मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई ग्राहक तक्रार क्रमांक – 77/2011 तक्रार दाखल दिनांक – 07/04/2011 निकालपत्र दिनांक – 14/06/2011 1) कन्झ्युमर्स वेलफेअर असोसिएशन, (रजिस्टर्ड नंबर 643/03 मुंबई), 402 बी विंग अशोका कॉम्प्लेक्स, जस्टीस रानडे रोड, दादर, मुंबई 400 028, तर्फे सेक्रेटरी, श्री. ए. एम. मस्करन्हास. 2) श्री. विशाल एस. मोदी, 407 ए/33, बी विंग, योगी कुटीर, योगी नगर, बोरिवली (पश्चिम), ........ तक्रारदार नंबर 1 व 2 विरुध्द 1) विपूल मेडकॉर्प टीपीए प्रा. लि., बी-14,वडाळा उद्योग भवन, वडाला, मुंबई 400 031. 2) दि न्यू इंडिया अँश्युरन्स कंपनी लिमिटेड, 87 महात्मा गांधी रोड, 3 रा मजला, पलई प्लाझा, प्रीतम हॉटेलच्यासमोर, दादर टी.टी., मुंबई 400 014. ......... सामनेवाले क्रं. 1 व 2 समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ उपस्थिती – तक्रारदारांतर्फे त्यांचे प्रतिनिधी श्री. ए. एम. मस्करन्हास हजर विरुध्दपक्ष एकतर्फा - निकालपत्र– एकतर्फा द्वारा - मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया तक्रारदार श्री. विशाल एस. मोदी, यांनीप्रस्तुत तक्रार कन्झ्युमर्स वेलफेअर असोसिएशन, यांचेमार्फत मंचात ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारदार क्रमांक 2 यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडून मेडिकल हॉस्पीटॅलायझेशन बेनीफीट पॉलीसी क्लेम (वैद्यकिय विमा पॉलीसी) नंबर 131000/34/09/11/00009758 दिनांक 15/02/2006 रोजी घेतली होती. सदर विमा पॉलीसी दिनांक 15/02/2010 ते 14/02/2011 पर्यंत कालावधी करीता घेतली होती त्याकरीता रुपये 4,358/- इतका प्रिमियम भरला होता. तक्रारदार क्रमांक 2 हे दिनांक 21/10/2010 रोजी जिन्याच्या पायरीवरुन उतरतांना पडल्यामुळे डोक्याला व दातांना जबरदस्त मार लागल्यामुळे त्यांना भार्गव मेडिकल सेंटर येथे भरती केले व दिनांक 22/06/2010 रोजी डिस्चार्ज देण्यात आला. तक्रारदार यांनी नमूद केले आहे की, त्यांना एकूण रुपये 46,198/- एवढा हॉस्पीटलचा खर्च आलेला आहे. तक्रारदार यांनी नमूद केले आहे की, गैरअर्जदार यांनी तक्रारदाराचा विमा दावा दिनांक 23/10/2010 रोजीच्या पत्राद्वारे नामंजूर केला. तक्रारदाराने नमूद केले आहे की, गैरअर्जदार यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे. तक्रारदार यांनी मेडिक्लेम रकमेची प्रस्तुत तक्रारीत मागणी केलेली आहे. 2) मंचामार्फत गैरअर्जदार यांना नोटीस काढण्यात आली. परंतु गैरअर्जदार हे मंचात हजर झाले नाहीत व त्यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केलेला नाही. गैरअर्जदार यांना नोटीस मिळाल्याबद्दलची पोचपावती अभिलेखात उपलब्ध आहे. गैरअर्जदार हे मंचात हजर न झाल्यामुळे मंचाने दिनांक 26/05/2011 रोजी प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला होता. तक्रारदार क्रमांक 2 यांनी प्रस्तुत तक्रार प्रकरण सत्य प्रतिज्ञावर दाखल केलेली आहे, तसेच पुरावा व इतर दस्तऐवज दाखल केलेले आहेत. 3) प्रस्तुत प्रकरण दिनांक 14/06/2011 रोजी मंचासमक्ष सुनावणीकरीता आले असता तक्रारदारातर्फे त्यांचे प्रतिनिधी चंद्रशेखर गावकर हजर होते. त्यांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. तसेच तक्रारदारांनी दाखल केलेले दस्तऐवज म्हणजेच तक्रार, सत्य प्रतिज्ञापत्रावरील पुराव्याचे अवलोकन केले असता मंच खालीलप्रमाणे निष्कर्षावर येत आहेत - - निष्कर्ष - प्रस्तुत तक्रार तक्रारदार क्रमांक 1 कन्झ्युमर्स वेलफेअर असोसिएशन यांचेमार्फत तक्रारदार क्रमांक 2, श्री. विशाल एस. मोदी यांनी मंचात दाखल केलेली आहे. तक्रारदार क्रमांक 2 यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडून मेडिकल हॉस्पीटॅलायझेशन बेनीफीट पॉलीसी क्लेम (वैद्यकिय विमा पॉलीसी) नंबर 131000/34/09/11/00009758 दिनांक 15/02/2006 रोजी घेतली होती. सदर विमा पॉलीसी दिनांक 15/02/2010 ते 14/02/2011 पर्यंत कालावधी करीता घेतली होती ही बाब तक्रारदार यांनी दाखल केलेल्या विमा पॉलीसीच्या प्रतींवरुन सिध्द होते. तक्रारदार क्रमांक 2 चा जिन्याच्या पाय-या उतरतांना पडून अपघात झाला व त्यांना डोक्याला मार लागला होता, व त्याकरीता त्यांना भार्गव मेडिकल सेंटर येथे दिनांक 21/10/2010 रोजी भरती करण्यात आले होते, व दिनांक 22/10/2010 रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. भार्गव मेडिकल सेंटर यांच्याकडे तक्रारदार यांना रुपये 3,650/- इतका खर्च आला होता ही बाब तक्रारदाराने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन सिध्द झालेली आहे. तसेच तक्रारदार यांनी रुपये 2,500/- इतका चाचणी करीता खर्च केलेला होता त्याबाबत डॉ. भरत शहा यांनी पावती दिलेली आहे. तक्रारदार यांनी दिनांक 20/10/2010 रोजी डॉ. काळे ऑर्थोडोन्टीक अँण्ड चिल्ड्रेनस डेन्टल क्लिनिक यांना रुपये 20,000/- औषधोपचार घेण्याकरीता दिलेले आहेत त्याची पावती दाखल केलेली आहे. तसेच दिनांक 14/07/2010 रोजी तक्रारदार यांनी गैरअर्जदार यांना विमा कंपनीकडून एकूण रक्कम रुपये 46,198/- चा विमा दावा सादर केला होता. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दिनांक 01/10/2010 रोजीच्या पत्रान्वये सदर विमा दावा खारिज केलेला आहे, व त्यात खारिज करण्याचे कारण नमूद केले आहे ते खालीलप्रमाणे आहे - PTS CLAIM IS REJECTED UNDER CUAUSE I [HOSPITALISATION IS NOT JUSTIFIED AS IT IS OPD PROCEDURE AND PROCEDURE IS DONE ON OPD BASIS]. गैरअर्जदार यांचे तक्रारदार यांचा विमा दावा खारिज करण्याचे कारण संयुक्तीक वाटत नाही. कारण तक्रारदार हे डॉ. भार्गव मेडिकल सेंटरमध्ये 24 तासांच्या वरती भरती होते, व त्यानंतर त्यांनी दातांचे औषधोपचार घेतलेले आहेत. त्यामुळे तक्रारदार याला पॉलीसीच्या कालावधीमध्ये अपघात झाला होता व त्याला रुपये 46,198/- इतका खर्च आला होता व ती रक्कम गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तक्रारदारास द्यावयास पाहिजे होती. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी सदर रक्कम दर साल दर शेकडा 9 टक्के दराने व्याजासह तक्रार दाखल दिनांक 07/04/2011 पासून ते प्रत्यक्ष रक्कम फीटेपर्यंत परत करावी. तसेच सदर तक्रारीच्या खर्चापोटी गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तक्रारदाराला रुपये 2,000/- द्यावेत. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेविरुध्द तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 हे थर्ड पार्टी असल्यामुळे त्यांचेविरुध्द कोणताही आदेश पारित करणे संयुक्तीक वाटत नाही. गैरअर्जदार क्रमांक 2 यांना नोटीस मिळूनही ते मंचात हजर झाले नाहीत व त्यांनी त्यांचा कोणताही जबाब सादर केलेला नाही. त्यामुळे मंचाने तक्रारदार यांनी दाखल केलेला पुरावा व दस्तऐवज व वर नमूद केलेल्या निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहेत – - अंतिम आदेश - 1) तक्रार क्रमांक 77/2011 अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनी यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदाराची वैद्यकिय विमा दावा रक्कम रुपये 46,198/ (रुपये सेहेचाळीस हजार एकशे अठयाण्णव फक्त) दर साल दर शेकडा 9 टक्के दराने तक्रार दाखल तारीख 07/04/2011 पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत तक्रारदाराला द्यावी. 3) गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- (रुपये दोन हजार फक्त) तक्रारदाराला द्यावा. 4) गैरअर्जदार क्रमांक 1 च्या विरुध्द सदर तक्रार खारिज करण्यात येते. 5) सदर आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावी. 6) सदर आदेशाची प्रत नियमाप्रमाणे उभयपक्षांना पाठविण्यात यावी. दिनांक – 14/06/2011 ठिकाण - मध्य मुंबई, परेल. सही/- सही/- (भावना पिसाळ) (नलिन मजिठिया) सदस्या अध्यक्ष मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई एम.एम.टी./-
| [ SMT.BHAVNA PISAL] MEMBER[HONABLE MR. MR. NALIN MAJITHIA] PRESIDENT | |