जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –144/2010 तक्रार दाखल तारीख –04/09/2010
खुलासा दाखल ता- 30/11/2010
निकाल तारीख – 06/04/2011
-------------------------------------------------------------
नंदकिशोर पि. प्रभाकर शेटे,
वय- 45 वर्षे, धंदा- व्यापार,
रा. पोस्टमन कॉलनी रोड,
शाहूनगर, बीड ता. जि. बीड. ... तक्रारदार
विरुध्द
1. व्यवस्थापक,
भारतीय जीवन विमा निगम,
नगररोड, बीड ता. जि. बीड.
2. विभागीय व्यवस्थापक,
भारतीय जीवन विमा निगम,
विभागीय कार्यालय, औरंगाबाद
ता. जि. औरंगाबाद. ... सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
सौ. एम. एस. विश्वरुपे, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- वकील -अँड. एस. आर. राजपूत.
सामनेवालेतर्फे :- वकील –अँड. ए.पी.कुलकर्णी.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हे प्रतिष्टीत व्यापारी असून त्यांचा व्यवसाय हा किराणा माल विक्रीचा असून त्यांचे दुकान शाहू नगर, पांगरी रोड, बीड येथे आहे. सामनेवालेकडून तक्रारदाराने स्वत:च्या जिवनावरील विमा पत्र क्रं. 980303060 चे घेतलेले आहे. सदर विम्याची मुदत तारीख 28/02/2010 रोजी संपलेली आहे.
तक्रारदाराच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्यांनी विमापत्र घेतल्यानंतर 3 वर्षे रक्कम सामनेवालेकडे वेळोवेळी जमा केलेली आहे. नंतर विमा हप्ते हे आर्थिक परिस्थिती व व्यापारामधील नुकसानीमुळे भरण्यात आलेली नाहीत.
तारीख 20/02/2010 रोजी सामनेवाले कंपनीने तक्रारदारांना वरील विमा पत्रा संदर्भात पत्र पाठवले. त्यानुसार कागदपत्रांची पूर्तता करण्याकामी निर्देश दिले असून त्यांची पूर्तताही तक्रारदाराने केलेली असल्याने तारीख 28/2/2010 रोजी सामनेवाले नं. 1 यांनी तक्रारदारांना पत्र पाठवले व त्यास सामनेवालेकडून देय रक्कम विवरणासहीत एकूण रु. 35,000/- दर्शविलेली आहे.
तक्रारदाराने वेळोवेळी रक्कमेची मागणी केली असता प्रकरण सामनेवाले नं. 2 कडे मंजूरीसाठी पाठवल्याचे कळविले. तारीख 24/5/2010 रोजी रक्कम लवकर मिळत नसल्याबाबत तक्रार अर्ज सामनेवालेकडे दिला परंतू सामनेवालेने रक्कम दिली नाही.
विनंती की, सामनेवालेकडून येणे रक्कम रु. 35,000/- तक्रारदारांना देण्याबाबत आदेश व्हावा. तक्रार खर्च, मानसिक त्रास, शारिरीक त्रासाबाबत खर्च देण्याबाबत आदेश व्हावा.
सामनेवालेंनी त्यांचा खुलासा तारीख 30/11/2010 रोजी दाखल केला. तक्रारीतील त्यांच्या विरुध्दचे सर्व आक्षेप सामनेवालेंनी नाकारलेले आहेत. तक्रारीत नमूद केलेल्या विमा पत्राची रक्कम रु. 1,00,000/-चे सहामाही हप्ते रु. 2,567.60 पैशाचे तारीख 28/02/1990 रोजी तक्रारदाराने विमापत्र घेतले होते. तक्रारदाराने शेवटचा हप्ता ऑगष्ट-1992 मध्ये चेकने दिला आहे आणि सदरचा चेक वटला नाही. त्याबाबत तक्रारदारांना तारीख 18/09/1992 रोजी विमा कंपनीने सुचना दिलेली आहे. सुचनेनुसार तक्रारदाराने सदरचा हप्ता न भरल्याने सदरचे विमापत्र हे बंद परिस्थितीत गेले. तक्रारदाराने 3 वर्षाचे वार्षिक हप्ते भरलेले नाहीत. त्यामुळे तक्रारदारांना कोणतीही रक्कम देय होत नाही. सन1997 मध्ये विमा कार्यालयात संगणक प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली. त्यात सदर विमापत्राची संगणकात ऑगष्ट-92 मध्ये कोणतीही नोंद नाही, त्यामुळे सामनेवाले विमा कंपनीकडून तारीख 28/02/2010 रोजी चुकून पत्र पाठवले गेले. वास्तवात तक्रारदारांना कोणतीही रक्कम देय होत नाही. यात सामनेवालेने तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत कोणताही कसूर केलेला नाही. तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी. सामनेवालेंना खर्च रक्कम रु. 10,000/- तक्रारदाराकडून देण्याबाबत आदेश व्हावा.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवालेचा खुलासा, दाखल कागदपत्रे, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदाराचे विद्वान अँड. एस.आर. राजपूत व सामनेवालेचे विद्वान अँड. ए.पी.कुलकर्णी यांचा युक्तिवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदाराने सामनेवालेकडून रक्कम रु. 1,00,000/- चे विमापत्र सहामाही हप्ता रु. 2,567.60 पैसे चे ता. 28/2/2010 रोजी मुदत पूर्ण होणारे घेतलेले आहे. ही बाब सामनेवालेंना मान्य आहे. तक्रारदाराने तक्रारीत नमूद केलेले आहे की, 3 वर्षापर्यंत हप्त्याची रक्कम सामनेवालेकडे वेळोवेळी जमा केलेली आहे.
यासंदर्भात सामनेवालेंनी त्यांच्या खुलाशात स्पष्टपणे नमूद केले आहे की, ऑगस्ट-1992 चा सहामाही हप्ता तक्रारदाराने चेकद्वारे भरलेला होता परंतू सदरचा चेक वटला नाही म्हणून सामनेवालेने तक्रारदारांना तारीख 18/9/1992 रोजी पत्राद्वारे सुचना दिलली आहे व त्यानंतरही तक्रारदाराने सदरची रक्कम भरणा न केल्याचे सदरचे विमापत्र हे बंद अवस्थेत गेले आहे.
तक्रारदाराने सामनेवालेचे सदरचे विधान त्यांच्या शपथपत्रात नाकारलेले नाही व ऑगस्ट-1992 च्या हप्त्याचा भरणा तक्रारदाराने केला असल्याबाबतचा तक्रारदाराकडून कोणताही पुरावा दाखल नाही.
विमापत्राच्या अटी व शर्तीनुसार वार्षिक 3 हप्ते तक्रारदाराने सामनेवालेकडे जमा करणे आवश्यक होते परंतू सदर प्रकरणात तारीख 28/2/1990 रोजी विमापत्र घेतल्यानंतर ऑगस्ट-1992 चा 6 वा हप्ता तक्रारदाराने सामनेवालेकडे जमा न केलेला असल्यामुळे तक्रारदाराचे विमापत्र बंद झालेले असल्याने तक्रारदारांना कोणतीही रक्कम देय होत नाही.
यासंदर्भात विमा कंपनीकडून संगणकात ऑगष्ट-92 च्या हप्त्याची नोंद न झाल्यामुळे तक्रारदारांना चुकीने विमापत्राची मुदतीनंतर देय होणारी रक्कम देण्याबाबत पत्र देण्यात आलेले आहे, परंतू ती चुक आहे. याचा गैरफायदा तक्रारदार घेवू पाहत आहे.
सदरच्या चुकीबाबत विचार करता सामनेवालेंच्या चुकीचा फायदा तक्रारदारांना होवू शकलो काय ? नाही. कारण विमापत्रातील अटी व शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी तक्रारदार व सामनेवालेची आहे. 3 वार्षिक हप्ते तक्रारदाराने सामनेवालेकडे जमा करणे आवश्यक होते परंतू वर नमूद केल्याप्रमाणे 6 वा सहामाही हप्ता तक्रारदाराने भरलेला नाही, त्यामुळे तक्रारदारांना सदर चुकीचा फायदा मिळू शकत नाही व सदरची बाब ही तक्रारदाराने तक्रारीत उघड केलेली नाही, त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट न झाल्याने तक्रारदारांना तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे कोणतीही रक्कम देणे उचित होणार नाही, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार रदृ करण्यात येत आहे.
2. सामनेवालेंच्या खर्चाबाबत आदेश नाही्.
(सौ.एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट )
सदस्या, अध्यक्ष,
चुनडे/- स्टेनो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड