::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- १४.११.२०१७)
१. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
२. तकारकर्त्याने दिनांक २८.०९.२०१४ रोजी बजाज फायनान्स लि. यांचेकडुन अर्थसहाय घेवुन सोनी कंपनीचा KLV-31 R422A, Sr. No. 4326429 ३२ इंच टि.व्ही. विरूध्द पक्ष क्र.१ कडुन विकत घेतला. सदर टिव्ही. चा दिनांक २८.०९.२०१४ ते दिनांक २७.०९.२०१५ पर्यंत १ वर्षाचा हमी कालावधी होता. हमी कालावधी दरम्यान सदर टि.व्ही. हा १ महिना व्यवस्थीत होता. त्यानंतर टि.व्ही. मध्ये तांत्रीक बिघाड झाल्याने तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष २ यांचेकडे नविन टि.व्ही. ची मागणी केली असता त्यांनी नविन टि.व्ही. न देता फक्त टि.व्ही. चे पॅनल बदलवुन दिले परंतु उत्पादीत दोष असल्याने बदलवुन दिलेले पॅनल न जुळल्याने टि.व्ही. दुरुस्त झाला नाही. विरुध्द पक्षाने काही दिवस सदर टि. व्ही. वापरा त्यानंतर नविन टि.व्ही. कंपनीकडुन देतो असे आश्वासन दिले. परत टि.व्ही. मध्ये बिघाड झाल्याने वि.प. क्र. १ व २ कडे तक्रारकर्त्याने तक्रार केली असता त्यांनी कंपनीला कळविण्यास सांगीतले म्हणुन दिनांक २०/१२/२०१४ रोजी ई-मेल व्दारे टि.व्ही. बदलवुनदेण्याची विनंती केली असता कंपनीने वि.प क्र. २ चे मदत घेण्याचे निर्देश वि.प. क्र. १ला दिले. वि.प. क्र. २ ने तक्रारकर्त्याला नविन टि.व्ही. देतो असे सांगुन तक्रारकर्त्याचे ४ महिने दिशाभुल केली व सदर टि.व्ही. बदलवुन न देता टि.व्ही. विकत घेतांना दिलेल्या पावतीवरच वि.प. क्र. २ यांनी दिनांक २९.०९.२०१५ ते २८.०९.२०१६ पर्यंत वारंटी लिहुन सदर पावतीवर त्यांनी स्वाक्षरी व सर्व्हीस सेंटर चा स्टॅम्प मारुन दिला परंतु दिनांक २४.०७.२०१६ रोजी सदर टि.व्ही. मध्ये पुन्हा बिघाड आल्याने तक्रारकर्त्याने सदर टि.व्ही. देण्याची विनंती केली. परंतु वि.प. यांनी त्याची दखल घेतली नसल्याने तक्रारकर्त्याने सोनी कंपनीच्या टोल फ्री क्रमांवर दिनांक २०/०९/२०१६, १८.१०.२०१६ व दिनांक ३०.११.२०१६ रोजी तक्रारी केल्या तसेच सदर कंपनीच्या ई-मेल आयडी वर सुध्दा तक्रारी नोदविल्या. परंतु वि.प. क्र. १ ते ३ यांनी सदर तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. वि.प. क्र. २ यांनी दोषयुक्त टि.व्ही. देवुन तक्रारकर्त्याकडे रु. १५,०००/- ची मागणी करुन तक्रारकर्त्याला मानसिक, आर्थिक त्रास दिला. वि.क्र. १ ते ३ यांनी दोषयुक्त टि.व्ही. दिल्याने तक्रारकर्त्याने मंचासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये वि.प. यांनी तक्रारकर्त्याला नविन टि.व्ही. देण्याचा आदेश व्हावा अशी मागणी केली.
