::: गैरअर्जदार यांनी दाखल केलेला, दरखास्त प्रकरण खारिज करण्याबाबतच्या अर्जावर आ दे श :::
( पारित दिनांक : 30/06/2017 )
माननिय सदस्य श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 27 अन्वये दाखल केलेल्या या दरखास्त प्रकरणात मंचाने गैरअर्जदार क्र. 1 ते 16 यांना समन्स पाठवले. त्यापैकी गैरअर्जदार क्र. 3,5,8,10,12,13,16 यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर ते प्रकरणात हजर होवून त्यांनी हा अर्ज दाखल केला. सदर अर्जावर फिर्यादीने निवेदन दिले. सदर अर्जावर वरिल गैरअर्जदारांचा युक्तिवाद एैकला. आज प्रकरण फिर्यादीच्या युक्तिवादाकरिता अंतिम संधी म्हणून गैरअर्जदारांच्या या अर्जावर आदेशाकरिता ठेवले होते. कारण गैरअर्जदारांचे वकिलांनी सदर प्रकरणात सतत हजर राहून युक्तिवाद केला परंतु फिर्यादीला संधी देवूनही त्यांनी युक्तिवाद केला नाही. म्हणून मंचाने त्यांचे निवेदन तपासले. गैरअर्जदार क्र. 3,5,8,10,12,13,16 यांचा युक्तिवाद असा आहे की, गैरअर्जदार पतसंस्थेच्या कारभाराबद्दल दिनांक 07/01/2017 रोजी वि. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रिसोड यांनी गैरअर्जदार छत्रपती शिवराय ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या.रिठद, ता. रिसोड, जि. वाशिम ही विरुध्द पक्ष पतसंस्था अवसायनात निघाली म्हणून आदेश पारित केला व या पतसंस्थेचे सर्व कामकाज हे अवसायक श्री. एस.व्ही.राठोड यांच्याकडे देण्यात आलेले आहे. व या पतसंस्थेचे संचालक मंडळ आदेशावरुन खारिज केले आहे. अशा परिस्थितीत सदर फिर्याद गैरअर्जदारांविरुध्द चालू शकत नाही. म्हणून प्रकरण खारिज करावे. यावर फिर्यादीचे असे निवेदन आहे की, गैरअर्जदार यांची संस्था जरी आदेशानुसार अवसायनात निघाली आहे तरी अवसायक श्री. राठोड यांनी अद्यापपर्यंत कार्यभार स्विकारलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांची कायदेशिर जबाबदारीतुन सुटका करता येणार नाही. तसेच सदर फिर्याद प्रकरणात इतर गैरअर्जदार अद्याप हजर झाले नाही.
अशाप्रकारे उभय पक्षांचे कथन एैकल्यानंतर व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्त तपासल्यानंतर मंचाचे असे मत झाले आहे की, गैरअर्जदार क्र. 1 ते 16 हे छत्रपती शिवराय ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या.रिठद, ता. रिसोड, जि. वाशिम यांच्यावरील संचालक मंडळ आहे. सदर फिर्यादीमधील मुळ प्रकरणात सर्व गैरअर्जदारां विरुध्द आदेश पारित झालेले आहे. त्यानुसार रक्कम वसुलीबाबत फिर्यादीने ही फिर्याद ग्राहक संरक्षण कायदा, कलम-27 अन्वये मंचासमोर दाखल केली आहे. परंतु गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्तावरुन असे दिसते की, गैरअर्जदार संस्था – छत्रपती शिवराय ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या. रिठद ही दिनांक 07/01/2017 रोजी मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रिसोड यांच्या आदेशान्वये अवसायनात निघाली असून श्री. एस.व्ही.राठोड यांची त्यावर अवसायक म्हणून नेमणूक झालेली आहे. त्यामुळे अवसायक हे शासनाचे नियुक्ती अधिकारी असतात व त्यांच्याविरुध्द सदर फिर्याद मंचात चालू शकत नाही, असे कायदेशिर तत्व आहे. त्यामुळे फिर्यादीचे निवेदन तपासता येणार नाही. म्हणून गैरअर्जदार यांनी दाखल केलेला अर्ज मंजूर करण्यात येवून, सदर दरखास्त प्रकरण खारिज करण्यांत येते. अर्जदाराने रक्कमेच्या मागणीचा अर्ज अवसायकाकडे करावा.
सबब, अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे. . . . . .
अंतिम आदेश
- फिर्यादीची फिर्याद खारिज करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित करण्यांत येत नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri