मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई ग्राहक तक्रार क्रमांक – 95/2010 तक्रार दाखल दिनांक – 21/07/2010 निकालपत्र दिनांक - 15/03/2011 श्रीमती अन्नपूर्णा के. चित्ता, रा. एफ-1, हायलँण्ड पार्क, अमरनगर, मुलूंड (पश्चिम), मुंबई. ........ तक्रारदार विरुध्द
1) व्हिटेस्से प्रा. लि., 1, टर्फ व्हयू, सेठ मोतीलाल संघी मार्ग, वरळी, मुंबई 400 018. 2) कृष्णा मोटर्स, 1, 2 आणि 27, उद्योग केकंम्प्लेन्ट्रा, मुलूंड-गोरेगांव लिंक रोड, मुलूंड (पश्चिम), मुंबई 400 080. ......... सामनेवाले
समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ उपस्थिती – तक्रारदार स्वतः व वकील रमेश दुबे पाटील हजर विरुध्दपक्ष क्रमांक 1 तर्फे वकील सोनाली देसाई हजर विरुध्दपक्ष क्रमांक 2 गैरहजर - निकालपत्र - - द्वारा - मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीने नमूद केले आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 हे मारुती स्वीफ्ट डिझायर-झेडीआय या कंपनीचे डिलर आहेत. तसे गैरअर्जदार क्रमांक 2 हे सबडिलर आहेत. तक्रारकर्तीने गैरअर्जदार यांचेकडे दिनांक 2/11/2009 मध्ये मारुती स्वीफ्ट डिझायर-झेडीआय हे वाहन रुपये 15,000/- देऊन नोंदणीकृत केले होते. तक्रारकर्तीने नमूद केले आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 ने दोन ते तिन महिन्यात वाहनाची डिलीव्हरी देण्याचे मान्य केले होते. तक्रारकर्तीने पुढे असे नमूद केले आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दिनांक 09/03/2010 रोजीच्या पत्रान्वये वाहनाची नोंदणी रद्द केली होती. तक्रारकर्तीने पुढे असे नमूद केले आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 ने पुन्हा गुढी पाडव्याला वाहन देण्याचे मान्य केले होते. तक्रारकर्तीने पुढे असे नमूद केले आहे की, गैरअर्जदार यांनी वाहनाची नोंदणी करुनही वाहनाची डिलेव्हरी दिलेली नाही. तसेच वाहनाची नोंदणी रद्द केली व रुपये 15,000/- ही रक्कम परत केली त्यामुळे गैरअर्जदार यांनी गाडीची डिलेव्हरी दिली नाही त्यामुळे गैरअर्जदाराविरुध्द नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
2) मंचामार्फत गैरअर्जदार यांना नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्रमांक 1 हे हजर झाले व त्यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला आहे, तो येणे प्रमाणे -
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी ही बाब मान्य केली आहे की ते मारुती स्वीफ्ट डिझायर-झेडीआय या गाडीचे डिलर आहेत. तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 हा त्यांचा सबडिलर आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 ने मान्य केले आहे की तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे मारुती स्वीफ्ट डिझायर-झेडीआय या गाडीची नोंदणी केली होती. गैरअर्जदार क्रमांक 1 ने नमूद केले आहे की, तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 ला गाडीचे नोंदणी शूल्क दिलेले आहे. तक्रारकर्तीने कंपनीत डायरेक्ट गाडीची बुकींग व पेमेंट केलेले नाही त्यामुळे ती त्यांची ग्राहक नसल्यामुळे त्यांच्याविरुध्द दाखल केलेली तक्रार खारिज होण्याबाबत कळविलेले आहे. 3) गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे लेखी जबाबात म्हणणे खालीलप्रमाणे आहे -
तक्रारदार ही त्यांची ग्राहक नाही. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी नमूद केले होते की, तक्रारदार हिने सदर तक्रार मंचासमक्ष चालविण्यासाठी अधिकारपत्र दिलेले नाही म्हणून खारिज करण्यात यावी. गैरअर्जदार क्रमांक 2 ने नमूद केले आहे की, त्यांना तक्रारकर्तीकडून वाहन नोंदणीकरीता रुपये 15,000/- प्राप्त झाले, त्याबाबत त्यांनी तक्रारकर्तीला पावती दिलेली आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 ने नमूद केले आहे की, वाहनाची नोंदणीची एकूण रक्कम रुपये 50,000/- ठरली होती त्यापैकी तक्रारदार यांनी रुपये 15,000/- दिलेले आहेत. गैरअर्जदार क्रमांक 2 ने ही बाब अमान्य केली आहे की, त्यांनी वाहनासाठी दिलेली किंमत 4 महिन्याच्या आत देण्याचे मान्य केले होते. गैरअर्जदार क्रमांक 2 ने तक्रारदार यांनी लावलेले सर्व आरोप अमान्य केलेले आहेत. तसेच तक्रारदार यांनी वाहनाची नोंदणी केली, त्यांनी ग्रे कलरचे वाहन नोंदणी केले होते. गैरअर्जदार क्रमांक 2 ने तक्रारकर्तीने लावलेले सर्व आरोप अमान्य केले आहेत व तक्रार खारिज करण्याबाबत विनंती केलेली आहे.
4) प्रस्तुत प्रकरण मंचासमक्ष आज दिनांक 15/03/2011 रोजी मौखिक युक्तीवादाकरीता आले असता तक्रारकर्तीतर्फे वकील श्री. रमेश दुबे पाटील तर्फे अँड अनिता वसानी यांनी मेमो दाखल केला व गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे वकील सोनाली देसाई हजर होत्या, गैरअर्जदार क्रमांक 2 यांचा तसेच त्यांच्या वकीलांचा पुकारा केला असता ते गैरहजर होते. उभयपक्षांनी दाखल केलेले दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेत आहेत – मुद्दा क्रमांक 1) – तक्रारकर्तीने ही बाब सिध्द केली आहे की, ती गैरअर्जदार यांची ग्राहक आहे काय? उत्तर गैरअर्जदार क्रमांक 1 ची ग्राहक नाही, गैरअर्जदार क्रमांक 2 ची ग्राहक आहे. मुद्दा क्रमांक 2) – तक्रारकर्तीने ही बाब सिध्द केली आहे की, गैरअर्जदारांनी तिला सेवेत त्रृटी दिली आहे काय? उत्तर होय. स्पष्टीकरण मुद्दा क्रमांक 1) - प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचेविरुध्द दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीने नमूद केले आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 हे मारुती स्वीफ्ट डिझायर-झेडीआय या कंपनीचे डिलर आहेत. व तक्रारकर्तीने स्वतः नमूद केले आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 हे गैरअर्जदार क्रमांक 1 चे सबडिलर आहेत. त्यांचेकडे मारुती स्वीफ्ट डिझायर-झेडीआय या वाहनाची नोंदणी केली होती व गैरअर्जदार क्रमांक 2 ला रुपये 15,000/- चा धनादेश दिनांक 02/11/2009 रोजी दिला होता. तसेच वाहनाची डिलेव्हरी देण्याची गैरअर्जदार क्रमांक 2 ने हमी दिली होती. मंचाच्या मते तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेशी वाहन विकत घेण्याबाबत वाहनाची नोंदणी केली होती. तक्रारकर्तीचा गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेबरोबर प्रत्यक्ष असा कोणताच व्यवहार झालेला नव्हता, त्यामुळे मंचाच्या मते तक्रारदार ही गैरअर्जदार क्रमांक 1 ची ग्राहक नाही. त्यामुळे तक्रारकर्तीची गैरअर्जदार क्रमांक 1 च्या विरुध्द तक्रार खारिज करण्यात येते. परंतु तक्रारकर्ती ही गैरअर्जदार क्रमांक 2 ची ग्राहक आहे असे मंचाचे मत आहे. स्पष्टीकरण मुद्दा क्रमांक 2) - तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे मारुती स्वीफ्ट डिझायर-झेडीआय या वाहनाची नोंदणी केली होती व गैरअर्जदार क्रमांक 2 ला रुपये 15,000/- चा धनादेश दिनांक 02/11/2009 रोजी दिला होता ही बाब तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेल्या निशाणी ए वरुन सिध्द होते. परंतु गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी सदर वाहनाची डिलेव्हरी दोन ते तिन महिन्यात तक्रारकर्तीला दिली नाही असे तिचे म्हणणे आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्तीने नोंदणी शूल्क अग्रीम रक्कम रुपये 35,000/- न दिल्यामुळे त्यांना वाहनाची डिलेव्हरी देता आली नाही. परंतु गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी याबाबत कोणतेच दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केलेले नाहीत. तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 ला रुपये 15,000/- देऊन, ग्रे रंगाचे वाहन कराराप्रमाणे पसंत केलेले आहे असे मंचाचे मत आहे. मौखिक युक्तीवादाच्या वेळेस वकील अनिता वसाने यांनी नमूद केले की, मारुती स्वीफ्ट डिझायर-झेडीआय प्रा. लि. या कंपनीने उत्पादन केलेले वाहन हे दुस-या डिलरकडून विकत घेतलेले आहे. तसेच तक्रारकर्तीने तक्रारीत रुपये 15,000/- व्याजासह परत मिळणेची मागणी केलेली आहे. वास्तविक गैरअर्जदार क्रमांक 2 यांना तक्रारकर्तीने वाहनाची नोंदणी करतांना दिलेली रक्कम परत करावयास पाहिजे होती. तसेच तक्रारकर्तीच्या वाहनाची नोंदणी गैरअर्जदार क्रमांक 1 ने रद्द केली होती. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 ने तक्रारकर्तीकडून घेतलेली रक्कम रुपये 15,000/- परत देण्याची नैतिक जबाबदारी असल्यामुळे सदर रकमेवर दिनांक 2/11/2009 पासून 9 टक्के व्याज सदर रक्कम अदा होईपर्यंत द्यावे. तक्रारकर्तीने सदर तक्रारीत गैरअर्जदारांनी अनुचित प्रथेचा अवलंब केल्यामुळे शारिरीक मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाईची मागणी केलेली आहे. प्रस्तुत तक्रारीतील मागणीनुसार मंचाने वर नमूद केल्याप्रमाणे गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तक्रारकर्तीला मानसिक त्रासासाठी नुकसानभरपाई रुपये 5,000/- द्यावी, तसेच तक्रारीच्या खर्चाकरीता रुपये 3,000/- द्यावेत असे मंचाचे मत आहे. प्रस्तुत प्रकरणात उभयपक्षांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे व पुराव्याचे अवलोकन केले असता मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहेत
- अंतिम आदेश - 1) तक्रार क्रमांक 95/2010 अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्रमांक 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारकर्तीकडून वाहन नोंदणीसाठी घेतलेली रक्कम रुपये 15,000/- (रुपये पंधरा हजार फक्त) दिनांक 2/11/2009 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत दर साल दर शेकडा 9 टक्के दराने व्याजासह परत करावी. 3) गैरअर्जदार क्रमांक 2 यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसानभरपाई रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) तक्रारकर्तीला द्यावी. 4) गैरअर्जदार क्रमांक 2 यांना आदेश देण्यात येतो की तक्रारीचा खर्च रुपये 3,000/- (रुपये तिन हजार फक्त) तक्रारकर्तीला द्यावा. 5) गैरअर्जदार क्रमांक 1 च्या विरुध्दची तक्रार खारिज करण्यात येते. 6) सदर आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावी. 7) सदर आदेशाची प्रत नियमाप्रमाणे उभयपक्षांना पाठविण्यात यावी. दिनांक – 15/03/2011 ठिकाण - मध्य मुंबई, परेल. (सदर तक्रारीचा निकाल हा उभयपक्षांचा युक्तीवाद संपल्यानंतर लगेच मंचाच्या बैठकीत पारीत करण्यात आला.)
सही/- सही/- (भावना पिसाळ) (नलिन मजिठिया) सदस्या अध्यक्ष मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई एम.एम.टी./- |