Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक ०४/०८/२०२२) - प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली
असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे. - तक्रारकर्ती हिने शेतीच्या कामाकरिता विरुध्द पक्ष क्रमांक २ निर्मित स्वराज ट्रॅक्टर नोंदनी क्रमांक एम.एच.३४/बी.एफ.८६३७ विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडून रुपये १०,००,०००/- ला दिनांक ९/१/२०१९ रोजी विकत घेतला. त्याकरिता रुपये ३,००,०००/- विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना नगदी देऊन उर्वरित रक्कम रुपये ७,००,०००/- चे कर्ज विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांचेकडून घेतले. स्वराज ट्रॅक्टर सोबत तक्रारकर्तीने शेतीच्या मशागती साठी डोझर (ब्लेड) वखर, भारत डोझर कंपनीचे नांगर असे सर्व ट्रॅक्टरसह रुपये १०,००,०००/- ला विकत घेतले. ट्रॅक्टर चा चेसीस क्रमांक MBNB955ACJCN01557 आणि इंजीन क्रमांक 604001/5ZN20795 असा आहे. तक्रारकर्तीने ट्रॅक्टर घरी आणल्यानंतर त्याचा शेतीची मशागत करण्याकरिता पहिली नांगरणी व नंतर वखरणी करीत असतांना सदरहु ट्रॅक्टर ७ ते ८ दिवसच व्यवस्थित चालला. त्यानंतर दिनांक १७/०१/२०१९ रोजी उपरोक्त ट्रॅक्टर मध्ये हायड्रोलीक बिघाड झाला व हायड्रोलीक सिस्टम व्यवस्थित काम करीत नव्हते त्यामुळे ट्रॅक्टर ला लागून असलेल्या शेतीच्या मशागतीचे औजार तुटले झाले. त्यामुळे तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना फोन करुन उपरोक्त ट्रॅक्टरच्या हायड्रोलीक सिस्टम मध्ये खराबी आल्याबाबत सांगितले तेव्हा तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक १ यांच्या सांगण्यावरुन दिनांक १८/०१/२०१९ रोजी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचे वर्कशॉप मध्ये ट्रॅक्टर आणून दिले. विरुध्द पक्ष यांनी दुरुस्ती करुन दिल्यानंतरही त्यामध्ये परत बिघाड झाल्याने तक्रारकर्तीने दिनांक ५/४/२०१९ व २२/०४/२०१९ रोजी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांच्या वर्कशॉप मध्ये परत ट्रॅक्टर घेऊन गेली. त्यावेळी ट्रॅक्टरचे समोरचे टायर खराब झाले होते परंतु विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी टायर बदलवून देण्यास नकार दिल्याने तक्रारकर्तीने दिनांक १७/०४/२०१९ रोजी ‘जय बजरंग टायर रिट्रेडिंग वर्क, गोंडपिपरी’ यांच्याकडे रिमोल्ड टायर रक्कम रुपये ३,०००/- ला विकत घेऊन उपरोक्त ट्रॅक्टरला लावले त्यानंतर उपरोक्त ट्रॅक्टर मध्ये बिघाड होऊन इंजीन ऑईल मध्ये डिझेल जात असल्यामुळे ट्रॅक्टर खराब झाल्यामुळे विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडे तक्रार केली त्यावेळी त्यांचा कारागीर पाठवून त्यांनी ट्रॅक्टर दुरुस्त करुन दिला होता परंतु तो २ दिवसात बंद पडला तेव्हापासून उपरोक्त ट्रॅक्टर बंद अवस्थेत आहे. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडे तक्रार केली व त्यांना विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचेकडे ट्रॅक्टर परत करुन नवीन ट्रॅक्टरची मागणी केली परंतु विरुध्द पक्षांनी त्याची दखल घेतली नाही. तक्रारकर्तीने शेतीच्या मशागतीकरिता ट्रॅक्टरला लागणारे अवजार विरुध्द पक्ष क्रमांक १ कडे ठेवले व विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी स्वतःकडे ट्रॅक्टर ठेवून घेतले त्यामुळे तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना अधिवक्ता श्री ढोक यांचे मार्फत दिनांक १३/०५/२०१९ रोजी नोटीस पाठविला परंतु त्यावर विरुध्द पक्ष क्रमांक १ ने अधिवक्ता मार्फत खोटे उत्तर दिले. विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांनी नोटीसला उत्तर न देता दिनांक २२/०६/२०१९ रोजी उपरोक्त ट्रॅक्टर विकत घेण्याकरिता घेतलेल्या कर्जाच्या रकमेची मागणी केली व ती रक्कम न भरण्यास कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली. त्यामुळे तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ विरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचेकडून विवादीत ट्रॅक्टर मध्ये उत्पादीत दोष असल्यामुळे नवीन सदोष स्वराज ट्रॅक्टर तक्रारकर्तीस द्यावे किंवा विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासठी घेतलेली रक्कम रुपये १,००,०००/- हे १४ टक्के व्याजाने परत द्यावी. विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांनी सदर वाहन कर्जाचा हफ्ता रुपये १,०६,०००/- प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मागू नये तसेच त्यावर व्याज आकारु नये. विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्तीस शारीरिक, मानसिक व आर्थिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये ५,००,०००/- आणि तक्रार खर्च रुपये २०,०००/- देण्याचे आदेशीत व्हावे.
- तक्रारकर्तीची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना नोटीस प्राप्त होऊन ते आयोगासमक्ष उपस्थित झाले. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी आपले लेखी उत्तर दाखल करुन त्यामध्ये तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडून विरुध्द पक्ष क्रमांक २ उत्पादित स्वराज ट्रॅक्टर त्यासोबत भारत कंपनीचा डोझर १ नग आणि थोरात कंपनीचे नांगर १ नग रुपये १०,००,०००/- मध्ये विकत घेतले तसेच विरुध्द पक्ष क्रमांक १ हे विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचे अधिकृत डिलर आहे, या बाबी मान्य करुन तक्रारकर्तीचे उर्वरित कथन नाकबूल करुन नमूद केले की तक्रारकर्ती पहिल्यांदा दिनांक १८/०१/२०१९ रोजी विरुध्द पक्ष क्रमांक १ कडे ट्रॅक्टर घेऊन आली व ‘Hydraulic down automatically’ बाबत तक्रार केली त्यानंतर दिनांक ५/४/२०१९ रोजी ‘Hydraulic not working’ अशी तक्रार केली असता विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी दोन्ही वेळेस जॉब कार्ड बनवून सदर बाब दुरुस्त करुन दिली तसेच दुस-यांदा पंप रिप्लेसमेंट सुध्दा करुन दिले. तक्रारकर्ती दिनांक २२/०४/२०१७ रोजी विरुध्द पक्ष क्रमांक १ कडे ट्रॅक्टर घेऊन आली व हायड्रोलीक प्रॉब्लेम, नांगर गडत नाही अशी तक्रार केली असता सदर बाबत दुरुस्त करुन दिली त्यानंतर टायरबाबत तक्रार केली असता स्पॉट इन्सपेक्शन केले तेव्हा गाडी बरोबर चालवित नसल्याने सदर गाडी ‘High Initiation Pressure’ मध्ये चालवित असल्यामुळे टायर घासत आहे असे निदर्शनास आले. गाडी बरोबर न चालविल्याने ही समस्या येऊ शकते त्यानंतर ट्रॅक्टरच्या इंजिनच्या ऑईल मध्ये डिझेल जात असल्याने खराब झाल्याचे सांगितल्यावर ती तक्रार सुध्दा दुर करुन दिली. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीच्या नोटीसला सुध्दा योग्य उत्तर दिले. तक्रारकर्तीची तक्रार खोटी आहे. तक्रारकर्तीने जेव्हा-जेव्हा ट्रॅक्टर विरुध्द पक्ष क्रमांक १ कडे आणले त्यावेळी त्यांनी दुरुस्त करुन दिलेले आहे व विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्तीला कोणतीही न्युनतम सेवा दिली नाही. सबब तक्रारकर्तीची तक्रार खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे.
- विरुध्द पक्ष क्रमांक २ हजर होऊन त्यांनी लेखी उत्तर दाखल करुन त्यामध्ये नमूद केले की, तक्रारकर्तीने फक्त तिची आर्थिक जबाबदारी टाळण्याकरिता ही खोटी तक्रार दाखल केली आहे शिवाय विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचेविरुध्द तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारकर्तीने वादातील ट्रॅक्टरमध्ये उत्पादित दोष आहे, याबाबत तज्ज्ञांचा अहवाल दिलेला नाही. पुढे लेखी कथनामध्ये तक्रारकर्तीचे कथन नाकबूल करुन नमूद केले की, विरुध्द पक्ष क्रमांक २ हे वादातील ट्रॅक्टरचे उत्पादक आहेत. विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ हे तक्रारकर्तीला ट्रॅक्टरबाबत काही तक्रारी असतील तर त्यांचे निवारण करण्यास तयार आहेत. वास्तविक पाहता तक्रारकर्तीला तिने ट्रॅक्टरकरिता घेतलेल्या कर्जाच्या रकमेची परतफेड करायची नाही व त्या जबाबदारीतून मुक्तता हवी असल्याने तिने विरुध्द पक्ष क्रमांक २ विरुध्द खोटी तक्रार दाखल केली. त्यामुळे प्रस्तुत तक्रार खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे.
- विरुध्द पक्ष क्रमांक ३ हजर होऊन त्यांनी आपले लेखी कथन दाखल करुन त्यामध्ये तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक १ कडून विरुध्द पक्ष क्रमांक २ कंपनीचा ट्रॅक्टर दिनांक ९/१/२०१९ रोजी रक्कम रुपये ३,००,०००/- रोख देऊन आणि विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांचेकडून उर्वरित रक्कम रुपये ७,००,०००/- चे वाहन कर्ज घेऊन एकूण रक्कम रुपये १०,००,०००/- मध्ये विकत घेतले, ही बाब मान्य करुन उर्वरित तक्रारकर्तीचे कथन नाकबूल करुन नमूद केले की, विरुध्द पक्ष क्रमांक ३ हे गरजु लोकांना वित्तीय सहाय्य करणारी कंपनी आहे. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांचेकडून रुपये ७,००,०००/- चे कर्ज घेतले होते व याबाबत दिनांक १६/०१/२०१९ रोजी तक्रारकर्ती व विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांचेमध्ये करार झाला होता. तक्रारकर्तीने कर्जाच्या रकमेची परतफेड ६० महिण्यांच्या कालावधीमध्ये करावयाचे कबूल केले होते. कर्जाच्या रकमेवर मासिक कम्पाऊंड व्याज दर १६.३६ टक्के आणि वार्षिक दर १७.७७ टक्के निश्चीत करण्यात आले होते तसेच करारातील अटीनुसार कर्ज रक्कम न भरल्यास त्यावर ३ टक्के अतिरिक्त व्याज दर आकारण्याचे निश्चित केले होते. विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांना प्रस्तुत प्रकरणात अनावश्यक पक्ष म्हणून जोडण्यात आलेले आहे. विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांना तक्रारकर्तीकडून एकही किस्त रक्कम मिळाली नाही. तक्रारकर्तीकडून कर्ज रक्कम रुपये ७,००,०००/- घेणे बाकी आहे. सबब प्रस्तुत तक्रार दंड खर्च बसवून खारीज होण्यास पाञ आहे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्षे १. विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी तक्रारकर्तीप्रति नाही न्युनतापूर्ण सेवा दिली आहे कायॽ २. आदेश कायॽ अंतिम आदेशाप्रमाणे कारणमीमांसा मुद्दा क्रमांक १ बाबतः- - तक्रारकर्ती हिने शेतीच्या कामाकरिता विरुध्द पक्ष क्रमांक २ उत्पादित स्वराज ट्रॅक्टर, चेसीस क्रमांक MBNB955ACJCN01557 आणि इंजीन क्रमांक 604001/5ZN20795, नोंदनी क्रमांक एम.एच.३४/बी.एफ.८६३७, तसेच त्यासोबत भारत कंपनीचा डोझर १ नग, नांगर १ नग एकूण रक्कम रुपये १०,००,०००/- ला दिनांक ९/१/२०१९ रोजी विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचे अधिकृत विक्रेता विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडून विकत घेतले व त्याकरिता विरुध्द पक्ष क्रमांक ३ फायनान्स कंपनीकडून रुपये ७,००,०००/- चे कर्ज घेतले ही बाब विरुध्द पक्षांनी आपल्या लेखी उत्तरात मान्य केली असल्याने तक्रारकर्ती ही विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांची ग्राहक आहे, ही बाब निर्विवाद आहे.
- प्रस्तुत तक्रारीत विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्तीस उत्पादित दोष असलेले उपरोक्त स्वराज ट्रॅक्टर दिले याबाबत उभयपक्षात वाद आहे. तक्रारीत दाखल दस्तऐवजांचे अवलेाकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडे दिनांक १८/०१/२०१९ रोजी ट्रॅक्टर मध्ये ‘Hydraulic down automatically’ बाबत तक्रार केली असता त्यांनी ती तक्रार दुर करुन दिली त्यानंतर तक्रारकर्तीने दिनांक ५/०४/२०१९ रोजी वादातील ट्रॅक्टर मध्ये ‘Hydraulic not working’ अशी तक्रार केली असता विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी ती दुर करुन दिली व Pump Replacement सुध्दा करुन दिले तसेच ‘Hydraulic Problem Solve’ अशा शेरा जॉब शीटवर सुध्दा दिला आहे.त्यानंतर तक्रारकर्तीने दिनांक ४/५/२०१९ रोजी ट्रॅक्टरचे इंजीन ऑईल लेवल वाढल्याबाबत ऑईल लिकेज तसेच दिनांक २२/०४/२०१९ रोजी Hydraulic Problem, नांगर गडत नसल्याबाबत आणि टायर खराब झाल्याबाबत तक्रार केली असता विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी दिनांक २३/०४/२०१९ रोजी स्पॉट इन्स्पेक्शन केले तेव्हा त्यामध्ये गाडी High Initiation Pressure मध्ये चालवित असल्याने टायर घासत आहे असे निदर्शनास आले. तक्रारकर्तीने जेव्हा-जेव्हा विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडे ट्रॅक्टर बाबत तक्रार केली असता त्यांनी प्रथमतः जॉब शीट बनविली व त्यामध्ये तक्रार नोंदवून नंतर हमी कालावधीमध्ये ट्रॅक्टर दुरुस्त करुन तक्रारीचे निवारण केले तसेच दिनांक ५/४/२०१९ च्या जॉब शीटवर ‘Hydraulic Problem Solve’ असे नमूद आहे. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी निशानी क्रमांक २६ सह सदर जॉब शीट दस्त क्रमांक १ ते ४ व स्पॉट इन्स्पेक्शन अहवाल दस्त क्रमांक ५ वर प्रकरणात दाखल केला आहे तसेच तक्रारकर्तीने सुध्दा विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्तीने ट्रॅक्टर बाबत तक्रार केली असता त्यांनी दुरुस्त करुन दिल्याचे तक्रारीत मान्य केले आहे. तक्रारकर्तीने आक्षेप घेतला की, विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडे ट्रॅक्टर नेला असता त्यांनी तो अवजारासह ठेवून घेतला व वादातील ट्रॅक्टर मध्ये उत्पादित दोष आहे परंतु ही बाब तक्रारकर्तीने पुराव्यानिशी सिध्द केली नाही. याशिवाय वादातील ट्रॅक्टरमध्ये उत्पादित दोष आहे याबाबत कोणताही तज्ज्ञांचा स्वतंञ अहवाल/दस्तावेज प्रकरणात दाखल केलेला नाही.
मा. सर्वोच्च न्यायालयाने C.N. Anantharam Vs. Fiat India Ltd and Others या प्रकरणात “ Complaint of manufacturing defects in the vehicle manufacturer replaced the engine of the vehicle with a new one- No question of replacing the vehicle itself arises- if the independent technical expert directed to appointed by the District Forum is of the opinion that there are inherent manufacturing defects in the vehicle, the petitioner will be entitled to refund of the price of the vehicle and the lifetime tax and EMI along with interest @12 % per annum and costs” असा निर्वाळा दिला आहे. उपरोक्त न्यायनिवाड्याचे तत्व प्रस्तुत प्रकरणात लागू होते. या न्यायनिर्णयाचा आधार व वस्तुस्थिती विचारात घेता तक्रारकर्तीने सुध्दा विवादीत ट्रॅक्टरमध्ये उत्पादित दोष आहे हे स्वतंञ तज्ज्ञांचा अहवाल दाखल करुन सिध्द केले नाही. उलटपक्षी विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्तीचे विवादीत ट्रॅक्टर असलेल्या किरकोळ तक्रारीचे हमी कालावधीमध्ये निवारण करुन तक्रारकर्तीप्रति कोणतीही न्युनतम सेवा दिली नाही, हे सिध्द होते, या निष्कर्षाप्रत हे आयोग आले आहे. त्यामुळे तक्रारकर्तीची ट्रॅक्टर बदलवून नवीन ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टर खरेदीची रक्कम रुपये १०,००,०००/- परत करण्याची मागणी ही कायदेशीर नाही. विरुध्द पक्ष क्रमांक ३ फायनान्स कंपनी असून तक्रारकर्तीने त्यांच्याकडून विवादीत ट्रॅक्टर खरेदी करण्याकरिता रुपये ७,००,०००/- चे कर्ज घेतले आहे व तक्रारकर्तीने कर्जाच्या रकमेची परतफेड केलेली नाही ही बाब मान्य केली आहे आणि थकीतदाराकडून कर्ज रक्कम वसूल करण्याचा विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी तक्रारकर्तीप्रति कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिली नाही. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर नकारार्थी देण्यात येते. - मुद्दा क्रमांक २ बाबतः- मुद्दा क्रमांक १ च्या विवेचनावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्र. १०३/२०१९ खारीज करण्यात येते.
- उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावे.
| |