तक्रारदार : वकील श्री.सदानंद गवारगुर हजर.
सामनेवाले : --
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*--*-
तक्रार दाखल करुन घेण्यासंबधीचा आदेश
1. तक्रारदारांची तक्रार अशी आहे की, तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून दोन व्हालवो बसेस खरेदी केल्या. परंतु त्यामध्ये मुलभूत दोष असल्याने त्या वेळो वेळी बंद पडत होत्या. या प्रकारे सा.वाले यांनी तक्रारदारांना मुलभूत दोष असलेली वाहने विक्री करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप तक्रारदारांनी केला व सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाईची मागणी केली.
2. प्रस्तुतच्या प्रकरणात दाखल सुनावणीकामी तक्रारदारांचा युक्तीवाद ऑक्टोबर, 2011 मध्ये ऐकण्यात आला होता. त्या सुनावणी दरम्यान प्रस्तुतचा व्यवहार हा वाणिज्य व्यवसायाकामी झालेला आहे अशी शंका व्यक्त केल्यानंतर तक्रारदारांनी तक्रार बदलाचा अर्ज दिला व तक्रारीमध्ये असे कथन केले की, तक्रारदारांनी दोन्ही व्हालवो बसेस वाहतुकीच्या उद्योगाकरीता खरेदी केल्या. परंतु त्या व्यवसायाचे उत्पन्नावर तक्रारदारांचा उदरनिर्वाह चालतो. व तक्रारदारांना त्या शिवाय दुसरे उपजिविकेचे साधन नाही असे तक्रारदारांनी तक्रारीमध्ये कथन केले. त्यानंतर तक्रारदारांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार ही दोन व्हालवो बसेस संदर्भात होती. त्यातही तक्रारदारांनी तक्रारीच्या परिच्छेद क्र.3 मध्ये असे कथन केले आहे की, व्हालवो बसेस चालविणकामी त्यांनी बस चालकाचा परवाना असलेल्या चालकाची याकामी नियुक्ती केलेली आहे. तक्रारीतील वरील कथन असे दर्शविते की, तक्रारदार वरील दोन्ही व्हालवो बसेस स्वतः चालवित नव्हते, तर ते ड्रायव्हरकरवी म्हणजे कर्मचा-याकरवी चालवित होते. तक्रारदारांनी तक्रारीमध्ये असे कथन केलेले आहे की, तक्रारदार तो व्यवसाय स्वयंरोजगार व उपजिविकेचे साधन म्हणून करीत होते. सहाजिकच तक्रारदारानी तक्रारीमध्ये बदल करुन असे भासविण्याचा प्रयत्न केला की, तक्रारदार हे व्हालवो बसेस चालविण्याचा व्यवसाय स्वयंरोजगार व उपजिविकेचे साधन म्हणून करीत असल्याने तो व्यवसाय वाणिज्य व्यवसायाकामी चालविणाला जाणारा व्यवसाय ठरत नाही. परंतु तक्रारदारांच्या तक्रारी मधीलच कथन असे दर्शविते की, तक्रारदार व्हालवो बसेस स्वतः चालवित नसून अन्य चालकामार्फत चालवित आहेत.
4. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या लक्ष्मी इंजिनियरींग वर्क्स विरुध्द पी.एस.जी. इंडस्ट्रीयल इंस्टीटयुट II ( 1995) CPJ 1 ( SC) या प्रकरणातील निकालाप्रमाणे कलम 2(1)(डी)(i) या ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीवरुन व त्यात जोडलेल्या स्पष्टीकरणावरुन असे दिसून येते की, तक्रारदारांनी विकत घेतलेली वस्तु अथवा मशिन तक्रारदारांनी स्वतः चालविली पाहिजे, तरच त्यास स्वयंरोजगाराचे साधन म्हणता येईल. मा.सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकाल पत्राचे परिच्छेद क्र.12 मध्ये तसा अभिप्राय दिलेला आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या लक्ष्मी इंजिनियरींग वर्क्स या प्रकरणातील परिच्छेद क्र.12 मधील अभिप्राय हे स्पष्ट करतात की, ग्राहकाने खरेदी केलेली वस्तु अथवा मशिन ते स्वतः वापरत असेल अथवा चालवित असेत तरच ते स्वयंरोजगाराचे साधन होऊ शकते. प्रस्तुतचे प्रकरणामध्ये तक्रारदारांनी खरेदी केलेल्या व्हालवो बसेस तक्रारदार आपल्या चालकांमार्फत चालवित होते.
5. त्यातही तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत प्रवासी वाहतुक परवान्याची प्रत हजर केलेली आहे. त्यामध्ये तक्रारदारांच्या आस्थापनेचे नांव स्वामी ट्रॅव्हल्स् असे नमुद असून वाणिज्य व्यवसाय असा शिर्षक आहे. व्यवसायाचे स्वरुप या रकान्यामध्ये हॉटेल बुकींग आणि पॅकेज टूर असे नमुद केलेले आहे. या दरम्यान तक्रारदारांनी व्यवसायाचा परवाना देखील व्यवसायाकामी घेतलेला असून तक्रारदारांची नोंदणी आस्थापना आहे. ही बाब देखील असे दर्शविते की, तक्रारदारांनी खरेदी केलेली वाहने वाणिज्य व्यवसायाकामी खरेदी केलेली होती.
6. वरील परिस्थितीमध्ये तक्रारदारांनी खरेदी केलेली वाहने वाणिज्य व्यवसायाकामी खरेदी केलेली असल्याने तक्रारदार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(डी)(i) प्रमाणे ग्राहक या संज्ञेत बसत नाही.
7. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार दाखल करुन घेण्यात येत नाही, व ती ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12(3) प्रमाणे रद्द करण्यात येते.
2. आदेशाच्या प्रमाणित प्रती तक्रारदारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.