ता मिळाले संदर्भात पाठविलेले पत्र, शरद घोरपडे यांचे मृत्यू प्रमाणपत्र, तक्रारदार क्र.1 यांनी सामनेवाला क्र.1 यांना पाठविलेले पत्र, सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार क्र.1 यांना पत्राने कळविलेला लेखी तपशील, तक्रारदार क्र.1 यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह कळविलेले पत्र, तक्रारदार क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांना पाठविलेले पत्र, पॉलीसीसंदर्भात सामनेवाला क्र.2 यांचेशी ई-मेलवरुन झालेल्या व्यवहाराची प्रिंट, तक्रारदार क्र.1 यांनी सामनेवाला क्र.1 यांना डेथ क्लेम संदर्भातील पाठविलेले पत्र, सामनेवाला क्र.2 डेथ क्लेम नामंजूर केलेबाबतचे पत्र, सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांचे दि.01.07.09 रोजीचे पत्रास पाठविलेले उत्तर, तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 यांना डेथ क्लेमसंदर्भात पाठविलेले पत्र, सदर पत्रास सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना पाठविलेले उत्तर, तक्रारदारांना सामनेवाला क्र.1 यांनी परत पाठविलेला चेक नं.321929, तक्रारदारांनी वकिलामार्फत पाठविलेली नोटीस तसेच सामनेवाला क्र.1 संस्थेने शरद घोरपडे यांचे नांवे कोल्हापूर शाखेतून दिलेली पावती, सामनेवाला क्र.1 संस्थेचे कोल्हापूर येथे शाखा असलेचे इंटरनेटवरील प्रिंट, सामनेवाला क्र.1 संस्थेच्या कोल्हापूर शाखेचे सदस्यांची इंटरनेटवरील प्रिंट, सामनेवाला क्र.1 यांच्या कोल्हापूर शाखेमधून मिटींग संदर्भात पाठविलेल्या पत्राच्या प्रती, जिल्हा उपनिबंधक यांनी सामनेवाला क्र.1 यांना दिलेले पत्र, शरद घोरपडे यांना सामनेवाला क्र.1 यांचे कोल्हापूर शाखेतून दिलेला दि.16.01.05 व दि.10.10.1999 रोजीचा दाखला, श्री.शिरढोणकर यांचे नांवे कोल्हापूर शाखेतून दिलेली पावती, सामनेवाला क्र.1 ची शाखा कोल्हापूर येथील ऑफिस दर्शविणारा फोटा इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (6) सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदार हे सदर सामनेवाला यांचे ग्राहक होत नाहीत व सदरचा वाद हा ग्राहक वाद होत नाही. तसेच, प्रस्तुत तक्रार चालविणेची क्षेत्रिय अधिकारिता (Territorial Jurisdiction) सदर मंचास येत नाही. तसेच, प्रस्तुतचे प्रकरण संक्षिप्त प्रोसिजरमध्ये चालविता येणार नाही. (7) सदर सामनेवाला हे त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, मयत, शरद यशवंत घोरपडे हे व्यवसायाने चार्टर्ड अकौंटंट असल्याने सामनेवाला क्र.1 संस्थेचे सभासद झाले होते. त्यानुसार सदर सामनेवाला यांनी त्यांच्या सभासदासाठी सुरु केलेली पॉलीसी मयत शरद घोरपडे यांनी घेतलेली होती. सदर पॉलीसी नुतनीकरण करणेसाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयामध्ये प्रिमियम रक्कम स्विकारली होती व त्याप्रमाणे नविन पॉलीसी देणेत आली, त्याचा क्रमांक 692669 असा असून पॉलीसी सुरु दि.16.02.2009 असा होता. सदर सामनेवाला क्र.1 यांचेविरुध्द केलेली कथन चुकीची असून पॉलीसीचे फायदे देणेची जबाबदारी सामनेवाला क्र.2 विमा कंपनीची आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (8) सामनेवाला क्र.2 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, पॉलीसी क्र.692608 या पॉलीसीचा कालावधी दि.02.01.2006 ते दि.02.01.2009 असा होता. सदर पॉलीसीची मुदत सपुंष्टात आलेने तक्रारदार त्याचा फायदा मिळवू शकत नाहीत. तसेच, पॉलीसी क्र.692669 ही पॉलीसी दि.16.02.2009 रोजी सुरु झाली. पूर्वीची व मदत पॉलीसी यांच्या अटी व शर्ती एकच होत्या. परंतु, पॉलीसींची मुदत व नविन पॉलीसी सुरु होण्याचा तारखा भिन्न होत्या. जुनी पॉलीसी दि.02.01.2009 रोजी संपलेली होती व नविन पॉलीसी दि.16.02.209 रोजी सुरु झाली. ग्रेस पिरियड देवून जिवंत केलेली नाही. पॉलीसीच्या असलेल्या अटी व शर्तीनुसार अपघाती मृत्यूखेरीज इतर कारणामुळे पॉलीसी सुरु झालेपासून 45 दिवसांचे विमेदाराचा मृत्यू झाले असलेस क्लेम मागणी करता येणार नाही. शरद घोरपडे यांचा मृत्यू दि.23.03.2009 रोजी म्हणजेच नविन पॉलीसी क्र.692669 सुरु झालेनंतर 45 दिवसांच्या कालावधीमध्ये दिलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांना क्लेम मागणी करता येणार नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (9) सामनेवाला क्र.2 यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत पॉलीसी नं.692669 ची फॅक्स कॉपी दाखल केली आहे. (10) तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्हणून दाखल कगदपत्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद यांचे अवलोकन केले असता प्रस्तुत प्रकरणी खालीलप्रमाणे मुद्दे निष्कर्षाकरिता येत आहेत :- 1. तक्रारदार व सामनेवाला यांचे ग्राहक होतात काय ? व प्रस्तुतचा वाद हा ग्राहक होतो काय ? -- होय 2. प्रस्तुत तक्रार चालविणेस क्षेत्रिय अधिकारीता या मंचास येते काय ? -- होय 3. सामनेवाला यांच्या सेवेत त्रुटी झाली आहे काय ? -- सामनेवाला क्र.2 विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे. 4. तक्रारदार हे क्लेम रक्कम मिळणेस पात्र -- होय आहेत काय ? 5. काय आदेश ? -- शेवटी दिलेप्रमाणे. मुद्दा क्र.1 व 2 :- उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत शरद घोरपडे हे व्यवसायाने चार्टर्ड अकौंटंट असून सामनेवाला क्र.2 या संस्थेचे ते सभासद होते. तसेच, तक्रारदार हे मयत शरद घोरपडे यांचे वारस आहेत हे दिसून येते. सामनेवाला क्र.1 संस्थेने त्यांच्या सभासदांसाठी सामनेवाला क्र.2 विमा कंपनीकडे ग्रुप मास्टर पॉलीसी उतरविली होती. त्यानुसार सामनेवाला क्र.1 यांनी मयत शरद घोरपडे यांचेकडून प्रिमियम स्विकारुन व सदर प्रिमियम सामनेवाला क्र.2 यांचेकडे भरणा करुन प्रथमत: पॉलीसी सुरु केली. त्याचा पॉलीसी नं.692608 असा असून त्याचा कालावधी दि.02.01.2006 ते दि.02.01.2009 असा असलेचे दिसून येते. त्यानंतर सामनेवाला क्र.1 यांनी दि.19.01.2009 रोजी पॉलीसी प्रिमियम रुपये 10,390/- स्विकारुन व त्याचा भरणा सामनेवाला विमा कंपनीकडे करुन पुन्हा पॉलीसी देणेत आली आहे. सदर पॉलीसी क्र. 692669 असा देणेत आला आहे. ही वस्तुस्थिती उपलब्ध कागदपत्रांवरुन दिसून येते. मयत शरद घोरपडे यांचा मृत्यू दि.23.03.2009 रोजी झालेला आहे व तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे क्लेमची मागणी केली असता सदर क्लेम नाकारणे आलेला आहे. सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या म्हणण्यात तक्रारदार हे ग्राहक होत नाहीत. या मुद्दयाकडे लक्ष वेधलेले आहे. परंतु, ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2(1)(ओ) यातील तरतुदी तसेच उपरोक्त विवेचन विचारात घेतली तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक होत आहे व प्रस्तुतचा वाद हा ग्राहक होत आहे या निष्कर्षाप्रत येत आहे. सबब मुद्दा क्र.1 होकारार्थी आहे. सामनेवाला क्र.1 यांनी या मंचास क्षेत्रिय अधिकारीता (Territorial Jurisdiction) असा मुद्दा उपस्थित केलला आहे; परंतु, सामनेवाला क्र.1 यांचे शाखा कार्यालय कोल्हापूर येथे आहे; त्यानुवार झालेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती प्रस्तुत दाखल केलेल्या आहेत. शाखा कार्यालय या मंचाच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने क्षेत्रिय अधिकारीता (Territorial Jurisdiction) या मंचास येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 व 2 होकारार्थी आहेत. मुद्दा क्र.3 व 4 :- सामनेवाला क्र;2 यांनी मयत शरद घोरपडे यांचा मृत्यू हा पॉलीसी क्र.692669 सुरु झालेपासून 45 दिवसांचे आत झालेला आहे, या कारणावरुन तक्रारदारांचा क्लेम नाकारला आहे. या मंचाने सदर मास्टर पॉलीसीच्या अटी व शर्ती चे अवलोकन केले आहे; यातील महत्त्वाच्या अटी व शर्ती या पुढीलप्रमाणे :- (v) ‘Effective Date’ shall mean the 15th of FEBRUARY 2006, the date as from which this policy take effect. (vi) ‘Renewal Date’ shall mean in relation to the Scheme the 16th day of FEBRUARY 2009 & 1st day of FEBRUARY every three years thereafter. (vii) ‘Entry Date’ for a member shall mean the date of receipt of the appropriate Premium in respect of that Mamber, by the Corporation. तसेच, सर्वसाधारण शर्तीमधील शर्त क्र.4 पुढीलप्रमाणे :- 4. Subject to the provisions of these General Conditions, the Assurance effected hereunder shall continue in force for a period of three years from the Effective date and shall be renewable at the option of the Grantees on every three years period. तसेच, परिशिष्ट भाग-2 यातील क्र.2 हा पुढीलप्रमाणे :- 2. | RENEWAL OF ASSURANCE | Renewal of Assurance shall mean every three years after the Scheme commences |
उपरोक्त अटी व शर्तींचे बारकाईने अवलोकन केले असता जुनी पॉलीसी 692608 व नविन पॉलीसी 692669 या दोन्ही पॉलीसींमध्ये असलेल्या अटी व शर्ती या एकच आहेत. मयत शरद घोरपडे यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडे पॉलीसी नुतनीकरणाकरिता दि.19.01.2009 रोजी पॉलीसी हप्ता दिलेला आहे व त्याची पावती दि.22.01.2009 रोजी दिलेली आहे. सदर पावती देणेचा अधिकार हा सामनेवाला क्र.1 यांना सामनेवाला क्र.2 यांनी सदर पॉलीसीच्या अटी व शर्तीमधील पान नं.3 परिच्छेद नं.5 यातील उप-परिच्छेदाप्रमाणे दिलेचा दिसून येत आहे व त्याप्रमाणे सामनेवाला क्र.2 विमा कंपनीने पॉलीसी नुतनीकरण करुन पॉलीसी नं.692669 ही दिलेली आहे. उपरोक्त उल्लेख केलेली अट व शर्त क्र.vii याचा विचार करता पॉलीसीची एन्ट्री डेट ही दि.22.01.2009 अशी आहे. सदर तारखेपासूनच पॉलीसी सुरु असलेचे अटी व शर्तीनुसार दिसून येते व मयत शरद घोरपडे यांचा मृत्यू हा दि.23.03.2009 रोजी झालेला आहे. म्हणजे सदरचा कालावधी हा 61 दिवसांचा दिसून येत आहे. त्यामुळे सामनेवाला विमा कंपनीने पॉलीसी सुरु केलेपासून 45 दिवसांच्या आंत मृत्यू झालेला आहे. या कारणावरुन तक्रारदारांचा नाकारलेला क्लेम हा अटी व शर्ती भंग करणारे आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच, उपरोक्त उल्लेख केलेप्रमाणे जुनी व नविन पॉलीसी यातील अटी व शर्ती या एकच आहेत. त्यामुळे नविन पॉलीसी ही जुन्या पॉलीसीचे पुर्नजिवन केलेले नाही हा घेतलेला मुद्दा सुध्दा अटी व शर्तींचा भंग करणारा आहे. उपरोक्त विवेचन विचारात घेता सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांचा क्लेम नाकारला यामध्ये सामनेवाला विमा कंपनीची सेवात्रुटी दिसून येत आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 हा होकारार्थी आहे. तक्रारीत उल्लेख केलेल्या पॉलीसीचे अवलोकन केले असता सम अॅश्युरड् रक्कम ही रक्कम रुपये 10 लाख आहे. उपरोक्त विवेचन केलेप्रमाणे सदर क्लेम रक्कम देणेची जबाबदारी ही सामनेवाला क्र.2 विमा कंपनीची आहे. सामनेवाला क्र.2 विमा कंपनीने सदरची रक्कम ही तक्रारदारांना व्याजासह अदा करावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.4 हा होकारार्थी आहे. उपरोक्त संपूर्ण विवेचन विचारात घेवून हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला क्र.2 विमा कंपनीने तक्रारदारांना क्लेम रक्कम रुपये 10,00,000/- (रुपये दहा लाख फक्त) द्यावी व सदर रक्कमेवर दि.23.03.2009 पासून द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे संपूर्ण रक्कम मिळेपावेतो व्याज द्यावे. 3. सामनेवाला क्र.2 विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |