तक्रारदारातर्फे – वकील- ए.के.जवळकर
सामनेवाले 1 तर्फे – नि.17 तक्रारदारांचा ता.4.9.10 अर्जानुसार वगळण्यात आले
सामनेवाले 2 तर्फे – एकतर्फा आदेश.
सामनेवाले 3 तर्फे – एकतर्फा आदेश.
सामनेवाले 4 तर्फे – वकिल- एस.एम.फारुक
।। निकालपत्र ।।
( निकाल घोषितद्वारा सौ.एम.एस.विश्वरुपे – सदस्या )
तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे लातूर येथील रहीवासी असुन त्यांनी सामनेवाले नं.2 यांचे खातेदार आहेत. सदरची आय.सी.आय.सी.आय.बँक ही ऑनलाईन बँक असल्यामुळे भारतातुन कोणत्याही आय.सी.आय.सी.आय.बँकत शाखेतून धनादेश अथवा डी.डी जमा करता येतो, आणि जमा केलेला डि.डी. अथवा धनादेश यांच्या रक्कमा खातेदाराचे खात्यात आपोआप दुस-या दिवशी जमा होतात, अशी सुविधा आय.सी.
आय.सी.आय.बँक लि मार्फत देण्यात आल्या आहेत.
सामनेवाले नं. 1 ही आय.सी.आय.सी.आय.बँक लि यांची मुख्य शाखा असुन सामनेवाले नं.2 ही लातूर येथील शाखा आहे. तसेच सामनेवाले नं.3 ही पूणे येथील शाखा आहे. सामनेवाले नं.4 ही कोल्हापूर येथील तेज कुरिअरची मुख्य शाखा असुन संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळया ठिकाणी शाखा आहे. सामनेवाले नं.4 यांच्या अधिपत्याखाली त्यांच्या शाखा कार्यकरीत असतात.
सामनेवाले ही पुणे येथील बँक असून सदर बँकेची कागदपत्रे बाहेर गावी पाठवावी लागतात आणि एका शाखेतुन दुस-या शाखेकडे पाठवावी लागतात त्याबाबतचा करार सामनेवाले नं.4 यांचेशी झालेला आहे.
तक्रारदाराचा स्वत:चा व्यवसाय असल्यामुळै तक्रारदारांनी पुणे येथील ग्राहकास रक्कम रु.4,35,950/- चामाल पाठविला होता. या संदर्भात सदर ग्राहकाने रक्कम रु.4,35,950/- चा ता.21.1.2008 रोजीचा बॅंक ऑफ महाराष्ट्रचा चेक क्र.183897 दिला होता. तक्रारदारांनी सदरचा धनादेश सामनेवाले नं.3 यांचेकडे भरला. त्यानंतर सदरचा चेक पुणे येथील बँकेने क्लिअरिंगसाठी पाठविला. तक्रारदारांना त्यांचे खात्यावर सदरची रक्कम जमा झाली नसल्यामुळे त्यांनी वेळोवेळी सामनेवाले नं.1,2 व 3 यांचेकडे पत्रव्यवहार केला, व सदरची रक्कम तक्रारदारांचे खात्यात देण्यात यावी अशी विनंती केली. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांचे खात्यावर रक्कम जमा केली नाही, किंवा सदरचा धनादेश त्यांचे पक्षकारास परत केला नाही. यासंबधी तक्रारदारांनी बँकीग लोकपाल यांचेकडे लेखी तक्रार केलीअसता सामनेवाले नं.3 यांनी ता.31.5.2008 च्या पत्रानुसार सदरचा चेक ता.24.1.2008 रोजी ‘‘ अल्टरेशन ऑन ’’ चेक सामनेवाले नं.4 मार्फत तक्रारदाराचे पत्यावर पाठविण्यात आल्याबाबत कळविले. त्याचा कन्साईन्टमेंट क्र.8955172 असा असुन दिनांक 25.1.2008 रोजी सामनेवाले नं.3 मार्फत तक्रारदारांचे पत्यावर पाठवूनदेण्यात आले आहे असे लेखी कळविले. तक्रारदारांनी सामनेवाले नं.1,2 व 3 यांना वेळोवेळी सामनेवाले नं.4 मार्फत कोणताही धनादेश तक्रारदारांना मिळालेला नसल्याचे कळविले. त्याचप्रमाणे सामनेवाले नं.4 यांचेकडे सुध्दा वेळोवेळी फोनद्वारे चौकशीकरुन विचारणा केली. सदरचा धनादेश कोणास दिल्याबाबत माहिती मागविली असुन सामनेवाले नं.4 यांना आजपर्यन्त त्याची पोहच अथवा कोणतीही झेरॉक्स किंवा सत्यप्रत किंवा मुळप्रत तक्रारदारांना दिली नाही. या कारणास्तव तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 ते 4 यांना ता.4.7.2008 रोजी नोटीस पाठविली. परंतु सामनेवाले यांनी ता.17.7.2008 रोजी नोटीसचे उत्तर दिले की, तेज कुरिअर मार्फत 1 फेब्रुवारी,2008 रोजी तक्रारदारांचा पार्सल तक्रारदारांना पाठविण्यात आले आहे. तेजकुरिअर यांचे डिलीव्हरी रनसिटवरुन सदरचे कन्साईन्टमेंट तक्रारदारांस देण्यात आले आहे. तसेच एक प्रत अगोदरच तक्रारदारास देण्यात आले आहे. तक्रारदारांनी पाठविलेली नोटीस सामनेवाले नं.4 यांना मिळाल्यानंतर त्यांनी सदर नोटीस ता.1.2.2008 रोजी ग्यानबा धोंडीबा बन्सोडे यांना दिले असे कळविले. सदर नोटीस ग्यानबा धोंडीबा बन्सोडे हे तक्रारदारांचे दुकानात नौकरीस असल्या बाबत नमुदत केले आहे. परंतु प्रत्यक्ष ग्यानबा धोंडीबा बन्सोडे हे व्यक्ती तक्रारदारांचे दुकानात नौकरीस नाही अथवा नव्हती. यावरुन सामनेवाले नं.4 यांनी सदरची कन्साईन्टमेट दिलेली नाही असे दिसून येते. सामनेवाले नं.4 यांनी नोटीसच्या खुलाशासोबत सामनेवाले नं.2 यांनी ता.21.5.2008 रोजी ग्यानबा धोंडीबा बन्सोडे या नावाची स्टेटमेंट पाठवून दिली. सदर स्टेटमेंटमध्ये ‘‘ सदरचे पॉकेट त्यांनी घेतलेले असून ते तक्रारदारांकडे काम करतो असे सांगुन सदरचे कुरिअर पाकेट हे तक्रारदाराच्या अडतीवरील मुनिमास सांगुण त्याठिकाणी ठेवले ’’ असा जबाब असलेले कागद व त्याची पोहोचचे कागद पाठविले.
तक्रारदारांनी त्यांचे कागदावर नमुदकेलेले धनादेश ता.21.1.2008 रोजी भरले. आठ दिवसात रक्कम जमा न झाल्यामुळे तक्रारदारांनी त्यांचा चेक दिलेल्या ग्राहकास विनंती करुन त्वरीत दुसरा धनादेश देण्या बाबत विनंती केली. तेव्हा पुणे येथील ग्राहकाने तक्रारदारांना ता.29.1.2008 रोजी रु.100 चे स्टँपपेपरवर सदरचा धनादेश गहाळ झाला आहे व मिळाल्यास परत देण्यात येईल अशी हमीपत्र द्यावे लागले. त्यासाठी तक्रारदारांना पुणे येथे जावे लागले व पत्रव्यवहार करावा लागला. त्या प्रमाणे पुणे येथील ग्राहकाने तक्रारदारांना ता.29.1.2008 रोजी तेवढया रक्कमेचा दुसरा धनादेश तक्रारदारांचे खात्यात भरला, ता.1.2.2008 रोजी सदर चेकची रक्कम रु.4,35,950/- तक्रारदाराचे खात जमा झाली.
सामनेवाले नं.3 यांनी सामनेवाले नं.4 मार्फत पाठवून दिलेला धनादेश तक्रारदारांना ता.12.8.2008 रोजी मिळाला. सामनेवाले नं.3 यांचे चुकीमुळे तक्रारदारांना मानसिक त्रास झाला. तक्रारदारांनी यासंबंधी बॅंक ऑफ महाराष्ट्राकडे विचारणा केली असता सदरचा धनादेश त्यांचेकडे क्लिअरिंगसाठी आला नसल्याचे लेखी कळविले. त्यामुळे सदरचा धनादेश हा ‘‘अल्टरेशन ऑन चेक ’’ म्हणण्याचा अधिकार सामनेवाले नं.3 यांना नसताना जाणुनबुजून तक्रारदारांचा धनादेश सामनेवाले नं.4 मार्फत पाठवून दिला. तक्रारदारांनी सदरचा चेक मिळण्यास 21.1.2008 ते 31.1.2008 अशा 11 दिवसाचा विलंब झाला असल्यामुळे तक्रारदारांनी रक्कम रु.4,35,950/- एवढया रक्कमेवर 15 टक्के दाराने व्याजाची मागणी केली आहे. तसेच सामनेवाले बँकेने तक्रारदारांना धनादेश असलेले पार्सल वेळेत न देवून जवळपास 7 ते 8 महिन्याचा कालावधी लागला, तसेच सामनेवाले नं.4 मार्फत पाठविलेले कुरिअरने तक्रारदारांचे पॉकिट त्रयस्त व्यक्तीस दिले. अशा परिस्थितीत सामनेवाले यांनी तक्रारदारांना अकार्यक्षम सेवा देवून सेवेत त्रूटी व चुक केलेली आहे.
तरी तक्रारदारांची विनंती की, तक्रारदारांची तक्रार पूर्णत: मंजूर करण्यात यावी. सामनेवाले नं.1 ते 3 यांनी रु.4,35,950/- रक्कमेवर ता.21.1.2008 ते 1.2.2008 पर्यन्त 15 टक्के दाराने व्याज द्यावे. तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व नविन धनादेश घेण्यासाठीचा करावा लागलेला खर्च अधिक प्रवास खर्च रक्कम रु.700/- असे एकूण रु.10,700/- देण्यात यावा. तसेच तक्रारीचा खर्च रक्कम रु.5,000/- सामनेवाले नं.4 यांचेकडून वसुल करुन देण्यात यावा.
सदर प्रकरणात तक्रारदारांनी ता.4.9.2010 रोजी दिलेल्या अर्जानुसार सामनेवाले नं.1 यांना सदर प्रकरणातुन वगळण्यात येणे बाबतचा अर्ज मंजूर करण्यात आला असुन त्या प्रमाणे सामनेवाले नं.1 यांना वगळण्यात आले आहे. सामनेवाले नं.2 व 3 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त होवूनही सामनेवाले न्यायमंचात हजर नाहीत अथवा ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार मुदतीत खुलासा दाखल नाही, त्यामुळे सामनेवाले नं. 2 व 3 यांचे विरुध्द ता. 12.7.2010 रोजी एकतर्फा निर्णय न्यायमंचाने घेतला आहे. सामनेवाले नं.4 न्यायमंचात हजर झाले असुन ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार मुदतीत खुलासा दाखल न केल्यामुळे ता.8.10.2010 रोजी त्यांचे खुलाशाशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा निर्णय न्यायमंचाने घेतला.
न्याय निर्णयासाठी मुद्दे. उत्तरे.
1. सामनेवाले नं.2 ते 4 यांनी तक्रारदारांचा धनादेश सामनेवाले नं.2,3 करीता
क्र.183897 रक्कम रु.4,35,950/- ता.21.8.08 होय.सामनेवाले नं.4
रोजीचा बँक ऑफ महाराष्ट्रचा धनादेशाची रक्कम करीता नाही.
खात्यात भरण्यास विलंब करुन अकार्यक्षम सेवा
पुरवून तक्रारदरांना द्यावयाचे सेवेत कसुर केल्याची
बाब तक्रारदारांनी सिध्द केली आहे काय ?
2. तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. अंतिम आदेश काय ? निकालाप्रमाणे.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, शपथपत्र, पुराव्याचे शपथपत्र पूरसीस याचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकिल ए.के.जवळकर यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांना त्यांच्या ग्राहकाने दिलेला धनादेश क्र.183897 रक्कम रु.4,35,950/- ता.21.1.2008 रोजीचा बँक ऑफ महाराष्ट्रचा धनादेश ता.21.1.2008 रोजी सामनेवाले नं.3 बँकेकडे भरला. सामनेवाले नं.2 व 3 ही बँक ऑनलाईन बँक असल्यामुळे कोणत्याही आय.सी.आय.सी बँकेत डीडी/धनादेश जमा केलाअसता दुस-या दिवशी खातेदारांचे खात्यात रक्कम जमा होते अशी सुविधा सामनेवाले नं.2 बँकेमार्फत तक्रारदारांना देण्यात आली होती. परंतु तक्रारदारांना सामनेवाले नं.2 यांनी सदरची रक्कम त्यांचे खात्यावर जमा केली नसल्यामुळे सामनेवाले नं.2 व 3 बँकेशी पत्रव्यवहार करुन सदरची रक्कम त्याचे खात्यावर जमा करण्यास विनंती केली. सामनेवाले नं.2 व 3 यांनी तक्रारदाराचे खात्यावर रक्कम जमा केली नाही अथवा धनादेशही परत दिला नाही. अशा परिस्थितीत तक्रारदाराने बँकींग लोकपाल यांचेकडे लेखी तक्रार दिलीअसता सामनेवाले नं.3 यांनी ता.31.5.2008 च्या पत्रानुसार तक्रारदारांचा धनादेश अल्टरेशन ऑन चेक, सामनेवाले नं.4 मार्फत तक्रारदाराच्या पत्यावर पाठविण्यात आल्याचे कळविले. सदरचा धनादेश तक्रारदारांना मिळाला नसल्याचे सामनेवाले नं.2 ते 3 यांना वेळोवेळी कळविले. त्याचप्रमाणे सामनेवाले नं.4 यांचेकडे फोनद्वारे चौकशी केली परंतु तक्रारदारांना सदरचा धनादेश मिळाला नाही. शेवटी ता.4.6.2008 रोजी तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 ते 4 यांना लेखी नोटीस पाठविली. सामनेवाले नं.4 यांनी सदरची नोटीसीस उत्तरात ग्यानबा धोंडीबा बनसोडे यांचेकडे सदरचे कुरिअरचे पाकेट दिले बाबत खुलासा केला. त्याचप्रमाणे सदरचा व्यक्ती तक्रारदाराचे दुकानात नौकरीस असल्याबाबत कळविले, परंतु सदर नावाची कोणतीही व्यक्ती तक्रारदाराचे दुकानात नौकरीस नव्हती व नाही. तक्रारदारांनी सदर व्यक्तीचा शोध घेतलाअसता त्यांना ते पाकीट मिळाले. अशा प्रकारे सामनेवाले नं.2 ते 4 यांनी तक्रारदारांना अकार्यक्षम सेवा देवून सेवेत कसूरी केल्याबाबत तक्रारदारांची तक्रार आहे.
सदर प्रकरणात सामनेवाले नं.2 ते 3 हजर नाहीत अथवा त्यांचा खुलासा दाखल नाही. तसेच सामनेवाले नं.4 सदर प्रकरणात हजर असुन ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार मुदतीत खुलासा दाखल नाही. तक्रारदारांचा तक्रारीतील मजकुरास सामनेवाले यांचा तक्रारीस कोणत्याही प्रकारचे अहवान अथवा अक्षेप नाही. अशापरिस्थितीत तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेला मजकुर स्विकारल्या पलिकडे न्यायमंचा समोर दुसरा पर्याय नाही. अशा परिस्थितीत तक्रारदारांचा तक्रारीत नमुद केलेला मजकुर ग्राह धरणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदारांना सदर चेकसंदर्भात सामनेवाले नं.2 व 3 यांना कोणतीही माहिती कळविली नसल्यामुळे तक्रारदारांने ता.4.7.2008 रोजी कायदेशीर नोटीस देणे भाग पडले. त्यानंतरही सामनेवाले नं.2 व 3 बँकने तक्रारदारांना यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नाही; अशा परिस्थितीत तक्रारदारांना बँकींग लोकपाल यांचेकडे तक्रार दाखल करणे भागपडले आहे. तक्रारदारांनी ता.13.8.2008 रोजी या संदर्भात बँकीग लोकपाल यांचेकडे तक्रार केल्यानंतर सामनेवाले नं.2 यांनी ता.17.7.2006 रोजीचे पत्रानुसार तक्रारदारांनी त्यांचा चेक तेजकुरिअर मार्फत पाठविण्यात आल्याबाबत माहिती दिल्याचे दिसून येते. त्याच प्रमाणे तक्रारदारांनी माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत सदर चेक संदर्भात बँक ऑफ महाराष्ट्र, पूणे यांचेकडे अर्ज दिलीअसता तक्रारदारांचा वर नमुद केलेला चेक ता.21.1.2008 ते 23.1.2008 तसेच दिनांक 10.7.2008 पर्यन्त क्लेरिंगद्वारे त्यांचे शाखेत आला नसल्याचे बँक ऑफ महाराष्ट्र पूणे यांनी नि.20 वर असलेल्या ता.10.6.2008 चे पत्रानुसार दिसून येते. वरील परिस्थितीचा विचार केला असता सामनेवाले नं.2 व 3 यांनी तक्रारदारांचा चेक मुदतीत क्लिरिंगसाठी पाठविण्यात आलानसल्याचे स्पष्ट होते. सामनेवाले नं.2 व 3 यांनी तक्रारदारांना ऑनलाईन बँकेची सेवा दिली असल्यामुळे धनादेश जमा केलेल्या दुस-या दिवशी तक्रारदारांचे खात्यात रक्कम जमा होणे आवश्यक होते. परंतु सामनेवाले नं.3 यांनी तक्रारदारांचे सामनेवाले नं.2 यांचेकडे असलेल्या खात्यात सदरची रक्कम नमुद केल्याप्रमाणे जमा केली नाही. सामनेवाले नं.3 यांची सदरची कृती सेवेत कसूरीची असल्याचे स्पष्ट होते. सामनेवाले नं.3 यांनी सेवेत कसुरीची बाब स्पष्ट झाल्यामुळे तक्रारदारांनी तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे ता.21.1.2008 ते 1.2.2008 (11 दिवस ) या कालावधीचे रक्कम रु.4,35,950/- रक्कमेवर 9 टक्के व्याजदेणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
सदर प्रकरणात तक्रारदारांना सामनेवाले नं.2 व 3 यांचेशी वेळोवेळी पत्रव्यवहार करणे भाग पडले, तसेच बँकींग लोकपाल यांचेकडेही तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. तसेच मुदतीत रक्कम खात्यावर जमा न झाल्यामुळे तक्रारदारांनी त्यांचे ग्राहकास विनंती केल्याप्रमाणे त्यांना दुसरा चेक देण्यास तयारी दाखवली असल्यामुळे दुसरा चेक घेण्यासाठी रक्कम रु.100/- चे बॉन्डपेपरवर सदरचा चेक गहाळ झाल्याबाबत तसेच पहिला चेक परत मिळाल्यास त्यांचेकडे परत देण्याबाबत हमीपत्र देणे भाग पडले. तसेच परत सदर कामाकरीता त्यांना पूणे येथे जाणे-येणेचा खर्च सोसावा लागता, अशा प्रकारे तक्रारदारांची कोणतीही चुक नसताना त्यांना शारिरीक व मानसिक त्रास सोसावा लागला आहे. त्याचप्रमाणे सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. त्यामुळे तक्रारदारांनी तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे मानसिक त्रासाची रक्कम रु.10,000/- तसेच तक्रारीचा खर्च रक्कम रु.5,000/- आणि धनादेश घेण्यासाठी करावा लागलेला खर्च व प्रवास खर्च रक्कम रु.700/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाले नं.4 यांना तक्रारदारांनी ता.4.7.2008 रोजी नोटीस पाठविल्यानंतर तक्रारदारांना त्यासंदर्भात माहिती कळविण्यात आल्याची तक्रारीत आलेल्या पुराव्यावरुन दिसून येते. तक्रारदारांनी सामनेवाले न.4 यांनी दिलेल्या माहितीनुसार शोध घेतल्यानंतर तक्रारदारांना सदरचा चेक मिळाला असल्याबाबत तक्रारदारांनी तक्रारीत दिलेल्या मजकुरानुसार दिसून येते. तक्रारीत आलेल्या पुराव्यानुसार सामनेवाले नं.4 कुरिअर सर्व्हिसेस यांनी तक्रारदारांना सेवा देण्यास कोणत्याही प्रकारची कसूरी केल्याची बाब स्पष्ट होत नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले नं.2 ते 3 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना रु.4,35,950/- या रक्कमेवर ता.21.1.2008 ते 1.2.2008 (11 दिवस) या कालावधीचे द.सा.द.शे. 9 टक्के व्याज आदेश मिळाल्यापासुन एक महिन्याचे आत अदा करावे.
3. सामनेवाले नं.2 ते 3 यांना आदेश देण्यात येते की, आदेश क्र.2 मधील व्याजाची रक्कम विहित मुदतीत अदा न केल्यास सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारख 17.12.2009 पासुन 9 टक्के व्याज देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
4. सामनेवाले नं.2 ते 3 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मानसिक, शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-( अक्षरी रुपये दहा हजार फक्त ) आदेश मिळाल्याचे तारेखपासुन एक महिन्याचे आत अदा करावी.
5. सामनेवाले नं.2 ते 3 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना तक्रारीचा खर्चाची रक्कम रु.5,000/-( अक्षरी रुपये पाच हजार फक्त ) आदेश मिळाल्याचे तारेखपासुन एक महिन्याचे आत अदा करावी.
6. सामनेवाले नं.2 ते 3 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना पूणे येथे येणे-जाणेचा खर्चापोटी रक्कम रु.700/-( अक्षरी रुपये सातशे फक्त ) आदेश मिळाल्याचे तारेखपासुन एक महिन्याचे आत अदा करावी.
7. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांला परत करावेत.
(सौ.एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड