(पारित व्दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य.)
(पारित दिनांक-13 जानेवारी, 2017)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये विरुध्दपक्षां विरुध्द मंचासमक्ष दाखल केली.
02. तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) भूखंड विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारकर्त्याला भूखंडाची आवश्यकता असल्याने त्याने विरुध्दपक्ष क्रं-1 व क्रं-2 यांचेशी संपर्क साधला. विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम को-ऑप.हाऊसिंग सोसायटीचे मालकीचा मौजा हजारी पहाड, खसरा क्रं-22 येथील भूखंड क्रं-33 व क्रं 33-अ ज्यांचे एकूण क्षेत्रफळ-2262 चौरसफूट, प्रतीचौरसफूट रुपये-65/- प्रमाणे एकूण रुपये-1,47,030/- एवढया किंमतीत खरेदी करण्याचा करार तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्ष क्रं-2) याचेशी दिनांक-06/12/2004 रोजी केला. कराराचे वेळी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) ला रुपये-35,443/- बयानादाखल अदा केलेत, परंतु सदर करारा संदर्भात दिनांक-10.04.2006 रोजी सौद्देचिठ्ठी करण्यात आली असून त्या दिवशी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-2 याला रुपये-1,10,000/- धनादेशाव्दारे श्री सेवराम कर्वे याच्या नावाने, विरुध्दपक्ष क्रं-2) याने सांगितल्या प्रमाणे दिले. भूखंडाची उर्वरीत रक्कम रुपये-1587/- खरेदीच्या वेळी देण्याचे ठरले. खरेदीची मुदत निश्चीत करण्यात आली नसल्याने विरुध्दपक्ष क्रं-2) याचे मागणी नुसार तक्रारकर्त्याने उर्वरीत रक्कम रुपये-1587/- दिनांक-19/04/2006 रोजी विरुध्दपक्ष क्रं-2) याला दिली. विरुध्दपक्ष क्रं-2) याने, विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम को-ऑप.सोसायटीचे उपरोक्त नमुद मालकीच्या भूखंडाची विक्री तक्रारकर्त्याचे नावे करुन देण्याचे अभिवचन दिले होते.
पुढे तक्रारकर्त्याने असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी त्याचे कडून दिनांक-19.04.2006 रोजी पर्यंत भूखंडाची संपूर्ण रक्कम रुपये-1,47,030/- विरुध्दपक्ष क्रं-2) याचे माध्यमातून स्विकारली. तसेच भूखंडाची संपूर्ण रक्कम मिळाल्या बाबत विरुध्दपक्ष क्रं-2) याने त्याला दिनांक-11/12/2010 रोजी दिलेल्या पत्रात मान्य केलेले आहे. त्या अनुषंगाने विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम को-ऑप.हाऊसिंग सोसायटीने प्लॉट क्रं-33 व क्रं-33-अ ची नोंद तक्रारकर्त्याच्या नावे नागपूर सुधार प्रन्यास येथे केली व त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक-15 जून, 2006 पूर्वी रुपये-60,452/- विकास शुल्क नागपूर सुधार प्रन्यास मध्ये भरले. परंतु त्या नंतर आज पर्यंत विरुध्दपक्षानीं त्याचे नावे भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून दिले नाही व भूखंडाची मोजणी करुन ताबाही दिलेला नाही. अशाप्रकारे दोन्ही विरुध्दपक्षानीं आपल्या सेवेत त्रृटी ठेवली.
म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन पुढील प्रमाणे विरुध्दपक्षां विरुध्द मागण्या केल्यात-
विरुध्दपक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन दोषपूर्ण सेवा दिल्याचे घोषीत करण्यात यावे. विरुध्दपक्षांना भूखंड क्रं-33 व 33-अ चे नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून देण्याचे व ताबा देण्याचे आदेशित व्हावे किंवा विरुध्दपक्ष भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देण्यास असमर्थ असल्यास आजचे बाजार भावा प्रमाणे भूखंड क्रं-33 व क्रं-33-अ ची संपूर्ण किम्मत वार्षिक-18 टक्के व्याजासह प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो त्यास परत करण्याचे विरुध्दपक्षानां आदेशित व्हावे. याशिवाय त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- व तक्रारखर्च म्हणून रुपये-10,000/- विरुध्दपक्षां कडून देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम को-ऑप हाऊसिंग सोसायटी तर्फे अकील अहमद हिफझुल कबीर यंनी उपस्थित होऊन लेखी उत्तर प्रतिज्ञालेखावर सादर केले. त्यांनी प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार ही खोटी व बनावट स्वरुपाची आहे. तक्रारकर्त्याचा विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम को-ऑप. सोसायटीशी कोणताही करार झालेला नाही. तक्रारकर्त्याचे तक्रारीतील मजकूरा प्रमाणे त्याने भूखंडाची संपूर्ण रक्कम ही विरुध्दपक्ष क्रं-2) याला दिलेली आहे. तक्रारकर्त्याने अथवा विरुध्दपक्ष क्रं-2) याने विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम हाऊसिंग सोसायटीला भूखंडाची रक्कम दिलेली नाही वा त्यांना ती रक्कम प्राप्त झालेली नाही. त्यांनी तक्रारकर्त्यास सेवा देण्याचे कबुल केलेले नाही. विरुध्दपक्ष क्रं-1) सोसायटीने तक्रारकर्त्याला भूखंड विक्री करण्यास कधीही मान्यता दिलेली नाही वा त्या संबधाने कोणताही लेखी करार त्यांनी तक्रारकर्त्या सोबत केलेला नाही, त्यामुळे तक्रारकर्ता हा त्यांचा ग्राहक होऊ शकत नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) याचेशी व्यवहार केलेला असल्याने, त्याला विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम को-ऑप.सोसायटी विरुध्द दावा करता येणार नाही. विरुध्दपक्ष क्रं-2) याने दिनांक-11/12/2010 रोजीचे तक्रारकर्त्याला दिलेल्या पत्रात विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम को-ऑप.सोसायटीला भूखंडाची रक्कम दिल्याचे नमुद केलेले आहे परंतु तक्रारकर्त्याने वा विरुध्दपक्ष क्रं-2) याने विरुध्दपक्ष क्रं-1 ला कोणतीही रक्कम दिलेली नाही. तक्रारकर्त्याची तक्रार ही मुदतबाहय आहे. ग्राहक मंचाचे मर्यादित अधिकारक्षेत्रात ही तक्रार चालू शकत नाही.
परिच्छेद निहाय उत्तर देताना तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) याचेशी दिनांक-11/11/2004 रोजी केलेला भूखंड करार नामंजूर केला. तक्रारकर्त्या कडून, विरुध्दपक्ष क्रं-2) मार्फतीने विहित मुदतीत भूखंडाची संपूर्ण रक्कम प्राप्त झाल्याची बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्याने नागपूर सुधार प्रन्यास मध्ये विकास शुल्काची रक्कम भरली, या बाबी सुध्दा नामंजूर केल्यात. विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम को-ऑप.हाऊसिंग सोसायटीने तक्रारकर्त्याचे नावे भूखंड क्रं-33 व क्रं-33-अ ची नोंद नागपूर सुधार प्रन्यासमध्ये करुन दिल्याची बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम हाऊसिंग सोसायटी सोबत कोणताही व्यवहार केलेला नसल्याने व त्यांचा विरुध्दपक्ष क्रं-2) याने तक्रारकर्त्याशी केलेल्या व्यवहाराशी कोणताही संबध नसल्याने तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम सोसायटी कडून कोणतीही दाद मागू शकत नाही. तक्रारकर्त्याचा विरुध्दपक्ष क्रं 1 शी कोणताही करार नसल्याने दोषपूर्ण सेवा देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार नामंजूर करुन तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम को-ऑप.हाऊसिंग सोसायटी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) सुर्यकांत गेंदासिंग ठाकूर, अध्यक्ष, गौसिया लेबर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, नागपूर तर्फे प्रतिज्ञालेखावर लेखी उत्तर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष क्रं-2) ने लेखी उत्तरात असे नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम को-ऑप.हाऊसिंग सोसायटी कडून भूखंड विकत घेतला आहे आणि त्याचा विरुध्दपक्ष क्रं-2) संस्थेशी कोणताही
संबध नसून त्याला विनाकारण या प्रकरणात प्रतिपक्ष केले असल्याने त्याचे विरुध्दची तक्रार खारीज व्हावी. भूखंड क्रं 33 व 33-अ चे सौद्देचिठ्ठीचे अवलोकन केले असता ती विरुध्दपक्ष क्रं-2) संस्थेनी करुन दिलेली नसल्याचे दिसून येते, त्यामुळे तक्रार विरुध्दपक्ष क्रं-2) विरुध्द खारीज व्हावी. दस्तऐवज क्रं-2 व 3 वरुन असे दिसून येते की, भूखंड क्रं-33 व 33-अ हा विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम को-ऑप.हाऊसिंग सोसायटीचा असून त्याचेशी विरुध्दपक्ष क्रं-2) संस्थेचा संबध नाही. नागपूर सुधार प्रन्यासच्या रेकॉर्ड वरुन सिध्द होते की, विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम सोसायटीचे मालकीचा तो भूखंड आहे व तक्रारकर्ता हा त्या संस्थेचा सभासद आहे. सदरील वाद हा विरुध्दपक्ष क्रं 1) संस्था आणि तक्रारकर्त्या मधील असून तो वाद सहकार न्यायालयाचे अधिकारक्षेत्रात येत असल्याने ग्राहक मंचाला अधिकारक्षेत्र येत नाही. तक्रारकर्त्याने भूखंड क्रं 33 व 33-अ चा कायदेशीर करार केलेला नाही. तसेच तक्रार ही मुदतबाहय आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) याचेशी भूखंडा बाबत केलेला संपूर्ण व्यवहार, कथीत सौद्देचिठठी नामंजूर केली. सदर सौद्देचिठ्ठीत सूर्यकांत ठाकूर या वैयक्तिक नावाचा उल्लेख आहे, गौसिया लेबर को-ऑप.संस्थेच्या नावाचा उल्लेख नाही. तक्रारकर्त्या कडून भूखंडापोटी विरुध्दपक्ष क्रं-2) यांनी उर्वरीत रक्कम स्विकारलेली नाही. तसेच तक्रारकर्त्यास दिनांक-11/12/2010 रोजी दिलेले पत्र विरुध्दपक्ष क्रं-2) यास अमान्य आहे. तक्रारकर्त्याने भूखंड क्रं-33 व 33-अ चे विकासशुल्कची रककम नागपूर सुधार प्रन्यास कडे भरली याचेशी विरुध्दपक्ष क्रं 2 चा कोणताही संबध नाही. तक्ररकर्त्याने भूखंडा संबधी संपूर्ण व्यवहार विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम सोसायटीशी केलेला असून, भूखंड क्रं-33 व 33-अ शी विरुध्दपक्ष क्रं-2 चा संबध नाही त्यामुळे विक्रीपत्र करुन देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तऐवज विरुध्दपक्ष क्रं 2 ला मान्य नाहीत. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 सोबत भूखंड विक्री संबधाने कोणताही व्यवहार केलेला नसल्याने व तो भूखंड विरुध्दपक्ष क्रं 1 वेलकम सोसायटीचे मालकीचा असल्याने तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 2 चे विरुध्द खारीज व्हावी अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं 2 ने केली.
05. तक्रारकर्त्याची तक्रार तसेच उभय पक्षांची लेखी उत्तरे आणि उपलब्ध दस्तऐवजांच्या प्रतीं तसेच उभय पक्षकारांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
06. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत जे दस्तऐवज दाखल केलेले आहेत, त्यातील दस्तऐवज क्रं-1) सौद्देचिठ्ठी असून ती सुर्यकांत गेंदासिंह ठाकूर याने तक्रारकर्त्याच्या नावे लिहून दिलेली असून ती सन-2006 मधील असून त्यामध्ये मौजा हजारी पहाड, तालुका जिल्हा नागपूर येथील खसरा क्रं 22 मधील भूखंड क्रं-33 व 33-अ एकूण क्षेत्रफळ-2262 चौरसफूट, प्रतीचौरसफूट रुपये-65/- प्रमाणे एकूण रुपये-1,47,030/- एवढया किमतीत विकल्याचे नमुद असून, बयाना दाखल अक्षरी रुपये-................नगदी भरुन पावलो (बयाना दाखल रकाना रिकामा ठेवलेला आहे) तसेच उर्वरीत रक्कम रजिस्ट्री पर्यंत भरावयाची असल्याचे त्यात नमुद आहे. सदर सौद्देचिठ्ठीवर विकणा-याची सही आणि एक साक्षीदाराची सही आहे परंतु ही सौद्देचिठ्ठी साध्या कागदावर करण्यात आलेली आहे. सदर सौद्देचिठ्ठी मध्ये विकणा-याने (सुर्यकांत सिंह ठाकूर याने) आमचे मालकीचे व कब्ज्यात असलेले मौजा हजारी पहाड, तालुका जिल्हा नागपूर असा उल्लेख केलेला आहे.
07. तक्रारकर्त्याने दाखल केलेला दुस-या क्रमांकाचा दस्तऐवज हा विरुध्दपक्ष क्रं-2) सूर्यकांत गेंदासिंह ठाकूर, अध्यक्ष, गौसिया लेबर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी तर्फे तक्रारकर्त्याचे नावे दिलेले पत्र असून ते दिनांक-11.12.2010 रोजीचे असून ते भूखंड क्रं-33 व 33-अ चे संदर्भात आहे. त्या पत्रात असे नमुद केले आहे की, विषयांकित भूखंड क्रं-33 व 33-अ, हजारी पहाड ची विक्री गौसिया लेबर को-ऑप. हाऊसिंग सोसायटीव्दारा वेलकम को-ऑप हाऊसिंग सोसायटीचा प्लॉट तक्रारकर्त्याला दिनांक-06/12/2004 रोजी विकलेला असून त्याची आराजी 2262 चौरसफूट असून त्यामध्ये या प्लॉटच्या विक्रीपोटी तक्रारकर्त्या कडून दिनांक-06.12.2004 रोजी रुपये-35,443/- नगदी, दिनांक-10.04.2006 रोजी धनादेशाव्दारे रुपये-1,10,000/- आणि दिनांक-19.04.2006 रोजी नगदी रुपये-1587/- असे मिळून एकूण रुपये-1,47,030/- प्लॉटची संपूर्ण किम्मत मिळाल्याचे नमुद असून मी, सूर्यकांत गेंदासिंह ठाकूर, अध्यक्ष, गौसिया लेबर को-ऑप. हाऊसिंग सासोयटी, नागपूर उपरोक्त संपूर्ण रक्कम वेलकम को-ऑप.हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नं.8, लोखंडे ले आऊट विकास भवाना मागे, मानकापूर रिंगरोड, नागपूर यांना दिली आहे. तसेच वेलकम को-ऑप. हाऊसिंग सोसायटीने भूखंड क्रं-33 व 33-अ, हजारी पडाड-22ची नोंदणी नागपूर सुधार प्रन्यास मध्ये श्री अनिरुध्द देविदास पेढेकर यांचे नावाने करुन दिलेली आहे.
08. तक्रारकर्त्याने दाखल केलेला दस्तऐवज क्रं-3 हा नागपूर सुधार प्रन्यास तर्फे दिलेली डिमांडनोट असून ती तक्रारकर्त्याचे नावे असून ती वेलकम को-ऑप सोसायटी मधील भूखंड क्रं-33 व 33-अ संबधाने विकासशुल्क भरण्या संबधीची डिमांडनोट आहे, तसेच दस्तऐवज क्रं 4 नागपूर सुधार प्रन्यासव्दारे दिलेली पावती असून त्या अनुसार तक्रारकर्त्याने दिनांक-15/06/2006 रोजी विकासशुल्क म्हणून रुपये-60,452/- नागपूर सुधार प्रन्यास मध्ये भरल्याचे दिसून येते.
मंचाचे मते, भूखंड क्रं-33 व 33-अ चे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदविलेले नसताना नागपूर सुधार प्रन्यास तर्फे कोणत्या आधारावर विकासशुल्का संबधी डिमांड नोट तक्रारकर्त्याचे नावे देण्यात आली याचा कोणताही उलगडा होत नाही.
09. मंचाचे मते तक्रारकर्त्याच्या नावे सुर्यकांत गेंदासिंह ठाकूर याने दिनांक-11/11/2004 रोजीची लिहून दिलेल्या सौद्देचिठ्ठी वरील स्वाक्षरी तसेच दिनांक-11/12/2010 रोजीचे तक्रारकर्त्याचे नावे विरुध्दपक्ष क्रं-2) सूर्यकांत गेंदासिंह ठाकूर, अध्यक्ष, गौसिया लेबर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी याने दिलेल्या पत्रावरील स्वाक्षरी आणि विरुध्दपक्ष क्रं-2) अध्यक्ष, गौसिया लेबर को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी नागपूर याने मंचा समक्ष दिनांक-05/12/2011 रोजीचे दाखल केलेले लेखी उत्तर यावरील स्वाक्षरी या सर्व स्वाक्ष-या या सुर्यकांत गेंदासिंग ठाकूर यानेच केल्या असल्याचे दिसून येतात आणि सदरील दस्तऐवजांवरील स्वाक्ष-या या एकमेकांशी जुळतात.
10. मंचाचे पुढे असे मत आहे की, सुर्यकांत गेंदासिंह ठाकूर याने आपल्या लेखी उत्तरात असे नमुद केले आहे की, त्याने भूखंड क्रं-33 व 33-अ ची सौद्देचिठ्ठी ही व्यक्तिगतरुपात केलेली आहे. सदर सौद्देचिठ्ठीमध्ये आमचे मालकीचे व कब्ज्यात असेलेले भूखंड असा उल्लेख केलेला आहे, त्याने सदरील भूखंड हे विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम को-ऑप हाऊसिंग सोसायटीचे असून विरुध्दपक्ष क्रं 1 तर्फे तो विकत असल्याचे कुठेही सौद्देचिठ्ठी मध्ये नमुद केलेले नाही. सौद्देचिठ्ठी जरी व्यक्तीगत रुपात सुर्यकांत ठाकूर याने केलेली असली तरी तक्रारकर्त्याचे नावे दिनांक-11/12/2010 रोजी दिलेल्या पत्रात सूर्यकांत गेंदासिंह ठाकूर याने अध्यक्ष, गौसिया लेबर को-ऑप.हाऊसिंग सोसायटी, नागपूर मार्फतीने भूखंडाची रक्कम तक्रारकर्त्या कडून स्विकारलेली असल्याचे नमुद केलेले असल्याने सदर भूखंड व्यवहार हा दोन पक्षां मधील व्यक्तीगत स्वरुपाचा करार नसून तो तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष संस्थे मधील भूखंड व्यवहार असल्याने मंचास या तक्रारीत ती चालविण्याचे अधिकारक्षेत्र येते.
11. तसेच विरुध्दपक्ष क्रं-2) सूर्यकांत गेंदासिंह ठाकूर, अध्यक्ष, गौसिया लेबर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी तर्फे तक्रारकर्त्याचे नावे दिनांक-11.12.2010 रोजी दिलेल्या पत्राचे अवलोकन केले असता ते भूखंड क्रं-33 व 33-अ चे संदर्भात आहे. त्या पत्रात विषयांकित भूखंड क्रं-33 व 33-अ, हजारी पहाडची विक्री गौसिया लेबर को-ऑप. हाऊसिंग सोसायटीव्दारा वेलकम को-ऑप हाऊसिंग सोसायटीचा प्लॉट तक्रारकर्त्याला दिनांक-06/12/2004 रोजी विकलेला असून त्याची आराजी 2262 चौरसफूट असून प्लॉटच्या विक्रीपोटी तक्रारकर्त्या कडून दिनांक-06.12.2004 रोजी रुपये-35,443/- नगदी, दिनांक-10.04.2006 रोजी धनादेशाव्दारे रुपये-1,10,000/- आणि दिनांक-19.04.2006 रोजी नगदी रुपये-1587/- असे मिळून एकूण रुपये-1,47,030/- प्लॉटची संपूर्ण किम्मत मिळाल्याचे नमुद असून सूर्यकांत गेंदासिंह ठाकूर, अध्यक्ष, गौसिया लेबर को-ऑप. हाऊसिंग सासोयटी, नागपूर याने उपरोक्त संपूर्ण रक्कम वेलकम को-ऑप.हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नं.8, लोखंडे ले आऊट विकास भवाना मागे, मानकापूर रिंगरोड, नागपूर यांना दिल्याचे त्यात नमुद केलेले आहे
परंतु प्लॉटची संपूर्ण रक्कम विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम को-ऑप सोसायटीला मिळाल्याचे खंडन विरुध्दपक्ष क्रं 1) वेलकम सोसायटी तर्फे करण्यात आलेले आहे, सूर्यकांत गेंदासिंह ठाकूर याने प्लॉटची रक्कम विरुध्दपक्ष क्रं 1) वेलकम सोसायटीला दिल्या बाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम सोसायटीने भूखंड क्रं-110 व क्रं 111 ची सौद्देचिठ्ठी त्यांचे वतीने करण्याचे कोणतेही अधिकार विरुध्दपक्ष क्रं-2) संस्थेला वा सुर्यकांत ठाकूर याला व्यक्तीगत रुपाने दिल्या बद्दलचा कोणताही लेखी पुरावा मंचा समोर आलेला नाही.
12. विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम सोसायटी तर्फे तक्रारकर्त्याने सुर्यकांतसिंह ठाकूर याचेशी भूखंड क्रं-33 व 33-अ चा केलेला संपूर्ण व्यवहार तथाकथीत सौद्देचिठ्ठी व त्या संबधाने रकमा मिळाल्या बाबत संपूर्ण बाब नामंजूर केलेली आहे.
13. हा संपूर्ण प्रकार पाहता यात सूर्यकांत गेंदासिंह ठाकूर यानेच अध्यक्ष, गौसिया लेबर-को ऑप.हाऊसिंग सोसायटी, नागपूर म्हणून भूखंडा संबधीचे संपूर्ण व्यवहार तक्रारकर्त्याशी करुन रकमा प्राप्त केलेल्या आहेत, सूर्यकांत ठाकूर याने भूखंड क्रं-33 व 33-अ विक्री करुन देण्या संबधी कोणत्या अधिकारा खाली व्यवहार तक्रारकर्त्याशी केलेले आहेत, ते ही समजून येत नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 तर्फे जे लेखी उत्तर मंचा समक्ष सादर करण्यात आले, त्यात तक्रार ही मुदतीत नसल्याचे नमुद केले आहे परंतु सुर्यकांतसिंह ठाकूर याने अध्यक्ष, गैसिया लेबर को-ऑप.हाऊसिंग सोसायटी नागपूरव्दारे तक्रारकर्त्याशी सौदेचिठ्ठीव्दारे केलेला भूखंड क्रं-33 व 33-अ चा व्यवहार व स्विकारलेल्या रकमा या बाबी दाखल दस्तऐवजा वरुन सिध्द होत असल्याने व तक्रारकर्त्यास भूखंडाचे आमिष दाखवून त्याला शेवट पर्यंत भूखंडाचे विक्रीपत्र करुन न दिल्याने, जो पर्यंत भूखंडाचे विक्री करुन देत नाही तो पर्यंत तक्रारीचे कारण सतत घडत असल्याचे (Cause of Action is continuing) दिसून येते. अशाप्रकारे अशाप्रकारे सुर्यकांतसिंह ठाकूर याने अध्यक्ष, गैसिया लेबर को-ऑप.हाऊसिंग सोसायटी नागपूर या नात्याने तक्रारकर्त्याची एकप्रकारे फसवणूक केल्याचे दिसून येते, त्यामुळे तक्रारकर्त्याला साहजिकच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
14. भूखंडाचीं तथाकथीत सौद्देचिठ्ठी ही कोणत्या आधारावर सूर्यकांतसिंह ठाकूर याने तक्रारकर्त्यास करुन दिली या संबधी कोणताही पुरावा मंचा समोर आलेला नाही आणि विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम सोसायटी तर्फे सौद्देचिठ्ठीतील भूखंड क्रं-33 व 33-अ व त्या संबधाने तक्रारकर्त्याने दिलेल्या रकमा या सर्व बाबी नामंजूर करण्यात आलेल्या आहेत. तक्रारकर्त्याने अरविंद अर्जुन बोंद्रे यांचा प्रतिज्ञालेख दाखल केलेला असून त्याने सुध्दा आपल्या प्रतिज्ञापत्रात त्याचे समोर जो काही भूखंडाचा व्यवहार झालेला आहे तो सुर्यकांत ठाकूर आणि तक्रारकर्त्या मध्ये झाल्याचे नमुद केलेले आहे, त्यामुळे दस्तऐवजी पुराव्या वरुन सुर्यकांत ठाकूर याने अध्यक्ष, गौसिया लेबर को-ऑप.हाऊसिंग सोसायटी नागपूर या नात्याने भूखंड व्यवहार केलेले असून रकमा स्विकारल्यात हे सिध्द होत असून पुढे त्या रकमा विरुध्दपक्ष क्रं 1) वेलकम सोसायटीला दिल्या बद्दलचा कोणताही पुरावा मंचा समोर सादर केलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्ता हा सुर्यकांतसिंह गेंदासिंह ठाकूर, अध्यक्ष गौसिया लेबर को-ऑप.हाऊसिंग सोसायटी नागपूर याचे कडून त्याने भूखंडापोटी दिलेल्या रकमा, रक्कम दिल्याचे दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो वार्षिक 12 टक्के दराने व्याजासह मिळण्यास पात्र आहे, त्याच बरोबर शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-5000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- तक्रारकर्त्यास देण्यास तो पात्र आहे. विरुध्दपक्ष क्रं1) वेलकम सोसायटीचे विरुध्द कोणताही पुरावा समोर आलेला नसल्याने त्यांना मुक्त करण्यात येते. तक्रारकर्त्याने नागपूर सुधार प्रन्यास मध्ये तथाकथीत भूखंडापोटी भरलेली विकासशुल्काची रक्कम नियमा नुसार त्याने योग्य तो अर्ज करुन ती परत घ्यावी.
15. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(1) तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष सुर्यकांत गेंदासिंह ठाकूर, अध्यक्ष गौसिया लेबर को-ऑप.हाऊसिंग सोसायटी नागपूर याचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष सुर्यकांत गेंदासिंह ठाकूर, अध्यक्ष गौसिया लेबर को-ऑप.हाऊसिंग सोसायटी नागपूर यास आदेशित करण्यात येते की, त्याने तक्रारकर्त्या कडून भूखंड क्रं-33 व 33-अ पोटी स्विकारलेली संपूर्ण रक्कम रुपये-1,47,030/- (अक्षरी रुपये एक लक्ष सत्तेचाळीस हजार तीस फक्त) (दिनांक-06.12.2004 रोजी रुपये-35,443/- नगदी, दिनांक-10.04.2006 रोजी धनादेशाव्दारे रुपये-1,10,000/- आणि दिनांक-19.04.2006 रोजी नगदी रुपये-1587/-) रकमा स्विकारल्याचे त्या-त्या दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने व्याजासह तक्रारकर्त्यास परत कराव्यात.
(03) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष सुर्यकांत गेंदासिंह ठाकूर, अध्यक्ष गौसिया लेबर को-ऑप.हाऊसिंग सोसायटी नागपूर याने तक्रारकर्त्याला द्दावेत.
(04) सदर निकालपत्रातील आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष सुर्यकांत गेंदासिंह ठाकूर, अध्यक्ष गौसिया लेबर को-ऑप.हाऊसिंग सोसायटी नागपूर याने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
(05) विरुध्दपक्ष क्रं-1) वेलकम को-ऑप.हाऊसिंग सोसायटी व्दारा संचालक मंडळ यांना त्यांचे विरुध्द कोणताही पुरावा नसल्याने मुक्त करण्यात येते.
(06) तक्रारकर्त्याने तथाकथीत भूखंड भूखंड क्रं-33 व 33-अ पोटी नागपूर सुधार प्रन्यास मध्ये भरणा केलेली रक्कम तो नियमा नुसार योग्य त्या विहित मार्गाने अर्ज करुन परत प्राप्त करु शकेल.
(07) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.