३. लेखी तक्रार स्विकृत करुन वि.प. क्र. १ ते ३ यांचे विरुध्द नोटीस काढण्यात आली. वि.प.क्र. १ ते ३ यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर प्रकरणात उपस्थित होवुन वि.प. क्र. १ यांनी त्यांचे लेखी म्हणने दाखल केले व वि.प. क्र. २ व ३ यांनी वि.प. क्र. १ यांचे लेखी कथन म्हणुन स्विकारले व तशी पुरशिस दाखल केली. वि.प. यांनी लेखी कथनामध्ये नमुद केले कि, वि.प. क्र. ३ हि कंपनी असुन वि.प. क्र. १ हे वि.प क्र. ३ चे अधिकृत विक्रेता आहेत व वि.प. क्र. २ हे अधिकृत सर्व्हीस सेंटर आहे. तक्रारकत्याने वि.प क्र. १ कडुन सोनी कंपनीचा टि.व्ही. विकत घेतला. सदर टि.व्ही. चा हमी कालावधी हा खरेदी केल्यापासुन १ वर्षाचा होता व तो दिनांक २७.०९.२०१५ रोजी संपुष्टात आला आहे. तक्रारकर्ता हे दिनांक ०३.१२.२०१६ रोजी २ वर्षाचा हमी कालावधी संपल्यानंतर वि.प क्र. २ कडे आले व त्यांनी सदर टि.व्ही.मध्ये रेखा येत असल्याबद्दल सांगीतले. टि.व्ही. चा हमी कालावधी संपुष्टात आल्याने वि.प.ने सदर टि.व्ही. च्या दुरुस्तीकरीता रु. १०,५३१/- खर्च येणार असल्याचे सांगीतले तसेच दुरुस्ती खर्चाच्या अंदाजपत्रकास तक्रारकर्त्याची मान्यता घेतली. सदर टि.व्ही.मध्ये दिनांक ०३.११.२०१४ व १६.१२.२०१४ रोजी झालेला बिघाड वि.प क्र. २ ने सदर टि.व्ही. हमी कालावधीमध्ये असल्याने विनामुल्य तक्रारकर्त्यास दुरुस्त करुन दिला. तक्रारकर्त्याने दिनांक ०३.१२.२०१६ रोजी सदर टि.व्ही. वि.प. क्र. २ यांचेकडे दुरुस्तीला आणण्यापुर्वी त्रयस्त व्यक्तीकडुन दुरुस्ती करुन घेतला. परंतु हमी कालावधीच्या क्लॉज नं. ३ नुसार सदर टि.व्ही.चा हमी कालावधी संपुष्टात आला आहे व सदर टि.व्ही.चा हमी कालावधी वि.प.ने वाढविलेला नाही. कालावधीमध्ये अनधिकृत त्रयस्त व्यक्तीकडुन काही नुकसान झाल्यास ते सुध्दा हमी कालावधीच्या क्लॉज नं. ३ नुसार बाद केला आहे तक्रारकर्त्यान सदर टि.व्ही.मध्ये कोणताही दोष नाही. तक्रारकर्त्याने सदर टि.व्ही. चा उपयोग करुन घेतला व आता वि.प. कडुन रक्कम उकळण्यासाठी टि.व्ही. मध्ये दोष असल्याचे सांगत आहे. तक्रारकर्त्याच्या सदर टि.व्ही. मध्ये उत्पादीत दोष नाही व टि.व्ही. चा हमी कालावधीसुध्दा संपुष्टात आला असल्याने वि.प. हे तक्रारकर्त्याला नविन टि.व्ही. देण्यास व नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासहखारीज करण्यात यावी.
४. तक्रारदारांची तक्रार, दस्ताऐवज, तक्रारदारांचे शपथपत्र, तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद तसेच विरूध्द पक्ष क्र.१ ते ३ यांचे लेखी कथन, शपथपत्र आणि लेखी युक्तिवाद आणि उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व विरूध्द पक्षांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे
मुद्दे निष्कर्ष
१) तक्रारकर्ता विरूध्द पक्ष क्र.१ ते ३ यांचा ग्राहक आहे काय ? होय
२) वि.प. क्र. १ ते ३ यांनी तक्रारकर्त्यास न्युनतापुर्ण सेवा
दिली आहे काय ? होय
३) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १ ः-
५. तक्रारकर्त्याने दिनांक २८.०९.२०१४ रोजी विरुध्द पक्ष क्र. ३ ने निर्मीत केलेला सोनी कंपनीचा KLV-31 R422A, Sr. No. 4326429, ३२ इंच टि.व्ही. वि.प. क्र. ३ यांचे अधिकृत विक्रेता वि.प. क्र. १ यांचेकडुन रु. ३०,०००/- ला विकत घेतला. वि.प. क्र. २ हे वि.प. क्र. ३ चे अधिकृत सर्व्हीस सेंटर आहे. सदर टि.व्ही. मध्ये हमी कालावधीमध्ये दोष निर्माण झाल्यानंतर तक्रारकर्त्याने सदर टि.व्ही. वि.प. क्र. २ सर्व्हीस सेंटरला दिला होता. या संदर्भात तक्रारकर्त्याने टि.व्ही. खरेदी केल्याची पावती दाखल केली आहे. सदर बाब ही लेखी कथनाथ मान्य केली असल्याने तक्रारकर्ता हा वि.प. क्र. १ ते ३ यांचा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्र. १ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. २ बाबत ः-
६. तक्रारकर्त्याने दिनांक २८.०९.२०१४ रोजी वि.प. क्र. १ कडुन सोनी कंपनीचा टि.व्ही. खरेदी केला. सदर टि.व्ही. खरेदी केल्यापासुन दिनांक २८.०९.२०१४ ते दिनांक २८.०९.२०१५ पर्यंत १ वर्षाचा हमी कालावधी होता. सदर टि.व्ही.मध्ये दिनांक ०३.११.२०१४ व दिनांक १६.१२.२०१४ रोजी झालेला बिघाड वि.प ने सदर टि.व्ही. हमी कालावधीमध्ये असल्याने विनामुल्य तक्रारकर्त्यास दुरुस्त करुन दिला. परंतु तक्रारकर्त्याच्या सदर टि.व्ही. मध्ये दिनांक ०३.१२.२०१६ रोजी रेखा येत असल्याचे तक्रारकर्त्याने वि.प. स सांगीतले. वि. प. यांच्या लेखी कथनात, सदर टि.व्ही. चा हमी कालावधी संपुष्टात आल्याने वि.प. ने सदर टि.व्ही.च्या दुरुस्तीकरीता रु. १०,५३१/- खर्च येणार असल्याचे सांगीतले. तसेच दुरुस्ती खर्चाच्या अंदाजपत्रकास तक्रारकर्त्याची मान्यता मागीतली असे नमूद आहे. यावरून सदर टी.व्ही. मध्ये आलेला दोष हा दुरुस्त करण्यायोग्य आहे, हे सिध्द होते. तक्रारीमध्ये दाखल केलेल्या टि.व्ही. खरेदी केलेल्या दिनांक २८.०९.२०१४ रोजीच्या पावतीचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते कि त्यावर विरुद्ध पक्ष क्र. २ ने “ONE YEAR PANEL WARRANTY 28.09.2015 TO 28.09.2016” असे लिहून त्यावर वि. प. क्र. २ ने शिक्का व सही दिली आहे. यावरून वाढीव हमी कालावधी दिला आहे हे सिध्द होते. सदर टि.व्ही. हा दिनांक २४.०७.२०१६ रोजी वाढीव हमी कालावधीमध्ये बिघडल्याने वि.प. हे सदर टी. व्ही. विनामूल्य दुरुस्त करुन देण्यास जबाबदार आहेत, असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने सदर दोषाबाबत वि. प. यांना लेखी व तोंडी तक्रार करुन देखील टी.व्ही. दुरुस्त करुन दिला नाही. सदर टि.व्ही. मध्ये आलेला दोष हा दुरुस्त करता येतो हे तक्रारीत दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन सिध्द होते असे मंचाचे मत आहे. तसेच वि. प. यांनी सदर दोष विनामूल्य दुरुस्त करुन देण्यास नकार दिला. तक्रारकर्त्याने वाढीव हमी कालावधीमध्ये टि.व्ही. अनधिकृत त्रयस्त व्यक्तीकडे दुरुस्तीकरीता नेला होता असे वि.प.चे कथन आहे परंतु तक्रारकर्त्याने सदर टि.व्ही. तो कोणाकडे दुरुस्तीकरीता दिला व केव्हा दिला होता ही बाब दस्ताऐवजासह सिध्द केली नसल्याने ग्राह्य धरण्यायोग्य नाही. सदर टि.व्ही. वाढीव हमी कालावधी असताना सुद्धा वि.प. यांनी तक्रारकर्त्यास विनामूल्य दुरुस्त करण्यास नकार देवुन तक्रारकर्त्यास न्युनतापुर्ण सेवा दिली, हे सिद्ध होते. सबब मुद्दा क्रं. २ व ३ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. ३ बाबत ः-
७. मुद्दा क्रं. १ व २ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(१) तक्रारकर्त्याची तक्रार क्र. ३३/२०१७ अंशत: मान्य करण्यात येते.
(२) वि.प.क्र. १ ते ३ यांनी तक्रारकर्त्यास न्युनतापुर्ण सेवा
दिली आहे ही बाब जाहीर करण्यात येते.
(३) वि.प. क्र. १ ते ३ यांनी वैयक्तीक व संयुक्तिकपणे विरुध्द पक्ष क्र. ३ ने निर्मीत केलेला सोनी कंपनीचा KLV-31 R422A, Sr. No.
4326429, ३२ इंच टि.व्ही. या आदेश प्राप्त दिनांकपासून ३०
दिवसांच्या आत तक्रारदारास विनामूल्य दुरुस्त करुन सुस्थितीत
द्यावा.
(४) वि.प. क्र. १ ते ३ यांनी हमी कालावधीमध्ये असलेले दोष निवारण करण्याची जबाबदारी स्वीकारल्यामुळे सदर दोषाचे निवारण विहित कालावधीमध्ये करुन न्युनतापुर्ण सेवेची पुनरावृत्ती न करण्याचे निर्देश ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम १४ (फ) अन्वये वि.प. क्र. १ ते ३ यांना देण्यात येतात.
(५) उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
(६) आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
अधि.कल्पना जांगडे(कुटे) अधि.किर्ती गाडगिळ(वैदय) श्री उमेश वि. जावळीकर
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष