तक्रारदारातर्फे – वकील – आर.बी.धांडे,
सामनेवालेतर्फे – वकील – के.आर.टेकवाणी,
।। निकालपत्र ।।
( निकाल घोषितद्वारा सौ.एम.एस.विश्वरुपे – सदस्या )
तक्रारदार यांनी प्रस्तुतचीतक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे बीड येथील नांमवत इलेक्ट्रीकल होलसेलचे व्यापारी अहेत. त्यांचे सुभाष रोड येथे सोना इलेक्ट्रीकल नांवाचे दुकान आहे. तक्रारदारांचे दुकानातुन बाहेर गांवी माल ट्रान्सपोर्टद्वारे वितरीत करणेचा व्यवसाय करतात.
सामनेवाले नं.1 हे सामनेवाले नं.2 यांचे अधिपत्याखाली राज्य परिवहन महामंडळामार्फत दिलेल्या अधिकृत ट्रान्सपोर्ट व कुरीअर सेवा संपूर्ण महाराष्ट्रात देतात.
तक्रारदारांनी ता. 26.10.2009 रोजी त्यांचे जुने ग्राहक मुनलाईट हाऊस, उस्मानाबाद यांना रक्कम रु.11,909/- चे इलेक्ट्रीक सामान 41 किलोग्राम वजनाचे असे 5 डाग उस्मानाबाद करीता पाठविण्या करीता सामनेवाले नं.1 यांचेकडे कार्यालयात जावून सदर सामान ते बुकींग केली होती. सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांकडून मालाच्या किराया रु.59/-, सरचार्ज रु.15/-, अतिरिक्त सेवा चार्ज रु.5/- बील चार्ज रु.20/- व सदर मालाचा विमा असल्याचे भासवून त्याचे नावाखाली रु.36/- हे सर्व मिळून रु.140/- एवढी रक्कम तक्रारदार यांचेकडून घेवून त्यांना पावती दिली. सदरचा माल 4 ते 5 दिवसात समोरच्या व्यक्तीला मिळून जाईल. सदर माल संबंधीत व्यक्तीस मिळाल्यापासून आमच्या कंपनीकडून विमा काढण्यात आलेला असल्याचे सांगीतले.
तक्रारदारांनी सदर माला बाबत मुनलाईट हाऊस, उस्मानाबाद यांचेकडे चौकशी केली असता 5 डागापैकी फक्त 4 डाग मिळाल्या बाबत समजले. 1 डाग मिळाला नसल्याने ज्यामध्ये अंकर कंपनीचे 9 मिटर टेप व एच.पी.एल. कंपनीचे 15 वॉट सीएफएल मिळाले नाहीत. सदर मालाची किमत रु.6167/- होती. तक्रारदारांनी सदरच्या मालाची चौकशी सामनेवाले नं.1 यांचेकडे केली तेव्हा 4 ते 5 दिवसात वरील माल न मिळाल्यास सदर मालाचा विमा मुल्याधिकारीत अधिभार घेतले असल्याचे सांगीतले. तक्रारदारांनी ता.10.11.2009 रोजी मुनलाईट, उस्मानाबाद यांचेकडे सदर मालाबाबत चौकशी केली असता गहाळ झालेला एक डाक अद्यापपर्यन्त त्यांना मिळाला नसल्याचे समजले. तक्रारदारांनी या संदर्भात सामनेवाले नं.1 यांचेकडे चौकशी केली असता सदर मालाचा डाग हरवलेला असुन विमा रक्कम लवकरच मिळून जाईल असे सांगण्यात आले. त्याच प्रमाणे या संदर्भात मुख्य कार्यालय म्हणजेच सामनेवाले नं.2 यांचेकडे कळविले असल्याचे सांगीतले. अशा प्रकारे तक्रारदारांनी सामनेवाले न.1 व 2 यांचेकडे सदर मालाच्या विमा रक्कमे विषयी व सदर माल हरवले विषयी वारंवार चौकशी केली. परंतु सामनेवालें न.1 व यांनी फक्त खोटे आश्वासन दिले. अद्यापपर्यन्त तक्रारदारांना रक्कम रु.6167/- च्या मालाच्या विम्याची रक्कम दिली नाही. तसेच सदरील माल मुन लाईट हाऊस, उस्मानाबाद यांना पोहच केलेला नाही. तक्रारदारांनी शेवटी ता. 15.11.2009 रोजी या संदर्भात सामनेवाले नं.1 यांचेकडे चौकशी केली असता सामनेवाले नं.1 यांनी टाळाटाळ करुन उडवाउडविचे उत्तर देवून सदर माल व सदर मालाची विमा रक्कम देण्यास टाळलेले आहे. तरी तक्रारदारांची विनंती की,
अ). दिनांक 26.10.2009 रोजी पाठविलेल्या मालाची किंमत :- रु. 6,167/-
ब). मनस्तापा बाबत नुकसान भरपाई :- रु. 10,000/-
क). प्रस्तुत तक्रार खर्च. :- रु. 3,000/-
-------------------------
एकुण :- रु. 19,167/-
-------------------------
एकुण रक्कम रु. 19,167/- त्यावर द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह सामनेवाले यांचेकडून वसूल होवून मिळावे.
सदर प्रकरणात सामनेवाले नं.1 व 2 हजर झाले असुन त्यांनी त्यांचा खुलासा दाखल केलेला आहे. सामनेवाले यांचा थोडक्यात खुलासा की,
कलम- 1 मधील मजकुर माहित नाही. कलम-2 मधील मजकुराबाबत सामनेवाले नं.1 हे सामनेवाले नं.2 चे बीड येथील एजंट म्हणुन कार्यरत आहेत. कलम-3 मधील मजकुरा बाबत ता.26.10.2009 रोजी सामनेवाले नं.1 यांचेकडे उस्मानाबाद येथील सामनेवाले नं.2 यांचे प्रतिनिधिला पाठविण्यासाठी एकुण 23 डागाची बुकींग झाली होती.
अ.क्र. | पावती क्रमांक | माल पाठविणार | माल घेणार | डागांची संख्या |
01 | 1025359 | वैशाली मेडिको, बीड | श्री मेडीकल,उस्मानाबाद | 5(पाच) |
02 | 3525402 | सोना इलेक्ट्रीकल्स,बीड | संध्या इलेक्ट्रीकल्स, उस्मानाबाद | 1(एक) |
03 | 3525401 | सोना इलेक्ट्रीकल्स,बीड | मोरे इलेक्ट्रॉनिक्स, उस्मानाबाद | 1(एक) |
04 | 3525400 | सोना इलेक्ट्रीकल्स,बीड | सना इलेक्ट्रीकल्स, उस्मानाबाद | 1(एक) |
05 | 3525399 | सोना इलेक्ट्रीकल्स,बीड | संगीता गॅस एजन्सी , उस्मानाबाद | 1(एक) |
06 | 3525398 | सोना इलेक्ट्रीकल्स,बीड | मुनलाईट इलेक्ट्रीकल्स, उस्मानाबाद | 1(एक) |
07 | 3525397 | सोना इलेक्ट्रीकल्स,बीड | पारस एजन्सी, उस्मानाबाद ----------------------- एकुण | 1(एक) --------- 23 (तेवीस) |
तक्ता क्र. 1 ते 7 वरील तक्यामधीत अनुक्रमांक 1 मधील पार्सल पेड होते. उर्वरीत सर्व पार्सल टू-पे होते. सामनेवाले नं.1 यांनी 14 डाग जालना-अक्कलकोट या बस कंडक्टरकडे दिले. उर्वरीत 9 डाग सामनेवाले यांनी धुळे-तुळजापूर या बस कंडक्टरकडे उस्मानाबादला पाठविले. अशा प्रकारे 23 डाग सामनेवाले नं.1 यांनी ता.26.10.2009 रोजी उस्मानाबाद बस गाडीमध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार पाठविले. या सर्व 23 डाग त्याबाबत मालाची सही संबंधीत बस गाडीचे कंडक्टर/ड्रायव्हर यांची घेतली आहे. तक्रारदारांनी 5 डागामध्ये रक्कम रु.12,000/- चे माल असल्याचे सांगीतले. सदर पावती क्रं.3525398 वर सदर किमंत नमुद कण्यात आली आहे. त्याच प्रमाणे प्रत्येक डागाची किंमत रु.2,500/- अशी होते. ज्यात प्रत्येक डागाची रक्कम रु.2,500/- चा विमा आहे.
कलम-4 मधील मजकुर चुकीचा असुन मान्य नाही. तक्रारदारांनी मुन लाईट इलेक्ट्रीकल्स नांवाने सदर मालाची बुकींग केली आहे. कलम-5 मधील मजकुर चुकीचा असुन मान्य नाही. कलम-6 मधील मजकुर चुकीचा असुन मान्य नाही. तक्रारदारांनी अद्यापर्यन्त एकदाही संबंधीत एक बॉक्स हरवले बाबत सामनेवाले यांना लेखी किंवा तोडी माहिती दिली नाही. वर नमुद केल्याप्रमाणे 1 डागाचा विमा रु.2,500/- एवढा आहे. कलम- 7,8,9 मधील मजकुर चुकीचा असुन मान्य नाही. कलम-10 मधील मजकुराबाबत तक्रारदरांचा नमुद केल्या प्रमाणे सामनेवाले नं.2 चे उस्मानाबादसाठी प्रतिनिधी यांना 1 डाग कमी मिळाला म्हणुन सदर प्रतिनिधी म्हणुन आवश्यक पक्षकार आहे. कलम-11 मधील मजकुर कोर्ट फि संबधात असल्यामुळे उतर देण्याची आवश्यकता नाही.
सामनेवाले नं.1 यानी कसल्याही प्रकारची सेवेत कसूरी केलेली नाही किंवा सेवेत त्रुटी केलेली नाही त्यामुळे कसल्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यास सामनेवाले जबाबदार नाहीत. तरी सामनेवाले यांची विनंती की, तक्रारदारांची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी.
सामनेवाले नं.2 हे हजर झाले असुन त्यांनी त्यांचा खुलासा ता.3.4.2010 रोजी दाखल केला आहे. सामनेवाले नं.2 यांचा थोडक्यात खुलासा की,
कलम-1 मधील मजकुरा बाबत माहिती नाही. कलम-2 मधील मजकुराबाबत सामनेवाले नं.1 हे सामनेवाले नं.2 बीडचे प्रतिनिधी म्हणुन कार्यरत आहेत. सामनेवाले नं.2 हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बसेसद्वारे पार्सल व कुरिअर व इतर तसम वाहतुकीचा परवानाधारक मे.जोशी फ्रेड कॅरिअर्स,धुळे यांचे एकमेव अधिकृत एजंट आहेत. परवानाधारक व एस.टी. महामंडळ यांचेमध्ये ता.19 सप्टेंबर,2009 रोजी करार झाला आहे. या करारातील तरतुदीनुसार प्रस्तुत सामनेवाले हे अधिकृत एजेंट आहेत. सदर कराराप्रमाणे सामनेवाले यांचे प्रतिनिधीने पार्सल/डाक/कुरिअर नियोजित ठिकाणी पाठविण्यासाठी बसचे कंडक्टर/ड्रायव्हरला सदर पार्सल द्यावे व संबंधीत एस.टी महामंडळाचे कर्मचारी सदर पार्सल नियोजीत ठिकाणी पाठविण्याची त्यानुसार जबाबदारी संबंधीत कर्मचा-यांची आहे. सदर पार्सलचे नुकसान महामंडळाचे कर्मचा-यांचे निष्काळजीपणामुळे झाले, यासंबंधी काही कलम सदर करारामध्ये नमूद केले आहेत ते असे.
“34.1 whenever there is loss or damage to the parcels due to the negligence of the corporation employees, the unit officers of the corporation shall cause an enquiry and fix-up the responsibility on the employees (s) for such loss/damage as far as possible within three months from the date of such loss or damage is reported to the licensee or its representative to the Corporation. The licensee or its representative shall inform the loss/ damage of parcels to the respective unit officer, with details, within 48 hours, form the date of loading of the parcels in the bus.”
“34.3 whenever it is established after due enquiry that loss or damage to parcels is due to the fault or negligence of Corporations employees, the claim as admitted by the licensee based on declared value of parcel recorded on parcel receipt shall be recovered from the employee and remitted to the Licensee by the Corporation.”
परवानाधारकाने त्यांचे बुकींग कार्यालय, कार्यालयाचे आवारातच उघडणे आवश्यक आहे.
कलम-3 मधील मजकुर मान्य नाही. कलम-4,5,6 मधील मजकुर चुकीचा असुन मान्य नाही. कलम-7 मधील मजकुर चुकीचा असुन तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 व 2 यांचेकडे यासंदर्भात तक्रार केली असती तर सामनेवाले यांनी सदर तक्रारीवर एस.टी.महामंडळाकडे यांनी प्रकरणाची तक्रार केली असती. तक्रारदारांनी एस.टी.महामंडळाकडे तक्रार दाखल केली नाही.
कलम-8,9,10 मधील मजकुर चुकीचा असुन मान्य नाही. प्रस्तुत प्रकरणात सिध्दीविनायक फ्राईट लि, उस्मानाबाद हयांना पार्टी करणे आवश्यक आहे.
तक्रारदाराना सामनेवाले नं.1 यांनी दिलेल्या पावतीवरील नियम 5 व 6 प्रमाणे कोणताही वाहतुक विवाद निर्माण झाल्यास न्यायीकक्षेत्र धूळे (महाराष्ट्र) राहिल असे स्पष्ट उलेख आहे.
सदर तक्रार दाखल करण्यास कारण उस्मानाबाद येथे निर्माण झाले उदभवले, त्यामुळे बीड न्यायमंचास सदर प्रकरण चालविण्यास अधिकार नाही. तक्रारदारांनी बीड, उस्मानाबाद प्रतिनिधी किंवा कंपनीचेमुख्यालयाकडे तक्रार दाखल केली नाही. तरी देखील या प्रकरणाची माहिती सामनेवाले यांना झाल्यानंतर सामनेवाले नं.2 यांनी संबंधीत एस.टी वाहकाचे विरुध्द अंबड आगार, जिल्हा जालना ता.12.03.2010 रोजी तक्रार दाखल केली आहे. सदरची तक्रार प्रलंबीत आहे. तरी सामनेवाले यांची विनंती की, तक्रारदारांची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी.
न्याय निर्णयासाठी मुद्दे. उतरे.
1. तक्रार न्यायमंचाचे अधिकार कक्षेत आहे काय ? होय
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांचा उस्मानाबाद येथे पाठविलेल्या
मालापैकी एक डाग गहाळ करुन, तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत
कसुरी केल्याची बाब तक्रारदारांनी सिध्द केली आहे काय ? होय
3. तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहे काय ? होय
4. अंतिम आदेश काय ? निकाला प्रमाणे
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्र, शपथपत्र, पुराव्याचे शपथपत्र, सामनेवाले नं.1 व 2 याचा लेखी खुलासा, कागदपत्र, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकिल आर.बी.धांडे व सामनेवाले यांचे विद्वान वकिल के.आर.टेकवाणी यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्ररदारांनी तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 यांचे कार्यालयात रक्कम रु.11,909/- किमंतीचे 11 किलो वजनाचे पाच डाग मुन लाईट हाऊस, उस्मानाबाद यांचेकडे पाठविण्याकरीता बूकींग केले. सदर सामान पाठविण्याकरीता ट्रान्सपोर्टचा किराया व इतर खर्च एकुण रु.140/- एवढी रक्कम तक्रारदारांकडून घेवून सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांना पावती दिली. सदर माला संदर्भात मुन लाईट हाऊस, उस्मानाबाद यांचेकडे चौकशी केली असता पाच डागापैकी फक्त चार डाग मिळालेले आहेत, एक डाग मिळालेला नसल्याचे समजले. तक्रारदारांनी या संदर्भात सामनेवाले नं.1 व 2 यांचेकडे वारंवार चौकशी केली असता सामनेवाले नं.1 यांनी सदरचा 1 डाग हरवलेला असून इंश्युरन्सची रक्कम लवकरच मिळेल असे आश्वासन दिले. परंतु अद्यापपर्यन्त तक्रारदारांचा सदरचा हरवलेला डाग मिळालेला नाही अथवा मालाची किंमत रक्कम रु.6,167/- परत मिळाले नाही, अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सामनेवाले नं.1 यांचे खूलाशानुसार तक्रारदारांनी या संदर्भात सामनेवाले यांचेकडे लेखी अथवा तोंडी तक्रार केलेली नाही. तक्रारदारांनी पाच डागांची किमत रु.12,000/-नमुद केलेली असून प्रत्येक डागाची किंमत रु.2,500/- एवढी असल्यामुळे, तक्रारदारांचा हरवलेल्या डागाचा इंश्युरन्स रक्कम रु.2,500/- एवढा आहे. तसेच सामनेवाले नं.2 यांचे उस्मानाबदचे प्रतिनीधी यांना एक डाग कमी मिळाला. म्हणुन ते सदर दाव्यात ते आवश्यक पार्टी आहेत. असे नमुद केले आहे.
सामनेवाले नं.2 यांचे खूलाशानूसार तक्रारदारांनी त्यांचेकडे या संदर्भात तोंडी अथवा लेखी तक्रार केलेली नाही. या कारणाबाबत माहिती झाल्यानंतर सामनेवाले नं.2 यांनी संबंधीत एस.टी.चे वाहकाचे विरुध्द अंबड, आगार जि.जालना येथे ता.12.3.2010 रोजी तक्रार दाखल केली आहे. सदरची तक्रार प्रलंबित आहे.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 यांचे मार्फत उस्मानाबाद येथे रक्कम रु.12,000/- किमतीचे पाच डाग पाठविण्यात आले परंतु त्यापैकी सामनेवाले नं.1 यांचे उस्मानाबाद प्रतिनिधी यांची दि.25.10.209 रोजीचे पावतीवरुन चारच डाग प्राप्त झाल्याचे दिसून येते. सदर गहाळ झालेल्या माला संदर्भात सामनेवाले यांनी संबंधीत एस.टी. चालकाविरुध्द, आगार व्यवस्थापक अंबड, जि.जालना यांचेकडे ता.12.3.2010 रोजी दाखल केल्याचे तक्रारीत आलेल्या पुराव्यावरुन दिसून येते. यावरुन तक्रारदारांचा माल गहाळ झााल्याची बाब स्पष्ट होते. सामनेवाले यांचे खुलाशानुसार तक्रारादारांचे पाच डागांवी एकूण किमंत रु.12,000/- आहे. त्याप्रमाणे प्रत्येक डागांची किंमत रु.2,500/- असल्यामूळे, प्रत्येक डागाचा रु.2,500/- चा विमा काढला आहे. सामनेवाले नं.1 यांनी सामनेवाले नं.2 यांच्या उस्मानाबाद येथील प्रतिननिधीकडे पाठविण्या करीता एकूण 14 डागांची बुकींग झाली होती. त्याप्रमाणे एम.एच.20 डी-9991 या बस गाडीच्या वाहन कंडक्टरकडे देवून सही घेतली आहे. सदर कंडक्टरने सदर 14 डाग स्विकारुन त्या गाडीमध्ये उस्मानाबादला पोहचविण्यासाठी ठेवले. तक्रारदारांच्या तक्रारीनुसार सामनेवाले नं.2 यांचे उस्मानाबादचे प्रतिनीधीना एक डाग कमी मिळाला त्यामुळे सदर प्रतिनिधी प्रस्तुत प्रकरणात पक्षकार करणे आवश्यक आहे, असे नमुद केले आहे. सामनेवाले नं.2 यांचे उस्मानाबाद येथील प्रतिनिधी त्यांचे अधिपत्याखाली काम करतात. तक्रारदारांनी मुख्य कार्यालय सामनेवाले नं.1 व 2 यांना सदर प्रकरणात समाविष्ट केलेले असल्याचे कारणास्तव मुख्य कार्यालयाच्या अधिपत्याखाली उस्मानाबाद प्रतिनिधींना सदर प्रकरणात समाविष्ठ करणे आवश्यक नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाले यांचे खूलाशानुसार सामनेवाले नं.2 व एस.टी.महामंडळ यांचेमध्ये झालेल्या करारानूसार महामंडळाच्या कर्मचा-यांच्या निष्काळजीपणामुळे पार्सल गहाळ झालेले असल्यामुळे सामनेवाले नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत.
वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 यांचेकडे उस्मानाबाद येथे पाठविण्या करीता दिलेल्या मालापैकी एक डाग गहाळ झाल्याचे स्पष्ट होते. सदरचा डाग एस.टी. महामंडळाच्या कर्मचा-यांच्या निष्ळजीपणामुळे गहाळ झालेला असल्यामुळे सामनेवाले नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत, असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे नियोजित स्थळी पाठविण्याकरीता दिलेला माल नियोजित ठिकाणी नियोजीत वेळेत पोहचणे आवश्यक होते. सामनेवाले व एस.टी. महामंडळात झालेला करार हा त्यांचा दोघामधील अंतर्गत करार आहे. तक्रारदारांचा सदर करारा बाबत माहिती नाही व त्यांचा सदर कराराशी काहीही संबध नाही. अशा परिस्थितीत तक्रारदारांचा माल गहाळ झालेला तो निश्चित ठिकाणी पोहचविलेला नाही. सदर माल नेमून दिलेल्या ठिकाणी पोहचविण्याची जबाबदारी सामनेवालेंनी घेतलेली आहे. ती पूर्ण न केल्याने सामनेवाले यांनी सेवेत कसुरी केली आहे, असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी वर नमुद केलेला माल सामनेवाले नं.1 यांचेकडे बीड येथे देवून,पावती घेवून स्मानाबाद येथे पाठविण्या करीतादिलेल्या असल्यामुळे सदरचे प्रकरण न्यायमंचाच्या अधिकार क्षेत्रात येते, असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाले यांचे खुलाशात नमुद केल्याप्रमाणे तक्रारदारांच्या प्रत्येक डागांची किंमत रु.2,500/- असल्यामुळे, रु.2,500/- एवढया किंमतीचा सदर मालाचा विमा काढलेला आहे. अशा परिस्थितीत सामनेवाले यांनी तक्रारदारांना गहाळ झालेल्या मालाची किमंत रु.2,500/- देणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे. तक्रारदारांची कोणतीही चुक नसताना सदर प्रकरणात निश्चित मानसिक त्रास सोसावा लागला आहे. तरी मानसिक त्रासाची रक्कम रु.1,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु.500/- देणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना गहाळ झालेल्या मालाची किंमत रु.2,500/- ( अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्त ) आदेश मिळाल्या पासुन एक महिन्याचे आत अदा करावे.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/- ( अक्षरी रुपये एक हजार फक्त ) आदेश मिळाल्या पासून एक महिन्याचे आत अदा करावी.
4. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.500/- ( अक्षरी रुपये पाचशे फक्त ) आदेश मिळाल्या तारखे पासुन एक महिन्याच्या आत अदा करावी.
5. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, वरील आदेश क्र.2,3 व 4 मधील रक्कम विहित मुदतीत अदा न केल्यास त्यावर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
6. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांला परत करावेत.
(सौ.एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड