(आदेश पारित द्वारा मा. सदस्या, कु. वर्षा ओ. पाटील)
(पारित दि. 26 ऑगस्ट, 2015)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी केल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता हा मौजा खैरबोडी, तालुका तिरोडा, जिल्हा गोंदीया येथील रहिवासी असून त्याचे वर नमूद केलेल्या ठिकाणी किराणा दुकान आहे व सदरहू व्यवसाय तो त्याचे स्वतःचे उदरनिर्वाहासाठी करतो.
3. विरूध्द पक्ष 1 हे सुपरसिक्स प्रॉडक्टस् चे सर्व्हीस मॅनेजर असून विरूध्द पक्ष 2 हे सुपरसिक्स प्रॉडक्टस् चे Executive आहेत. विरूध्द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्याला त्यांच्या कंपनीचे म्हणजेच सुपरसिक्स प्रॉडक्टस् कंपनीचे गव्हाचे पीठ व दुसरे प्रॉडक्टस् घेण्याची विनंती केली. विरूध्द पक्ष 2 यांच्या विनंतीवरून तक्रारकर्ता गव्हाचे पीठ घेण्यासाठी तयार झाला व त्याप्रमाणे त्याने विरूध्द पक्ष 2 यांचेशी संपर्क साधला.
4. त्यानंतर विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला रक्कम रू. 40,000/- आयसीआयसीआय बँकेत असलेल्या खाते क्रमांक 056005000197 मध्ये जमा करण्यासाठी सांगितले आणि 7 दिवसांत वस्तू तक्रारकर्त्याला पोहोचती करण्यात येईल असे कळविले. त्यानंतर तक्रारकर्त्याने सदरची रक्कम आयसीआयसीआय बँकेच्या तिरोडा शाखेत दिनांक 25/06/2012 रोजी जमा केली.
5. परंतु तक्रारकर्त्याला विरूध्द पक्ष यांचेकडून कुठल्याही वस्तू प्राप्त न झाल्यामुळे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांचेशी संपर्क साधला असता विरूध्द पक्ष यांनी खोटे आश्वासन देऊन बरेचदा वस्तू देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 1 व 2 यांना कायदेशीर नोटीस पाठविला. परंतु सदरहू नोटीस “Notice Intimated” अशा शे-यासह परत आल्या. अशाप्रकारे विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या नोटीसची कुठल्याही प्रकारे दखल न घेतल्यामुळे विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे.
6. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला आवश्यक ती सेवा प्रदान करण्यामध्ये कसूर केल्यामुळे तक्रारकर्त्याने आयसीआयसीआय बँकेमध्ये जमा केलेली रक्कम रू. 40,000/- मिळण्यासाठी दिनांक 03/06/2014 रोजी न्याय मंचात तक्रार दाखल केली.
7. तक्रारकर्त्याची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 16/07/2014 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 17/07/2015 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष 1 व 2 यांचेविरूध्द बजावण्यात आलेल्या नोटीसेस “Notice Intimated” अशा शे-यासह परत आल्या.
8. विरूध्द पक्ष 1 व 2 यांचेविरूध्द बजावण्यात आलेल्या नोटीसेस परत आल्यामुळे विरूध्द पक्ष 1 व 2 यांचेविरूध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 21/01/2015 रोजी विद्यमान मंचाद्वारा पारित करण्यात आला.
9. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत आयसीआयसीआय बँकेत रक्कम जमा केल्याबाबतच्या पावतीची झेरॉक्स प्रत पृष्ठ क्र. 12 वर, सुपरसिक्स प्रॉडक्टस् चे कार्ड पृष्ठ क्र. 13 वर, तक्रारकर्त्याने वकिलामार्फत पाठविलेली नोटीस व नोटीसची पावती पृष्ठ क्र. 14 वर, परत आलेला नोटीस पृष्ठ क्र. 16 वर, पोस्टाचा Complaint – Settled Reply पृष्ठ क्र. 24 वर दाखल केलेला आहे. तसेच तक्रारकर्त्याच्या वकिलांनी त्यांना तक्रारकर्त्याचे शपथपत्र किंवा इतर साक्षदाराचे शपथपत्र किंवा लेखी युक्तिवाद सदरहू प्रकरणात दाखल करावयाचा नाही अशा आशयाची पुरसिस पृष्ठ क्र. 25 वर दाखल केलेली आहे.
10. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज व तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | विरूध्द पक्ष यांनी सेवेत कसूर केला आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
11. तक्रारकर्ता हा मौजा खैरबोडी, तालुका तिरोडा, जिल्हा गोंदीया येथील रहिवासी असून तो आपले किराणा दुकान स्वतःच्या उपजिविकेकरिता चालवितो. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 1 व 2 यांचेकडून गव्हाचे पीठ हे प्रॉडक्टस् विकत घेण्याकरिता आयसीआयसीआय बँकेत असलेल्या खाते क्रमांक 056005000197 मध्ये रू. 40,000/- जमा केले व त्याबद्दलची पावती पृष्ठ क्र. 12 वर दाखल केलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष 1 व 2 यांचा ग्राहक आहे.
12. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांना वारंवार विनंती करूनही त्यांनी सदर माल तक्रारकर्त्याच्या दुकानात पाठविला नाही आणि वेळोवेळी टाळाटाळ केली. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांना कायदेशीर नोटीस पाठविला. त्याचेही उत्तर विरूध्द पक्ष यांनी दिले नाही अथवा सदरहू प्रकरणात मंचासमक्ष हजर झाले नाहीत किंवा आपले म्हणणे देखील सादर केले नाही. अशाप्रकारे त्यांनी आपल्या सेवेमध्ये कसूर केलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार व तक्रारीसोबत दाखल केलेले संपूर्ण दस्तऐवज पाहता तक्रारकर्त्याची तक्रार एकतर्फी मंजूर होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः एकतर्फी मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला रक्कम रू. 40,000/- परत करावे. या रकमेवर तक्रार दाखल झाल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 16/07/2014 पासून ते संपूर्ण रक्कम तक्रारकर्त्याच्या हातात पडेपर्यंत विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी द. सा. द. शे. 9% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 5,000/- तक्रारकर्त्याला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्त्याला रू. 5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी उपरोक्त आदेश क्र. 2, 3, 4 चे पालन संयुक्तिकरित्या अथवा वैयक्तिकरित्या करावे.
6. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.