सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला ग्राहक विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी शेती मशागतीसाठी फार्म 60, 2000 मॉडेलचा ट्रॅक्टर क्र.एम.एच.13/ जे-6695 स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून अर्थसहाय्य घेऊन खरेदी केला होता. सन 2005 मध्ये तो ट्रॅक्टर विरुध्द पक्ष यांच्याकडे दुरुस्तीकरिता नेला असता, विरुध्द पक्ष यांनी जुन्या ट्रॅक्टरच्या बदल्यात नवीन ट्रॅक्टर घेण्याचे सांगितल्यावरुन दि.12/10/2005 रोजी तो रु.2,51,000/- किंमतीस विरुध्द पक्ष यांना दिला. तसेच त्यांनी वेळोवेळी रु.2,14,500/- जमा केले आणि उर्वरीत रकमेकरिता सिक्युरिटी म्हणून दोन धनादेश दिले आहेत. त्यानंतर विरुध्द पक्ष यांनी त्यांना नवीन ट्रॅक्टर 605 डी.आय. दिला. ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर 2-3 महिन्यामध्येच त्यात बिघड झाला आणि दुरुस्तीकरिता त्यांच्याकडून रु.30,000/- घेण्यात आले. तसेच त्यांच्या ट्रॅक्टरचे आर.टी.टी.सी. पासिंग बूक व पासिंग करुन दिले नाही. त्यांना ट्रॅक्टर उपयोगात न आणता येऊन त्यांचे नुकसान झाले आहे. शेवटी त्यांनी दिलेल्या रकमेची पावती, आर.सी. अन्ड टी.सी. पुस्तक देण्यासह आर.टी.ओ. कार्यालयाकडून ट्रॅक्टरचे पासिंग करुन मिळावे आणि नुकसान भरपाईपोटी रु.2,00,000/- मिळावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांच्या आग्रहामुळे व मैत्रीच्या संबंधामुळे त्यांनी फार्म 60 कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी केला आणि महिंद्रा अन्ड महिंद्रा कंपनीचा 605 मॉडेलचा ट्रॅक्टर उधारीने तक्रारदार यांना विक्री केला आहे. सदर ट्रॅक्टरमध्ये दोष नसल्यामुळे सर्व्हिसिंगकरिता तक्रारदार यांच्याकडून रु.30,000/- स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. ते विमा एजंट किंवा आर.टी.ओ. कार्यालयातील दलाल नाहीत. वाहन खरेदी केल्यानंतर ट्रॅक्टर नोंदणी शुल्क परिवहन कार्यालयामध्ये भरणा करुन व रोड टॅक्स भरणा करण्याची जबाबदारी खरेदीदारावर असते, याची तक्रारदार यांना कल्पना आहे. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांच्या सेवेमध्ये त्रुटी असल्याचे सिध्द होत काय ? नाही. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांचा फार्म 60 कंपनीचा जुना ट्रॅक्टर विरुध्द पक्ष यांनी खरेदी करुन महिंद्रा अन्ड महिंद्रा कंपनीचा 605 मॉडेलचा ट्रॅक्टर तक्रारदार यांना विक्री केल्याविषयी विवाद नाही. तसेच त्या ट्रॅक्टरचे आर.टी.ओ. कडून पासिंग करण्यात आले नसल्याविषयी विवाद नाही. 5. तक्रारदार यांनी ट्रॅक्टर खरेदीचा मोबदला रक्कम विरुध्द पक्ष यांना अदा केल्याविषयी विवाद नाही. विरुध्द पक्ष यांनी ट्रॅक्टरचा ताबा तक्रारदार यांना दिल्याविषयी विवाद नाही. परंतु विरुध्द पक्ष यांनी ट्रॅक्टरचे आर.टी.ओ. पासिंग करुन त्या अनुषंगिक कोणतीही कागदपत्रे तक्रारदार यांना दिलेली नाहीत, अशी तक्रारदार यांची प्रमुख तक्रार आहे. विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार ते विमा एजंट किंवा आर.टी.ओ. कार्यालयातील दलाल नाहीत आणि वाहन खरेदी केल्यानंतर ट्रॅक्टर नोंदणी शुल्क परिवहन कार्यालयामध्ये भरणा करुन व रोड टॅक्स भरणा करण्याची जबाबदारी खरेदीदारावर असते. प्रामुख्याने, तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी ट्रॅक्टरचे आर.टी.ओ. पासिंग करण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलल्याचे निदर्शनास येते. 6. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नोंदणी झाल्याशिवाय वाहन रस्त्यावर चालविता येत नाही, अशी मोटार वाहन कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून नवीन ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर ट्रॅक्टरचे आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन करण्याची जबाबदारी निश्चित कोणाची आहे ? याविषयी कोणतीही स्पष्टता कागदोपत्री सिध्द होत नाही. तसेच ट्रॅक्टर विक्री केल्यानंतर यदाकदाचित विरुध्द पक्ष यांची पासिंग करुन कागदपत्रे देण्याची जबाबदारी असल्याचे गृहीत धरल्यास, त्याप्रमाणे तक्रारदार यांनी ट्रॅक्टरचा ताबा मिळाल्यानंतर विरुध्द पक्ष यांच्याकडे वेळोवेळी कोणताही लेखी पाठपुरावा केला नसल्याचे निदर्शनास येते. योग्य पुराव्याअभावी, विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या ट्रॅक्टरचे आर.टी.ओ. पासिंग करुन त्या संदर्भातील कागदपत्रे देण्याची जबाबदारी स्वीकारल्याचे सिध्द होत नाही. परंतु आर.टी.ओ. कार्यालयाकडे ट्रॅक्टर पासिंगकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे ट्रॅक्टर-विक्रेता या नात्याने तक्रारदार यांना पुरविणे संयुक्तिक ठरते, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. विरुध्द पक्ष यांच्या सेवेमध्ये त्रुटी असल्याचे सिध्द होत नसल्यामुळे तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येते. 2. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/2511)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |