Maharashtra

Ahmednagar

CC/17/28

Shri Digambar Yelhuji More - Complainant(s)

Versus

Vplast - Opp.Party(s)

Shri D D Khandekar

12 Mar 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/17/28
( Date of Filing : 24 Jan 2017 )
 
1. Shri Digambar Yelhuji More
At post Taklimiya Tal Rahuri
Ahmadnager
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Vplast
J-11 M I D C Bhosari Pune 411026
Pune
Maharashtra
2. Shri Vinay Shankar Dingre Throug Vplast
J-11 MIDC Bhosari Pune 411026
Pune
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Shri D D Khandekar, Advocate
For the Opp. Party: K.M. Deshpande, Advocate
Dated : 12 Mar 2020
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – १२/०३/२०२०

(द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.   तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केले आहे की, तक्रारदार हे मौजे टाकळीमियॉं, ता. राहुरी, जि.अहमदनगर येथे कुटुंबियांसह राहतात. तक्रारदार व त्‍यांचे कुटुंबिय शेती व्‍यवसाय करतात व त्‍यांचे शेतीतुन मिळणा-या उत्‍पन्‍नावर गुजराण करतात आहे. तक्रारदार व त्‍यांच्‍या  कुटुंबियांचे मालकीचे राहुरी तालुक्‍यात मौजे टाकळीमियॉं व मौजे त्रिंबकपुर येथे पुढील प्रमाणे शेतजमिन मिळकत आहे.

अ.क्र.

गांव

गट क्र.

क्षेत्र हे.आर

घटकाचे नाव

टाकळीमियॉं

४१/२

१-२०

लताबाई येल्‍हुजी मोरे

टाकळीमियॉं

४७/२

१-२०

दिगंबर येल्‍हुजी मोरे

टाकळीमियॉं

४७/२

१-२१

दत्‍तात्रेय येल्‍हुजी मोरे

त्रिंबकपुर

४९/१/१

१-१७

दिगंबर येल्‍हुजी मोरे

त्रिंबकपुर

४९/१

१-१७

अनिता दिगंबर मोरे

त्रिंबकपुर

४९/२

१-१७

दत्‍तात्रेय येल्‍हुजी मोरे

त्रिंबकपुर

४९/२

१-१७

सविता दत्‍तात्रेय मोरे

 

           सन २०१५ पासून अत्‍यंत कमी पाऊस असल्‍यामुळे दुष्‍काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्‍यामुळे तक्रारदाराने शेततळे करणेसाठी कृषी विभागाशी संपर्क साधला असता त्‍यांनी पाहणी करून वर्षभर पिके घेण्‍यासाठी १ ते दिड कोटी लिटर पाणी साठवण्‍याची क्षमता असणारे शेततळे करावे लागेल व शेततळ्यात पाणी साठवण्‍यासाठी ५०० मायक्रॉन जाडीचा एच.डी.पी.ई. कागद लागेल, असे सांगितले. सामनेवाले क्र.२ हे सामनेवाले क्र.१ सदर फर्मचे चालक, मालक असुन सदर फर्मचा एच.डी.पी.ई. (हाय डेन्‍सीटी पॉलीइथलीन) कागद तयार करण्‍याचा व त्‍याची विक्री करण्‍याचा व्‍यवसाय आहे. सदरचा कागद हा शेत तळ्यात अंथरूण, शेत तळ्यात पाणी साठवण्‍यासाठी वापर केला जातो. तक्रारदाराने सामनेवालेशी संपर्क साधला असता सामनेवाले क्र.२ यांनी ५०० मायक्रॉन जाडीचा कागद दाखवला व माहिती दिली. सदर कागदाचा दर हा रूपये ६०-८४ प्रत्‍येकी चौरस मीटर असे सांगितले तसेच व्‍हॅट, एक्‍साईज डयुटी तसेच कागद शेततळ्यात अंथरून देण्‍यासाठी मजुरी वेगळी लागेल असे सांगितले. सामनेवाले क्र.२ यांनी त्‍यांचे फर्मचे म्‍हणजे सामनेवाले क्र.१ चे कर्मचारी हे प्रत्‍यक्ष जागेवर येऊन शेततळ्याची पाहणी करतील व मगच कागद अंथरून देतील व काम पुर्ण झाल्‍यावर संपर्क साधण्‍यास सांगितला. त्‍याप्रमाणे तक्रारदाराला शेत तळे खोदण्‍यासाठी रक्‍कम रूपये ६,०९,५००/- इतका खर्च आला. तसेच कागद अंथरण्‍यापुर्वीचा खर्च रक्‍कम रूपये ८०,०००/- इतका आला. शेततळी उभारणी झाल्‍यानंतर तक्रारदाराने सामनेवाले क्र.२ यांचेशी संपर्क साधला असता त्‍यांनी कागदाचा दर आधी सांगितल्‍याप्रमाणे द्यावा लागेल असे सांगितले व तो कागद त्‍यांचे कर्मचारी व्‍यवस्थित अच्‍छादित करून देतील त्‍याची मजुरी वेगळी लगेल तसेच ते अखंड कागद तयार करून देतील व त्‍यासाठी आगाऊ रक्‍कम रूपये ३,६२,९२०/- द्यावी लागेल व उर्वरीत रक्‍कम प्रत्‍यक्ष कागद पाठवले वेळी जमा करावी लागले असे सांगितले. त्‍याप्रमाणे तक्रारदाराने रक्‍कम रूपये ३,६२,९२०/- आर.टी.जी.एस. द्वारे सामनेवालेचे बॅंक खात्‍यात दिनांक ३१-१०-२०१५ रोजी वर्ग केली व उर्वरीत रक्‍कम रूपये ३७,६४८/- दिनांक २३-११-२०१५ रोजी पुणे येथे जाऊन सामनेवालेला रोख जमा केली. सामनेवाले क्र.२ यांनी श्री. घटोळ यांचे मार्फत कागद पाठवुन दिला. सदर कागद अंथरण्‍यासाठी दिनांक २४-११-२०१५ रोजी १० मजुर बोलावले. श्री. घटोळ यांनी आणलेल्‍या  कागदाची घडी कागद अंथरण्‍यासाठी मजुरांकरवी उघडली. तेव्‍हा तो अखंड कागद नसुन तो तीन तुकड्यांमध्‍ये असल्‍याचे तक्रारदाराचे निदर्शनास आले. त्‍यावेळेवी श्री. घटोळ यांना विचारले असता त्‍यांनी कागद व्‍यवस्थित जोडून देतील, जोड सुटणार नाही/ लिक होणार नाही याची हमी दिली व श्री.घटोळ यांच्‍या  मार्गदर्शनानुसार शेततळ्यात कागद अंथरला. सदर कागद अंथरल्‍यानंतर तक्रारदाराने चार-पाच दिवसात विद्युत व जनरेटरच्‍या सहाय्याने, बोअर, विहीरीच्‍या पाण्‍याने तसेच पाटाच्‍या पाण्‍याने शेततळे भरले. यासाठी तक्रारदाराला रूपये ४७,५५०/- चे डिझेल लागले. तक्रारदाराला ४२१६ चौ.मी. एच.डी.पी.ई. मायक्रॉन कागद व त्‍याची अंथरण्‍याच्‍या मजुरीसह एकूण किंमत रूपये ४,००,५६८/- लागले व ती रक्‍कम तक्रारदाराने सामनेवाले यांना अदा केलेली आहे. दिनांक ११-१२-२०१५ रोजी शेततळे पाण्‍याने भरलेले असता त्‍या दिवशी सकाळी ७ वा.चे सुमारास अचानक तळ्याचे उत्‍तर बाजुकडील जमिनीपासून ५ फुट उंचीवर ६ ते ७ फुट उंचीवरील शेततळ्याचा कागद लिक झाला. लिक झालेल्‍या/ जोड सुटलेल्‍या भागातुन पाणी तळ्याच्‍या कागदाखाली अन्‍य  भागात गेल्‍यामुळे तळ्याचा बांध तसेच जमिनीखालील भाग खचला व त्‍यामुळे भरावाची काही माती आतील बाजुस पसरली गेली व उत्‍तर बाजुकडील तळ्याचा भराव पुर्णपणे फुटून तक्रारदार यांचे तळ्यालगतचे उत्‍तरेकडील शेतातील उसाकडील क्षेत्रात वाहुन गेला त्‍यामुळे सुमारे २० गुंठे जमिनीत टाकलेला ठिबक सिंचन संचाचे पुर्णपणे नुकसान झालेने ते निकामी झाले. कागद लिक झाल्‍यामुळे पाणी वाहुन गेले व जमिनीत मुरून गेले. त्‍यामुळे साधरण फक्‍त २० टक्‍के पाणी तळ्यात शिल्‍लक राहिले. यामुळे तक्रारदाराचे व त्‍याचे कुटुंबियांचे सुमारे रक्‍कम रूपये १८,१०,०००/- चे नुकसान झाले. याबाबत तक्रारदाराने दिनांक २३-०२-२०१६ रोजी अॅड.शिवाजी कल्‍हापुरे यांचेमार्फत रजि.पोष्‍टाने नोटीस देऊन रक्‍कम रूपये १८,१०,०००/- ची मागणी केली व सामनेवालेशी फोनवर संपर्क साधला. परंतु सामनेवाले यांनी दिनांक १३-०३-२०१६ रोजी खोटे नोटीस उत्‍तर पाठवुन नुकसान भरपाईची रक्‍कम देण्‍याचे नाकारले. त्‍यामुळे तक्रारदाराला सदर तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले आहे.

     तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाले यांनी दुषित सेवा दिल्‍यामुळे तक्रारदाराचे झालेले नुकसान रक्‍कम रूपये १८,१०,०००/- सामनेवालेकडुन तक्रारदारास देण्‍याचा आदेश व्‍हावा, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रूपये २५,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रूपये २५,०००/- सामनेवालेकडुन मिळावा.

३.   तक्रारदाराने तक्रारीसोबत निशाणी २ वर शपथपत्र, निशाणी ६ वर दस्‍तऐवज यादीसोबत एकुण ३६ कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या  आहेत. त्‍यामध्‍ये सामनेवाले यांचे माहितीपत्रक, तक्रारदाराने पैसे जमा केलेची पावती, सामनेवाले यांचे टॅक्‍स इन्‍व्‍हॉईस, डिलेव्‍हरी चालान, पंचनामा करणेसाठी दिलेला अर्ज, घटनास्‍थळाचा पंचनामा, तहसिलदार यांनी कृषि अधिकारी यांना दिलेले पत्र, सामनेवाले यांना पाठविलेली नोटीस, सामनेवालेचे नोटीस उत्‍तर, डिझेल खरेदी बिले, उस वजनाचे पावत्‍या, सातबारा उतारा, जेसीबी व इतर यंत्रे/ वाहन वापरल्‍याबाबतचे बिल, चैनलेन व सिमेंट पोलची बिले इत्‍यादी दाखल केले आहे.  निशाणी १५ वर रिजॉईंडर दाखल केले आहे. निशाणी १७ वर दस्‍तऐवज यादीसोबत तालुका कृषी अधिकारी यांना दिलेला अर्ज, तालुका कृषी अधिकारी यांनी तक्रारदारास अहवालावर दिलेले पत्राची मुळ प्रत, शेततळ्याचे खोदाई दरम्‍यान व नंतरचे छायाचित्रे दाखल केलेली आहेत. निशाणी १९ वर तक्रारदारातर्फे युक्तिवादाचे संक्षिप्‍त टिपण दाखल केले आहे.  

४.   तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्‍यात आली. सदर नोटीस प्राप्‍त होऊन सामनेवाले क्र.१ व २ यांनी संयुक्‍तपणे निशाणी १३ वर खुलासा दाखल केला. त्‍यामध्‍ये त्‍यांनी असे कथन केले आहे की, सामनेवाले कंपनी ही नामांकीत कंपनी असुन कंपनीने एच.डी.पी.ई. लायनींग उत्‍पादन करून महाराष्‍ट्र अगर महाराष्‍ट्राबाहेरील अनेक शेतक-यांना त्‍याचा पुरवठा केलेला आहे. सामनेवाले हे फक्‍त एच.डी.पी.ई. लायनींगचे उत्‍पादन करून बसवण्‍याचे काम करीत असल्‍याने कागदाचा दर्जा हा प्रथमपासुन उत्‍तम होता व आहे. तक्रारदाराने जे शेततळ्याचे काम केलेले होते ते स्‍वतःच केलेले असल्‍याने सदर काम हे निष्‍कृष्‍ठ दर्जाचे होते. शेततळ्याचे केलेले सिव्‍हील वर्क हे मुळातच कुचकामी असल्‍याने शेततळ्यात कापड अंथरतांना ४२१७ चौ.मी. म्‍हणजे ४५३९२ चौ.फु. कापड हे अखंड उत्‍पादीत होऊ शकत नाही, याची कल्‍पना सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिलेली होती. तसेच सदर कापड हे तीन तुकड्यात बनवुन प्रत्‍यक्ष शेततळ्यात अंथरतांना तंत्रांज्ञांमार्फत सदर कापडाची जोडणी करून ते अंथरण्‍यात आलेले होते. तक्रारदाराने शेततळ्यासाठी केलेला खड्डा हा गेरूच्‍या  मातीत केलेला होता. त्‍यामुळे भिंतीस अनेक भेगा पडलेल्‍या होत्‍या व सदर भेगा ह्या सामनेवाले याच्‍या कर्मचा-यांनी तक्रारदाराच्‍या निदर्शनास आणलेल्‍या होत्‍या. परंतु तक्रारदाराने पाणी थोडे दिवसच उपलब्‍ध आहे व त्‍यामुळे थोड्या दिवसांकरीता तात्‍पुरते काम केले आहे असे सामनेवाले यांना सांगितले. वस्‍तुतः सामनेवालेने कापडास जे जोड दिलेले होते त्‍याचप्रकारचे जोड १ कोटीपेक्षा जास्‍त शेततळ्यासाठी अनेक ठिकाणी सामनेवाले यांनी दिलेले आहे. त्‍यामुळे जोड निघण्‍याचा कोणताही प्रश्‍न उद्भवत नाही. यावरून सामनेवाले याने जे प्‍लॅस्‍टीक कागद दिले तो उच्‍च दर्जाचा असुन त्‍याची जोडही कायम होते व आहे व कापडाचे कोणतेही नुकसान झालेले नाही हे तक्रारदाराने त्‍याच्‍या तक्रारीतच नमुद करून कागद व्‍यवस्‍थीत अंथरूण घेतला असे नमुद केले आहे. यावरून सामनेवाले यांच्‍या सेवेत कोणतीही कमतरता नाही, हे स्‍पष्‍ट दिसुन येते. सामनेवालेने दिलेल्‍या प्‍लॅस्‍टीक कागदात कोणताही दोष नव्‍हता याउलट शेततळ्याचे बांधकाम हे सदोष असल्‍याने शेततळ्याचे नुकसान झालेले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करण्‍यात यावी व सामनेवालेस कॉम्‍पेनसेटरी कॉस्‍ट रूपये २५,०००/- तसेच बिलापोटी बाकी रक्‍कम रूपये ३४,६४८/- तक्रारदाराने सामनेवाले यांना देण्‍याचा हुकूम देण्‍यात यावा, अशी विनंती केली आहे.

     सामनेवाले यांनी खुलाश्‍यासोबत नि.१४ वर शपथपत्र दाखल केले आहे.    

५.   तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, शपथपत्र, दस्‍तऐवज सामनेवाले क्र.१ व २ यांचे शपथपत्र त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्र पाहता मंचासमोर खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेण्‍यात येत आहे.

अ.क्र.

मुद्दे

निष्‍कर्ष

१.

तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ?

होय

२.

सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिलेली आहे काय ?

होय

३.

आदेश काय ?

अंतीम आदेशाप्रमाणे

 

मुद्दा क्र.१ -    

६.   तक्रारदाराने सामनेवालेकडुन त्‍याच्‍या शेततळ्यात प्‍लॅस्‍टीक खरेदी व कागद बसविण्‍याकरीता सामनेवाले यांना रक्‍कम दिली, ही बाब तक्रारदाराने निशाणी क्र.६/२ वर दाखल बॅंक पावती, नि.६/४ व ६/५ वर दाखल टॅक्‍स इन्‍व्‍हॉईस यावरून सिध्‍द होत आहे. म्‍हणुन तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहे, असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.   

मुद्दा क्र.२ –

७.   तक्रारदाराने नि.क्र.६ वर दाखल दस्‍त क्रमांक ६/४ व ६/५ याची पडताळणी करतांना असे दिसुन आले की, सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदाराला शेत तलावाकरीता प्‍लॅस्‍टीकचे कागद विकलेले होते, तसेच ते बसविण्‍याकरीता ७५,९३४/- रक्‍कम स्विकारली होती. सदर प्‍लॅस्‍टीक कागद सामनेवाले क्र.२ कडुन तक्रारदाराकडे लावण्‍यात आलेला होता. सामनेवाले क्र.२ यांनी त्‍यांच्‍या कैफीयतीत हे मान्‍य केलेले आहे की, सामनेवाले यांना पुरविलेला प्‍लॅस्‍टीक कागद हा जोडमध्‍ये दिलेला होता. तक्रारदाराने तक्रारीत नमुद केलेप्रमाणे कागदाच्‍या लिक झालेल्‍या/ जोड सुटलेल्‍या भागातुन मोठ्या दबाने पाणी कागदाखाली चारही बाजुस भरावात गेले. याबाबत तक्रारदाराने निशाणी ६/९ वर कामगार तलाठी, कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांनी केलेला घटनास्‍थळाचा पंचनामा दाखल केला आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी सदरच्‍या तळ्याचा अच्‍छादन असलेला आय.एस.आय. मार्क एच.डी.पी. बारदारान्‍याचा जोड जमिनीपासुन साधारण पाच फुट उंचीवर निसटल्‍याचे दिसते. सदर जोडामधुन पाणी व गाळाच्‍या वाहुन जाण्‍यामुळे ०.२० आर क्षेत्रावर गाळ साचलेला आहे व तेथील ठिबक सिंचन संचाच्‍या नळया बुजुन गेलेल्‍या आहे. सदर जोडामधुन पाणी झिरपल्‍याने शेततळ्याच्‍या चारही बाजुच्‍या भरावाच्‍या आतील बाजु सखलित झाल्‍याने दिसुन येते, असे नमुद आहे. सामनेवाले क्र.१ व २ यांनी प्‍लॅस्‍टीक कागद बसविण्‍याकरीता रक्‍कम स्विकारली म्‍हणुन त्‍यांची ही जबाबदारी ठरते की, सदर प्‍लॅस्‍टीक कागद बसविणेवेळी योग्‍य काळजी घ्‍यावी. सामनेवाले क्र.१ व २ यांची ही जबाबदारी आहे की, सदर प्‍लॅस्‍टीक कागद शेत तळ्यात योग्‍य पध्‍दतीने बसविण्‍यात यावा व त्‍याच्‍या जोड ठिकाणी प्‍लॅस्‍टीक कागदाचे कोणतेही नुकसान झाले नाही पाहिजे. तक्रारदाराला सामनेवाले क्र.१ व २ यांनी पुरविलेला प्‍लॅस्‍टीक कागद ५०० मायक्रॉनचा होता किंवा नाही तसेच निम्‍न दर्जाचा होता, ही बाब तक्रारदाराने तज्ञ विशेषज्ञानाच्‍या अहवालाअभावी सिध्‍द करू शकले नाही. सामनेवाले क्र.२ यांचे सुचनांचे पालन न करता पाणी भरल्‍यामुळे शेततळ्याच्‍या  भिंतीवर दाब येऊन सर्व भिंती खचल्‍या, प्‍लॅस्‍टीक कागदामध्‍ये दोष नव्‍हता ही बाबही सामनेवाले यांनी तज्ञ विशेषज्ञानाचा अहवलाअभावी सिध्‍द करू शकले नाही. सामनेवाले यांनी सदरचा कागद जोड कागद दिला होता, ही बाब कैफीयतीत मान्‍य केलेली असुन सामनेवाले यांनी कागद बसविण्‍याकरीता रक्‍कम स्विकारली होती व सामनेवालेने योग्‍यप्रमाणे शेत तलावामध्‍ये प्‍लॅस्‍टीक कागद बसविलेले नव्‍हते व त्‍यानंतर त्‍याची दुरूस्‍ती किंवा त्‍याची पडताळणी करीता सामनेवाले यांना तक्रार प्राप्‍त होऊनसुध्‍दा दुर्लक्ष केले, ही बाब सामनेवाले क्र.१ व २ यांची तक्रारदाराप्रती न्‍युनतम सेवा दर्शविते. सबब मुद्दा क्र.२ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

मुद्दा क्र.३ -    

८.  तक्रारदाराने शेत तलावात पाणी गळुन गेले असल्‍याने त्‍याचे पिकाचे नुकसान रूपये १३,९०,०००/- इतके झाले याबाबत तक्रारदाराने कोणताही दस्‍तऐवज पुरावा प्रकरणात सादर केलेला नाही, ही बाब ग्राह्य धरून तसेच मुद्दा क्र.१ व २ चे विवेचनावरुन खालीलप्रामणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.   

अंतीम आदेश

१.   तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

२.   सामनेवाले क्र.१ व २ यांनी व्‍यक्तिगत किंवा संयुक्‍तरितीने तक्रारदाराचे शेततळ्याचे प्‍लॅस्‍टीकचे कागद लावण्‍याकरीता घेतलेली रक्‍कम रूपये ७५,९३४/- (अक्षरी पंचाहत्‍तर हजार नऊशे चौतीस मात्र) तक्रारदाराला परत करावी.

३.  तक्रारदाराला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रूपये २०,०००/- (अक्षरी वीस हजार मात्र), तसेच तक्रारीचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार मात्र) सामनेवाले क्र.१ व २ यांनी व्‍यक्तिगत व संयुक्‍तरितीने द्यावे.

४.  वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाले क्र.१ व २ यांनी आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन ३० दिवसाच्‍या  आत करावी.

५. तक्रारदारला ‘क’ व ‘ब’ फाईल परत करावी.

६. आदेशाची प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.