(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याने गैरअर्जदार यांच्या स्पाईस कंपनीचा मोबाईल दि.19.04.2010 रोजी रुपये 4,550/- मधे खरेदी केला असून, त्यास एक वर्षाची गॅरंटी व वॉरंटी देण्यात आलेली आहे. तक्रारदाराने सदर मोबाईलचा वापर केला असता, मोबाईलमधे दाखविण्यात आलेले फंक्शन व सॉफ्टवेअर व्यवस्थित चालत नसल्याचे, तसेच मोबाईल रिस्टार्ट व हँग होणे असे प्रॉब्लेम असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तक्रारदाराने सदर मोबाईल गैरअर्जदार कंपनीच्या ऑथोराईज्ड सर्व्हिस सेंटरकडे दुरुस्तीसाठी दिला. तक्रारदाराने वारंवार चकरा मारल्यानंतर त्यास मोबाईल दुरुस्त झाला आहे असे सांगून मोबाईल परत केला, परंतू मोबाईलचा कलर खराब झालेला होता व त्यावर ओरखडे पडलेले होते. सदर मोबाईलमधे परत हे प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे त्याने दि.08 सप्टेंबर 2010 रोजी पुन्हा सर्व्हिस सेंटरकडे दुरुस्तीसाठी जमा केला. गैरअर्जदाराने मोबाईल दुरुस्त होण्यासारखा नाही असे सांगून दि.21.10.2010 रोजी तक्रारदारास एक नवीन मोबाईल दिला. परंतू हा नवीन मोबाईल देखील खराब असून व्यवस्थित चालत नसल्यामुळे दि.22.10.2010 रोजी लगेच सर्व्हिस सेंटरकडे दिला. गैरअर्जदारांनी तक्रारदाराचा ओरिजनल मोबाईल व दि.21.10.2010 रोजी दिलेला मोबाईल दोन्हीही ठेऊन घेतले. तक्रारदाराने या संदर्भात गैरअर्जदार कंपनीच्या कस्टमर केअरकडे दि.26 ऑक्टोबर 2010 रोजी ई-मेल द्वारे तक्रार दाखल केली, परंतू सदर तक्रारीची गैरअर्जदाराने कोणतीही दखल घेतली नाही. गैरअर्जदारांनी तक्रारदारास मुळातच खराब मोबाईल दिलेला असून तो दुरुस्तही करुन दिलेला नाही. गैरअर्जदारांनी तक्रारदाराची फसवणूक केलेली असून त्यास त्रुटीची सेवा दिलेली आहे. म्हणून तक्रारदाराने, गैरअर्जदारांकडून मोबाईलची रक्कम रु.4,550/- दि.19.04.2010 पासून 18% व्याजदराने मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासासह मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदारांना नोटीसची बजावणी होऊनही ते मंचात गैरहजर राहिले, म्हणून त्यांचेविरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला. (3) त.क्र.613/10 तक्रारदाराने दाखल केलेले शपथपत्र व यादीसह कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराच्या वतीने अड.प्रशांत गवळी यांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदाराने गैरअर्जदार क्र.1 विशाल कम्युनिकेशन यांचेकडून दि.19.04.2010 रोजी स्पाईस कंपनीचा मोबाईल रक्कम रु.4,550/- मधे खरेदी केला हे पावतीवरुन दिसून येते. सदर पावतीवर मोबाईल हॅडसेटची एक वर्षाची वॉरंटी असल्याचा तसेच मोबाईल विकल्यानंतर वॉरंटी कालावधीत मोबाईल बिघडल्यास तो दुरुस्त करुन देण्याची, अथवा सेवा देण्याची जबाबदारी ऑथोराईज्ड सर्व्हिस सेंटरची आहे, असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून खरेदी केलेला मोबाईल हँडसेट वॉरंटी कालावधीत बिघडल्यामुळे दि.2 ऑगस्ट 2010 रोजी गैरअर्जदार क्र.3 स्पाईस ऑथराईज्ड सर्व्हिस सेंटरकडे दुरुस्तीसाठी दिला हे सर्व्हिस जॉबशीटवरुन दिसून येते. सदर सर्व्हिस जॉबशीटमधे तक्रारदाराच्या मोबाईलमधे Low Incoming Outgoing Voice, FM Problem, Auto Restart हे प्रॉब्लेम असल्याचे नमूद केलेले आहे. तक्रारदाराने सदर प्रॉब्लेम गैरअर्जदाराने दुरुस्त करुन न दिल्यामुळे पुन्हा दि.08 सप्टेंबर 2010 रोजी परत गैरअर्जदार क्र.3 कडे दुरुस्तीसाठी दिल्याचे सर्व्हिस जॉबशीटवरुन दिसून येते. सदर सर्व्हिस जॉबशीटमधे तक्रारदाराच्या मोबाईलमधे Auto Restart, Hang हे प्रॉब्लेम असल्याचे नमूद केलेले आहे. सदर जॉबशीटवर नवीन मोबाईल दि.21.10.2010 रोजी तक्रारदारास दिल्याचा उल्लेख आहे, परंतू त्याचा ओरिजनल मोबाईल परत दिला नाही याचाही उल्लेख केलेला आहे. तक्रारदाराचे म्हणण्यानुसार गैरअर्जदाराने त्यास दि.21.10.2010 रोजी जुना वापरलेला मोबाईल दिलेला असून तो लगेच बिघडल्यामुळे दि.22.10.2010 रोजी गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे दिलेला आहे. या संदर्भात तक्रारदाराने गैरअर्जदार क्र.2 स्पाईस कंपनीच्या कस्टमर केअरकडे ई-मेल द्वारे दि.26.10.2010 रोजी तक्रार नोंदविली, त्यामधे त्याचे दोन्ही मोबाईल गैरअर्जदाराने ठेऊन घेतल्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. गैरअर्जदार क्र.2 स्पाईस कंपनीने दि.28.10.2010 रोजी तक्रारदाराने पाठवलेल्या ई-मेलचे उत्तर दिले असून, त्यामधे तक्रारदाराची तक्रार नोंदवून घेतली असून आमचे सर्व्हिस मॅनेजर चौकशी करतील आणि त्यांचेशी संपर्क साधावा असे नमूद केलेले आहे. गैरअर्जदारांनी तक्रारदारास दि.21.10.2010 रोजी दिलेला मोबाईल ठेऊन घेतला असून, त्याचा दि.19.04.2010 रोजी खरेदी केलेला मोबाईल देखील दुरुस्त करुन दिलेला नाही. व ठेऊन घेतला आहे. तक्रारदाराने दि.19.04.2010 रोजी खरेदी केलेला मोबाईल वॉरंटी कालावधीत बिघडलेला असून, गैरअर्जदारांनी त्याच्या मोबाईलमधील प्रॉब्लेम दुरुस्त करुन (4) त.क्र.613/10 दिलेले नाहीत. तक्रारदाराने दाखल केलेल्या जॉबशीटवरुन त्याचा मोबाईल खरेदी केल्यानंतर लगेचच बिघडलेला असल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदारांनी तक्रारदारास सदोष मोबाईल विक्री केलेला आहे असे मंचाचे मत आहे. मोबाईल दुरुस्त करुन न देऊन, अथवा बदलून न देऊन गैरअर्जदारांनी तक्रारदारास त्रुटीची सेवा दिलेली आहे. तक्रारदारास मोबाईल दुरुस्त करुन घेण्यासाठी गैरअर्जदाराकडे चकरा माराव्या लागल्या व ई-मेल द्वारे तक्रार नोंदवावी लागली. त्यामुळे त्यास निश्चितपणे मानसिक, शारिरिक त्रास झालेला आहे. म्हणून तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास देखील पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रार मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तपणे तक्रारदारास मोबाईलची रक्कम रु.4,550/- 9% व्याजदराने दि.19.04.2010 पासून पूर्ण रक्कम देईपर्यंत निकाल प्राप्तीपासून 30 दिवसात द्यावेत. 3) गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तपणे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- असे एकूण रु.2,000/- निकाल प्राप्तीपासून 30 दिवसात द्यावेत. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डि.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |