::निकालपत्र::
(पारीत व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या )
(पारीत दिनांक–16 मे, 2017)
01. उपरोक्त नमुद तिन्ही तक्रारदारानीं एकत्रितरित्या मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष बिल्डर फर्मचे भागीदार विरुध्दपक्ष क्रं-1) ते 8) यांचे विरुध्द करारा प्रमाणे सदनीकेचे विक्रीपत्र व ताबा न दिल्याचे कारणावरुन प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
02. तिन्ही तक्रारदारांचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष व्यंकटेश बिल्डर्स एवं डेव्हलपर्स ही एक बिल्डर व डेव्हलपरचा व्यवसाय करणारी भागीदारी फर्म असून तिचे विरुध्दपक्ष क्रं-1) ते 8) भागीदार आहेत. तिन्ही तक्रारदारांना राहण्यासाठी सदनीकेची आवश्यकता होती. त्यांनी विरुध्दपक्ष व्यंकटेश बिल्डर्स एवं डेव्हलपर्सचे मौजा कळमना, उमरेड रोड, नागपूर, पटवारी हलका क्रं-38, खसरा क्रं-57/1 येथील भूखंड क्रं-1)
व क्रं-2) वर उभारण्यात येणा-या प्रस्तावित “VYANKATESH ENCLAVE-V” मधील फ्लॅट विकत घेण्यासाठी स्वतंत्र करारनामे केलेत, त्याचे विवरण “परिशिष्ट-अ” मध्ये दर्शविल्या नुसार खालील प्रमाणे-
“परिशिष्ट-अ”
Sl.No. | Name of Complainant | Agreement Date | Flat Descripation | Total Consideration Amount |
1) | Mr.Dushyant Arvind Kulkarni | 07/03/2011 | First Floor Flat No.-103 Saleable Area 645 Sq.Ft. | 7,09,500/- |
| | | | |
2) | Mrs.Sarika Dushyant Kulkarni | 07/03/2011 | First Floor Flat No.-104 Saleable Area 650 Sq.Ft. | 7,15,000/- |
| | | | |
3) | Mr.Raghuvir Bhasarrao Kulkarni | 04/02/2011 | First Floor Flat No.-101 Saleable Area 650 Sq.Ft. | 7,15,000/- |
तिन्ही तक्रारदारानीं पुढे असे नमुद केले की, त्यांनी खालील प्रमाणे विरुध्दपक्ष फर्मला करारातील सदनीकेपोटी रक्कम दिली. त्याचे विवरण “परिशिष्ट-ब” मध्ये दर्शविल्या नुसार खालील प्रमाणे-
“परिशिष्ट-ब”
Sl.No | Name of Complainant | Payment Receipt No. | Receipt Date | Paid Amount | Remarks |
1) | Mr.Dushyant Arvind Kulkarni | 0440 | 06/01/2011 | 11,000/- | Cash |
| | 1001 | 28/02/2011 | 1,67,000/- | By Cheque No.-908128 |
| | | Total Amount | 1,78,000/- | |
“परिशिष्ट-ब”
Sl.No | Name of Complainant | Payment Receipt No. | Receipt Date | Paid Amount | Remarks |
2) | Mrs.Sarika Dushyant Kulkarni | 0441 | 06/01/2011 | 11,000/- | Cash. |
| | 1001 | 28/02/2011 | 1,67,000/- | By Cheque No.-908128 |
| | | Total Amount | 1,78,000/- | |
“परिशिष्ट-ब”
Sl.No | Name of Complainant | Payment Receipt No. | Receipt Date | Paid Amount | Remarks |
3) | Mr.Raghuvir Bhasarrao Kulkarni | 417 | 13/12/2010 | 11,000/- | Cash. |
| | 418 | 14/12/2010 | 50,000/- | Cash. |
| | 442 | 09/01/2011 | 43,000/- | Cash. |
| | 711 | 30/01/2011 | 40,000/- | Cash. |
| | | Total Amount | 1,44,000/- | |
तिन्ही तक्रारदारानीं पुढे असे नमुद केले की, त्यांनी विरुध्दपक्ष फर्मला करारातील सदनिकांपोटी आंशिक रकमा दिल्या नंतरही तेथे विरुध्दपक्षानीं पेमेंट प्रमाणे कोणतेही अपार्टमेंटचे काम केले नाही, त्यानंतर त्यांनी विरुध्दपक्षाची भेट घेतली असता लवकरच सदनीकांचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले परंतु त्यानंतर सुध्दा पाच वर्ष पर्यंत विरुध्दपक्षानीं सदनीकांचे काम पूर्ण केले नाही. त्यानंतर तक्रारदार हे विरुध्दपक्षानां सन 2016 मध्ये भेटले पण विरुध्दपक्ष कार्यालयात भेटत नाही, फोन सुध्दा उचलत नाहीत व त्यांचे कर्मचारी उत्तरे बरोबर देत नाहीत, त्यामुळे तक्रारदारानीं विरुध्दपक्षानां वकीलांचे मार्फतीने दिनांक-23.06.2016 रोजीची कायदेशीर नोटीस पाठविली परंतु प्रतिसाद मिळाला नाही. अशाप्रकारे तक्रारदारांची विरुध्दपक्षानीं फसवणूक
केलेली आहे म्हणून तक्रार ग्राहक मंचात दाखल केली असल्याचे नमुद करुन खालील प्रकारे मागण्या केल्यात-
(01) विरुध्दपक्षानीं तिन्ही तक्रारदारांना त्यांनी-त्यांनी सदनीकेपोटी जमा केलेल्या रकमा अनुक्रमे रुपये-1,78,000/-, रुपये-1,78,000/- आणि रुपये-1,44,000/- वार्षिक 24% दराने व्याजासह परत करण्याचे आदेशित व्हावे परंतु असे करणे विरुध्दपक्षानां शक्य नसल्यास करारनाम्या प्रमाणे उर्वरीत रकमा स्विकारुन त्या-त्या तक्रारदारांना त्यांच्या त्यांच्या सदनीकचे विक्रीपत्र नोंदवून देऊन ताबे देण्याचे आदेशित व्हावे.
(02) तिन्ही तक्रारदारानां झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-1,00,000/- अणि तक्रारीचा खर्च म्हणून प्रत्येकी रुपये-10,000/- विरुध्दपक्षांकडून मिळावेत.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) ते 8) यांचे नावे उपरोक्त नमुद पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने नोटीसेस ग्राहक मंचा तर्फे पाठविण्यात आल्यात, सदर रजिस्टर नोटीस विरुध्दपक्ष क्रं-1) ते 8) यांना प्राप्त प्राप्त झाल्याच्या पोच अभिलेखावर दाखल आहेत परंतु ग्राहक मंचाच्या नोटीसेस प्राप्त होऊनही विरुध्दपक्ष क्रं-1) ते 8) तर्फे कोणीही मंचा समक्ष हजर झाले नाहीत वा त्यांनी आपले लेखी निवेदनही सादर केले नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं-1) ते 8) विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दिनांक-22/12/2016 रोजी पारीत केला.
04. तक्रारदारानीं निशाणी क्रं 3 वरील यादी नुसार दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात ज्यामध्ये प्रामुख्याने सदनीका विक्रीचे करारनामे, विरुध्दपक्ष फर्म तर्फे पेमेंट मिळाल्या बद्दल पावत्यांच्या प्रती, तक्रारदारानीं विरुध्दपक्षानां रजिस्टर पोस्टाने दिनांक-23/06/2016 रोजी पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत, पोस्टाची पावती व पोच अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला.
05. तक्रारदारां तर्फे अधिवक्ता श्री सावल यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
06. तक्रारदारांची तक्रार तसेच प्रकरणातील उपलब्ध विक्री कराराची प्रत, विरुध्दपक्ष फर्म तर्फे निर्गमित पेमेंट मिळाल्या बद्दल पावत्यांच्या प्रती इत्यादींचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले असता न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
::निष्कर्ष::
07. या निकालपत्रातील परिशिष्ट-अ मध्ये दर्शविल्या प्रमाणे तिन्ही तक्रारदारानीं विरुध्दपक्षां सोबत सदनीका खरेदी करण्यासाठी स्वतंत्ररित्या करारनामे केल्याची बाब दाखल करारांच्या प्रतींवरुन सिध्द होते आणि परिशिष्ट- ब मध्ये दर्शविल्या प्रमाणे त्यांच्या-त्यांच्या सदनीकेपोटी विरुध्दपक्ष फर्मला रक्कम अदा केल्या बाबत पुराव्या दाखल पावत्यांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत, यावरुन तिन्ही तक्रारदारानीं स्वतंत्ररित्या विरुध्दपक्ष फर्म सोबत सदनीका खरेदी बाबत करारनामे केलेत आणि परिशिष्ट-ब मध्ये दर्शविल्या प्रमाणे तिन्ही तक्रारदारांनी त्यांच्या त्यांच्या सदनीकेपोटी अनुक्रमे रुपये-1,78,000/-, रुपये-1,78,000/- आणि रुपये-1,44,000/- अशा रकमा विरुध्दपक्ष फर्म मध्ये जमा केल्याची बाब सिध्द होते.
08. विरुध्दपक्ष फर्म तर्फे निर्गमित कराराच्या प्रतींचे अवलोकन केले असता ते मे.व्यंकटेशा बिल्डर्स एवं डेव्हलपर्स फर्मचे वतीने करुन दिले असल्याचे दिसून येते. मे.व्यंकटेशा बिल्डर्स एवं डेव्हलपर्सचे विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (8) हे भागीदार असल्याचे तक्रारदारानीं तक्रारीत नमुद केलेले आहेत परंतु त्यांनी सदर भागीदारी फर्मचे कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाहीत तसेच करारा मध्ये विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (8) यांची नावे नमुद नाहीत परंतु तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (8) सदर फर्मचे भागीदार आहेत. ग्राहक मंचाचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं (1) ते (8) यांना रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविण्यात आली व ती त्यांना प्राप्त झाल्या बद्दलच्या पोच अभिलेखावर दाखल आहेत परंतु विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (8) ग्राहक मंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा त्यांनी आपली कोणतीही बाजू मांडली नाही तसेच तक्रारदारांनी त्यांचे विरुध्द केलेले आरोप खोडून काढलेले नाहीत, त्यामुळे तक्रारदारांच्या म्हणण्या प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (8) हे सदर व्यंकटेशा बिल्डर्स एवं डेव्हलपर्सचे भागीदार आहेत हे म्हणणे विरुध्दपक्षां कडून खोडून काढण्यात आलेले नसल्याने तक्रारदारांच्या म्हणण्या नुसार विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (8) फर्मचे भागीदार असल्याची बाब मंचा तर्फे विचारात घेण्यात येते.
09. विरुध्दपक्षां तर्फे तक्रारदारांशी सदनीका विक्री करार केलेत व त्या-त्या तक्रारकर्त्या कडून आंशिक रकमा प्राप्त केल्यात परंतु पुढे कोणतीही कार्यवाही केलेली नाही वा रक्कमही परत केलेली नाही ही विरुध्दपक्षां तर्फे दिलेली दोषपूर्ण सेवा आहे.
10. तक्रारदारानीं विरुध्दपक्ष फर्म सोबत सदनीका खरेदीचे करार हे माहे फेब्रुवारी-मार्च-2011 रोजी केलेले असून आता सन-2017 उजाडण्याच्या स्थितीत आहे. तक्रारदारां कडून प्रस्तावित सदनीकेपोटी आंशिक रक्कम स्विकारुनही सदनीकेचे बांधकाम न करणे तक्रारदारानां प्रस्तावित सदनीकेपोटी ताटकळत ठेवणे, त्यांनी जमा केलेली रक्कम परत करण्याचे सौजन्य न दाखविणे, इतकेच नव्हे तर, कायदेशीर नोटीस प्राप्त होऊनही त्याला कोणताही प्रतिसाद न देणे वा उत्तर न देणे हा सर्व प्रकार विरुध्दपक्षां तर्फे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब यामध्ये मोडतो. विरुध्दपक्षांचे अनुचित व्यापारी प्रथेमुळे तसेच दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदारानां निश्चीतच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
11. अशापरिस्थितीत विरुध्दपक्षानीं परिशिष्ट अ मध्ये दर्शविल्या प्रमाणे करारातील सदनीकांचे नोंदणीकृत विक्रीपत्र करारा प्रमाणे उर्वरीत रक्कम स्विकारुन त्या-त्या तक्रारदारांच्या नावे नोंदवून द्दावे परंतु काही कायदेशीर तांत्रिक कारणास्तवच विरुध्दपक्षानां करारातील सदनीकांचे विक्रीपत्र तक्रारदारांचे नावे नोंदवून देणे शक्य नसल्यास तिन्ही तक्रारदारां कडून करारातील सदनीकां पोटी परिशिष्ट- ब मध्ये दर्शविल्या प्रमाणे स्विकारलेल्या आंशिक रकमा, त्या-त्या रकमा स्विकारल्याचे पावती दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेते द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह तिन्ही तक्रारदारानां परत कराव्यत तसेच तिन्ही तक्रारदारांना झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-3500/- व तक्रारीचा खर्च सर्व मिळून एकूण रुपये-6000/- विरुध्दपक्षानीं देण्याचे आदेशित करणे न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे.
12. विरुध्दपक्षाचे कार्यपध्दती संबधाने हे न्यायमंच पुढील मा.राष्ट्रीय ग्राहक आयोग,न्यु दिल्ली यांनी पारीत केलेल्या निवाडयावर आपली भिस्त ठेवीत आहे- “Juliet V. Quadros-Versus-Mrs.Malti Kumar & Ors.”- 2005(2) CPR-1 (NC). सदर निवाडयामध्ये मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले आहे की, जर भूखंडाचा विकास करणारा विकासक करारा प्रमाणे भूखंडाचा कब्जा संबधित ग्राहकास देण्यास किंवा त्याने जमा केलेली रक्कम परत करण्यास असमर्थ ठरला तर तक्रार दाखल करण्यास सतत कारण (Continuous cause of action) घडत असते. मा. राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात असेही नमुद केले आहे की जर भूखंडाचा विकास करण्यास विकासक/बांधकाम व्यवसायिक काही प्रयत्न करीत नसेल किंवा त्याठिकाणी कुठलेच बांधकाम होत नसेल तर खरेदीदारास मासिक हप्ते नियमित भरणे अपेक्षित नाही. त्यामुळे असा आक्षेप जर विरुध्दपक्ष घेत असेल तर त्या आक्षेपाचा कुठलाही विचार करण्याची गरज नसते.
13. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
1) तक्रारदार क्रं-(1) दुष्यंत अरविंदराव कुळकर्णी, क्रं-(2) श्रीमती सारीका दुष्यंत कुळकर्णी आणि विरुध्दपक्ष क्रं-(3) रघुविर भास्कररव कुळकर्णी यांची, विरुध्दपक्ष व्यंकटेशा बिल्डर्स एवं डेव्हलपर्स फर्म तर्फे भागीदार क्रं-(1) नरेश हंसराज झाम आणि इतर-07 यांचे विरुध्दची तक्रार वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येते.
2) “विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (8)” यांना आदेशित करण्यात येते की, त्यानीं निकालपत्रातील परिशिष्ट- अ मध्ये दर्शविल्या प्रमाणे उभय पक्षांमध्ये झालेल्या करारा नुसार, परिशिष्ट-ब मध्ये दर्शविल्या प्रमाणे सदनीकां पोटी जमा केलेल्या रकमांचे योग्य ते समायोजन करुन करारा नुसार उर्वरीत रकमा तक्रारदारां कडून प्राप्त करुन सदनीकांचे विक्रीपत्र त्यांच्या-त्यांच्या नावे नोंदवून देऊन प्रत्यक्ष्य ताबे द्दावेत व लेखी पोच घ्यावी. नोंदणी व मुद्रांक शुल्काचा खर्च तक्रारदारांनी स्वतः सहन करावा.
3) विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (8) यांना तक्रारदारांनी केलेल्या करारा प्रमाणे उर्वरीत रक्कम स्विकारुन विक्रीपत्र नोंदवून देणे काही तांत्रिक शासकीय कायद्दा नुसार शक्य नसल्यास त्या परिस्थितीत तक्रारदारानीं परिशिष्ट- ब मध्ये दर्शविल्या प्रमाणे सदनीकेपोटी जमा केलेल्या त्या-त्या रकमा निर्गमित पावती दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह त्या-त्या तक्रारदारास परत कराव्यात.
3) तिन्ही तक्रारदारानां झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-3500/- (अक्षरी प्रत्येकी रुपये तीन हजार पाचशे फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून सर्व मिळून एकूण रुपये-6000/- (अक्षरी सर्व मिळून एकूण रुपये सहा हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (8) यांनी तक्रारदारानां द्दावेत.
4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (8) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
5) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन
देण्यात याव्यात.