तक्रारदारातर्फे :- वकील- एस. एस.महाजन.
सामनेवाले नं. 1,2 तर्फे :- वकील- एस. आर. कुडके.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हे सधन शेतकरी असून मौजे आहेर चिंचोली, ता. जि. बीड येथे त्यांची शेतजमीन आहे. सदर शेतजमीन ही बागायती असून दरवर्षी तक्रारदार हे सदर शेतजमीनीतून विविध पिके घेऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत असतात.
तक्रारदार हे तारीख 31/05/2009 रोजी बि-बियाणे खरेदी करण्यासाठी सामनेवाले नं. 2 यांचेकडे गेले असता पावती क्र. 4529 अंतर्गत आरसीएच-2 बीटी रासी टी.एफ.लॉट नं. 342366 पिशवी संख्या 10 भाव प्रति बॅग (पिशवी) रु. 650/- व त्याच पावती अंतर्गत मल्लिका निजीउडू सिडस् देखील खरेदी केले होते.
तक्रारदाराने वरील शेतजमीनीत 5 एकर रासी बियाणाची पेरणी केली. सदर कापसाचे पिक जोमाने वाढले. चांगले उत्पन्न व्हावे म्हणून चांगल्या प्रतीचे खत वापरले. पिकावर रोग पडू नये म्हणून वेळोवेळी किटकनाशकाची फवारणी केली. परंतू सदर राशी बियाणे हे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे व पिकाची वाढ खुंटल्यामुळे तक्रारदाराचा विनाकारण वाढीव खर्च झाला. सदर पीक वाढत नाही. तेव्हा तक्रारदार हे वेळोवेळी सामनेवाले 2 कडे गेले व त्यांचे सांगण्याप्रमाणे सदर पिकास पाणी देण्याचे सल्ल्यामुळे तक्रारदाराने स्प्रिंकल सेट रक्कम रु.20,000/- चा खरेदी केला. तो सेट सबसिडीचा असल्याने रु. 13,000/- मध्ये खरेदी केला. व सामनेवाले 2 यांनी सांगितल्याप्रमाणे कपासीपिकास पाणी दिले, परंतू तरी देखील सदर कापूस पिकाची वाढ झाली नाही. मुळात सदर बियाणे हे बोगस दिलेले असल्यामुळे वाढ झालेली नाही.
तारीख 19/10/2009 पर्यंत वाट पाहून देखील पिकाची वाढ होत नाही, हे जेव्हां तक्रारदाराचे निदर्शनास आले तेव्हा दि. 20/10/2009 रोजी तक्रारदाराने मा. गट विकास अधिकारी, पंचायत समिती, बीड अंतर्गत वरील बियाणे निकृष्ट दर्जाचे मिळाल्याबाबत सामनेवाले विरुध्द तक्रारदाराचे शेतीतील पिकाचे नुकसानीची मागणी करुन झालेले आर्थिक नुकसानीबाबत निकाल देण्यात यावा, असा अर्ज दिला. त्याची एक प्रत कृषि अधिकारी, जि. प. बीड यांना देखील दिली.
सदर अर्ज दिल्यानंतर तक्रारदारास जि. प. बीड (कृषि विभाग) जा. क्र. जिपबी/कृषी/बि.तक्रार/3271/09/बीड दिनांक 08/12/2009 अन्वये लेखी स्वरुपात कळविण्यात आले की, तक्रारदाराचे तक्रारीवरुन जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने दि. 24/11/2009 रोजी प्रत्यक्ष भेट देऊन क्षेत्र परिस्थितीचा पंचनामा केला आहे व निष्कर्ष अहवाल दिला. त्यावरुन तक्रारदाराचे तक्रारी अर्जात तथ्य आढळून येते, परंतू याच वाणाच्या व याच लॉट नंबरच्या बियाणे लागवड केलेल्या इतर शेतक-यांची क्षेत्र पहाणी केली असता तेथील पिक परिस्थिती समाधानकारक आढळून आली नाही. याचाच अर्थ सामनेवालेनी तक्रारदारास फसविण्याचे उदेशाने व त्याचे शेतातील पिक कपासी वाण खुंटलेले रहावे, करीता बोगस बि-बियाणाची विक्री केलेली आहे. तक्रारदाराने लागवड केलेले कपाशीचे वाण हे समाधानकारक नसल्यामुळे संपूर्ण पिक मोडून काढले आहे. त्यामुळे तक्रारदाराचे कधीही न भरुन येणारे नुकसान झालेले आहे. सदर नुकसानीचा तपशील खालील प्रमाणे.
अ) बि-बियाणे खरेदी खर्च 10 बॅग रु. 650 10 रु. 6,500/-
ब) 3 वेळा खत खर्च 20 क्विंटल रु. 1000 20 रु. 20,000/-
क) किटक नाशक खरेदी व फवारणी खर्च. रु. 2,000/-
ड) 5 एकर मधील कापसाचे उत्पन्न 75 क्विंटल रु. 2,25,000/-
अंदाजे भाव रु. 3,000 75000.
इ) मेहनत, मशागत व इतर खर्च. रु. 25,000/-
ई) मानसिक व शारिरीक व आर्थिक त्रासापोटी. रु. 20,000/-
एकूण :- रु. 2,98,500/-
सामनेवाले नं. 1 व 2 यांनी तक्रारदारास कपाशीचे बोगस बियाणे दिलेले आहे. त्यामुळे तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झालेले आहे.
तारीख 29/12/2009 रोजी सामनेवाले नं. 1 व 2 यांना त्यांचे वकिला मार्फत आर.पी.ए.डी.ने नोटीस पाठवून वरील प्रमाणे नुकसान भरपाईची मगणी केली होती. सदर नोटीस सामनेवालेंना मिळाल्यानंतर त्यांनी वकिलामार्फत तक्रारदाराने पाठविलेल्या नोटीसला खोटे व चुकीचे उत्तर नुकसान भरपाई टाळण्याच्या उद्देशाने दिलेले आहे.
विनंती की, सामनेवाले नं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या तक्रारदारास नुकसान भरपाई म्हणून रु. 3,05,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह देण्याचा आदेश व्हावा.
सामनेवाले नं. 1 व 2 यांनी त्यांचा खुलासा न्याय मंचात ता. 29/6/10 रोजी दाखल केला. त्यांचा खुलासा थोडक्यात की, तक्रारीतील तक्रारदाराचे म्हणणे तक्रारदारांना शेतजमीन आहे, हे म्हणणे सर्वसाधारणपणे बरोबर आहे. परंतू सदरहू जमीन बागायती आहे, हे म्हणणे चुक व खोटे आहे. बाकीचा मजकूर सामनेवालेस माहिती नाही त्यामुळे ते नाकारीत आहेत.
कलम- 2 बाबत तारीख 31/05/2009 रोजी तक्रारदारांने सामनेवाले नं. 2 कडून त्यांनी केलेल्या बियाणाची खात्री करुन घेऊनच बियाणे खरेदी केलेले आहे.
कलम- 3 मधील मजकूर संपूर्णपणे खोटा असून, बनवा-बनवीचा व हेतुपुरस्सर लिहिलेला आहे. सामनेवाले त्याचा स्पष्टपणे इन्कार करत आहेत. वास्तविक तक्रारदाराने वरील बियाणे खरेदी केल्यानंतर कधीही सामनेवाले यांना भेटलेला नाही, त्यामुळे पिकास पाणी देण्याचा सल्ला सामनेवाले यांनी दिला व त्यासाठी तक्रारदाराने स्प्रिंकलर सेट खरेदी केला, हे म्हणणे धादांत खोटे आहे. बियाणे बोगस दिलेले असल्यामुळे पिकाची वाढ झाली नाही याचा सामनेवाले स्पष्टपणे इन्कार करीत आहेत.
कलम- 4 आणि 5 बाबत जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने दि. 24/11/2009 रोजी प्रत्यक्ष भेट देवून पंचनामा केला आहे व निष्कर्ष अहवाल दिला आहे, हे म्हणणे बरोबर आहे. परंतू सदर समितीने काढलेल्या निष्कर्षाचा लबाडीने चुकीचा अर्थ काढून सामनेवाले विरुध्द खोटे आरोप केलेले आहेत. वास्तविक निष्कर्ष अहवालामध्ये प्रत्यक्ष पाहणीनंतर हे स्पष्ट झाले आहे की, बियाणाची उगवण ही उत्कृष्ट झाली आहे. परंतू पिकावर रस शोषण करण्याच्या किडीचा मोठया प्रमाणावर प्रादूर्भाव असल्याचे दिसून आले आहे. तसेच पिकावर लाल्या रोग सापडला आहे. त्यामुळे पिकाची अन्नरस तयार करण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. यावरुन हे स्पष्ट होत आहे की, तक्रारदारास सामनेवालेने दिलेले बियाणे हे उत्कृष्ट बियाणे होते. परंतू तक्रारदाराने पिकाच्या वाढीसाठी लागणारे योग्य प्रकारचे खते किडीच्या प्रादूर्भावापासून बचाव होण्यासाठी योग्य त्या औषधांच्या फवारण्या, जमिनीची मशागत व पिकामध्ये भरपूर प्रमाणात अन्नरस तयार होण्यासाठी घ्यावयाच्या सर्व प्रकारच्या उपाययोजना या सर्व घटकांचा पिकांच्या वाढीवर परिणाम होत असतो. त्यामुळे तक्रारदाराचे त्यास सामनेवालेने बोगस बियाणे दिले, हे म्हणणे चुकीचे व खोटे आहे. केवळ सामनेवालेची बदनामी व्हावी म्हणून जाणुन-बुजून हेतुपुरस्सर हे खोटे कथन तक्रारदाराने केले असून, सामनेवाले त्याचा स्पष्टपणे इन्कार करत आहेत.
कलम- 6 ते 8 मधील मजकूर चुक, खोटा व बनावट असून सामनेवाले त्याचा स्पष्टपणे इन्कार करीत आहेत. तारीख 21/12/2009 रोजी तक्रारदारांने पाठवलेल्या नोटीस मधील मजकूर पूर्णपणे खोटा आहे. त्यास सामनेवालेने तारीख 12/01/2010 रोजी वकिलामार्फत कायदेशीर उत्तर दिलेले आहे. तक्रारदाराने तक्रारीत केलेली नुकसान भरपाईची मागणी पूर्णपणे चुकीची असून सामनेवालेंना याबाबत जबाबदार धरता येणार नाही. खोटी तक्रार केल्याने सामनेवालेस हकनाक मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागला, त्यामुळे रक्कम रु. 10,000/- खर्च मिळण्यास सामनेवाले हक्कदार आहेत.
कलम- 10 चुक व खोटा आहे, सामनेवाले नाकारीत आहेत.
विनंती की, तक्रार नामंजूर करण्यात यावी व सामनेवालेंना रक्कम रु. 10,000/- खर्च म्हणून देण्यात यावा.
न्याय निर्णयासाठी मुददे उत्तरे
1. कपाशीचे राशी वाणाचे बोगस बियाणे सामनेवाले
1 व 2 यांनी तक्रारदारांना विकल्याची बाब
तक्रारदाराने सिध्द केली आहे काय ? नाही.
2. तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
3. अंतिम आदेश ? निकालाप्रमाणे.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, तक्रारदाराचा लेखी युक्तिवाद, सामनेवालेचा खुलासा, शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले. सामनेवालेचे विद्वान वकील कुडके यांचा युक्तिवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदाराच्या नावाने आहेर चिंचोली ता. जि. बीड शिवारात गट नं. 9 मध्ये 1 हेक्टर 17 आर शेतजमीन असल्याचे 7/12 च्या उता-यावरुन दिसून येते. सदर 7/12 उता-यात पिक पाहणी सदरात सन 2008-2009 या हंगामात ऊस लागवड 1 एकर, कापूस 14 , बाजरी- 3, गहु – 2, हरभरा-38 आर, अशी पिकाची पेरणी केल्याची नोंद घेण्यात आलेली आहे.
तक्रारदाराने शितल अँग्रो एजन्सी सामनेवाले नं. 2 यांच्याकडून तारीख 31/5/2009 रोजी सामनेवाले नं. 1 कंपनीने उत्पादित केलेले राशी 2 बीटी प्लॉट नं. 342366 च्या 10 पिशव्या कपाशीच्या बियाणाच्या प्रत्येकी रु. 650/- प्रमाणे रक्कम रु. 6,500/- ला विकत घेतलेल्या आहेत व त्याबाबत सामनेवाले नं. 2 यांनी पावती क्रं. 4529 ची तक्रारदारांना दिलेली आहे.
तक्रारदाराने वरील दोन्ही बियाणे त्याच्या वर नमूद केलेल्या शेतजमीनीत पेरल्याचे नमूद केलेले आहे. पैकी राशी – 2 बीटी या कपाशीच्या वाणाच्या रोपांची वाढ व्यवस्थीत न झाल्याने त्याबाबतची तक्रार तक्रारदाराने कृषि अधिकारी जि. प. बीड यांच्याकडे तारीख 20/10/2009 रोजी दिलेली आहे. त्यानुसार तारीख 24/11/2009 रोजी जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती बीड यांनी प्रत्यक्ष भेट देवून शेतीची पाहणी करुन क्षेत्र परिस्थितीचा पंचनामा केला व त्याचा अहवाल तक्रारदारांना दिला. निष्कर्ष अहवालात तक्रारदाराच्या तक्रारीत तथ्य आढळून येते, असा निष्कर्ष देण्यात आलेला आहे.
यासंदर्भात तक्रारदाराने तक्रारीसोबत निष्कर्ष अहवाल दाखल केला आहे. परंतू प्रत्यक्ष पाहणी परिस्थितीचा पंचनामा दाखल केलेला नाही. तसेच निष्कर्ष अहवालाचे संदर्भात संबंधीत पाहणी अहवालातील कोणत्याही अधिका-याचे शपथपत्र दाखल केलेले नाही. पिकाची वाढ होत नाही ही तक्रारदाराची तक्रार आहे. सदरची वाढ ही बियाणे सदोष असल्यामुळे झाली नाही, असा स्पष्ट अभिप्राय कृषि अधिका-याच्या निष्कर्ष अहवालात नाही. सदर निष्कर्ष अहवालात फक्त तक्रारदाराच्या तक्रारीत तथ्य आढळून येते, याचा सरळ अर्थ असा होतो की, तक्रारदाराच्या पिकाची वाढ झालेली नाही, परंतू सदरची वाढ ही कोणत्या कारणाने झालेली नाही व त्यासाठी खरोखर बियाणे सदोष होते काय ? याबाबतचा पुरावा देण्याची जबाबदारी तक्रारदाराची आहे. त्याबाबतचा कोणताही पुरावा तक्रारदाराकडून देण्यात आलेला नाही. तसेच तक्रारदाराने मलिका 207 बीटी या बियाणाच्या 10 पिशव्या विकत घेतलेल्या आहेत. परंतू वरील शेतात कोणत्या ठिकाणी पेरणी केली व किती क्षेत्रात पेरणी केली याबाबतचा कुठलाही उल्लेख तक्रारदाराने केलेला नाही. तक्रारदाराचे 7/12 वरील क्षेत्र पाहता 1 हेक्टर 17 आर आहे व त्यात तक्रारदाराने एकूण 20 पिशव्या बियाणाची लागवड केलेली आहे. याबाबत पंचनामा झालेला असून तो रेकॉर्डवरती नाही, व त्यामुळे कृषि अधिका-याने काढलेला निष्कर्ष तक्रारीत तथ्य आहे, ही बाब पुराव्याशिवाय स्पष्ट होत नाही.
याबाबत सामनेवालेंनी खुलाशात नमूद केले आहे की, तक्रारदाराच्या कपाशीच्या रोपावर लाल्या रोगाचा प्रादूर्भाव झाला होता व त्यामुळे सदर रोपांची वाढ झालेली नाही. सदरची बाब तक्रारदाराने त्याच्या शपथपत्रात नाकारलेली नाही, त्यामुळे सदरची बाबही आव्हानाशिवाय आहे. लाल्या रोगाचा प्रादूर्भावामुळे देखील पिकाची वाढ होत नाही. जर पिकावर रोग पडला असेल तर त्यास बियाणे सदोष असल्यामुळे तो रोग पडला, असे म्हणता येत नाही. बियाणे सदोश असल्याची बाब प्रथमदर्शनी तरी तक्रारदारांना योग्य त्या पुराव्यानिशी शाबीत करावी लागते.
वरील सर्व विवेचनावरुन सदोष बियाणे विक्री केल्याची बाब स्पष्ट होत नाही, त्यामुळे तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे तक्रारदारांना कोणतीही नुकसान भरपाईची रक्कम देणे उचित होणार नाही, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार रदृ करण्यात येत आहे.
2. सामनेवालेंच्या खर्चाबाबत आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(सौ. एम. एस. विश्वरुपे ) ( पी. बी. भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, बीड.
चुनडे एम.एस./-