नि. 30 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 196/2010 नोंदणी तारीख – 20/8/2010 निकाल तारीख – 9/11/2010 निकाल कालावधी – 79 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री सांगर संजय चव्हाण रा.महागाव ता.जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री आनंद कदम) विरुध्द 1. व्यवस्थापक, सचिन कदम विराज मोबाईल शॉपी, साईशक्ती, विसावा कॅम्प, उड्डाण पुलाजवळ, सातारा ----- जाबदार क्र.1 (अभियोक्ता श्री संग्राम मुंढेकर) 2. व्यवस्थापक, उदय दिगंबर परांजपे पत्ता – नोकिया केअर सेंटर, शाहू स्टेडियम, एस.टी.स्टँडजवळ, सातारा ----- जाबदार क्र.2 (अभियोक्ता श्री वाय.एस.घोरपडे) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. जाबदार क्र.1 यांचा मोबाईल संच विक्रीचा व्यवसाय आहे व जाबदार क्र.2 हे मोबाईल संच दुरुस्ती करुन देणारे नोकिया कंपनीचे अधिकृत केअर सेंटर आहे. अर्जदार यांनी दि. 15/11/2009 रोजी जाबदार क्र.1 यांचेकडून नोकीया कंपनीचा मोबाईल संच रु.7,050/- या किंमतीस खरेदी केलेला आहे. सदरचे संचास एक वर्षाची वॉरंटी दिलेली आहे. सदरचा मोबाईल सुरुवातीस काही दिवस व्यवस्थित चालू होता. परंतु नंतर त्यामध्ये वेगवेगळे दोष येवू लागले. सदरची बाब जाबदार क्र.1 यांचे निदर्शनास आणलेनंतर जाबदार क्र.1 यांनी जाबदार क्र.2 यांचेशी संपर्क साधणेस सांगितले. परंतु जाबदार क्र.2 यांनी मोबाईल संच दुरुस्त करण्यास नकार दिला आहे. जाबदार क्र.2 यांनी मोबाईलचा डिस्प्ले बदलून घेण्यास सांगितले त्यास रु.2,500/- इतका खर्च येईल असे सांगितले. परंतु सदरचा मोबाईल हा वॉरंटी पिरेडमध्ये असलेने संचाचा दोष काढून देण्याची जबाबदारी जाबदार यांची आहे. परंतु बेकायदेशीरपणे रक्कम मिळविणेसाठी जाबदार यांनी आजपर्यंत मोबाईल संच दुरुस्त करुन दिलेला नाही. सबब अर्जदार यांनी जाबदार यांना वकीलांचे मार्फत नोटीस पाठविली परंतु जाबदार क्र.1 यांनी त्यास खोटया मजकुराचे उत्तर दिले आहे व जाबदार क्र.2 यांनी कोणत्याही प्रकारचे उत्तर दिलेले नाही. सबब मोबाईल संचाची किंमत रु.7,050/- परत मिळावी व मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम परत मिळावी यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार क्र.1 यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि.12 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. वॉरंटी कालावधीत येणा-या समस्यांसाठी कंपन्यांची स्वतःची सर्व्हिस सेंटर्स बनविलेली आहेत. नियमानुसार मोबाईल संचामध्ये समस्या उदभवल्यास तो अधिकृत सेंटरमध्येच दुरुस्तीसाठी द्यावा लागतो. त्यास मोबाईल विक्रेता जबाबदार रहात नाही. अर्जदार यांनी नोकिया कंपनीला पक्षकार म्हणून सामील केलेले नाही. अर्जदार यांचा संच वॉरंटी कालावधीत असल्याने त्याची दुरुस्ती अगर बदलून देणेबाबतचा व्यवहार हा नोकीया कंपनी व जाबदार क्र.2 यांचेशी संबंधीत आहे. जाबदार क्र.1 यांची याबाबत कोणतीही जबाबदारी येत नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.1 यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. जाबदार क्र.2 यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि.18 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अर्जदार हे जाबदार क्र.2 यांचेकडे कधीही आलेले नव्हते. अर्जदार यांचे मोबाईल संचाच्या डिस्प्लेवर ठिपके दिसून येत असतील तर त्याला जोराचा धक्का लागला असलेस, तो पडला असलेस अगर डिस्प्लेवर दाब पडला असलेस असे डाग निर्माण होतात. अशा परिस्थितीत वॉरंटी कालावधीमध्ये कंपनी हॅण्डसेट दुरुस्त करुन देवू शकत नाही. अर्जदाराने मोबाईल खरेदी करतेवेळी अटी व शर्ती मान्य केल्या आहेत. जाबदार यांनी अर्जदार यांना हॅण्डसेट दुरुस्तीबाबत कोणतीही जॉबशीट लिहून दिलेली नाही. अर्जदार हे जाबदार क्र.2 यांचे ग्राहक नाहीत. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.1 यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे अभियोक्ता श्री कदम यांनी व जाबदार क्र.1 व 2 तर्फे अनुक्रमे अभियोक्ता श्री मुंढेकर व घोरपडे यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. कारणे 5. अर्जदार यांची मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांचा मोबाईल संच वॉरंटी कालावधीत असून त्याचे डिस्प्लेवर ठिपके दिसून येतात. त्यामुळे त्याचा वापर करता येत नाही. सबब सदरचे संचाचे किंमतीपोटी दिलेली रक्कम परत मिळावी अशी अर्जदार यांनी मागणी आहे. 6. जाबदार क्र.1 यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, ते फक्त मोबाईलची विक्री करतात. त्यामध्ये काही दोष असल्यास त्याची जबाबदारी नोकीया कंपनी व त्यांचे स्थानिक सर्व्हिस सेंटर यांची आहे. परंतु सदरचे कथनाशी हा मंच आजिबात सहमत होत नाही. ग्राहकाने खरेदी केलेल्या मोबाईल संचामध्ये काही दोष निर्माण झाल्यास त्याबाबत अधिकृत सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधून व आवश्यकता वाटल्यास त्यांचेशी पाठपुरावा करुन तो त्यांचेकडून दुरुस्त करुन घेणे ही प्रामुख्याने विक्रेत्याची जबाबदारी आहे. त्यामुळे जाबदार क्र.1 हे केवळ विक्रेते आहेत म्हणून मोबाईलचे विक्रीपश्चात सेवेची जबाबदारी झटकू शकत नाहीत. सबब वॉरंटी कालावधीतील दोषांसाठी जाबदार क्र.1 हे जबाबदार नाहीत हे जाबदार क्र.1 यांचे कथन योग्य व न्यायोचित नाही असे या मंचाचे मत आहे. 7. जाबदार क्र.2 यांनी असे कथन केले आहे की, अर्जदार हे त्यांचेकडे मोबाईल दुरुस्तीसाठी आलेच नव्हते. तसेच जर डिस्प्लेमध्ये ठिपके दिसत असतील तर तो अर्जदारचे चुकीचे हाताळणीमुळे झाले असावेत, सदरचा दोष वॉरंटी कालावधीत निर्माण झाला तरी तो दूर करुन देण्याची जबाबदारी जाबदार क्र.2 यांची नाही. सदरचे कथनाचे पृष्ठयर्थ जाबदार क्र.2 यांनी श्री विक्रांत बाळासाहेब अहेरराव व निखिल सुभाष गायकवाड यांची शपथपत्रे दाखल केलेली आहेत. त्यामध्ये मोबाईल संचामध्ये दिसून येणारे डाग हे संच पडल्यामुळे अगर त्यावरील दाबामुळे निर्माण झाले असावेत असे त्यांनी कथन केले आहे. परंतु सदरचे कथनाशी प्रस्तुतचा मंच आजिबात सहमत होत नाही. अर्जदार यांनी या मंचाला त्यांचा संच दाखविला असता त्यामध्ये या मंचाला काळे डाग स्पष्टपणे दिसून आलेले आहेत. सदरचा दोष हा वॉरंटी कालावधीमध्ये निर्माण झाला असल्याने तो विनामोबदला दूर करुन देण्याची जबाबदारी ही जाबदार क्र.2 या नोकीया कंपनीच्या अधिकृत सेंटरची आहे. सदरचा संच हा चुकीच्या हाताळणीमुळे, संच पडल्यामुळे अगर दाब पडल्यामुळे निर्माण होत असतो हे दर्शविणारा कोणताही पुरावा जाबदार यांनी दाखल केलेला नाही. सबब अर्जदार यांचा मोबाईल संच वॉरंटी कालावधीमध्ये असल्याने विनामोबदला जाबदार क्र.2 यांनी दुरुस्त करुन द्यावा या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 8. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या अर्जदार यांचा नोकिया कंपनीचा 6303 एम ब्लॅक हा मोबाईल संच विनामोबदला दुरुस्त करुन द्यावा. 3. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 500/- द्यावेत. ब. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 500/- द्यावेत. 4. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 9/11/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |