::: आ दे श प त्र :::
मा. अध्यक्षा, सौ. एस.एम. उंटवाले यांनी निकाल कथन केला :-
सदर प्रकरणात तक्रारकर्त्याचा युक्तीवाद ऐकला. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांना मंचाची नोटीस बजाविल्यानंतर देखील ते गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने पारित केला होता व प्रकरण जेव्हा विरुध्दपक्ष क्रमांक 2 च्या युक्तीवादाकरिता होते. त्यावेळेस तक्रारकर्ते व विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी संयुक्त पुरसिस रेकॉर्डवर दाखल केली, त्यातील नमूद मजकूर असा आहे.
“ तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्रमांक 2 ( आयडिया सेल्युलर ) विदयमान मंचास कळवितात ते येणेप्रमाणे की,
1) तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्रमांक 2 मध्ये आपसात बोलणी होऊन त्यांच्यात प्रकरण आपसात करण्याचे ठरले व त्या अनुषंगाने विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्याच्या सदर वादातील मोबाईल क्रमांक 9604888555 पूर्ववत सुरु करुन देण्याचे मान्य केले आहे व त्या अटींवर तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचेविरुध्द मागितलेली दाद परत घेत आहे.
2) विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्याचे नावाने कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण करुन व तसेच विरुध्दपक्ष क्रमांक 2 मागतील ते आवश्यक कागदपत्रे पुरविल्यावर कोणतीही अतिरिक्त रक्कम न आकारता उपरोक्त मोबाईल क्रमांक पूर्ववत सुरु करण्याची हमी दिलेली आहे. म्हणून तक्रारकर्ता त्याचे विरुध्दपक्ष क्रमांक 1 विरुध्द असलेली दाद व मागणीला बाधा न येता विरुध्दपक्ष क्रमांक 2 चे विरुध्द उपरोक्त प्रकरणात मागितलेली दाद मागे घेत आहे.
3) ठरल्याप्रमाणे तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्रमांक 2 एकमेकांविरुध्द उपरोक्त प्रकरणासंबंधी कोणतेही दावे प्रतिदावे करणार नाही व प्रकरण फक्त तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्रमांक 2 मध्ये पूर्णपणे मिटले आहे.
सदर प्रकरण विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचे विरुध्द सुरु ठेवून निकाली लावल्यास विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांची काही हरकत नाही. करिता ही पुरसीस. ”
सबब, तक्रारकर्ते यांची प्रार्थना क्रमांक 1 ची पूर्तता विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडून झालेली आहे. परंतु, तक्रारकर्ते यांना जो शारिरीक, आर्थिक व मानसिक त्रास झाला व सदर प्रकरण दाखल करावे लागले त्यापोटीची नुकसान भरपाई, या प्रकरणाच्या न्यायिक खर्चासह ₹ 5,500/- ईतकी रक्कम विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्त्यास दयावी, असे आदेश पारित केल्यास न्यायोचित होईल. म्हणून अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
अं ति म आ दे श
तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
दिनांक 13-01-2016 रोजीच्या तक्रारकर्ते व विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी दाखल केलेल्या पुरसिसनुसार, विरुध्दपक्ष क्रमांक 2 विरुध्द कोणतेही आदेश पारित नाही.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी या प्रकरणाच्या न्यायिक खर्चासह ₹ 5,500/- ( अक्षरी रुपये पाच हजार पाचशे फक्त ) रक्कम दयावी.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांचे आत आदेशाचे पालन करावे.
उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्य देण्यात यावी.