जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –03/2011 तक्रार दाखल तारीख –06/01/2011
पांडूरंग पि. किसन गदळे
वय 49 वर्षे धंदा नौकरी .तक्रारदार
रा.दळीफळ वडमाऊली ता.केज जि.बीड
विरुध्द
व्यवस्थापक, .
रिलायन्स् जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
सी-9/10, दुसरा मजला, औरंगाबाद बिझीनेस सेंटर
अदालत रोड,औरंगाबाद-431001 .सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.अरविंद काळे
सामनेवाले तर्फे :- अँड.ए.पी.कूलकर्णी
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांनी त्यांचे व कूटूंबाचे वापराकरिता तवेरा कार खरेदी केली. सदरची कार सोहम मोटार्स ओरंगाबाद कडून खरेदी केली. त्यासाठी तक्रारदारांनी एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेतले.
दि.5.5.2008 रोजी तक्रारदारांनी सदर वाहनाचा विमा घेतला आहे.सदर वाहनाचा नोंदणी क्रमांक एम.एच.-44-बी-926.
दि.16.11.2008 रोजी तक्रारदार तूळजापूर येथे काही खाजगी कामाकरिता ड्रायव्हर संतोष महादेव टिंगरे यांला घेऊन जात असताना दुपारी अंदाजे 4.30 वाजता तुळजापूर जवळ सांगवी पाटीजवळ एक मोटारसायकल स्वार क्र.एम.एच.-13-ए.जी.-5895 हा चुकीच्या बाजूने ट्रकच्या पाठीमागून ट्रकला ओव्हरटेक करुन तक्रारदाराच्या गाडीला येऊन धडकला. त्यामध्ये तक्रारदाराच्या गाडीचा समोरचा भाग चक्काचूर झाला व गाडी रस्त्याच्या कडेला गेली. त्यामुळे तक्रारदाराच्या गाडीचे रु.1,10,000/- चे नूकसान झाले. अपघातानंतर तक्रारदारांनी तात्काळ यासंदर्भातील सामनेवाला यांना कळविले. त्याचप्रमाणे ताकलवाडी पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची माहीती दिली. सामनेवाला यांचे सर्व्हेअर यांनी गाडीचा अपघाता झाला त्याठिकाणी जाऊन गाडीची पाहणी केली.
गाडीचा विमा कालावधीमध्ये अपघात झाल्याने तक्रारदारांने सामनेवालाकडे रु.1,10,000/-ची मागणी केली असता सामनेवाला यांनी तक्रारदारांना कळविले की, गाडी दूरूस्त करुन घ्या व खर्चाच्या पावत्या आमचे कार्यालयामध्ये जमा करा. त्याप्रमाणे गाडीचे खर्चाचे पैसे मिळतील.
सामनेवाला यांचे सांगणेप्रमाणे व त्यांचे संमतीने तक्रारदाराने अपघातग्रस्त गाडी दूरुस्तीकरिता औरंगाबाद येथे सोहम मोटार्स यांचेकडे टाकली. गाडी दि.15.12.2008 रोजी दूरुस्त होऊन तयार झाली. त्याप्रमाणे सदर दिनांकाला तक्रारदारांनी रु.1,07,500/- रोख दिले व गाडी आणली.
त्यानंतर गाडीच्या दूरस्तीच्या पावत्या सामनेवाला यांचेकडे अर्जासह देऊन नूकसानीची मागणी केली.अनेक वेळा कार्यालयात जाऊन रक्कमेची मागणी केली परंतु सामनेवाला नवनवीन कारणे सांगून विमा दाव्याचे रककम दिली नाही. याप्रमाणे तक्रारदाराने जवळपास दोन वर्ष सामनेवाला यांचेकडे चकरा मारल्या. दि.31.3.2010 रोजी तक्रारदारांनी सामनेवाला यांचे औरंगाबाद येथील कार्यालयात जाऊन नूकसान भरपाईचे संदर्भात विचारणा केली असता सामनेवाला यांनी तक्रारदारास सांगितले की, तुमचा नुकसान भरपाईचा अर्ज दि.10.03.2009 रोजी निकाली काढला त्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे पैसे मिळणार नाही. सामनेवाला यांचे दि.10.03.2009 रोजीच्या पत्राची प्रत तक्रारदारांना पाठविली नाही. दि.21.09.2010 रोजी दि.10.03.2009 रोजीचे पत्र दिले. सामनेवाला यांनी जाणीवपूर्वक तक्रारदाराचा क्लेम नांमजूंर केल्याचे कळविले नाही व सेवेत कसूर केला.
वरील पत्रातील सामनेवाला यांचे कारणे तक्रारदाराना मान्य नाहीत. त्यामुळे तक्रारदारास सामनेवाला हे खालील प्रमाणे नूकसान भरपाई देण्यास बंधनकारक आहेत. अपघातग्रस्त वाहनास दूरस्तीचा खर्च रु.1,07,500/- विमा रक्कम वेळेत न दिल्यामुळे तक्रारदारास झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासाबददल रु.10,000/- तक्रारीचा खर्च रु.5,000/- असे एकूण रु.1,22,500/-.
सामनेवाला यांनी त्यांचा खुलासा दि.3.5.2011 रोजी नि.8 दाखल केला आहे. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत.तक्रारदारांनी अपघाताची माहीती तिन दिवसउशिराने दिली. तसेच वाहन दूरुस्ती बाबत सामनेवाला यांना तोंडी सूचना दिली नाही. उलटपक्षी तक्रारदारांनी वाहन अपघातग्रस्त स्थळावरुन कोणतीही सूचना न देता सामनेवाला यांचे संमती न घेता हलवले. त्यामुळे सामनेवाला यांनी गाडीची नूकसान भरपाई बाबत पाहणी करता आली नाही. तक्रारदाराचा दावा दि.10.03.2009 रोजीच्या पत्रान्वये पत्रात नमूद केलेल्या कारणावरुन नाकारलेला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा योग्य रितीने नाकारलेला आहे. वास्तविक वाहनाचा ताबा श्री. राम नवनाथ केदार यांचा होता आणि त्यांचा इन्शुरेबल इन्ट्ररेस नव्हता. सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केलेला नाही. विमा पत्रातील अटी व शर्तीनुसार सदरचे वाहन भाडयाने दिले होते त्यामुळे पॉलिसीचा अटीचा व शर्तीचा भंग झालेला आहे. तक्रारदाराचा दावा खर्चासह रदद करण्यात यावा.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला यांचा खुलासा यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.काळे आणि सामनेवाला यांचे विद्वान वकील श्री.कूलकर्णी यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी तवेरा गाडी विकत घेतली असून त्यांचा विमा सामनेवाला यांचेकडे घेतलेला आहे. सदरची बाब विमापत्रावरुन स्पष्ट होते. तक्रारदाराच्या गाडीला दि.16.11.2008 रोजी अपघात झाला. सदर अपघाताची सूचना तक्रारदारांनी सामनेवाला यांना दिलेली होती. त्यानुसार सामनेवाला यांनी सर्व्हेअर नेमून अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. परंतु या संदर्भात सामनेवाला यांचे खुलाशात तक्रारदारांनी अपघाताची माहीती तिन दिवस उशिराने दिल्याने अपघाताग्रस्त जागेवर वाहनाची पाहणी करता आली नाही व त्यामुळे सर्व्हे अहवाल आला नाही. या संदर्भात सामनेवाला यांनी तक्रारदारांना दावा नाकारल्याचे दि.10.03.2009 रोजीचे पत्र दिले आहे त्यात नमूद केले आहे की, दावा अर्जासोबत कागदपत्र आणि सर्व्हे रिपोर्ट यांचेमध्ये त्यांनी दावा नाकारल्याचे कारण पत्रात नमूद केले आहे. याठिकाणी सामनेवाला यांचे वरील विधान सर्व्हे रिपोर्ट आलेला नाही हे खोटे ठरते. पत्रात नमूद केल्याप्रमाणे सर्व्हे रिपोर्ट दाखल करण्याची जबाबदारी सामनेवाला यांची होती परंतु त्यांनी विलंबाने सूचना न मिळाल्याचे कारणावरुन पाहणी केली नाही व त्यामुळे सर्व्हे रिपोर्ट नाही असा चूकीचा बचाव घेतल्याचे दिसते.
सामनेवाला यांनी दावा नाकारल्याचे कारणाचा विचार करता सामनेवाला यांचेकडे सदरची सूचना तिन दिवसानंतर मिळाली या बाबतचा कूठलाही पुरावा सामनेवाला यांनी दाखल केलेला नाही. तसेच अपघाताचे वेळी राम नवनाथ केदार यांचे ताब्यात वाहन होते याही कारणावरुन तक्रारदाराचा इन्शुरेबल इन्ट्ररेस नाही.या कारणाने दावा नाकारला आहे. या संदर्भात राम नवनाथ केदार यांच्या ताब्यात वाहन असल्या बाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा सामनेवाला यांनी दाखल केलेला नाही. त्यामुळे इन्शुरेबल इन्टरेस्टच्या संदर्भातील कारण हे योग्य व न्याय आहे असे म्हणता येणार नाही.
विमा पत्रातील अटी व शर्तीनुसार वाहन हे खाजगी उपयोगाकरिता असल्याने ते भाडयाने देता येत नाही या अटीचे उल्लंघन करुन या कारणाने दावा नाकारलेला आहे. या संदर्भात वाहन भाडयाने दिले असल्या बाबतचा कोणताही विमा कंपनीचा कागदोपत्री पुरावा खुलाशा सोबत दाखल नाही.त्यामुळे वरील तिनही कारणाचा विचार करता सामनेवाला यांनी योग्य रितीने तक्रारदाराचा दावा नाकारला आहे असे कूठेही स्पष्ट होत नाही. तक्रारदाराचा दावा नाकारुन सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते.
सर्व्हे रिपोर्ट झालेला असून तो दाखल केलेला नाही त्यामुळे त्या संदर्भात तक्रारदारांनी तक्रारीत मागणी केलेली गाडी दुरुस्तीसाठी लागलेला खर्च रु.1,07,500/- च्या बाबत विचार करता विमा पत्रात तक्रारदारांनी वाहनाच्या नूकसानीचे संदर्भात रक्कम रु.13,653/- चा हप्ता भरला आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी वरील नूकसानीची रक्कम तक्रारदारांना देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सेवेत कसूरीची बाब स्पष्ट झाल्याने सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/- व खर्चाची रक्कम रु.2,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
1.
2. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना वाहनाच्या दूरुस्तीचा खर्च रु.1,07,500/-(अक्षरी रु.एक लाख सात हजार पाचशे फक्त) आदेश प्राप्ती पासून 30 दिवसाचे आंत दयावा.
3. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, वरील रक्कम विहीत मूदतीत अदा न केल्यास दि.06.01.2011 पासून द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज देण्यास सामनेवाला हे जबाबदार राहतील.
4. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) व खर्चाची रक्कम रु.2,000/-(अक्षरी रु.दोन हजार फक्त) आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड