जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 79/2010 तक्रार दाखल तारीख- 29/08/2010
निकाल तारीख - 05/04/2011
---------------------------------------------------------------------------------------
जालींदर पि. नानाभाऊ बडे,
वय- 40 वर्षे, व्यवसाय – शेती,
रा.दुकडेगांव, ता.वडवणी, जि.बीड ....... तक्रारदार
विरुध्द
1. मा. व्यवस्थापक,,
हरितक्रांती कृषी ट्रेडर्स,
नगर रोड, बीड
2. शाखा व्यवस्थापक,
आय.सी.आय.सी.बँक लि,
पहिला मजला, हॉटेल व्यंकटेश्वर, औसा रोड,
लातूर, ता.जि.लातूर ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
सौ. एम.एस.विश्वरुपे, सदस्या
तक्रारदारातर्फे – वकील – ए.व्ही.कुलकर्णी,
सामनेवाले 1 तर्फे – वकील – ए.बी.लांडगे,
सामनेवाले 2 तर्फे – वकील – आर.बी.धांडे,
।। निकालपत्र ।।
( निकाल घोषितद्वारा सौ.एम.एस.विश्वरुपे – सदस्या )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 यांचेकडून स्वराज्य 744 ट्रॅक्टर ट्रॉलीसह रक्कम रु.4,81,000/- किमतीचा विकत घेतला. सदर ट्रॅक्टर घेण्यासाठी सामनेवाले नं.2 यांचेकडून रक्कम रु.3,82,500/- कर्ज घेतले. तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 यांना रोख रक्कम रु.1,19,500/- दिले व उर्वरीत रक्कम सामनेवाले नं.2 यांनी सामनेवाले नं.1 यांना दिली. अशा प्रकारे सामनेवाले नं.1 यांना सदरील ट्रॅक्टरची रक्कम रु.5,02,000/- मिळाले. सदरचा ट्रॅक्टरची किमत सामनेवाले नं.1 यांनी रु.5,21,000/- असल्याचे सांगीतले होते. परंतु त्यावर रु. 40,000/- डिस्काउंट आहे असे सांगीतले होते. सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांकडून रक्कम रु.21,000/- एवढी जास्तीची रक्कम घेतली. सदर रक्कमे बाबत चौकशी केली असता सामनेवाले नं.1 यांनी सदर रक्कम ट्रॉलीसाठी घेतली असल्याचे सांगीतले. सामनेवाले नं.1 यांनी ट्रॅक्टर सोबत ट्रॉली दिली नाही. तक्रारदारांनी ता.23.7.2007 रोजी ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर आरटीओ कार्यालयात नोंदणी केल्यानंतर रजिस्टर क्रमांक एम.एच.23 बी-6656 असा मिळाला आहे.
तक्रारदारांनी सामनेवाले नं.2 यांचेकडून रक्कम रु.3,82,500/- रक्कमेचे कर्ज घेतले. सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदारांचा पहिला हाप्ता रु.29,000/- व त्यानंतर प्रतिमहा रु.58,400/- प्रमाणे 10 हाप्त्यामध्ये परत फेड करण्याचे ठरले.
तक्रारदारांनी सदर ट्रॅक्टरचा प्रत्यक्ष शेतीमध्ये वापर केला असता सदरचा ट्रॅक्टर लोड ओढत नाही. त्याचे टायर जाग्यावर फिरते, ते जाग्यावर खड्डा करते, तसेच सदर ट्रॅक्टरला जास्त प्रमाणात ऑईल लागते व जास्त डिझल लागते. त्याचप्रमाणे सदर ट्रॅक्टरचे स्टेरिंगमध्ये देखील दोष असल्याचे तक्रारदारांचे लक्षात आले होते. अशा प्रकारे तक्रारदारांना नादुरुस्त ट्रॅक्टर देवून तसेच फसवनूक झाली. या संदर्भात तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 यांना तोंडी व लेखी कळविले. त्यानुसार सामनेवाले नं.1 यांची प्रतिनिधी येवून सदरच्या ट्रॅक्टरची पाहणी केली. सदर ट्रॅक्टरची बीड येथील पवार यांचे शेतात व पिंपळगव्हाण येथे देखील ट्रायल घेतली. त्यावेळी प्रतिनिधीच्या लक्षात आले की, सदरचा ट्रॅक्टर शेत नांगरत नाही, जागेवर स्लिप मारते त्यामुळे ट्रॅक्टर बदलून देवू असे आश्वासन दिले. सामनेवाले नं.1 यांचे सागण्यावरुन तक्रारदारांनी सदरचा ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी त्याचेकडे जमा केला. सदरचा ट्रॅक्टर सामनेवाले नं.1 यांनी दुरुस्त झाल्याचे कळविल्या नंतर ता.31.12.2007 रोजी दुरुस्त ट्रॅक्टर परत अणुन काम करण्यासाठी सुरुवात केली असता ते नादुरुस्त असल्याचे तक्रारदारांचे लक्षात आले. त्यावेळी तक्रारदारांनी स्वखर्चाने ट्रॅक्टरची दुरुस्ती करण्यासाठी नॅशनल डिजेल वर्क्स, जालना रोड, बीड येथे दाखविले. तेव्हा दुरुस्तीसाठी रक्कम रु.10,000/- खर्च करावा लागला. तसेच ट्रॅक्टरचे स्लिप मारणारे टायर बदलण्यासाठी रक्कम रु.10,000/- खर्च आला. तक्रारदारांना ना दुरुस्त ट्रॅक्टर सामनेवाले यांनी दिल्याने तसेच शेतीतील काम करता आले नाही. शेतीतील काम मजूराकडून करुन घ्यावे लागले. त्यामुळे तक्रारदाराचे आर्थीक नुकसान झाले. तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 यांना ता.22.12.2007 रोजी व 29.07.2007 रोजी लेखी नोटीस दिली. परंतु सामनेवाले यांनी सदर नोटीस स्विकारण्याचे टाळले. दिनांक 5.2.2008, 21.07.2008 व 23.1.2010 रोजी नोंदणीकृत डाकेने नोटीस दिली. परंतु सामनेवाले नं.1 यांनी नोटीस देखील घेतली नाही. सामनेवाले नं.2 यांनी कर्ज परत फेडीसाठी तगादा लावलेला आहे. सामनेवाले नं.1 यांचे कृतीमुळे तक्रारदारांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे.
तरी विनंती की,
अ. नॅशनल डिझेल वर्कशॉप,बीड यांचेकडे आलेला
दुरुस्ती खर्च. :- रु. 10,000/-
ब. ट्रॅक्टरचे टायर बदलण्यासाठी आलेला खर्च :- रु. 10,000/-
क. ट्रॅक्टर नादुरुस्त असल्यामुळे शेतीत काम
करण्यास मजुरांचा खर्च :- रु. 25,000/-
ड. मानसिक त्रासाबद्दल :- रु. 25,000/-
इ. सदरचा दावा दाखल करेपर्यन्त झालेला खर्च :- रु. 10,000/-
-------------------------------
एकुण :- रु. 80,000/-
--------------------------------
एकुण रक्कम रु.80,000/- द.सा.द.शे. 12 टक्के व्यासाह सामनेवाले यांचेकडून वसुल होवून मिळावेत.
सदर प्रकरणात सामनेवाले नं.1 हजर झाले असून त्यांनी त्यांचा खुलासा न्यायमंचात ता.14.1.2011 रोजी दाखल केला आहे. सामनेवाले नं.1 यांचा खुलासा थोडक्यात असा की, सामनेवाले नं.1 यांना तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेला कांही मजकुर मान्य नसून उर्वरीत मजकुर मान्य आहे. तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 यांचेकडून सदर ट्रॅक्टर घेताना रक्कम रु.58,400/- जमा केली आहे. त्याचप्रमाणे सामनेवाले नं.2 यांचेकडून रु.3,73,500/- एवढी रक्कम सामनेवाले नं.2 बँकेकडून स्वीकारली आहे. अशा प्रकारे रक्कम रु.86,000/- तक्रारदारांकडे सदर ट्रॅक्टरची थक बाकी आहे. सदरची रक्कम सामनेवाले यांनी वेळवेळी मागणी करुनही तक्रारदाराने दिली नाही. स्वराज ट्रॅक्टर ही नामांकीत कंपनी असुन सदरचे ट्रॅक्टर घेताना कमीतकमी एक महिना आदी नोंद केल्यानंतर मिळते. त्याच प्रमाणे सदरची ट्रॅक्टर इतर कंपनीच्या ट्रॅक्टरपेक्षा जास्त चांगले काम देते. तक्रारदारांनी सदर ट्रॅक्टर मार्गदर्शक तत्वानुसार वापलेले नाही. त्यामुळे तक्रारदारांचे ट्रॅक्टर दुरुस्तीस सामनेवाले नं.1 जबाबदार नाहीत. सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांना ता.23.12.2009 च्या पत्रानुसार तज्ञ अभियंत्याची ता.2.1.2010 रोजी सामनेवाले नं.1 यांचे शोरूमध्ये व्हिजीट असल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे तक्रारदारांने सदरचे ट्रॅक्टर सामनेवाले नं.1 यांचे शोरुमध्ये तपासणी करीता आणणेस सांगीतले. त्याप्रमाणे सदर ट्रॅक्टरमध्ये जे दोष असतील ते काढले जातील असे सांगीतले. परंतु तक्रारदारानी सदरचे ट्रॅक्टर तपासणी करीता आणले नाही. तरी तक्रारदारांची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी.
सदर प्रकरणात सामनेवाले नं.2 हजर झाले असून त्यांनी त्यांचा खुलासा न्यायमंचात ता.1.12.2010 रोजी दाखल केला आहे. सामनेवाले नं.2 यांचा खुलासा थोडक्यात असा की, तक्रारदार सामनेवाले नं.2 यांचे थकबाकीदार आहेत. तक्रारदाराची तक्रार सामनेवाले नं.1 यांचेविरुध्द नादुरुस्त ट्रॅक्टर दिल्याची आहे. सामनेवाले नं.2 यांचा कोणताही संबंध नाही. तक्रारदारांना सदर ट्रॅक्टर करीता सामनेवाले नं.2 यांचे लातूर शाखेकडून कर्ज मंजूर करुन अदा करण्यात आले आहे. त्यामुळे सदरची तक्रार न्यायमंचाचे अधिकार क्षेत्रात येत नाही. तक्रारदारांनी सदरचे ट्रॅक्टर व्यवसायाकरीता घेतलेले असत्यामुळे तक्रार हे सामनेवाले नं.2 यांचे ग्राहक होत नाहीत. तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडून रक्कम रु.3,82,500/- एवढया रक्कमेचे कर्ज ता.31.8.2007 रोजी घेतले असून पहिला हाप्ता रु.29,148/- एवढा असुन उर्वरीत हाप्ते हापइअरली सहामाही रु.60,500/- एवढया रक्कमेचे आहे. तक्रारदाराना सदर कर्ज 60 महिन्यामध्ये परत फेट करण्याचे ठरले आहे. तक्रारदार सामनेवाले यांचेकडून घेतलेल्या कर्जाचे थकबाकीदार आहेत. सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदारांचे कर्ज खाते मॅगमा फायनान्स यांचेकडे हस्तांतरीत केले आहे. अशा परिस्थितीत सामनेवाले यांचे तक्रारदाराचे कर्ज खात्याशी कोणताही संबंध राहिलेला नाही. तक्रारदारांची तक्रार रद्द करण्यात यावी.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, शपथपत्र, पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तीवाद, अतिरिक्त पुराव्याचे शपथपत्र, सामनेवाले नं.1 यांचा खुलासा, शपथपत्र, सामनेवाले नं;2 यांचा खुलासा व शपथपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदाराचे विद्वान वकिल ए.व्ही.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 यांचेकडून ट्रॅक्टर स्वराज 744 ता.2.7.2007 रोजी सामनेवाले नं.2 यांचेकडून कर्जाची रक्कम घेवून खरेदी केले. तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे ता.29.12.2007 रोजीचे पत्रानुसार ट्रॅक्टर नादुरुस्त झाल्या बाबत तक्रारी अर्ज दिल्याचे दिसून येते. सामनेवाले नं.1 याचे खुलाशानुसार तक्रारदाराचा ट्रॅक्टर दुरुस्त करुन दिलेला असुन तक्रारदारांनी मार्गदर्शक तत्वाप्रमाणे ट्रॅक्टरची हाताळणी केली नाही. त्यामुळे ट्रॅक्टर ना दुरुस्त होण्यास तक्रारदार जबाबदार आहे.
तक्रारीत आलेल्या पुराव्यानुसार तक्रारदारांनी ता.15.6.2008 रोजी रक्कम रु.10,000/- ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी तसेच ता.2.11.2008 रोजी रक्कम रु.10,000/- खर्च केल्याचे दिसून येते. सदर बिलावरुन तक्रारदारांनी ट्रॅक्टर दुरुस्ती करीता खर्च केल्याचे दिसून येते. परंतु तक्रारदारांनी तक्रारीत सदरचे ट्रॅक्टर सामनेवाले नं.1 यांचेकडे दुरुस्तीसाठी दिल्याचे त्यामध्ये कोणत्या प्रकारची दुरुस्ती करण्यात आली तसेच कोणत्या प्रकारची दुरुस्ती झाली नाही याबाबत खुलासा केलेला नाही. त्यामुळे सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदाराचे ट्रॅक्टरची दुरुस्ती न केल्यामुळे तक्ररदाराना सदरचा खर्च करावा लागला ही बाब स्पष्ट होत नाही. तक्रारदाराचे ट्रॅक्टर सामनेवाले यांचेकडून पूर्णपणे दुरुस्त झाले नसल्याचे तक्रारदारानी सदरचे ट्रॅक्टर सामनेवाले नं.1 यांचेकडेच पुन्हा दुरुस्ती करीता देणे आवश्यक होते, परंतु तक्रारदारांनी इतके दिवस दुरुस्तीकरीता ट्रॅक्टर दिल्यामुळे सदरचा ट्रॅक्टरची हाताळणी तज्ञ माणसाकडून न झाल्यामुळे सदरचे ट्रॅक्टर नादुरुस्त झाले असल्याचे सामनेवाले नं.1 यांचे म्हणने ग्राहय धरणे उचित होईल. तक्रारदारांनी सदरचे ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी सामनेवाले नं.1 यांचेकडेच देणे त्याचेंवर बंधनकारक होते. सामनेवाले नं.1 यांची ता.23.12.2009 रोजीचे पत्रानुसार तक्रारदाराचा ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी तज्ञ इंजिनिअरच्या तपासणीसाठी मागविण्यात आल्याचे दिसून येते. परंतु तक्रारदारांचे ता. 13.1.2010 चेक सदर पत्रात दिलेल्या उत्तरावरुन तक्रारदारानी सदरचे ट्रॅक्टर तपासणीसाठी सामनेवाले नं.1 यांचेकडे दिले नसल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी सदरचे ट्रॅक्टर सामनेवाले नं.1 यांचेकडे तज्ञ सर्व्हिस इंजिनिअरकडे तपासणीसाठी दिले असते तर ट्रॅक्टरमध्ये कोणत्या प्रकारची दुरुस्ती करणे आवश्यक होते या बाबत खुलासा झाला असता. परंतु तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 यांचेकडे दुरुस्तीसाठी झालेला खर्च रु.50,000/- रक्कमेची मागणी केल्याचे दिसून येते. सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदाराचा ट्रॅक्टर दुरुस्त करुन दिलेला आहे. त्याच प्रमाणे त्यानंतरही सामनेवाले नं.1 हे तक्रारदाराचे ट्रॅक्टरची तज्ञ इंजिनिअर मार्फत तपासणी करुन आवश्यक ती दुरुस्ती करण्यास तयार आहेत, हे त्यांचे ता.23.12.2009 च्या पत्रावरुन स्पष्ट होते. तक्रारदारानी सदरचा ट्रॅक्टर सामनेवाले नं.1 यांचेकडे दुरुस्तीसाठी न देता इतर ठिकाणी दुरुस्त करुन सदरचा खर्च सामनेवाले नं.1 यांचेकडे मागणी केल्याचे तक्रारीत आलेल्या पुराव्यावरुन दिसून येते. तक्रारदारांनी सदरचे ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी सामनेवाले नं.1 यांचेकडे देणे आवश्यक होते. अशा परिस्थितीत सामनेवाले नं.1 यांची कोणत्याही प्रकारची सेवेत कसूरी असल्याचे दिसून येत नाही. सेवेत कसूरीची बाब स्पष्ट न झाल्यामुळे तक्रारदारांनी तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे दुरुस्तीचा खर्च तसेच मानसिक त्रासाची व तक्रारीचा खर्चाची रक्कम देणे उचित होणार नाही. तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे ट्रॅक्टर कोणत्या काळात नादुरुस्त होता तसेच ट्रॅक्टर नादुरुस्त असल्यामुळे शेतीत काम करण्याकरीता मजूरीचा झालेल्या खर्चाबाबत कोणत्याही प्रकारचा खुलासा दिला नसल्यामुळे तक्रारदारांना सदरची रक्कम रु.25,000/- देणे उचित होणार नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी सदर ट्रॅक्टर खरेदीसाठी सामनेवाले नं.2 यांचेकडून कर्ज घेतले आहे. तक्रारदार सामनेवाले नं.2 यांचा थकबाकीदार आहे. तक्रारदार सामनेवाले नं.2 यांचे कर्जाचे थकबाकीदार झाल्यामुळे तक्रारदाराचे ट्रॅक्टर ता.12.6.2010 रोजी सामनेवाले नं.2 याचे ताब्यात दिला आहे. त्यामुळे तक्रारदाराने तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे सामनेवाले नं.2 यांचेकडे कर्जाची वसूली थाबंविण्याबाबतची मागणी मान्य करता येणार नाही.
सबब, न्यायमंच खालील आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदारांची तक्रार रद्द करण्यात येते.
2. सामनेवाले खर्चाबाबत आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे
तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांला परत करावेत.
( सौ.एम.एस.विश्वरुपे ) ( पी. बी. भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि. बीड