तक्रारदारासाठी वकील श्री.मादन आणि श्रीमती.नागश्री. गैर अर्जदारासाठी वकील श्रीमती कुरुप. मा.अध्यक्षानुसार दिलेले निकालपत्र. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे. 1. तक्रारदार कंपनीचा मुंबईतील व इतरत्र असलेल्या शाळांमध्ये सॉफ्टवेअरमध्ये संगणकाचे शिक्षण देण्याचा व्यवसाय आहे. त्यांचे संगणक विषयी इतरही बरेच व्यवसाय आहेत. N.I.I.T. Ltd. या कंपनीने तक्रारदार कंपनीला मुंबई उपनगर जिल्हयातील शाळांमध्ये संगणक शिक्षण देण्यासाठी अधिकार दिलेला होता. त्यापैकी सा.वाली संस्था ही एक होती. तक्रारदार कंपनी ही N.I.I.T. Ltd . चे अधिकृत स्कूल सर्व्हिस प्रोव्हायडर ( S.S.P.) होती. तक्रारदार कंपनीने सा.वाले यांच्या शाळेला पहिली ते दहावी पर्यतच्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्याना संगणकाचे शिक्षण द्यावयाचे होते. सॉफ्टवेअरचा अभ्यासक्रम N.I.I.T. Ltd. ने ठरवून दिलेला होता. सा.वाले संस्थेने तक्रारदार कंपनीची सेवा घेण्यासाठी परवानगी दिली. तक्रारदार कंपनीने त्या कामासाठी व्यावसाईक लोक नेमून त्यांचेकरवी 2004-2005 या शालेय वर्षासाठी सा.वाले संस्थेच्या विद्यार्थ्याना संकणकाचे शिक्षण दिले. सकाळी 6.30 पासून ते संध्याकाळी 6.30 पर्यत त्यांचे वर्ग असत. या प्रमाणे या शालेय वर्षासाठी तक्रारदार यांचे काम समाधानकारक झाले. त्या प्रमाणे सा.वाले संस्थेने तक्रारदारांचे काम समाधानकारक असल्याबद्दल प्रमाणपत्र दिले व तक्रारदार कंपनीने प्रत्येकी 1,85,400/- चे दोन वेळा पेमेंट केले. 2. तक्रारदार कंपनीचे म्हणणे की, शेवटच्या पेमेंटच्या वेळी सा.वाले व N.I.I.T. Ltd यांनी अनुचित व्यापारी प्रथेचे अवलंब केला. त्यांनी तक्रारदार कंपनीला N.I.I.T. Ltd चे नांवाने रु.2,14,900/- चा चेक देण्यास भाग पाडले. ही रक्कम तक्रारदार कंपनीने सा.वाले यांचेसाठी अडव्हान्स म्हणून दिली. N.I.I.T. Ltd ने त्यावेळी असे आश्वासन दिले होते की, तक्रारदारांना शेवटचे पेमेंट मिळाल्याशिवाय सदरहू चेकचे रोखीकरण करणार नाही. पंरतु तक्रारदार कंपनीला N.I.I.T. Ltd च्या या आश्वासनाबाबत शंका आल्याने त्यांनी त्या चेकचे पेमेंट रोखून धरले. N.I.I.T. Ltd ने चेक रोखीकरणासाठी टाकला मात्र तो परत आला. म्हणून N.I.I.T. Ltd ने तक्रारदार कंपनीच्या विरुध्द फौजदारी करण्याची धमकी दिली. म्हणून तक्रारदार कंपनीने त्या चेकची रक्कम रोखीने N.I.I.T. Ltd ला दिली. मात्र त्या बद्दल तक्रारदाराला पावती न देता सा.वाले संस्थेला दिली. सा.वाले संस्थेने विद्यार्थ्यांकडून फी गोळा केली, तक्रारदार कंपनीकडून संगणकाच्याबाबत सेवा घेतली. मात्र तक्रारदाराचे पेमेंट दिले नाही. तक्रारदार कंपनीचे म्हणणे की, त्यांनी सा.वाले संस्थेला सेवा देण्यासाठी व्यावसाईक व्यक्तींची सेवा घेतली होती, व त्यांचा पगार दिला होता. तसेच स्टेशनरी इतर साहित्यासाठी त्यांना खर्च करावा लागला. तक्रारदाराला एकूण रु.10,11,804/- खर्च आला. मात्र सा.वाले संस्थेने त्यांना फक्त रु.5,56,200/- येवढी रक्कम दिली. त्यामुळे तक्रारदार कंपनीला रु.4,55,604/- रुपयाचे नुकसान झाले. तसेच त्यांचा करार तिन वर्षासाठी होता. परंतु एका वर्षानंतर त्यांचा करार रद्द करण्यात आला. त्यामुळे त्या दोन वर्षासाठी त्यांना मिळणारा मोबदला रु.16,68,600/- ला कंपनीला मुकावे लागले. त्यांनी सा.वाले यांना दिनांक 28/03/2005 रोजी नोटीस पाठविली व त्यांनी सेवेत ज्या न्यूनता केल्या आहेत त्या दुरुस्त कराव्यात अशी विनंती केली. परंतु सा.वाले यांनी त्या पूर्ण केल्या नाहीत. म्हणून सदरहू तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराचे म्हणणे की, खालील रक्कमा सा.वाले यांचेकडून मिळण्याचा त्यांना अधिकार आहे. 1) रु.1,85,000/- व त्यावर द.सा.द.शे.21 दराने दिनांक 14/12/2004 ते रक्कम वसुल होईपर्यत व्याज मिळावे. 2) त्यांना मानसिक त्रासाबद्दल, त्यांची बदनामी झाल्याबद्दल व त्यांना करार गमवावा लागला या बद्दल नुकसान भरपाई रु.16,68,600/- मिळावी. 3. सा.वाले यांनी कैफीयत देऊन तक्रारदारांचे आरोप नाकारले. त्यांचे म्हणणे की, सदरहू मंचाला ही केस चालविण्याचा अधिकार नाही. तसेच त्यांचे म्हणणे की, सदरहू तक्रारीत तक्रारदार यांनी जरुरी असलेल्या पक्षकारांना सामीन केले नाही. म्हणून या तक्रारीला नॉन जॉईंडर ऑफ नेससरी पार्टीज् ची बाध येते. सा.वाले यांचे म्हणणे की, त्यांच्यामध्ये व तक्रारदार कंपनीमध्ये कोणताही करार झालेला नाही. दिनांक 02/06/2004 चा करार हा त्याच्यात व M/s N.I.I.T. Ltd यांचेमध्ये झालेला आहे, व त्या कराराच्या आधारावर त्यांनी सेवा घेतलेली आहे. परंतु तक्रारदाराने जाणून बुजून N.I.I.T. Ltd ला तक्रारीत सामील केलेले नाही. त्यांनी तक्रारदाराच्या नोटीसीला सविस्तर उत्तर दिले होते. त्यांची तक्रारदार यांना पैसे देण्याची जबाबदारी नाही. तक्रारदार यांनी N.I.I.T. Ltd ला सेवा दिलेली आहे. N.I.I.T. Ltd ने तक्रारदार कंपनीला फी किंवा चार्जेस सा.वाले यांचेकडून गोळा करण्याचे अधिकार दिलेले नव्हते. त्यांचेकडे तक्रारदार कंपनीचे काहीही घेणे निघत नाही. 4. सा.वाले यांचा असाही आरोप आहे की, तक्रारदार कंपनी त्यांना बरोबर सेवा देत नव्हती. म्हणून त्यांनी त्यांचे विरुध्द N.I.I.T. Ltd कडे ब-याच तक्रारी केल्या होत्या. म्हणून त्यांना सा.वाले संस्थेचा राग आला. ते सा.वाले N.I.I.T. Ltd ला Service Charges देत होते. त्यांचे म्हणणे की, सदरहू तक्रार ही खोटी असून ती रद्द करुन त्यांचा खर्च देववावा. 5. आम्ही तक्रारदार यांचे तर्फे वकील श्री. एच.एच.मादन व श्रीमती नागश्री यांचा युक्तीवाद ऐकला. सा.वाले तर्फे वकील श्री.कुरुप यांचा युक्तीवाद ऐकला. सदरहू तक्रारीत मुद्दा उपस्थित होते की, या मंचाला सदरहू तक्रार चालविण्याचा अधिकार आहे काय ? तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्याखाली ग्राहक या संज्ञेत येतात काय ? ग्राहक संरक्षण कायद्याच्या सेक्शन 2 (1) (डी) मध्ये "ग्राहक" या संज्ञेची व्याख्या खालील प्रमाणे आहे. कलम 2(1)(डी) "ग्राहक" म्हणजे अशी व्यक्ती जी- (i) अंशतः अगर पूर्णतः मोबदला देऊन किंवा देण्याचा करार करुन वस्तू विकत घेणे, किंवा अस्तित्वात असलेल्या प्रथेप्रमाणे भावी काळात मोबदला देण्याचा करार करुन वस्तूचा ताबा घेणे किंवा मोबदला दिलेल्या व्यक्तीच्या संमतीने वापर करणे. परंतु यात वस्तुची फेरविक्री करणारी किंवा व्यापारी कारणाकरिता वस्तुचा वापर करणा-या व्यक्तीचा समावेश होणार नाही. (ii) भाडे करार तत्वावर अंशतः अगर पूर्णतः मोबदला देऊन अथवा देण्याचा करार करुन किंवा प्रचलित प्रथेनुसार भावी काळात मोबदला देण्याचा करार करुन कोणतीही सेवा उपलब्ध करुन घेतल्यास, यामध्ये ज्याच्यासाठी सेवा घेतली आहे अशा व्यक्तीने प्रत्यक्ष मोबदला दिलेला नसला तरी त्याचाही यात समावेश होतो. परंतु त्यासाठी त्याला अंशतः अगर पूर्णतः मोबदला दिलेल्या अथवा भावी काळात मोबदला देणचा करार केलेल्या किंवा त्याबाबत आश्वासन दिलेल्या व्यक्तींची संमती असणे आवश्यक आहे. पंरतु व्यक्ती अशा सेवेचा उपयोग कोणत्याही व्यापारी कारणा करीता करीत असेल तर त्याचा यात समावेश होणार नाही. स्पष्टीकरणः- या कंडीकेच्या प्रयोजनासाठी व्यापारी करणाकरीता यात जी व्यक्ती अशा वस्तू अगर सेवा यांचा उपयोग स्वयंराजगारासाठी किंवा उपजिविकेसाठी करते अशांचा यात समावेश होणार नाही. या तक्रारीतील तक्रारदाराने सा.वाले संस्थेकडून काहीही वस्तु विकत घेतलेली नाही. किंवा त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची सेवा घेतलेली नाही. या उलट तक्रारदारानेच सा.वाले यांना N.I.I.T. Ltd यांचेमार्फत सेवा दिली आहे. तसेच तक्रारदार हि रजिस्टर कंपनीअसून त्यांचे संगणकासंबंधी बरेच व्यवसाय आहेत. जसे की, Computer hardware, assembling computers, repairs and renewals MAINTAINANCE, RENT, LEASE & NETWORKS OF lap-top computers , DESKTOP COMPUTERS & NETWOKS & spares and so on. तसेच मुंबई मधील इतर ठिकाणीही शाळेतील विद्यार्थ्याना सॉप्टवेअरमध्ये संगणक शिक्षण देण्याचा तक्रारदारांचा व्यवसाय आहे. तक्रारदार त्यासाठी व्यावसाईक व्यक्तींची ( Professional staff ) नेमणूक करुन त्यांना पगार देतात. हे सर्व व्यवसाय तक्रारदार नफा मिळविण्याचे उद्देशाने करतात. त्यांचा हा व्यवसाय केवळ स्वयंरोजगार मिळविण्यासाठी नाही. ग्राहक संरक्षण कायद्यातील ग्राहक या संज्ञेची व्याख्या पहाता व वरील परिस्थिती पहाता मंचाचे मते तक्रारदार ग्राहक होत नाही. 6. तक्रारदार यांचा असा आरोप आहे की, सा.वाले यांनी त्यांच्याकडून सेवा घेतल्या मात्र मोबदल्याचा शेवटचा हप्ता त्यांनी दिला नाही. या उलट सा.वाले यांचे म्हणणे की, त्यांचेमध्ये व तक्रारदार कंपनीमध्ये या बाबत तथाकथीत सेवेबाबत काही करार झालेला नाही. त्यांचेमध्ये व N.I.I.T. Ltd यांचेमध्ये करार झालेला आहे. व त्या करारानुसार त्यांनी सेवा घेतलेली आहे. N.I.I.T. Ltd ने तक्रारदार यांनी त्यांचे (S.S.P.) नेमले होते, सा.वाले यांचे नाही. त्यांनी N.I.I.T. Ltd च्या सूचनेनुसार पैसे N.I.I.T. Ltd ला दिले. तक्रारदार व त्यांच्यामध्ये करार नसल्यामुळे त्यांनी पैसे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मंचाच्या मते तक्रारदार व सा.वाले यांच्यातील हा वाद निवाणी स्वरुपाचा आहे. तक्रारदार यांनी योग्य त्या दिवाणी कोर्टात आपली दाद मागणे योग्य राहील. ग्राहक मंचाला ही तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. तक्रारदार योग्य त्या दिवाणी कोर्टात दाद मागण्यास स्वतंत्र आहे. म्हणून मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश 1. तक्रार क्र. 209/2005 रद्द बातल करण्यात येते. 2. उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती दोन्ही पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्या.
| [HONORABLE G L Chavan] Member[HONABLE MRS. JUSTICE S P Mahajan] PRESIDENT | |