(घोषित दि. 30.11.2010 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष) गैरअर्जदारानी उत्पादीत व विक्री केलेले पी.व्ही.सी. पाईप निकृष्ट असल्याच्या आरोपावरुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याने स्वत:च्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 1 विवेक पॉलीमर्स यांनी उत्पादीत केलेले 110 एम.एम. पी.व्ही.सी.पाईपचे 185 नग गैरअर्जदार क्रमांक 2 दिपक मशिनरी स्टोअर्स यांच्याकडून दिनांक 29.02.2010 रोजी खरेदी केले. सदर पाईप त्याने शेतामध्ये जमिनीचे खाली गाडले व पाईपलाईन केली. परंतू सदर पाईपलाईन मधून त्याने पाणी सोडले असता पाईपला ठिक-ठिकाणी गळती लागली. म्हणून त्याने जमीन उकरुन पाईपची पाहणी केली त्यावेळी पाईप अनेक ठिकाणी फुटल्याचे व त्यास छिद्र पडल्याचे दिसले. सदर बाब त्याने त्वरीत गैरअर्जदार क्रमांक 2 यास कळविली. गैरअर्जदार क्रमांक 2 याने पाईपचे उत्पादन गैरअर्जदार क्रमांक 1 ने केल्यामुळे त्यास संपर्क साधावा असे सांगितले. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 कडे संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. गैरअर्जदार क्रमांक 1 ने उत्पादीत केलेले पी.व्ही.सी. पाईप निकृष्ट दर्जाचे असुन पाईपलाईनला छिद्र पडल्यामुळे तो शेतीला पाणी देऊ शकला नाही. म्हणून त्याचे नुकसान झाले. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास गैरअर्जदाराकडून पाईपची किंमत रुपये 98,436/-, पाईपलाईन खोदकाम मजूरी रुपये 37,000/-, बागायती पिकाचे नुकसान रुपये 30,000/- व मानसिक त्रास आणि वाहतुक खर्च रुपये 20,000/- असे एकूण रुपये 1,85,436/- देण्यात यावेत. गैरअर्जदार क्रमांक 1 विवेक पॉलीमर्स प्रा.लि. यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराची तक्रार खोटी आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 कडून पाईप खरेदी केल्याचे त्यास मान्य नाही. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 कडून कोणते पाईप खरेदी केले याबाबत त्यास काहीही माहिती नाही. गैरअर्जदाराचे म्हणणे असे आहे की, तो उत्कृष्ट दर्जाचे पाईप उत्पादीत करतो. त्यांनी उत्पादीत केलेल्या पाईपमध्ये कोणताही दोष नाही. दिपक मशिनरी स्टोअर्स यांनी विक्री केलेले पाईप उत्कृष्ट दर्जाचे होते. पाईपलाईनमध्ये नियमाप्रमाणे सेप्टी व्हॉल्वचा उपयोग करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणेच पाईप शेताच्या स्लोप प्रमाणे लावणे आवश्यक आहे. तक्रारदाराने बहूधा या बाबींचा उपयोग केला नसावा म्हणून त्याचे नुकसान झाले असावे. म्हणून तक्रारदाराला नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्रमांक 1 वर नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदार क्रमांक 1 ने केली आहे. गैरअर्जदार क्रमाक 2 दिपक मशिनरी स्टोअर्स यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने त्यांचेकडून दिनांक 29.02.2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 ने उत्पादीत केलेले पाईप खरेदी केले होते. परंतू तक्रारदाराने सदर पाईप त्याच्या शेतात जमीन खोदून लावले होते व पाईपलाईनमध्ये पाणी सोडले असता ठिक-ठिकाणी गळती लागली, ही बाब त्यास मान्य नाही. तक्रारदाराने त्यास पाईप खराब निघाल्याची माहिती दिल्याचे त्यास मान्य नाही. तक्रारदाराने पाईप खरेदी केल्यानंतर तो काही दिवसांनी आला व त्याने पाईपलाईनला गळती लागल्याचे सांगितले. म्हणून गैअर्जदार क्रमांक 1 शी त्याबाबत संपर्क साधला असता त्यांनी केवळ पाहू असे सांगितले. परंतू गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्यानंतर प्रतिसाद दिला नाही. नंतर गैरअर्जदार क्रमांक 1 कंपनीचे मालक स्वत: आले व त्यांनी वस्तुस्थिती पाहील्यानंतर 100/- रुपयाच्या बॉंडवर झालेली नुकसान भरपाई देऊ असे लिहून दिले. परंतू बॉंडवर संबंधित अधिका-याने चुकीचे नाव दर्शवून सही केली. गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराला विक्री केलेले पाईप्स त्याने उत्पादीत केलेले नसुन ते पाईप गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी उत्पादीत केलेले आहेत. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यास ते जबाबदार नाही. म्हणून त्याने ही तक्रार फेटाळावी अशी मागणी केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1.तक्रारदार हे सिध्द् करु शकतो का की, गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी उत्पादीत केलेले पी.व्ही.सी. पाईप निकृष्ट दर्जाचे आहेत ? नाही 2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदाराच्या वतीने अड.एस.ई.खटकळ आणि गैरअर्जदार क्रमांक 1 च्या वतीने अड.व्ही.जी.चिटणीस यांनी युक्तीवाद केला. गैरअर्जदार क्रमांक 2 गैरहजर. तक्रारदाराने दिनांक 29.02.2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 विवेक पॉलीमर्स यांनी उत्पादीत केलेले पी.व्ही.सी. पाईप गैरअर्जदार क्रमांक 2 दिपक मशिनरी स्टोअर्स यांच्याकडून खरेदी केले होते ही बाब पावती नि. 3/2 वरुन स्पष्ट दिसून येते. तक्रारदाराने सदर पाईप त्याच्या शेतामध्ये जमिनीखाली 3 ते 4 फुट गाडल्यानंतर त्यामधून पाणी सुरु केले असता पाणी गळाल्याचे निदर्शनास आले. म्हणून त्याने जमीन उकरुन पाईपची पाहणी केली असता पाईपला छिद्र पडल्याचे आढळले आणि पाईप निकृष्ट दर्जाचे असल्यामुळेच पाईपला छिद्र पडले असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 विवेक पॉलीमर्स यांनी उत्पादीत केलेले पी.व्ही.सी.पाईप्स निकृष्ट दर्जाचे आहेत किंवा नाहीत ही बाब तक्रारदाराने खरेदी केलेले पाईप प्रयोगशाळेत तपासल्याशिवाय सिध्द् होऊ शकत नाही हे विचारात घेऊन तक्रारदारास पाईपचे प्रत्येकी एक मीटरचे पाच तुकडे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याकरिता सादर करण्यास सांगितले. तसेच प्रयोगशाळेची तपासणी फी रुपये 5,000/- देखील भरण्याबाबत मंचातर्फे सांगण्यात आले. परंतू तक्रारदाराने प्रत्येकी एक मीटरचे पाच तुकडे सादर न करता केवळ एक ते दीड फुटाचा एकच तुकडा सादर केला. सेंट्रल इन्स्टिटयुट ऑफ प्लास्टीक इंजिनिअरींग अन्ड टेक्नॉलॉजी, प्लास्टीक टेस्टींग सेंटर, औरंगाबाद या शासनमान्य प्रयोगशाळेकडे पाईप तपासणीबाबत मंचातर्फे दुरध्वनीवरुन चौकशी केली असता त्यांनी पाईपच्या दर्जाची तपासणी करण्यासाठी केवळ एक ते दीड फुटाचा पाईपचा तुकडा पुरेसा नसून प्रत्येकी एक मीटरचे पाच तुकडे आवश्यक असल्याचे कळविले. त्यामुळे तक्रारदाराला पाईपचे प्रत्येकी एक मीटरचे पाच तुकडे सादर करण्यास सांगितले. परंतू तक्रारदाराने पाईपचे प्रत्येकी एक मीटरचे पाच तुकडे आणि त्यासाठी आवश्यक असलेली तपासणी फी रुपये 5,000/- वारंवार वेळ देऊनही मंचासमोर दाखल केले नाही. त्यामुळे तक्रारदाराने खरेदी केलेल्या पाईपचा दर्जा तपासणे शक्य झालेले नाही. तक्रारदाराने वादग्रस्त पाईप तपासणीसाठी सादर न केल्यामुळे पाईपची तपासणी प्रयोगशाळेत करता आलेली नाही. म्हणून पाईप निकृष्ट असल्याचे सिध्द् झालेले नाही. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की, तक्रारदाराने त्याच्या शेतात जमिनीखाली गाडलेल्या पाईपला छिद्र पडल्याचे दर्शविणारा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 विवेक पॉलीमर्स यांनी उत्पादीत केलेले पी.व्ही.सी. पाईप्स निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिध्द् होत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, Member | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |