श्री. शेखर प्र. मुळे, मा. अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
1. तक्रारकर्तीची सदर तक्रार वि.प.विरुध्द तिने घेतलेल्या भुखंडाचे विक्रीपत्र करुन न दिल्यामुळे ग्रा.सं.का.चे कलम 12 खाली दाखल केलेली आहे.
2. वि.प. हे व्हिजन बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स नागपूरचे मालक असून त्यांच्या मालकीची मौजा – पांजरकांते, ता.कोंढाळी, जि. नागपूर येथे ख.क्र. 242, प.ह.क्र.66 ही जमीन आहे. जमिनीवर भुखंड पाडून ते विकण्याचा वि.प.चा व्यवसाय आहे. त्यानुसार तक्रारकर्तीने वि.प.सोबत वर उल्लेखित जमिनीवरील भुखंड क्र. 33 विकत घेण्याचा करार दि.25.01.2016 रोजी केला. भुखंडाची एकूण किंमत रु.2,11,000/- ठरली. त्यापैकी तक्रारकर्तीने करारनाम्याच्या दिवशी वि.प.ला रु.2,00,000/- दिले. उर्वरित रक्कम रु.11,000/- विक्रीपत्र करुन देण्याचे वेळेस देण्याचे ठरले. विक्रीपत्र करारनामा झाला तेव्हापासून एक वर्षाचे आत करावयाचा होता. त्यानंतर तक्रारकर्तीने वि.प.ला ब-याचवेळा उर्वरित रक्कम घेऊन विक्रीपत्र करुन देण्याची विनंती केली. परंतू वि.प.ने कुठल्या ना कुठल्या कारणास्तव विक्रीपत्र करुन देण्याचे टाळले. तेव्हा तक्रारकर्तीने वि.प.ला वकीलामार्फत नोटीस पाठवून विक्रीपत्र करुन देण्याचे किंवा दिलेली रक्कम व्याजासह परत करण्याची मागणी केली. वि.प.ला नोटीस मिळूनही त्यांनी नोटीसला उत्तर दिले नाही किंवा विक्रीपत्र करुन दिले नाही किंवा रक्कमही परत केली नाही. सबब या तक्रारीद्वारे तक्रारकर्तीने अशी विनंती केली आहे की, वि.प.ला आदेशित करण्यात यावे की, त्यांनी उर्वरित रक्कम स्विकारुन भुखंडाचे विक्रीपत्र करुन द्यावे किंवा भरलेली रक्कम 18 टक्के व्याजाने परत करावी. तसेच झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्चसुध्दा मागितला आहे.
3. तक्रारीची नोटीस वि.प.ला पाठविण्यात आली. नोटीस वि.प.ला मिळाल्यासंबंधी तक्रारकर्तीने पोस्टाचा ट्रॅकींग रीपोर्ट दाखल केला. ज्यानुसार वि.प.च्या नावे पाठविण्यात आलेला नोटीसचा लिफाफा मिळाल्याचा शेरा दिसून येतो. परंतू वि.प.तर्फे कोणीही हजर न झाल्याने प्रकरण एकतर्फी ऐकण्यात आले.
4. ज्याअर्थी, वि.प.ने तक्रारीला कुठलेही उत्तर दिले नाही त्याअर्थी, असे गृहीत धरता येईल की, वि.प.ने तक्रारीतील मजकूर हा प्रत्यक्षपणे मान्य केलेला आहे. तक्रारकर्तीने तक्रारीच्या समर्थनार्थ काही दस्तऐवज दाखल केले आहे. त्यापैकी एक तिचा आणि वि.प.मध्ये विक्रीसंबंधी झालेला करारनामा आहे. तो करारनामा वाचला असता असे दिसून येते की, भुखंडाची एकूण रक्कम रु.2,11,000/- पैकी तक्रारकर्तीने वि.प.ला करारनाम्याच्या दिवशी रु.2,00,000/- दिले होते. ज्याची कबुली वि.प.ने करारनाम्यात लिहून दिलेली आहे. विक्री करुन देण्याची जबाबदारी वि.प.ची होती. परंतू त्याने आजपर्यंत विक्रीपत्र करुन दिले नाही आणि त्यासाठी कुठलेही कारण वि.प.कडून आलेले नाही.
5. तक्रारकर्तीने वि.प.ला जी नोटीस पाठविली होती, त्याचे उत्तर वि.प.कडून देण्यात आले होते. नोटीस उत्तराप्रमाणे वि.प.चे असे म्हणणे आहे की, तो व्यवहार विक्रीचा नव्हता, तर त्याला पैश्याची आवश्यकता असल्याने त्याने तक्रारकर्तीकडून रु.2,00,000/- हात उसने घेतले होते. त्याबद्दल त्यांच्यामध्ये भुखंड विक्रीसंबंधी एक करारनामा लिहिण्यात आला. परंतू तो करारनामा केवळ कर्जाऊ रकमेच्या परतफेडीच्या सुरक्षिततेसाठी लिहिण्यात आला होता. पुढे वि.प.चे असे म्हणणे आहे की, त्यांनी दि.30.08.2016 ला धनादेशाद्वारे तक्रारकर्तीला रु.1,14,000/- परत केले होते आणि केवळ रु.86,000/- देणे शिल्लक होते. परंतू या नोटीस उत्तरातील मजकुरामुळे तक्रारकर्तीच्या तक्रारीवर काही परिणाम होणार नाही कारण वि.प.ने तक्रारीला बचाव म्हणून लेखी उत्तर सादर केले नाही. त्याशिवाय, वि.प.ने आपल्या बचावासंबंधी नोटीस उत्तरामध्ये जे काही लिहिले आहे, त्याबद्दल कुठलाही पुरावा मंचासमोर दिलेला नाही. वर नमूद केल्याप्रमाणे वि.प.ने नोटीस मिळूनही या तक्रारीला आव्हान न दिल्यामुळे त्यांनी एक प्रकारे तक्रार मान्य केलेली आहे. वास्तविक पाहता वि.प.ने नोटीस उत्तरात जे काही लिहिले आहे त्याचा पुरावा सादर करणे आवश्यक होते आणि त्यासाठी त्यांना या प्रकरणात हजर होऊन लेखी उत्तर आणि पुरावा द्यायला हवा होता.
6. तक्रारीत दाखल दस्तऐवजांवरुन तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्यायोग्य आहे. वि.प.ने तक्रारकर्तीकडून भुखंडाची रक्कम स्विकारुनसुध्दा त्याचे विक्रीपत्र करुन दिले नाही आणि ताबासुध्दा दिला नाही ही त्यांच्या सेवेतील कमतरता ठरते. सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आ दे श
1) वि.प.ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला करारनाम्यानुसार मौजा – पांजरकांते, ता.कोंढाळी, जि. नागपूर येथे ख.क्र. 242, प.ह.क्र.66, भुखंड क्र. 33 चे नोंदणीकृत विक्रीपत्र उर्वरित रक्कम रु.11,000/- स्विकारुन करुन द्यावे. विक्रीपत्राच्या नोंदणीचा खर्च तक्रारकर्तीने सोसावा.
2) वि.प.ने तक्रारकर्तीला शारिरीक व मानसिक त्रासाच्या नुकसान भरपाईबाबत रु.15,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.5,000/- द्यावे.
3) जर काही कायदेशीर अडचणीमुळे वि.प. तक्रारकर्तीला विक्रीपत्र करुन देण्यास असमर्थ असतील तर, वि.प.ने तक्रारकर्तीला रु.2,00,000/- ही रक्कम दि.25.01.2016 पासून तर रकमेच्या प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत 15 टक्के व्याजासह परत करावी.
4) सदर आदेशाची अंमलबजावणी वि.प.ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
5) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरविण्यात यावी.