(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून टायर खरेदी केले. टायरमध्ये उत्पादीत दोष असल्यामुळे त्यांनी गैरअर्जदार यांच्या बरोबर संपर्क साधला, गैरअर्जदार (2) त.क्र.365/10 यांनी टायर परत करताना 5,000/- रुपयाची मागणी केल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी दि.23.01.2010 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून दोन टायर खरेदी केले. दि.29.03.2010 रोजी त्यापैकी 197638 या क्रमांकाच्या टायरमध्ये उत्पादकीय दोष आढळून आल्यामुळे त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे टायर जमा केला. गैरअर्जदार क्र.1 यांनी ते, उत्पादक गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे पाठविले. सदरील टायर परत करताना गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराकडे 5,000/- रुपये भरण्याची मागणी केली. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता, टायरमध्ये उत्पादकीय दोष असून, त्यांनी 3439.47/- रुपये भरल्यास नवीन टायर देण्यात येईल असे कळविले. गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यानंतर सुध्दा 5,000/- रुपये भरल्याशिवाय टायर देता येणार नाही असे कळविले. गैरअर्जदार यांच्या या कृतीमुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून, नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस प्राप्त होऊनही ते उपस्थित राहिले नाहीत, म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला. गैरअर्जदार क्र.2 यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार गैरअर्जदार क्र.1 व अर्जदार यांच्यात झालेल्या व्यवहाराबददल ते अनभिज्ञ आहेत. अर्जदाराच्या वाहनाचे टायर त्यांच्याकडे तांत्रिक पाहणीसाठी आल्यानंतर त्यांनी pre rate basis वर ते बदलून देण्याची तयारी दर्शविली. अर्जदाराकडून pre rate basis वर 3439/- रुपयाची मागणी केली आहे. अर्जदाराकडून रु.5,000/- ची मागणी केली नसल्याचे त्यांनी जवाबात पुढे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार क्र.2 यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे आढळून येते की, अर्जदाराने दि.23.01.2010 रोजी गैरअर्जदार यांच्याकडून अपोलो कंपनीने उत्पादन केलेले दोन टायर, प्रति टायर 11,689/- रुपये दराने खरेदी केले. खरेदी केलेल्या दोन टायरपैकी एका टायरमध्ये दोष आढळून आल्यामुळे त्यांनी ते गैरअर्जदार क्र.1 यांच्या मार्फत गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे तांत्रिक तपासणीसाठी पाठविले. गैरअर्जदार क्र.2 यांनी तांत्रिक तपासणी करुन व अर्जदाराने टायर वापरल्याचा कालावधी लक्षात घेऊन 3439.47/- रुपयाची मागणी करुन जुन्या टायर ऐवजी नवीन टायर देण्याचे मान्य केले. अर्जदाराने टायरबाबत गैरअर्जदार क्र.1 यांच्यामार्फत तक्रार (3) त.क्र.365/10 केलेली आहे. त्यामुळे दि.17.04.2010 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांनी सदरील रकमेच्या मागणीचे पत्र गैरअर्जदार क्र.1 यांच्या नावे पाठविलेले दिसून येते. अर्जदार हे सदरील रक्कम भरुन नवीन टायर घेण्यास तयार होते पण गैरअर्जदार क्र.1 यांनी, त्यांना 5,000/- रुपयाची मागणी केल्यामुळे त्यांनी ती रक्कम भरली नसून मंचात तक्रार दाखल केल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार क्र.1 यांनी मंचात जवाब दाखल केलेला नाही. त्यामुळे अर्जदाराचे म्हणणे मान्य करण्यात येत आहे. गेरअर्जदार क्र.1 यांची ही कृती सेवेतील त्रुटी मानण्यात येत असून, अर्जदाराची तक्रार मान्य करण्यात येत आहे. आदेश 1) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदाराकडून 3439.47/- रुपये स्विकारुन अर्जदारास 15 दिवसात नवीन टायर द्यावे. 2) गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास सेवेतील त्रुटी व मानसिक त्रासाबददल रु.2500/- 30 दिवसात द्यावे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |