द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्यक्ष
1) ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे -
दि.11/12/09 रोजी तक्रारदार चर्चगेट येथील सामनेवाला यांचे वोडाफोन गॅलेरीत सिमकार्ड घेण्यासाठी गेल्या त्यावेळी तेथे उपस्थित असलेले कर्मचारी श्री.मोहसीन यांनी तक्रारदारांची फॉर्मवर सही घेवून तक्रारदारांचा फोटो त्या फॉर्मवर चिटकवला व त्यावर तक्रारदारांची सही घेतली, तसेच तक्रारदारांच्या पॅनकार्डची छायांकीत प्रत त्या अर्जास जोडली. त्यानंतर दि.15/12/09 रोजी तक्रारदारांना त्यांचे मोबाईलवर एसएमएस आला व त्या एसएमएसमध्ये तक्रारदारांनी मोबाईल नं.9769718667 च्या संदर्भात फोटो व पॅनकार्ड घेवून सामनेवाला यांचे कर्मचारी श्री.मोहसीन जहांगीर खान यांची भेट घ्यावी असे कळविले. त्याप्रमाणे तक्रारदार वोडाफोन गॅलेरीत गेल्या व तेथील कर्मचारी श्री.मोहसीन व कु.रेखा यांना भेटल्या. कु.रेखा यांनी तक्रारदारांची नवीन फॉर्मवर सही घेवून त्या फॉर्मवर तक्रारदारांचा फोटो चिटकवून त्यावर तक्रारदारांची सही घेतली व पॅनकार्डची छायांकीत प्रत तक्रारदारांकडून घेवून ती फॉर्मसोबत जोडली.
2) तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यावेळी एकच सिमकार्डसाठी त्यांचे दोन फॉर्म, दोन फोटोग्राफ्स् का घेतले ? असे विचारले असता कर्मचारी कु.रेखा यांनी कंपनीने एका फॉर्मवरील सही बरोबर असल्याचे मान्य केल्यानंतर दुसरा फॉर्म त्यांना परत देण्यात येईल असे सांगितले. दि.15/12/2009 पासून तक्रारदार त्यांचा दुसरा फॉर्म परत मिळण्याची वाट पाहत होते. तक्रारदारांनी वारंवार विनंती करुनही त्यांचा दुसरा फॉर्म सामनेवाला यांनी परत केला नाही म्हणून तक्रारदार सामनेवाला यांचे मॅनेजरला भेटले. परंतु काही उपयोग झाला नाही.
3) सामनेवाला यांच्या कर्मचा-यांनी तक्रारदारांना दिलेला शब्द पाळला नाही. सामनेवाला यांचे कर्मचा-यांनी तक्रारदारांकडून बेकायदेशीररित्या कागदपत्रे जमा करुन ती काही कारण नसताना त्यांच्या ताब्यात ठेवली आहेत. तक्रारदारांनी विनंती करुनही ती त्यांना परत केली नाहीत त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास सहन करावा लागला.
4) तक्रारदारांनी दि.17/12/09 व दि.07/01/2010 रोजी सामनेवाला यांचे चर्चगेट येथील वोडाफोन गॅलेरी, तसेच सामनेवाला यांचे मॅनेजिंग डायरेक्टरला नोटीस पाठविल्या. सामनेवाला यांचे चर्चगेट गॅलेरीतील कर्मचारी श्री.मोहसीन यांनी तक्रारदारांच्या दि.17/12/2009 रोजीच्या नोटीसीला उत्तर पाठविले ते खालील प्रमाणे -
‘कागदपत्रांचे दोन संच घेतले होते त्यापैकी एक संच नष्ट करण्यात आला. सबब सामनेवाला यांचेकडे कागदपत्रांचा फक्त एकच संच राहिला आहे.’ सामनेवाला यांचे कर्मचारी कु.रेखा यांनी तक्रारदारांना दि.16/01/2010 रोजी कळविले की, ‘त्यांचा जो फोटो खराब झाला होता तो नष्ट करण्यात आला आहे.’
5) तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी भरुन दिलेला फॉर्म व त्यांचे फोटो ही त्यांची वैयक्तीक प्रॉपर्टी आहे व सदरची प्रॉपर्टी सामनेवाला यांना नष्ट करण्याचा काहीही अधिकार नव्हता. सामनेवाला यांनी त्यांचे कागदपत्रांचा एक संच त्यांना परत देणे आवश्यक होते. तसा तो संच परत न दिल्यामुळे तक्रारदारांना मानसिक यातना सहन करावी लागली. तक्रारदारांनी भरुन दिलेला फॉर्म, त्यांचे फोटो व पॅनकार्डच्या छायांकीत प्रतीचा गैरवापर होईल अशी तक्रारदारांना भिती वाटते.
6) तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे दि.25/12/09 रोजीच्या बिलामध्ये 3 एसएमएसचा उल्लेख करण्यात आला आहे. वास्तविक वरील तीनही एसएमएस तक्रारदारांनी पाठविले नव्हते. तरीसुध्दा सदर एसएमएसचे चार्जेस तक्रारदारांकडून बेकायदेशीरपणे वसुल करण्यात आले. दि.11/12/2009 पासून तक्रारदारांनी याबाबत मौन पाळले असून सामनेवाला यांचेकडून होणारा त्रास सहन करीत आहेत. म्हणून तक्रारदारांना सदर तक्रारअर्ज दाखल करणे भाग पडले.
7) सामनेवाला कंपनीने तक्रारदारांना त्यांनी भरुन दिलेला फॉर्म व फोटो त्यांना परत करावा असा सामनेवाला यांना आदेश करावा अशी विनंती केली आहे. तक्रारदारांनी त्यांना झालेल्या त्रासाबद्दल नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.75,000/- व या अर्जाच्या खर्चाची मागणी सामनेवाला यांचेकडून केली आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत कागदपत्रांच्या प्रती दाखल करुन तक्रारअर्जाच्या पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
8) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी एकत्रितरित्या कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्य केली. सामनेवाला यांचे म्हणण्याप्रमाणे तक्रारअर्ज गैरसमजूतीवर आधारलेला असून तक्रारअर्जास कोणतेही कारण घडलेले नाही त्यामुळे तक्रारअर्ज रद्द होणेस पात्र आहे. सामनेवाला यांचे सेवेत कसलीही कमतरता नाही. टेलिकॉन रेग्युलॅरिटी अॅथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या नियमांच्या अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन केले जाईल या अटीवर भारत सरकारने सामनेवाला कंपनीस मोबाईल टेलिकॉम सर्व्हीसेससाठी लायसन्स दिलेले आहे. सामनेवाला हे टेलिकॉम रेग्युलॅरिटी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (टी.आर.ए.पी.) च्या नियमांचे व अटी आणि शर्तींचे काटेकोर पालन करत असतात. राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेवून मोबाईल टेलिफोनची सेवा देण्यापूर्वी त्या व्यक्तीची ओळख पटण्याची योग्य ती शहानिशा करणे आवश्यक असते. सामनेवाला यांचा फॉर्म बरोबर व बिनचुकपणे भरणे आवश्यक असते. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी सामनेवाला मोबाईल टेलीफोन सर्व्हीसचे वतीने सदर व्यक्तीचा फोटो व पॅनकार्डची मागणी करत असतात व नंतर त्यासंदर्भात योग्य ती चौकशी केल्यानंतर दिलेली माहिती बरोबर आहे असे आढळून आल्यास सदर व्यक्तीस मोबाईल टेलिफोन सेवा उपलब्ध करुन दिली जाते. या कामी राष्ट्रीय सुरक्षतेचा प्रश्न विचारात घेवून सरकारी नियमांचे काटेकोर पालन करुन देण्याच्या उद्देशाने सामनेवाला यांनी तक्रारदारांना नवीन फॉर्म भरुन द्यावा व त्यासोबत त्यांचा फोटो पॅनकार्डची कॉपी सादर करण्यास सांगितले. तक्रारदारांनी सुरुवातीस भरुन दिलेला फॉर्म बिनचुक व बरोबर नव्हता म्हणून तक्रारदारांकडून दुसरा फॉर्म भरुन घेणेत आला व त्यानंतर तक्रारदारांनी पूर्वी सादर केलेला फॉर्म पॅनकार्डची छायांकीत प्रत व तक्रारदारांचा फोटो जो खराब झाला होता तो नष्ट करण्यात आला. सामनेवाला या सरकारच्या सिनिअर कौन्सिल असल्यामुळे त्यांना वरील नियमांची माहिती असलीच पाहीजे. वास्तविक तक्रारदारांनी क्षुल्लक कारणावरुन सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल करणे आवश्यक नव्हते.
9) तक्रारअर्जातील आरोप सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्यांच्या कागदपत्रांचा एक संच त्यांच्या सहीची खात्री पटल्यानंतर परत केला जाईल हा स्पष्टपणे नाकारला आहे. तक्रारदारांनी त्यांचे दोन कागदपत्रांचे संच सामनेवाला यांना एकाच वेळी दिले नव्हते ही बाब तक्रारदारांना मान्य आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी सुरुवातीस भरुन दिलेला फॉर्म हा अस्पष्ट व चुकीचा होता. त्यामुळे त्यांच्याकडून दुसरा कागदपत्रांचा संच देणेत आला व पहिला कागदपत्रांचा संच नष्ट करणेत आला असे तक्रारदारांना स्पष्टपणे सांगण्यात आले.
10) सरकारी नियमाप्रमाणे मोबाईल टेलिफोन सर्व्हीस पुरविण्यासाठी कागदपत्रांचा एकच संच पुरेसा असतो. तथापि, तक्रारदारांनी दिलेला पहिला कागदपत्रांचा संच अस्पष्ट व चुकीचा असल्यामुळे तो नष्ट करण्यात आला. तक्रारदारांनी दाखल केलेल्या दि.17/12/09 च्या पत्रावरुन असे स्पष्ट होते की, त्या पत्रामध्ये सामनेवाला यांनी तक्रारदारांना दोन गोष्टी कळविल्या होत्या त्या म्हणजे त्यांनी दिलेल्या कागदपत्रांच्या दोन संचापैकी एक संच नष्ट करणेत आला असून सामनेवाला यांचेकडे फक्त एकच कागदपत्रांचा संच आहे. या पत्रामध्ये दि.16/01/2010 चा सामनेवाला यांनी लिहिलेला शेरा खालील प्रमाणे आहे -
“Photograph which was spoiled, destroyed”
सामनेवाला यांनी तक्रारदारांना दुस-या कागदपत्राचा संच न देण्यासंबंधीचे कारण तत्परतेने कळविले होते त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास होण्याचे काहीही कारण नव्हते. तक्रारदारांनी दिलेला कागदपत्रांचा एक संच सामनेवाला यांनी नष्ट केला असल्यामुळे त्याचा दुरुपयोग होण्याची काडीमात्र शक्यता नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारांना याबाबत त्यांच्या कागदपत्रांचा एक संच नष्ट करण्यात आला असल्याचे स्पष्टपणे कळविले होते त्यामुळे तक्रारदारांना याबाबतील काळजी वाटण्याचे कारण नव्हते.
11) तक्रारदारांनी सामनेवाला यांना दिलेला कागदपत्रांचा एक संच ही तक्रारदारांची प्रॉपर्टी आहे हे तक्रारदारांचे म्हणणे सामनेवाला यांनी नाकारले आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी किंवा इतर ग्राहकांनी जे फॉर्म भरुन दिलेत त्याची छपाई सामनेवाला यांनीच करुन घेतलेली आहे. त्यामुळे न वापरलेला किंवा चुकीने भरलेला फॉर्म हे सामनेवाला यांची प्रॉपर्टी असते. कोणत्याही योग्य कारणाशिवाय तक्रारदारांनी त्यांच्या फॉर्मचा गैरवापर होणेची भिती व्यक्त केलेली आहे.
12) तक्रारदारांनी तक्रारअर्ज एस.एम.एस.संबंधी केलेला उल्लेख मोघम स्वरुपाचा आहे. तक्रारअर्जात नमूद केलेले तीन एस.एम.एस. तक्रारदारांनी दि.11/12/09 रोजी पाठविले होते. तक्रारदारांनी त्यांचे सिमकार्ड दि.11/12/09 ला अॅक्टीवेट केले हे स्वतः मान्य केले आहे. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या मोबाईल फोनची रिंग सायलेंट मोडवर ठेवली तरीही त्याची रिंग सतत वाजत असते. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांची जबाबदारी फक्त सिमकार्ड पुरतीच मर्यादीत असते. सामनेवाला हॅण्डसेट तयार करत नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी याबाबतीत केलेले आरोप चुकीचे आहेत.
13) तक्रारदारांचा कागदपत्रांचा एक संच सामनेवाला यांनी त्यांच्या नेहमीच्या पध्दतीप्रमाणे नष्ट केलेला असल्यामुळे तक्रारदारांचा सदर संच परत करणे शक्य नाही. नष्ट करण्यात आलेला फॉर्म अस्पष्ट व चुकीच्या पध्दतीने भरलेला होता. त्यांचा पूर्वीचा फोटो खराब झाला होता व मूळ पॅनकार्डची छायांकीत प्रत फॉर्मसोबत जोडली नव्हती त्यामुळे तक्रारदारांनी तक्रारअर्जात केलेले आरोप खोडसाळपणे व चुकीच्या पध्दतीने केलेले असल्यामुळे सदर तक्रारअर्ज खर्चासहित रद्द करणेत यावा अशी सामनेवाला यांनी विनंती केली आहे.
14) तक्रारदारांनी प्रतिनिवेदन दाखल करुन सामनेवाला यांनी केलेले आरोप नाकारले आहेत. या कामी सामनेवाला यांचे वतीने शेशी रेखा यमला यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले. या कामी तक्रारदारांनी लेखी युक्तीवाद दाखल केला तसेच सामनेवाला यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. युक्तीवादाच्या वेळी तक्रारदार स्वतः व सामनेवाला यांचेवतीने वकील श्री.इ.पी.केशवानी यांचा तोंडी युक्तिवाद ऐकला.
15) सामनेवाला वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी प्रथम मोबाईल टेलिफोन सेवेसाठी दिलेला अर्ज अस्पष्ट व बरोबर भरलेला नव्हता त्यामुळे सामनेवाला यांच्या विनंतीवरुन तक्रारदारांनी त्यांचा दुसरा फॉर्म व त्यावर फोटा चिटकवून पॅनकार्डच्या छायांकीत प्रतीसह दाखल केला. तक्रारदार हया सिनिअर कॉन्सिल आहेत. त्यांनी कागदपत्रांचा दुसरा संच दिला त्यावेळी पूर्वी दिलेला कागदत्रांचा संच अस्पष्ट व बरोबर नसल्याची खात्री केली होती. तक्रारदारांचा त्या फॉर्मवर चिटकविलेला फोटो खराब झाला होता हे तक्रारदारांनी नाकारले नाही. तक्रारदारांकडून कागदपत्रांचा दुसरा संच घेतल्यानंतर तक्रारदारांचे सिमकार्ड अॅक्टीवेट करण्यात आले व तक्रारदारांनी आधी भरुन दिलेला कागदपत्रांचा संच नष्ट करण्यात आला. नियमाप्रमाणे सध्या सामनेवाला यांचेकडे तक्रारदारांच्या कागदपत्रांचा एकच संच असल्यामुळे तक्रारदारांचे कागदपत्र त्यांना परत करावेत ही मागणी मान्य करता येत नाही. तक्रारदारांनी सुरुवातील दिलेला कागदपत्रांचा संच नष्ट करण्यात आलेल्या असल्यामुळे तक्रारदारांचा कागदपत्रांचा गैरवापर होण्याची तक्रारदारांच्या मनातील भिती अनाठायी व गैरवाजवी आहे. युक्तीवादाच्या वेळेस तक्रारदार यांनी असे प्रतिपादन केले की, सदर तक्रारअर्ज त्यांनी सामनेवाला यांचेकडे दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर होवू नये यासाठी मुख्यतः दाखल केलेला आहे. जर त्यांच्या कागदपत्रांचा दुरुपयोग होणार नाही असे सामनेवाला यांनी अंडरटेकींग दिले तर त्यांना सदर तक्रारअर्ज पुढे चालविणेस स्वारस्य नाही असे सांगितले. तक्रारदारांनी वरील भिती व्यक्त केल्यानंतर सामनेवाला यांचे वकीलांनी तक्रारदार यांच्या कागदपत्रांचा गैरवापर होणार नाही याबद्दल सामनेवाला हे या मंचासमोर अंडरटेकींग देण्यास तयार आहेत असे सांगितले. त्याप्रमाणे सामनेवाला यांनी या मंचासमोर शंभर रुपयांच्या स्टँम्प पेपरवर अंडरटेकींग दाखल केले आहे. सामनेवाला यांनी श्री.रॉबीन फर्नांडिस, अॅसिस्टंट मॅनेजर, लिगल यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. त्यात त्यांनी असे नमूद केले आहे की, तक्रारदारांनी सुरुवातील भरुन दिलेला फॉर्म चुकीचा होता व त्यामुळे तो नष्ट करण्यात आला. सामनेवाला यांनी या मंचासमोर दिलेल्या अंडरटेकींगमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, तक्रारदारांच्या कागदपत्रांचा एक संच नष्ट केलेला आहे त्यामुळे त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाही व जर यदाकदाचित दूरुपयोग झाला तर त्याची जबाबदारी सामनेवाला घेण्यास तयार आहे. सामनेवाला यांनी वरीलप्रमाणे तक्रारदारांच्या सुचनेप्रमाणे अंडरटेकींग दाखल केल्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाला यांच्या अंडरटेकींगवर समाधानी नाही असे सांगून या तक्रारअर्जाचा निकाल मेरिटवर करावा असे सांगितले.
16) तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्या दि.11/12/09 रोजी सामनेवाला यांचे चर्चगेट येथील वोडाफोन गॅलरीत मोबाईल टेलिफोन सेवा (सिमकार्ड घेण्यासाठी) गेल्या होत्या व त्यावेळी त्यांनी तेथे एक फॉर्म भरुन दिला. त्यावर स्वतःचा फोटो चिटकवला व त्यासोबत पॅनकार्डची छायांकीत प्रत जोडली. सामनेवाला यांनी तक्रारदारांना मोबाईल क्र.9769718667 दिला. त्यानंतर तक्रारदार वोडाफोन गॅलरीत गेल्यानंतर तेथील कर्मचारी श्री.मोहसीन व कु.रेखा यांनी तक्रारदारांचा दुसरा फॉर्म, दुसरा फोटो भरुन घेऊन त्यावर तक्रारदारांचा फोटो चिटकवला व पॅनकार्डची छायांकीत प्रत त्यासोबत जोडली. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे एक सिमकार्डसाठी त्यांचे दोन फॉर्म, दोन फोटो सामनेवाला यांना घेण्याची आवश्यक नव्हती. याबाबत त्यांनी सामनेवाला यांचेकडे चौकशी केल्यानंतर तक्रारदारांच्या सहीची शहानिशा झाल्यानंतर तक्रारदारांचा एक फॉर्म त्यांना परत करण्यात येईल असे सांगण्यात आले. तक्रारदार सामनेवाला यांचेकडून एक फॉर्म परत मिळेल याची दि.15/12/2009 पासून वाट पाहत होत्या. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांनी दिलेला शब्द पाळला नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारांना एक कागदपत्राचा संच परत दिला जाईल असे आश्वासन दिले होते हा तक्रारदारांचा आरोप स्पष्टपणे सामनेवाला यांनी नाकाराला आहे. तसेच तक्रारदारांनी भरुन दिलेला फॉर्म संच ही त्यांची प्रॉपर्टी आहे हेही स्पष्टपणे नाकारले आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांना दोन्हीवेळा भरुन दिलेले फॉर्म हे सामनेवाला कंपनीने छपाई करुन घेतलेले फॉर्म होते. सामनेवाला कंपनीने तक्रारदारांना त्यांच्या कागदपत्रांचा संच परत देता येणार नाही हे तत्परतेने कळविले होते व त्यासाठी दिलेले कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या फॉर्मवर चिटकवलेला फोटो खराब झालेला होता व सदरचे कागदपत्र नष्ट करण्यात आले असे कळविले होते. तक्रारदारांनी त्यांचा फॉर्म बिनचुकपणे भरला नव्हता असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे. सामनेवाला यांचे वकीलांनी याकामी तक्रारदारांचा तक्रारअर्ज निदर्शनास आणून सदरचा तक्रारअर्जावर बारा ठिकाणी व्हाईटनर लावल्याचे निदर्शनास आणून तक्रारदार निष्काळजीपणाने काम करतात असा आरोप केला.
17) तक्रारदार हया सरकारच्या सिनिअर कौन्सिल आहेत. त्यांना एका सिमकार्डसाठी एकच फॉर्म द्यावा लागतो याची माहिती होती. ज्यावेळी त्यांनी दुसरा फॉर्म भरुन दिला त्यावेळी त्यांना पूर्वीचा फॉर्म चुकीचा भरला होता याची खात्री झाली असली पाहिजे व त्या फॉर्मवरील त्यांचा फोटो खराब झाल्याचे त्यांनी पाहिले असावे त्याशिवाय त्यांनी दुसरा फॉर्म भरुन त्यावर त्यांचा फोटो चिटकवून दिला नसता. सामनेवाला यांचे कर्मचारी शिश रेखा यमला यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, तक्रारदारांचा फॉर्म व्हेरिफीकेशनसाठी त्यांच्याकडे आला त्यावेळी तो फॉर्म योग्यरितीने भरला नव्हता असे त्यांचे निदर्शनास आले त्यामुळे नवीन फॉर्मची आवश्यकता असल्यामुळे तक्रारदारांकडून नवीन फॉर्म भरुन घेण्यात आला व पूर्वीचा फॉर्म नष्ट करण्यात आला.
18)या प्रकरणातील वस्तुस्थितीचा साकल्याने विचार करता तक्रारदारांनी गैरसमजुतीने क्षुल्लक कारणावरुन सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे असे दिसून येते. सामनेवाला यांनी तक्रारदारांकडून दुसरा फॉर्म भरुन घेतला. त्यानंतर सामनेवाला कंपनीने तक्रारदारांचा पहिला फॉर्म नष्ट केला असे तक्रारदारांना कळविले तसेच सामनेवाला यांचे कर्मचा-यांनी प्रतिज्ञापत्रावर तक्रारदारांचा पहिला फॉर्म नष्ट करण्यात आला असेही सांगितले. तरीसुध्दा तक्रारदारांनी त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर होईल अशी अनाठायी भिती व्यक्त केली त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या कागदपत्रांचा गैरवापर होणार नाही व झाल्यास सामनेवाला जबाबदार राहतील असे शंभर रुपयांच्या स्टँम्प पेपवर अंडरटेकींग दिले आहे. या सर्व बाबी विचारात घेता तक्रारदारांना सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता सिध्द करता आली नाही असे म्हणावे लागते. सबब तक्रारदारांना तक्रारअर्जात मागितलेली दाद सामनेवाला यांचेकडून मागता येणार नाही.
19) वर नमूद केलेल्या कारणास्तव तक्रारअर्ज रद्द होणेस पात्र असल्यामुळे खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे -
अं ति म आ दे श
1.तक्रार क्रमांक 23/2010 रद्द करणेत येतो.
2.खर्चाबद्दल आदेश नाही.
3. सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षकारांना देणेत यावी.